Login

पहिली भेट भाग १९

Story of a friendship cum love

    माझी सकाळ श्रीराजच्या गुड मॉर्निंग ने व्हायची तर रात्र गुड नाईटने व्हायची. आपल्या वर कोणी एवढं प्रेम कधी करू शकेल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. श्रीराज त्याच्या अभ्यासात बिजी होता पण माझ्यासाठी तो आवर्जून वेळ काढायचा. मला श्रीराजच्या भेटीची ओढ लागली होती. श्रीराजशी चॅट करायला लागलं की वेळ कसा निघून जायचा हे कळायचं ही नाही. मी घरी असल्याने आम्हाला फोनवर बोलता यायचे नाही पण मॅसेज मात्र खूप व्हायचे. दिवसामागून दिवस जात होते. मी सुट्टीचा मनमुराद आनंद घेत होते. 

         एके दिवशी माझी मावशी आमच्या घरी आली, ती मला म्हणाली की तुला सुट्टीच आहे तर माझ्यासोबत माझ्या घरी चल, पुन्हा तुझे कॉलेज चालू झाले की तुला यायला जमणार नाही. तसही मला घरी बसून कंटाळा आला होता म्हणून मी मावशीसोबत तिच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. मी मावशीसोबत तिच्या घरी गेले. मी श्रीराजला कळवण्यासाठी मोबाईल हातात घेतला तोच श्रीराजचा मॅसेज आला होता, मी दोन तीन दिवसांसाठी बाहेर गावी जात आहे, तिकडे नेटवर्क नसल्याने माझा मोबाईल बंद असेल. मी श्रीराजचा मॅसेज बघितल्यानंतर त्याला नेटवर्क नसेल म्हणून मीपण त्याला मावशीकडे गेल्याचे सांगितले नाही.

          खूप वर्षांनी मावशीकडे गेल्याने मला खूप छान वाटले. माझ्या मावशीला माझ्यापेक्षा लहान एक मुलगा व मुलगी आहे, ते सतत माझ्याभोवती पिंगा घालत होते, त्या दोघांनाही मी त्यांच्या घरी गेल्याने खूप आनंद झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 च्या सुमारास श्रीराजचा मॅसेज आला. मला प्रश्न पडला की हा तर नेटवर्क मध्ये नसणार होता मग याचा मॅसेज कसा काय आला? मी या विचारातच त्याचा मॅसेज ओपन केला, हाय जान्हवी कुठे आहेस? मी तुला भेटण्यासाठी तुझ्या घरी आलोय आणि तू कुठे गायब झालीस? मला वाटले की श्रीराज माझी गम्मत करत असेल म्हणून मी आईला फोन लावला, आईने फोन उचलून सांगितले की देशमुख काका काकू व श्रीराज घरी आले आहेत, मी तुझ्याशी थोड्या वेळाने बोलेल. आईचा फोन ठेवल्यावर मी श्रीराजला मॅसेज केला,

जान्हवी--- श्रीराज मी कालच माझ्या मावशीकडे आलेय. तु घरी येणार होतास हे सांगायचं ना, मी घरीच थांबले असते.

श्रीराज--- मला तुला सरप्राईज द्यायचे होते, मला काय माहीत इथे येऊन मलाच सरप्राईज भेटणार आहे. मला आत्ता तुझ्याशी बोलता येणार नाही नंतर बोलू.

      बिचारा श्रीराज, त्याने काय विचार केला असेल आणि काय घडून बसले, आता नक्कीच तो माझ्यावर रागावला असेल. आम्हाला भेटण्याचा किती छान संधी चालून आली होती पण तीही गेली,आमची भेट होणे हे आमच्या नशिबातच नाहीये का? मला मनातून खूपच वाईट वाटत होते. रात्री झोपण्यापूर्वी श्रीराज ऑनलाईन दिसला म्हणून मी त्याला मॅसेज केला, 

जान्हवी--- हाय श्रीराज, रागावला आहेस का?

श्रीराज--- तु मावशीकडे गेल्याचे मला सांगितले का नाही?

जान्हवी--- तु नेटवर्क मध्ये नसशील म्हणून मी तुला सांगितले नाही.

श्रीराज--- मला तुला सरप्राईज द्यायचे होते म्हणून मी तुला खोटे सांगितले होते.

जान्हवी--- आपली भेट व्हावी हे आपल्या नशिबातच नाहीये.

श्रीराज--- आपलं नशीब आपल्या हातात आहे. आपली भेट नाही झाली म्हणून आपल्यातील प्रेम थोडीच कमी होणार आहे.

जान्हवी--- मुळीच नाही, उलट ते दिवसेंदिवस वाढतच जाते आहे.

श्रीराज--- तुझे बाबा तुझं खूप कौतुक करत होते.

जान्हवी--- हो ते नेहमीच करत असतात. 

श्रीराज--- तुझे बाबा तुझं कौतुक करत होते पण मलाच खूप भारी वाटत होते.

जान्हवी--- तुला का भारी वाटत होते?

श्रीराज--- आपल्या आवडत्या व्यक्तीचे कौतुक अस दुसऱ्याच्या तोंडून ऐकायला भारी वाटत.

जान्हवी--- हो का, बरं झोप आता, मला खूप झोप येत आहे.

श्रीराज--- बरं ठीक आहे, गुड नाईट

        पुढचे काही दिवस मावशीकडे राहिले, नंतर घरी परत गेले, आता थोड्याच दिवसात रिझल्ट लागणार होता. रिझल्ट चे दिवस जसे जवळ येत होते तशी भीती वाटत होती. पास तर मी होणारच होते पण चांगले मार्क्स मिळावे हीच इच्छा होती.

          एके दिवशी सकाळी श्रीराजचा मॅसेज आला की आज रिझल्ट लागण्याची शक्यता आहे, मी तेव्हापासूनच दर अर्ध्या तासाने वेबसाईटवर जाऊन चेक करायचे, पण रिझल्ट काही लागलेला नसायचा, त्या दिवशी जेवण करण्याची इच्छा ही उडून गेली होती. दुपारी तीन च्या सुमारास पुजाचा मॅसेज आला की रिझल्ट लागलाय वेबसाईटवर जाऊन चेक कर, रिझल्ट चेक करताना माझे हात थरथरत होते, मला फर्स्ट क्लास मिळाला होता, मी रिझल्ट पहिले आईला सांगितला, आईने रिझल्ट ऐकून देवासमोर साखर ठेवली आणि बाबांना फोन करून माझा रिझल्ट कळवला, आई बाबा दोघेही खूप खुश होते. पुजा व प्रियालाही चांगले मार्क्स मिळाले होते. कधी एकदा श्रीराजला फोन करून रिझल्ट सांगू असे मला झाले होते. आईसमोर श्रीराजला फोन कसा करू या विचारातच होते तेवढ्यात आई मला म्हणाली की श्रीराजला फोन करून तुझा रिझल्ट कळवं, तुझ्याकडे फोन नंबर आहे ना त्याचा. मी एका आज्ञाधारक मुलीसारखे आईला हो म्हणाले. चेहऱ्यावर दिसू दिले नाही पण माझ्या मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. श्रीराज सोबत आईसमोर फोनवर बोलायचे म्हणजे एक आव्हानच होते, एका अनोळखी मुलाशी बोलतेय असं दाखवायचे होते. मी श्रीराजला फोन लावला,

जान्हवी--- हॅलो श्रीराज, मी जान्हवी बोलतेय, ओळखलं का?

श्रीराज--- स्वीटहार्ट अशी का बोलत आहेस? मी केव्हाची तुझ्या फोन किंवा मॅसेजची वाट बघतोय.

आई माझ्याकडेच बघत असल्याने मला चेहऱ्यावरचे हावभाव बदलू द्यायचे नव्हते.

जान्हवी--- अरे माझा रिझल्ट लागलाय, आई म्हणाली की श्रीराजला फोन करून रिझल्ट कळवं.

श्रीराज--- ओके, आईने सांगितलं का फोन करायला, आई तिथेच आहे का?

जान्हवी--- हो, मला फर्स्ट क्लास मिळालाय.

श्रीराज--- अरे वा, हार्दिक अभिनंदन

जान्हवी--- थँक्स

श्रीराज--- जान्हवी काकूंकडे फोन दे ना.

जान्हवी--- का?

श्रीराज--- मला त्यांच्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे.

मी फोन स्पिकरवर टाकला व आईला सांगितले की श्रीराजला तुझ्याशी बोलायचे आहे.

आई--- बोल श्रीराज, काय म्हणतोस?

श्रीराज--- अभिनंदन काकू

आई--- माझे कशाचे अभिनंदन, जान्हवी ने मन लावून अभ्यास केला त्याचे फळ तिला मिळाले.

श्रीराज--- ते आहेच, जान्हवीला खूप छान मार्क्स मिळाले आहेत, आता पुढे postgraduation करायचा विचार असेल ना.

आई--- तीच तिने ठरवावं, आपण इथं पर्यंत शिक्षण दिलंय, आमची शिक्षण देण्याची जबाबदारी संपली, आता एक चांगला मुलगा मिळाला की लग्न उरकून टाकायचं मग लग्नानंतर नवरा बायको ठरवतील पुढे शिकायचे की नाही. तुझ्या बघण्यात एखादा चांगला मुलगा असेल तर नक्की सांग.

आई एकदम टिपिकल आई प्रमाणे बोलून गेली, आईचे बोलणं ऐकून श्रीराजला काय बोलावे काही सुचले नाही.

श्रीराज--- काकू मी आता कॉलेज मध्ये आहे, मी नंतर फोन करतो मग निवांत बोलू.

श्रीराजने फोन ठेवल्यावर मी आईला विचारले, आई हे लग्नाच काय मधेच काढलं?

आई--- मुलीच लग्न वेळेवर झालं की आई वडिलांच्या डोक्याचा ताण संपतो, तु व तुझे बाबा काहीही म्हणाले तरी मी तुझ्यासाठी मुलगा बघायला सुरुवात करणार आहे, आपल्याला हवा तसा मुलगा भेटायला वेळ लागेल.

आईच्या बोलण्यावर मी काय बोलणार, मी आपलं शांत बसण्याची भूमिका घेतली. संध्याकाळी बाबा ऑफिस मधून घरी येताना पेढे घेऊन आले, बाबांनी कॉलनी मधल्या सर्वांना पेढे वाटले. आम्ही त्या दिवशी रात्री जेवायला बाहेर गेलो. आपल्यामुळे आपल्या आई बाबांच्या चेहऱ्यावर आनंद बघताना खरच खूप भारी वाटते.

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all