पहिली भेट भाग १४

Story of a friendship

पहिली भेट भाग १४

            थर्ड इअर ची फायनल एक्साम जवळ आल्याने मी श्रीराजशी फोनवर बोलणे कमी केले. एक्साम होईपर्यंत मला अभ्यास सोडून इतर कोणत्याही गोष्टींना प्राधान्य द्यायचे नव्हते. मी सरळसरळ श्रीराजला सांगून टाकले की मला तुझ्याशी काही दिवस फोनवर बोलता येणार नाही. श्रीराजला अभ्यासाचे महत्व माहीत असल्याने श्रीराजने पण फोनवर न बोलण्याचा निर्णय घेतला.

              साधारणतः एक आठवड्याने एका रविवारी श्रीराजचा मला फोन आला, मी अभ्यासासाठी लायब्ररीत गेले होते, फोन सायलेंट वर असल्यामुळे मला कळलेच नाही की श्रीराजचा फोन कधी येऊन गेला. संध्याकाळी लायब्ररीतून निघाल्यावर मी मोबाईल चेक केला तेव्हा श्रीराजचे दहा मिस्ड कॉल होते. मी घाबरतच श्रीराजला फोन लावला.

जान्हवी---- हॅलो श्रीराज, काय झाले? एवढ्या वेळेस फोन का केलेस? तु ठीक आहेस ना.

श्रीराज--- अगं मी ठीक आहे.

जान्हवी---- अरे मग एवढ्या वेळेस फोन का केलेस? मी किती घाबरले होते याची कल्पना तरी तुला आहे का?

श्रीराज---- एवढ्या वेळेस फोन करूनही तु फोन उचलला नाहीस तेव्हा मला तुझी किती काळजी वाटली असेल याची कल्पना तुला आहे का? ( श्रीराज बोलण्यावरून अंदाज येत होता की तो खूपच चिडलेला आहे)

जान्हवी---- तुला एवढे चिडून बोलायला झाले तरी काय?

श्रीराज---- दहा वेळेस तुला फोन केला, किती सारे मॅसेज केले पण तु कशालाच उत्तर दिले नाहीस मग चिडणार नाही तर काय, मला माहित आहे तु अभ्यासात खूप व्यस्त आहेस पण एक मॅसेज करूच शकत होती ना.

जान्हवी---- श्रीराज फोन सायलेंट वर होता, मी लायब्ररीत होते, मला कळलंच नाही तुझा फोन केव्हा येऊन गेला. श्रीराज तसही आपल्यात ठरलं होतं ना की थोड्या दिवस आपण एकमेकांशी फोनवर बोलायचे नाही.

श्रीराज---- अगं पण आपण ठरवलेल्या सगळ्याच गोष्टी पाळतो का? फोनवर बोलायचे नाही म्हटल्यावर संपर्कच तोडून टाकायचा का?

जान्हवी---- श्रीराज तु असा तिरसट सारखा का बोलत आहेस? 

श्रीराज---- मी खूप जास्त चिडलोय.

जान्हवी---- आता फोन ठेव, माझ्याकडे तुझी चिडचिड ऐकून घ्यायला अजिबात वेळ नाहीये. मला माझा वेळ वाया घालवायचा नाहीये.

श्रीराज---- माझ्याशी बोलण्यात तुझा वेळ वाया जाणार आहे असं म्हणायचय का? यापूर्वी तुझी चिडचिड मी कधीच ऐकली नाहीये का?

जान्हवी---- श्रीराज तु प्रत्येक वाक्याचा वेगळाच अर्थ लावणार आहेस का? तुझा बोलताना सूर खूप चुकीचा लागत आहे. बेटर वे तुझं डोकं शांत झाल्यावर मला फोन कर.

           श्रीराजने काहीही न बोलता फोन कट केला. मला तर काही कळतच नव्हते की श्रीराजला काय झाले असेल, कधीही न चिडणारा श्रीराज आज एवढा का चिडला आहे? आपण ज्याच्याशी बोललो तो श्रीराजच होता का? डोक्यात खूप सारे विचार येत होते. आज पहिल्यांदा श्रीराज माझ्याशी एवढा चिडून बोलला होता, इतर वेळी तो मला समजून घ्यायचा पण आज तो माझं काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. मी श्रीराजचा विचार करतच रुम मध्ये गेले, पुजा रुम मध्येच होती.

पुजा---- जान्हवी काय ग, काय झालं, कसला विचार करत आहेस, अभ्यासाच टेन्शन आलंय का?

जान्हवी---- पुजा, श्रीराजचा फोन आला होता, तो खूप चिडलेला होता.

पुजा---- अगं पण काही दिवस तुम्ही फोनवर बोलणार नव्हता ना.

जान्हवी---- हो ना. माझा फोन सायलेंट वर होता,श्रीराजचे दहा मिस्ड कॉल्स होते. त्याला चांगलं माहीत आहे की मी या वेळेत लायब्ररीत असते तरी पण एवढे फोन का करावेत आणि वरून मी फोन उचलला नाही म्हणून चिडतोय. इतर वेळेस कधी बोलताना त्याच्या कडून चुकलं तर लगेच सॉरी चा मॅसेज करतो पण आज अजून मॅसेज आला नाही.

पुजा---- श्रीराजला राग नक्की कसला आहे? फक्त फोन उचलला नाही म्हणून एवढ श्रीराज चिडूच शकत नाही.

जान्हवी---- मी पण तोच विचार करत आहे की श्रीराजला एवढं चिडायला झालं तरी काय?

मी बराच वेळ श्रीराजच्या बोलण्यावर विचार करत होते तेवढ्यात माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडल्यासारखे आठवले.

जान्हवी---- पुजा मी आजचा दिवस विसरू कशी शकते, याआधीच माझ्या डोक्यात यायला पाहिजे होते.

पुजा---- आज काय खास आहे?

जान्हवी---- अगं आज श्रीराजचा बर्थडे आहे. मी खरंच खूप विसराळू आहे.

पुजा---- आता पहिले श्रीराजला फोन कर, बर्थडे च्या शुभेच्छा दे आणि सॉरी म्हण.

मी श्रीराजला फोन लावला, श्रीराजने फोन उचलला नाही, मी २ ते ३ वेळेस फोन लावला पण श्रीराजने फोन उचलला नाही. शेवटी मी त्याला मॅसेज केला, श्रीराज I just wanted to say I'm really sorry. मी अभ्यासाच्या टेन्शन मध्ये तुझा बर्थडे विसरले, मला माहित आहे की तु माझ्यावर खूप रागावला आहेस. प्लीज माझा फोन उचल मला तुला बर्थडे साठी शुभेच्छा द्यायच्या आहे.

        मी केलेला मॅसेज श्रीराजने वाचला पण त्याने काहीच रिप्लाय केला नाही शिवाय फोनही केला नाही. एक तास होऊन गेला पण श्रीराजने काही फोन केला नाही शेवटी मीच त्याला फोन लावला तेव्हा ४ ते ५ वेळा रिंग वाजल्यावर फोन उचलला गेला.

श्रीराज---- हॅलो जान्हवी, बोल पटकन मी मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवायला आलेलो आहे, ते माझी वाट पाहत आहेत.

जान्हवी---- श्रीराज खरंच तु एवढा बिजी आहेस की तुझ्याकडे माझ्याशी बोलण्यासाठी 5 मिनिटे ही नाहीत. Anyways wish you many many happy returns of the day.

 श्रीराज पुढे काही बोलायच्या आतच मी फोन कट केला. आता मात्र मला श्रीराजचा खूप राग आला होता.श्रीराज नेहमीपेक्षा काही तरी विचित्रच वागत होता. श्रीराजचा अस वागण्याच्या मागचा हेतूच मला कळत नव्हता. अर्धा तासाने श्रीराजचा मॅसेज आला, हाय जान्हवी, मला कल्पना आहे की माझ्या वागण्याने तु दुखावली गेली आहेस, आपण दोघेही आपल्या जागेवर बरोबर आहोत, मी कदाचित जास्तच रिऍक्ट केलं, त्यासाठी सॉरी, तुझी एक्साम संपल्यावर निवांत आपण ह्या टॉपिकवर बोलूयात, सध्या तरी तु तुझे पूर्ण लक्ष तुझ्या अभ्यासावर केंद्रित कर. माझ्या वागण्याचा जास्त विचार करू नकोस. Once again I am sorry and thanks for birthday wishes. ऑल द बेस्ट फॉर एक्साम.

मी श्रीराजला रिप्लाय केला, आज मी ज्या श्रीराजशी फोनवर बोलले तो मला वेगळाच कोणी तरी वाटत होता पण ज्या श्रीराजने मला मॅसेज केला त्या श्रीराजला मी ओळखते. Thanks for massage. 

        श्रीराजचा विचार डोक्यातून काढून मी परत एकदा अभ्यासाला लागले. 

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all