बघण्याचा कार्यक्रम ,चविष्ट कांदेपोहे आणि यशस्वी अरेंज मॅरेज

आईने प्रियाचे केलेले कोडकौतुक ऐकून मोहन तिच्या प्रेमात पडतो आणि बघण्याच्या कार्यक्रमात चविष्ट पोहे खाऊन तिच्यावर लट्टू होतो. ईश्वराने दिलेला इशारा मोहनला समजतो व नंतर हा लक्ष्मीनारायणाचा जोडा लग्न बंधनात अडकतो.


       " अरे प्रसाद, मुलगी अगदी नक्षत्रासारखी सुंदर आहे. शिवाय तिचे शिक्षणही उत्तम आहे. फक्त उंची जरा कमी वाटते. पण एवढी तडजोड केली तर हे स्थळ मला १००% पसंत आहे.शिवाय तिचे आई-वडीलही सुसंस्कृत वाटले. अरे तिच्या हातचे कांदेपोहे खाऊन तर आम्ही तृप्त झालो आणि तिने केलेला चहा तर अमृततुल्य होता." अलकाताई मुलगा मोहनला सांगत होत्या.

      "हा ,काहीही बर का आई तुझं!कांदे पोहे आणि चहा तिने केलेलाच नसेल. कदाचित तिच्या आईने आधीच सर्व करून ठेवले असेल." मोहन म्हणाला.

         "नाही रे! आमच्या समोरच ती आईला म्हणाली, "आई तू बोल पाहुण्यांशी. मी चटकन करून आणते सर्व." माझ्या बाळा, आता तरी हे स्थळ सोडू नये असं मला वाटतं. हे बघ तू म्हणाला होतास ना की मला इंजिनियर बायको हवी आहे तर मग हीचे शिक्षणही तेच आहे.शिवाय तिचे संस्कारही आपल्या घराला साजेसे वाटले.कारण आल्याबरोबर आणि जातानाही ती आमच्या पाया पडायला संकोचली नाही आणि तसे तिला कोणी सांगितले नाही. तेव्हा या मुलीला तरी तू बघायला जावे असे तुझ्या बाबांना व मला वाटतं .तेव्हा राजा जाशील ना?"

         "थोडा थांब . मला विचार करू दे. माझ्यामागे परत तगादा लावू नको. अंतिम निर्णय मी आणि फक्त मीच घेणार. आतापर्यंत जसा घेत आलो ना तसाच!"मोहन म्हणाला.

            खरंतर मोहनच वय आता तीस वर्षे झालं होतं. याआधीही त्याला अनेक स्थळे येऊन गेली होती.पण कधी फोटो,कधी शिक्षण, कधी घराणे यांसारख्या बाबींवरून लग्न जमत नव्हते. कारण कुठलीही तडजोड करण्यासाठी मोहन तयारच होत नव्हता.पण हे स्थळ मात्र मोहनच्या आई-बाबांना मनोमन पटलं होतं आणि आता तरी ही संधी सोडू नये व योग्य वयात मुलाचे लग्न करून त्याचे आयुष्य रुळावर यावे असे त्यांना वाटत होते. 

          प्रियाला पाहून आल्यापासून त्या दोघांच्याही चेहर्‍यावर विशेष आनंद झळकत होता.प्रियावर स्तुतिसुमने उधळून , तिची प्रशंसा करून, ते अजिबात थकत नव्हते.या आधीच्या स्थळांसाठी मोहनचे आईवडील कधीही एवढे उत्साहित नव्हते. मग या स्थळासाठीच का?असा प्रश्न मोहनला पडायचा. शिवाय आईने प्रियाने केलेल्या पोह्यांचे कौतुक( अगदी त्यात तळल्या गेलेल्या खमंग शेंगदाण्यापासुन ते त्यात असणार्‍या साखरेच्या प्रमाणापर्यंत )मोहन विसरला नव्हता.शिवाय तिच्या उंचीत तडजोडही करावी लागेल. ती दिसायला सुंदर आहे असे म्हणतात, पण माझ्या मनाला ती खरच भावेंल का ?असे असंख्य विचार मोहनच्या डोक्यात रेंगाळत होते.असेच दोन दिवस गेले.

       आज ना उद्या एखाद्या मुलीला पाहायला जावेच लागेल मग जाऊ हीला बघायला, असा विचार त्यांने केला.तिसऱ्या दिवशी मुलीला बघायला जातो असे मोहनने वडिलांना सांगितले व त्यानुसार प्रियाच्या घरच्यांना कळवले.एकीकडे मोहनच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता तर दुसरीकडे त्यांना आश्चर्यही वाटत होते, कारण कुठलीही तडजोड करायला तयार असणारा त्यांचा मुलगा आज चक्क स्वतःहून मुलीला बघण्यासाठी तयार झाला होता. एकीकडे मनाची घालमेल ,लाजराबुजरेपणा तर दुसरीकडे पहिल्यांदाच एखाद्या मुलीला पाहायला जायचे म्हणून टेन्शन अशी द्विधा मनस्थिती त्याला सतावत होती.

    मोहनने प्रसादला ( आपल्या जिवलग मित्राला) फोन लावला.

" अरे पश्या, चल बरं गाडी काढ तुझी."

"अरे मोन्या काय झालं सर्व ओके ना?"

"अरे सर्व ओके आहे. मला मुलगी बघायला जायचे आहे.आई-वडिलांनी तगादा लावला आहे, मग म्हटल जातो. लग्न काय आज, उद्या करायचेच आहे, मग म्हटलं आज जाऊ एक पाऊल पुढे, म्हणजे मुलगी बघायला!"

"अहा मोन्या, पोरगी पटलेली आहे वाटतं तुला. एवढे दिवस बरा गप्प होतास. आजची ही पोरगी न बघताच पसंत पडली वाटतं तुला. एवढा सहजासहजी तर तू आधी कधी तयार झाला नव्हता."

 "बास! झालं का तुझं चिडवून? बरं चल मग येतोयस ना?" 

"अभी हाजिर होता हू ना बॉस! ये सवारी आप के खिदमत मे अभी पहुंच जायेगी जहापना!"

"अरे,ड्रामेबाज!आता काय बोलण्यातच वेळ घालवणार आहेस का ?आपल्याला लांब जायचे आहे."

"अय्यो, केवढी ही बेताबी !मोन्या ,मला नव्हतं माहित तू खरंच एवढा रोमँटिक आहेस ते. मुलगी असतो ना तर तुझ्याशीच लग्न केलं असतं मी!"

"बर जाऊदे.येतोस का तू की मी एकटा जाऊ?"

"नाही ना बॉस. हे काय आलो लगेच!"

         प्रसाद मोहन च्या घरी पोहोचला आणि दोघेही प्रियाला बघण्यासाठी निघाले. गाडी सुरू असतानाच प्रसादने मोहनचा रोमँटिक मूड राहण्यासाठी गाण्यांचा रोमँटिक मोड सिलेक्ट करून सीडी प्लेयर चालू केला. मोहनही कधी नव्हे ते आज आकंठ बुडून अगदी तन्मयतेने ही गाणी ऐकत होता. आज आपल्याला खरच काय झालंय हे त्यालाही कळत नव्हते. कदाचित आपल्या आईने प्रियाचे जास्तच कोडकौतुक केले म्हणून तर ती मला आत्ताच भावली नाही ना? का माझे मन तिला बघण्यासाठी आतुरले आहे? खरच ती माझी स्वप्नसुंदरी असेल का? अशा रोमांचक विचारांच्या तंद्रीत प्रवास केव्हा संपला हे मोहनला समजलेही नाही.

(प्रियाच्या घरी)

प्रियाचे वडील म्हणाले,"तुमचे नाव सांगा."

"मोहन किसन पाटील."

"शिक्षण काय आणि काम काय करता?"

"मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे आणि एका नामांकित एम एन सी मध्ये असिस्टंट मॅनेजर आहे."

"बर.प्रिया ,बेटा ये आता कांदेपोहे घेऊन."

        प्रिया येते. हळूच मोहन च्या समोरच्या खुर्चीत बसते. तिच्या चेहऱ्यावर हलकासा कटाक्ष टाकत मोहनच्या नजरा तिथेच खिळतात, पण लगेच स्वतःला सावरत तो आपली नजर प्लेटमधील पोह्यांकडे वळवतो. कधी नव्हे ते आज मोहनने असे पोहे पहिल्यांदाच खाल्ले होते आणि तिच्या पोह्यांचे आई एवढं कौतुक का करत होती हे त्याला आज चांगलंच समजलं होतं. त्याने पोह्यांवर यथेच्छ ताव मारला व तिच्या हातचा अमृततुल्य चहा पिऊन तो अगदी तृप्त झाला.एक वेगळाच उत्साह त्याच्यात संचारला."

प्रियाची आई म्हणाली ,"तुम्हाला दोघांना एकांतात बोलायचे असेल तर वरती खोलीत जाऊ शकता."

दोघेही (प्रिया व मोहन) वर जातात.

"तुम्हाला स्वयंपाकाची आवड दिसते."

"हो. अगदी आठवी-नववी पासूनच मी माझी पाक कलेची आवड जोपासली आहे."

"पोहे कोणी शिकवले?"

"माझ्या आईने. विशेष म्हणजे आईने बनवलेल्या याच पोह्यांवर माझे बाबाही पहिल्याच भेटीत लट्टू झाले होते व नंतर त्यांचे लग्न जमले."

"अरे वा छानच की! खरंच तुमच्या आईने अगदी परफेक्ट पोहे तुम्हाला शिकवले आहेत."

"माफ करा.पण आपण फक्त पोह्यांवरच बोलणार आहोत का?"

" नाही. तुम्ही बोला. तुमच्या अपेक्षा, तुमचे विचार सांगा मला. लेडीज फर्स्ट!"

"हे बघा मी एक महत्त्वाकांक्षी मुलगी आहे. माझे वडील खासगी कंपनीत कामगार आहेत.ऐपत नसतानाही त्यांनी मला इंजिनियर केले. म्हणून लग्नानंतर मला जॉब करायचा आहे .तसेच मास्टर्स आणि पी एच डी ही करायची आहे.एक सून म्हणून घरातील जबाबदाऱ्या पार पाडत ,मला बाहेरच्या जगात एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे. एवढीच माझी इच्छा आहे. दिसण्याच्या बाबतीत माझी शरीरयष्टी सुबक असली तरी माझे बुटके पण मी कायम जपले आहे.मला वाटलं तर मी हिलची सॅंडल घालते किंवा बऱ्याचदा घालतही नाही. त्यामुळे मी जशी आहे तशी तुम्ही मला स्वीकारलं तर बरं होईल .कारण मला मी आहे तशीच खूप आवडते."

      मोहन तर बघतच राहिला. खमकी आत्मविश्वासाने प्रियाने मोहनला केव्हाच जिंकले होते. प्रत्येकाचे शरीर ही देवाची नैसर्गिक देणगी असते आणि ती आहे तशीच जपणे ही इच्छा कोणाचीही असू शकते,हा नवा विचार त्याच्या मनात आता रुजला होता.

"अहो, कुठे हरवलात?"

"काही नाही. बोला ना तुम्ही."

"तुम्हाला मला काही विचारायच आहे का?"

एव्हाना मोहनला प्रिया सर्वार्थाने उमगली होती म्हणून केवळ मान डोलावून त्याने नाही असे म्हटले.

        बघण्याचा कार्यक्रम उरकल्यावर मोहन थेट घरी गेला.आई-वडिलांना एक वेगळीच चमक त्याच्या चेहर्‍यावर दिसली व जे समजायचे ते त्यांना समजले. अशा रीतीने प्रियाचा बघण्याचा कार्यक्रम, चविष्ट कांदेपोहे यांचे रूपांतर थेट यशस्वी अरेंज मॅरेज मध्ये झाले. म्हणजे बघा ना ! जोपर्यंत आयुष्यात आपण एखादा अनुभव घेत नाही , तोपर्यंत आयुष्याला वेगळी कलाटणी मिळत नाही. मोहनने प्रियाला बघायला जायचे एकाएकी ठरवले आणि त्याच्या लग्नाचा प्रश्न मार्गी लागला. कारण त्याच्या आईवडिलांनी प्रियाचे सुयोग्य वर्णन केल्याने मोहन आधीच तिच्यावर लट्टू झाला होता. म्हणजे देवाने दिलेला इशारा मोहनला बहुधा समजला असावा. त्यामुळेच ही मेड फॉर इच ओदर जोडी लग्न बंधनात अडकली.

समाप्त.