Feb 28, 2024
प्रेम

पहिली भेट

Read Later
पहिली भेट

दिवस होता पंधरा जुलै २०१८...मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास मला हलक्या हलक्या प्रसूतीकळा यायला सुरुवात झाली. पहिलंच बाळंतपण असल्यामुळे मला आधी समजलच नाही या नक्की त्याच वेदना आहेत की मला भास होतोय म्हणून थोडा वेळ तशीच गुपचूप पडून राहिले. पहाटे पाच नंतर थोडा जास्तच त्रास जाणवू लागला,आईला समजले बरोबर ती म्हणाली की  दवाखान्यात जावं लागेल

कारण माझे नऊ महिनेही व्यवस्थित भरले होते आणि आता खरंतर मी खूप अधीर झाले होते बाळाला बघण्यासाठी☺️...

पण बाळाला बघण्यासाठी या भयंकर वेदनांचं इंद्रधनुष्यही पेलायचं होतं..अजून तर सुरुवातच होती तरी मी जरा बिथरून गेले होते. पण आईने धीर दिला. जुलै महिना त्यामुळे नाशिकला मुसळधार पाऊस सुरू होता. गोदावरीमाय दुथडी धरून वाहत होती,तिला पूर आला होता.

गाड्या मिळणं मुश्किल, काका आठ किलोमीटर अंतर कापून कसेबसे रिक्षा घेऊन पोहचले आणि आम्ही सातच्या सुमारास सगळ्या तयारीनिशीच दवाखान्यात पोहचलो कारण दवाखाना ते घर हे अंतरच जवळपास दहा किलोमीटर होते आणि त्यात पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी.

डॉक्टरने ऍडमिट करून घेतले, तपासणी करता समजले की अजून सहा ते सात तास तरी लागतील डिलिव्हरीला..मग वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता.नवऱ्याची खूप आठवण येऊ लागली.तोही लगेच निघाला ऍडमिट करताच पण दुसऱ्या राज्यात असल्यामुळे त्याला यायला कमीत कमी दहा तास तरी लागणार होते. त्याने धावत पळत सकाळी नऊ वाजेची बस पकडली. त्याचाही जीव टांगणीला लागला होता..अंतर कापलं जात नव्हतं.त्याचं नशीब प्रवासाच्या बाबतीत फारच वाईट आहे म्हणजे नेहमी प्रवासात त्याला खूप त्रास होतो मग तो ट्रॅफिकचा असो,गर्दीचा किंवा गाडी बिघडण्याचा.. त्यादिवशीही तसंच झालं.पावसामुळे दहा बारा किलोमीटर इतकी ट्रॅफिक , गाड्यांच्या दूरच दूर रांगा.गाडी एक तासात अर्धा किलोमीटरही पुढे सरकत नव्हती.तशी त्याची चिडचिड वाढत होती पण पर्याय काहीच नव्हता. इकडे हळूहळू माझ्या वेदना तीव्र होत होत्या.दुपारी चारच्या सुमारास डॉक्टर म्हणाले वेळ आली आहे आणि अर्ध्या तासात होईल बाळ जर मी साथ दिली तर.. खरंतर आनंद झाला होता की लवकर या वेदनेतून बाहेर पडणार आहे पण दुःखही होतं की बाळाच्या बाबाला त्याला सगळ्यात आधी बघायचं होतं पण तो तर अजून अर्ध्या रस्त्यातही पोहचला नव्हता.

अखेर चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी माझी नैसर्गिक प्रसूती झाली आणि माझ्या बाळाच्या रडण्याचा आवाज माझ्या कानी आला. माझे आनंदाश्रू भरभरून वाहू लागले.म्हणतात ना जन्मदिवस हा एकच दिवस असतो ज्या दिवशी बाळ रडते तेव्हा आई हसते.

नवऱ्याला आणि मला दोघांनाही मुलीची खूप हौस..डॉक्टरने मला कपड्यात गुंडाळलेलं माझं गुबगुबीत आणि गोरेपान बाळ दाखवलं पण मी एकदाही विचारलं नाही की मुलगी आहे की मुलगा ..मला मूलगीच हवी होती हे डॉक्टरलाही माहीत होते म्हणून त्या मला म्हणाल्या "तू विचारलं ही नाही मुलगा आहे की मुलगी...(हसतच)तीन चार वर्षाने परत यावं लागेल गं तुला माझ्याकडे" मी समजून गेले की मुलगा आहे.

बाहेर माझी आई वाट बघत होती,बाळाला हातात घेताच तीही आनंदाने वेडी झाली.आईने आधी फोनवर पिल्लुच्या बाबांना कळवले आणि ऐकून अक्षरशः तो बसमध्ये आनंदाने उडया मारत होता.आता आम्ही ते सगळं आठवून खूप हसतो पण तो क्षणच असा असतो की भावनेच्या भरात आपण वाहवत जातो. सासुसासरेही एका जवळच्या लग्नासाठी बाहेरगावी होते.. लग्न आटपून निघाले होते पण पाऊस आणि ट्रॅफिक मुळे तेही वेळेवर पोहचू शकले नाही.घरी दोन्हीकडे सगळे वाट बघत होते की कधी पिल्लुला बघायला मिळेल.मला जनरल वॉर्डला शिफ्ट करण्यात आलं आणि बाळाला माझ्या हातात दिलं. फोनवर नवऱ्याचा आवाज ऐकला आणि मी ऑक्सबोक्शी रडू लागले.."लवकर ये" याव्यतिरिक्त एक शब्दही बोलता आला नाही मला त्याक्षणी.. बाळाचं ते देखणं रूप बघून मी स्वतःच विचार करत होते की इतकं गोड लेकरू नक्की माझंच असेल ना..

आईला अगदी सगळीकडून फोन वर फोन येत होते की जमलं तर फोटो पाठवा बाळाचा. डॉक्टरला विचारले असता डॉक्टर म्हणाले दुरून काढा आणि फ्लॅशलाईट बंद करून मगच काढा. आम्ही त्याचा पहिला फोटो काढला आणि घरच्या सगळ्या मंडळीला पाठवला.बरोबर आहे की नवजात बाळाचे लगेच फोटो काढू नये वगैरे वगैरे पण पहिल्या दिवसाची आठवण म्हणून एक छायाचित्र टिपणं मला तरी वावगं वाटत नाही. सासरी अतिशय म्हातारी माणसंही आहेत माझ्या पिल्लुचे चुलतआजोबा वगैरे किंवा जे दूर राहतात आणि लगेच प्रवास करू शकत नाही त्यांनी फोटोत बघूनच बाळाला भरभरून आशीर्वाद दिले.

सगळ्यांचे फोन सुरू होते, आपुलकीने सगळे चौकशी करत होते.. मित्र परिवार,नातेवाईक शुभेच्छांचा वर्षाव करत होते पण माझं मन कशातच लागत नव्हतं कारण आता रात्रीचे नऊ वाजून गेले होते तरीही नवरा सापुतारा घाटात ट्रॅफिक मध्ये अडकलेला होता. बाळाने पहिली सु, शी केली, दुध प्यायलं.. दोन झोपही झाल्या त्याच्या..तोवर पावसात चिंब भिजलेले सासू सासरे कसेबसे येऊन पोहोचले.

सगळं निर्जंतुकीकरण करून मग नवीन आजी आजोबांनी बाळाला पहिल्यांदा हातात घेतलं. आजी तर आहेच हळवी पण आजोबाही त्यादिवशी हळवे झाले.एक शब्दही न बोलता ते डोळ्यातून नातवाशी भरभरून बोलत होते . म्हणतात ना दुधापेक्षा दुधावरची साय प्यारी असते तसंच काहीसं.. पिल्लुच्या आजी आजोबांनी छान वेळ घालवला आम्हा दोघांसोबत.. अखेर रात्री सव्वा बाराच्या सुमारास पिल्लूचे बाबा पोहचले.आधी मला तब्येतीबद्दल विचारले, पूर्ण शहानिशा केली की मी पूर्णपणे व्यवस्थित आहे.

त्याला अक्षरशः एक क्षणाचाही  विलंब करायचा नव्हता बाळाला हातात घेण्यासाठी पण डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे त्यानेही पूर्ण काळजी घेतली आणि अलगद मी बाळाला त्याच्या हातात ठेवले..त्याच्या बाबांचा आवाज ऐकला तसं बाळाने त्याच्या इवल्याश्या मुठीत बाबांचं बोट घट्ट धरून ठेवलं.जसा तोही याच क्षणाची वाट बघत होता.  मी गर्भसंस्कारांचे पालन केले होते आणि त्यात आईइतकंच बाबाचंही योगदान महत्वाचं असतं. ऐकणाऱ्याला अतिशोयोक्ती वाटेल कदाचित पण माझा नवरा तासनतास पोटात असताना बाळाशी गप्पा मारायचं जसं तो समोर आहे.न जाणे का असं वाटलं त्याने त्याच्या बाबांचा आवाज ओळखला. तो स्पर्श, तो क्षण, तो आनंद आम्ही दोघेही आयुष्यात पहिल्यांदा अनुभवत होतो.आम्ही दोघेही बाळाकडे बघून अक्षरशः रडत होतो सोबत हसतही होतो.नवऱ्याचा पंधरा तास प्रवास करून आल्याचा सगळा थकवा त्या एका क्षणात कुठेतरीच दूर पळून गेला.ती रात्र तो पूर्णवेळ फक्त एकटक बाळाकडे बघत बसला होता.पूर्ण रात्र त्याने जागून बाळाची काळजी घेतली आणि मला पुरेपूर आराम दिला.

अशी माझ्या बाळाची त्याच्या बाबाशी पहिली भेट..अविस्मरणीय आणि अतुलनीय..आज दोन वर्षे होत आली आमचं बाळ, 'अश्वथ' आमच्या आयुष्यात येऊन पण तो दिवस आजही डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//