पहिली भेट भाग २

Story of a friendship

मागील भागात आपण बघितलं, जान्हवी तिचा मित्र श्रीराजला पहिल्यांदाच भेटायला जाणार असते, जान्हवी तिची आणि श्रीराजची मैत्री कशी झाली हा प्रवास रुचीला सांगत असते, आता बघुयात त्यांचा पुढील प्रवास,

जान्हवी--- फेसबुकवर माझे ओळखीचे मोजकेच फ्रेंड्स होते, मला वाटायचे फेसबुकवर वेळ घालवणे म्हणजे रिकामटेकडे पणाचे लक्षण आहे म्हणूनच मी कधीही ५ ते १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ फेसबुकवर घालवला नाही, थोड्या कालावधीनंतर मी आठवड्यातून एखाद्या वेळेस जर वेळ भेटला तर फेसबुक उघडायचे.

रविवारचा दिवस होता,सुट्टी असल्याने निवांत गादीवर लोळत पडले होते, हातात मोबाईल घेतला व नेट चालू केले, मोबाईलवर माझ्या एका शाळेतल्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्याचे नोटिफिकेशन आले, फेसबुकची मला सर्वांत जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे कोणाचेही वाढदिवस आपल्याला लक्षात ठेवावे लागत नाही. मी माझ्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फेसबुक उघडले व तिला शुभेच्छा दिल्या, तर बघितलं की फेसबुकवर मॅसेज आलेला होता मी तो मॅसेज बघितला तर तो मॅसेज श्रीराज देशमुखचा होता, नाव वाचल्यावर असे वाटले की हे नाव आपण कुठेतरी ऐकले आहे, नाव ओळखीचे वाटल्यामुळे मॅसेज वाचायला घेतला,

श्रीराज--- हाय जान्हवी, मला ओळखलस का? आपण कधीही प्रत्यक्षपणे भेटलेलो नाही पण तुझे नाव मी माझ्या आई पप्पांकडून नेहमीच ऐकत आलोय. आशा करतो की तुपण माझे नाव ऐकले असशील. मी तुझ्या बाबांना भेटलोय पण तुला भेटण्याचा योगच आला नाही. मागच्या महिन्यातच आई पप्पांसोबत तुझ्या घरी जाणे झाले तेव्हा मला कळले की तु MBBS ला प्रवेश घेतलास.घरून जाऊन आल्यावर तुला फेसबुकवर शोधलं आणि तुला फ्रेंड रिकवेस्ट पाठवली, १५ दिवस झालेत पण तु रिकवेस्ट स्विकारली नाहीस म्हणून मॅसेज केला. तुला माहीतच असेल पण तरी सांगतो, मी 3rd yr MBBS ला मुंबईच्या कॉलेजमध्ये आहे. तुला जर अभ्यासात काही अडचण आली तर माझी मदत होईल याच हेतुने मी तुला फ्रेंड रिकवेस्ट पाठवली. तुझी इच्छा असेल तरच फ्रेंड रिकवेस्ट स्विकार. माझी जबरदस्ती नाहीये.

मॅसेज वाचल्यावर मला आठवले की आईने सांगितले होते, देशमुख काका काकू आणि श्रीराज घरी येऊन गेल्याचे, त्यांनी माझी चौकशी पण केली होती. मी लगेच रिकवेस्ट बॉक्स बघितला,तर खरंच १५ दिवसांपूर्वी श्रीराजची फ्रेंड रिकवेस्ट आलेली होती, मी पटकन ती स्विकारली व श्रीराजला मॅसेज केला, हाय श्रीराज, मी तुला ओळखणार नाही असे होऊच शकणार नाही. मी माझ्या बाबांकडून तुझ्या अभ्यासातील प्रगतीबद्दल नेहमीच ऐकत आले आहे, तु शिक्षणासाठी घरापासून दूर राहत असल्यामुळे आपली कधी भेटच झाली नाही, आणि आईने सांगितले होतं तुम्ही घरी येऊन गेल्याचे, आणि हो तुला जर अस वाटत असेल की मी मुद्दाम तुझी फ्रेंड रिकवेस्ट स्विकारली नाही तर तुझा माझ्याविषयी खूप मोठा गैरसमज झाला आहे. मी फेसबुकचा जास्त वापर करत नाही, मागच्या आठवड्यात परीक्षा असल्यामुळे मला फेसबुक बघायला वेळच भेटला नाही.तुला राग आला असेल तर मला माफ कर.

श्रीराज ऑनलाइन नसल्यामुळे मॅसेजला उत्तर काही लगेच आले नाही. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एका मुलाला मॅसेज केला होता पण का कुणास ठाऊक मी आतुरतेने त्याच्या उत्तराची वाट पाहत होते.दुपारी पुन्हा फेसबुक उघडले तेव्हा श्रीराजचा मॅसेज आला होता,

श्रीराज--- खरंच माझा तुझ्याविषयी खूप मोठा गैरसमज झाला होता, मला वाटले तू मुद्दाम माझी फ्रेंड रिकवेस्ट स्विकारली नाहीस. तुला फेसबुक वापरायला आवडत नाही वाटतं. Thanks for accepting my friend request.

श्रीराज ऑनलाइन दिसल्याने मी लगेच मॅसेज केला

जान्हवी---आतातरी तुझा गैरसमज दूर झाला ना. मला फेसबुक वापरायला नाही आवडत, माझ्यामते फेसबुक वापरणे रिकामटेकड्या लोकांचे काम आहे आणि शिवाय त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकते.

श्रीराज--- तु खूपच अभ्यासू दिसतेस, पप्पांनी कल्पना दिली होतीच. पप्पांना सांगू नकोस की मी फेसबुक वापरतो नाहीतर मोबाईल काढून घेतील.

जान्हवी--- काकांना खूपच घाबरतो का? काळजी नको करुस नाही सांगणार.

श्रीराज--- घाबरतो अस नाही पण आदरयुक्त भीती असतेच ना.शेवटी आपण जे काही आहोत त्यांच्यामुळेच ना.

जान्हवी--- हो खरं आहे, आपण जे काही आहोत ते आपल्या आई बाबांमुळेच.

श्रीराज--- अभ्यास कसा चालू आहे?झेपतोय का? कॉलेजच वातावरण काय म्हणतंय? 

जान्हवी--- अभ्यास चांगला चालू आहे, सुरवातीला जड गेलं पण आता झेपतोय. कॉलेजच्या वातावरणात हळूहळू रुळतेय.

श्रीराज--- नवीन वातावरणात रुळायला वेळ लागतोच. घरची आठवण येत असेल ना.

जान्हवी--- सुरवातीला घरची आठवण खूप यायची, पहिल्यांदाच घरापासून एवढ्या दूर रहावे लागले. तू कशी काय एवढी वर्षे घरापासून दूर राहतो तुलाच माहीत.

श्रीराज--- सुरवातीला मला खूप त्रास झाला पण आता ह्या सगळ्याची सवय झालीय. कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है.

जान्हवी--- घरापासून दूर रहायच ठीक आहे पण मेसच जेवण करताना आईच्या हातच्या जेवणाची आठवण आली की डोळ्यातच पाणी येते.

श्रीराज--- आईच्या हातच्या जेवणाची चव कोणत्याच जेवणाला येऊच शकत नाही. आपण त्रास करून घ्यायचा नाही. ह्या सगळ्याचा विचार करत बसशील तर त्याचा परिणाम अभ्यासावर होईल.

जान्हवी--- मी नाही विचार करत, पण आईशी बोललं तर तिला वाईट वाटेल म्हणून तुझ्याशी बोलले, मी अभ्यासाच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा होऊ देत नाही.

श्रीराज--- तु माझ्याशी बोलली तरी मला काहीच समस्या नाही फक्त अभ्यासावर परिणाम नको व्हायला. तुला कुठलीही अडचण आली तरी माझ्याशी बिनधास्तपणे बोलू शकतेस आणि डोन्ट वरी काका काकूंना काहीही कळू देणार नाही.

जान्हवी--- थँक्स, तुझ्याशी बोलून छान वाटलं, तु माझ्या आयुष्यातील पहिला मुलगा आहेस ज्याच्याशी मी एवढ्या मनमोकळेपणाने बोलतेय.

श्रीराज--- खरंच तु मुलांशी बोलत नाहीस.

जान्हवी--- खरंय, मी मुलांशी कामाव्यतिरिक्त काहीच बोलत नाही, मला मैत्रिणी भरपूर आहेत पण मित्र एकपण नाही.

श्रीराज--- तुझा पहिला मित्र व्हायला आवडेल मला, तुला आवडेल का माझ्याशी मैत्री करायला?

जान्हवी--- विचार करुन उत्तर देईल.

श्रीराज--- खडूस आहेस एक नंबरची, अगं फक्त मैत्रीसाठीच विचारतोय त्यात काय एवढा विचार करायचा.

जान्हवी--- मी लवकर कोणाशी मिसळत नाही, माझा स्वभावच तसा आहे, तु देशमुख काकांचा मुलगा आहेस म्हणून तुझ्याशी बोलले नाहीतर मी अनोळखी मुलांशी बोलत पण नाही.

श्रीराज--- ठीक आहे तुला हवा तितका वेळ घे.मी तुझ्या उत्तराची वाट पाहीन, 

"कह दो की तुम मुझसे दोस्ती करोगे"

जान्हवी--- "देखूंगी,सोचूंगी कल परसो कुछ कहूंगी"

श्रीराज--- बाय, तुला हवा असेल तेव्हा मॅसेज करू शकतेस.

जान्हवी--- बाय.

तर असे होते आमचे पाहिले संभाषण. श्रीराजशी बोलून खूप छान वाटले होते.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all