Login

पहिली भेट भाग १२

Story of a friendship

पहिली भेट भाग १२

            माझे थर्ड इअर सुरू झालेले होते, अभ्यासाचा लोड खूपच वाढला होता. दिवसेंदिवस कॉलेजचे शेड्युल खूप व्यस्त होत चालले होते. हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकलच्या वेळेस पेशंट हाताळताना नवनवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या. श्रीराजची इंटर्नशिप सुरू झाली होती. श्रीराज मला अभ्यास करण्याच्या टिप्स द्यायचा, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत होता. अभ्यासात काही अडचण आली तर श्रीराज मदतीला हजर असायचा. 

        अलीकडे श्रीराज व माझे फोनवर बोलणे वाढले होते,श्रीराज स्वताहून फोन करायचा. श्रीराज नेहमी त्याच्या बोलण्यातून जाणवून द्यायचा प्रयत्न करायचा की मी त्याची खूप खास व जवळची मैत्रीण आहे. मला श्रीराजच्या बोलण्याचा हेतू कळायचा पण मी जाणून बुजून त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नाही कारण आता तरी माझे पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करायचे होते.

          दिवसेंदिवस श्रीराजसोबत असलेले मैत्रीचे नाते अधिकाधिक दृढ होत चालले होते. आम्हाला दोघांना एकमेकांची खूपच सवय होत चालली होती. आता एकच अपेक्षा होती ती एकमेकांना प्रत्यक्ष भेटायची.

            योगायोगाने तशी संधीही चालून आली होती. आमच्या कॉलेजला राज्यस्तरीय मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आला होता. कॅम्पमध्ये राज्यातील सर्व मेडिकल कॉलेज सहभागी होणार होते. श्रीराजच्या कॉलेजकडून श्रीराजला कॅम्पसाठी निवडण्यात आले होते. आता आमची नक्कीच एकमेकांशी भेट होईल असे वाटत होते, आम्ही दोघेही खूप आनंदात होतो. पुजा व प्रियालाही श्रीराजला भेटता येणार असल्याने त्याही आनंदात होत्या.

             प्रियाने मला सजेस्ट केले की श्रीराजला पहिल्यांदाच भेटणार आहे तर काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे, एक मित्र म्हणून तो सदैव तुझ्या सोबत असतो. मला प्रियाचे सजेशन पटले, आम्ही तिघी रविवारी श्रीराजसाठी गिफ्ट घेण्यासाठी जाण्याचे ठरले.

कॅम्प मंगळवारी सुरू होणार होता, श्रीराज कॉलेजच्या बसने मित्रांसोबत मंगळवारी सकाळी येणार होता.

            रविवारच्या दिवशी सकाळी आम्ही तिघींनी पटपट आवरले व श्रीराजसाठी गिफ्ट आणण्यासाठी मार्केट मध्ये जाण्यासाठी निघालो. आम्ही कॉलेजपासून रिक्षाने मार्केट पर्यंत गेलो. रिक्षातून उतरून गिफ्ट शॉप पर्यंत पायी चाललो होतो, रस्त्यावर खूप गर्दी होती, रस्त्याच्या कडेने चालताना एका बाईकचा धक्का लागून मी रस्त्यावर पडले, माझ्या पायाला दुखापत झाली होती, पाय खूप दुखत होता, पायाला सुजही आली होती. प्रिया व पुजाने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून एका रिक्षात मला बसवून आमच्या कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये आणले, तिथल्या सिनिअर डॉक्टरांनी पायाचा xray काढला, Xray मध्ये पायाला फ्रॅक्चर झाल्याचे समजले, माझा पाय प्रचंड दुखत होता, इंजेक्शन घेतल्यावर पायाच्या वेदना कमी झाल्या. पायाला प्लास्टर बांधण्यात आले होते, पायाची हालचाल करणे कठीण जात होते. पुजाने माझ्या घरी फोन करून आई बाबांना पाय फ्रॅक्चर झाल्याची कल्पना दिली, आई बाबा मला घरी घेऊन जाण्यासाठी यायला निघाले होते.

             आई बाबा रात्रीपर्यंत हॉस्पिटलला पोहचले होते, रात्र खूप झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी परत घरी जायचे ठरले. एवढ्या सगळ्या गडबडीत श्रीराजला माझ्या अपघाता बद्दल सांगायचे राहून गेले. मी गाडीचा धक्का लागून पडले त्यावेळी मोबाईल माझ्या हातात असल्याने तो खाली पडून फुटला होता त्यामुळे श्रीराजसोबत संपर्क करणे अशक्यच होते. पायाला फ्रॅक्चर होण्याचे वेगळेच दुःख होते पण श्रीराजला भेटता येणार नसल्याचेही दुःख होत होते. पण काय करणार आई बाबांबरोबर घरी जाण्याव्यतिरिक्त दुसरा काही पर्यायही नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आई बाबांसोबत घरी जायला निघाले, निघताना पुजाला सांगितले की श्रीराजला माझ्यातर्फे सॉरी सांग.

             मंगळवारी सकाळी श्रीराज आमच्या कॉलेजमध्ये पोहचला, दोन दिवस झाले श्रीराजचा माझ्याशी काहीच संपर्क होत नसल्याने श्रीराज काळजीत होता पण त्याला वाटले होते की समक्ष भेटल्यावरच बोलूया. श्रीराजने आमच्या कॉलेजच्या मुलांकडे माझी चौकशी केली तेव्हा त्याला समजले की माझा अपघात झाला आहे. श्रीराज खूप टेन्शन मध्ये होता त्याने त्या मुलांकडून पुजाचा फोन नंबर मिळवला. श्रीराजने पुजाला फोन करून कॉलेजमध्ये भेटायला बोलवले. पुजा व प्रिया दोघीही श्रीराजला भेटायला गेल्या. पुजाने माझ्या अपघाताची इतंभूत कथा सांगितली. 

               पुजा सांगत होती की त्यावेळेस श्रीराजचा चेहरा बघण्यासारखा झाला होता,तो खूपच दुःखात दिसत होता. श्रीराजला माझ्याशी बोलायचे होते पण माझा फोन बंद असल्याने त्याला कळतच नव्हते की काय करावे. पुजाने सांगितले की जान्हवीच्या बाबांच्या फोनवर फोन कर मग तुला जान्हवीशी बोलायला भेटेल. श्रीराजची माझ्या बाबांच्या फोनवर फोन करायची हिम्मत होत नव्हती शिवाय त्याला काही कल्पनाही सुचत नव्हती. 

         खूप विचार केल्यावर श्रीराजला एक मस्त कल्पना सुचली, त्याने त्याच्या बाबांना फोन केला,

श्रीराज---- हॅलो बाबा, मला जान्हवीच्या बाबांचा फोन नंबर देता का?

श्रीराजचे बाबा----जान्हवीच्या बाबांचा फोन नंबर तुला कशासाठी हवाय?

श्रीराज---- बाबा मी मेडिकल कॅम्पसाठी जान्हवीच्या कॉलेजला आलो आहे, इथे आल्यावर समजले की जान्हवीचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला असून तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. शिवाय जान्हवीचा फोनही लागत नाहीये तर मी विचार केला की तिच्या बाबांच्या फोनवर फोन करून तिच्या तब्येतीची चौकशी करावी.

श्रीराजचे बाबा---- ठीक आहे, मी तुला फोन नंबर मॅसेज करतो.

              श्रीराज त्याच्या बाबांकडून माझ्या बाबांचा फोन नंबर मिळवण्यात यशस्वी होतो. श्रीराजने माझ्या बाबांना फोन केला,

श्रीराज---- हॅलो काका, श्रीराज बोलतोय

बाबा---- श्रीराज तु कसा काय अचानक फोन केलास?

श्रीराज---- काका मी मेडिकल कॅम्पसाठी जान्हवीच्या कॉलेजला आलो होतो तेव्हा मला समजले की जान्हवीचा अपघात झाला आहे. जान्हवीच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी फोन केला होता.

बाबा---- आता जान्हवी बरी आहे, पाय फ्रॅक्चर झालाय. सुरवातीला पाय खूप दुखत होता पण आता जरा दुखणे कमी झाले आहे.

श्रीराज---- काका जान्हवी तिथे असेल तर तिच्याकडे फोन देता का?

बाबा---- हो देतो ना.

 बाबा माझ्याकडे फोन देता व सांगतात की श्रीराजचा फोन आहे.

जान्हवी---- हा बोल श्रीराज.

श्रीराज---- काका आहेत का तिथे?

जान्हवी---- नाही बाबा फोन माझ्याकडे देऊन बाहेर गेलेत.

श्रीराज---- तु कशी आहेस? तुझा मोबाईल रिपेअर करून घे ना म्हणजे आपला एकमेकांशी संपर्क होत राहील, मला तुझी खूप काळजी वाटत होती म्हणून जुगाड लावून तुला फोन लावला.

जान्हवी---- मी बरी आहे. मोबाईल बाबांनी रिपेअर करायला टाकला आहे, फोन रिपेअर झाल्यावर मी तुला कळवेल. आपल्याला जास्त वेळ बोलता येणार नाही तेव्हा पटपट आणि मुद्द्याचे बोल.

श्रीराज---- जान्हवी, मला माहित आहे तु एका जागेवर बसून असल्याने तुझी चिडचिड होत असेल, पण चिडचिड करून स्वतःला त्रास करून घेऊन काही साध्य होणार नाही. मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणले होते,त्यासोबत एक ग्रीटिंग कार्ड पण आहे, तुझे गिफ्ट पुजाकडे देऊ का? ती ओपन करून तर बघणार नाही ना.

जान्हवी---- हो दे तिच्याकडे, आई रुममध्ये येत आहे, मी फोन ठेवतेय, बाय.

           श्रीराजने बाय म्हणण्याआधीच मी फोन बंद केला. माझ्या एका वाक्यावरून श्रीराजला समजले होते की माझी चिडचिड होत आहे, माझ्या मनातलं सगळंच या मुलाला कसं कळतं कुणास ठाउक? श्रीराजने माझ्यासाठी काय गिफ्ट आणले असेल याची मला उत्सुकता लागली होती. माझा पाय बरा झाल्याशिवाय मला श्रीराजचे गिफ्ट बघता येणार नव्हते.

©®Dr Supriya Dighe