पहिली भेट सासू सुनेची

पहिलीच भेट एका रशियन सुनेची तिच्या भारतीय सासूबाईशी


लंडनला नौकरी करणाऱ्या पार्थने दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमधे राहल्यावर त्याच्या गर्लफ्रेंड एलिना सोबत लग्न करायचं ठरवलं. पण कोरोना बाबा अवतरले. त्यांना लग्न करायला भारतात परतता आलं नाही. एलिना दोन महिन्याची गर्भवती आहे हे समजताच पार्थच्या आई, दुर्गाने त्यांना लग्न उरकून टाकायचा सल्ला दिला.

2022 मधे हळूहळू सर्व परिस्थिती सामान्य झाली. पार्थने आईला भेटायला स्वदेशी परतायचं ठरवलं. येण्या जाण्याची सर्व तिकिटं झाली. परंतु ऑफिसमधे एक नवीन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट आला आणि त्याला तिथेच थांबावे लागले. पार्थची अडचण समजून दुर्गाने त्याला सुन व नातवाला तरी पाठव असे सांगितले. भारतीय सासू बद्दल चित्रपट व पुस्तकांद्वारे विविध माहिती गोळा केलेल्या रशियन मुलगी एलीनाला एकटं सासूला भेटायला जायचं म्हणजे अग्नीपरीक्षाच वाटली.

"खरंच हिंदी चित्रपटात दाखवतात तशी खाष्ट सासू निघाली तर किती छळ करेल ती माझा. तिच्या एकुलत्या एक मुलाला मी परदेशीं अडकवून ठेवलं म्हणून माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेऊन मला घरातून बाहेर काढून दिलं किंवा एखाद्या अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं तर?

सासूबाईला समजून सांगायला. माझी बाजू घेऊन माझी सुटका करायला, माझं कोणी ओळखीचं किंवा पार्थही सोबत नाही."

या विचाराने तिला धडकी भरली. तेही त्यांची पहिलीच भेट. पण नाईलाज होता कारण पार्थला आजी आणि नातवाची भेट करून द्यायची होती.

एलिना भारतात गेली. पुणेच्या एअरपोर्टवर स्वतः दुर्गा तिला घ्यायला आली. एलिना रीतसर वाकून दुर्गाचा आशीर्वाद घ्यायला पुढे झाली तर दुर्गा तिला मिठीत घ्यायला. दुर्गाने स्वतःला तोल जाऊन पडता पडता कसंतरी सावरलं व डोक्यावर हात मारला. मग दीड वर्षाच्या नातू, जयला जवळ घेऊन त्याचे खूप खूप पापे घेतले.

पुणे वरून साताऱ्याला जायला ते रेल्वेत बसले. जय रडू लागला. त्याला भूक लागली होती. सासूबाईच्या विचारात एलीना त्याला विसरूनच गेलेली. तिने घाईघाईत बॅग मधून सेरेलॅक काढलं. पण ते मिक्स करायचा डबा तिला दिसत नव्हता. तिला वाटलं दुर्गा आता सर्व प्रवाशांसमोर तिला खूप उणंदुणं बोलणार. म्हणून तिची आणखीच घाबरगुंडी उडली. मात्र दुर्गाने एक छोटी स्टीलची वाटी व चमचा तिच्या पुढे केला. तिचा घाबरलेला चेहरा बघून दुर्गाने स्वतःच सेरेलॅक वाटीत घेऊन थर्मास मधील गरम पाणी घेऊन मिक्स केलं व एलिनाला दिलं.
जणू नजरेनेच ती एलिनाला म्हणत होती, "घाबरू नकोस. मी हिंदी चित्रपटातील अत्याचारी सासूबाई नाही."

एलिनाने जयला सेरेलॅक खाऊ घातलं. पोट टमटम झाल्यावर तो छान खेळु लागला तेव्हा दुर्गाने त्याला जवळ घेतलं. एलिना राहून राहून चोर नजरेने नातवाला खिडकीतून बाहेरचे नजारे दाखवण्यात गुंग असलेल्या दुर्गाकडे बघत होती. तिला हायसं वाटलं. तिच्या सासूबाईचं प्रेमळ, समंजस रुप बघून तिचं भीतीने फडफडणारं हृदय हळूहळू शांत झालं. तिच्या मनात भारतीय सासू बद्दलचा जो पूर्वग्रह निर्माण झाला होता तो आता पूर्णपणे संपुष्टात आला व या दूरदेशीही तिला आपल्याला जीवापाड जपणारे कोणीतरी आहे याची जाणीव झाली.

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार