Feb 28, 2024
मनोरंजन

पहिली live match

Read Later
पहिली live match

मी आणि माझा नवरा दोघेही क्रिकेटचे अगदी लहानपणापासून शौकीन. आंतराष्ट्रीय, २०-२० किंवा कसोटी सामने आम्ही काहीच बघायचे सोडत नाही. लग्नपत्रिकेत आमचा हाही एक गुण जुळला असावा बहुतेक????????.आम्ही अक्षरशः वेडे होतो मॅच बघताना. आरडाओरड काय,घरात पसारा काय आणि आवडत्या खेळाडूवरून भांडण काय नुसती मज्जा.

आम्ही वडोदरामधे राहतो, इथे दरवर्षी उन्हाळ्यात तापमानाचा पारा एक दोन डिग्रीने वाढलेलाच असतो.उन्हाळा आमचा सगळ्यात नावडता ऋतू पण तरी आम्ही मार्च महिन्याची उत्सुकतेने वाट बघत असतो त्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त IPL चे सामने☺️. मी धोनीची चाहती त्यामुळे माझी टीम चेन्नई सुपरकिंग्स आणि नवरा रोहित शर्माचा चाहता मग तो मुंबई इंडियन्स कडून...

IPL मधे आम्ही नवराबायको कमी आणि दुश्मन जास्त असतो,खूप चिडवतो एकमेकांना पण खूप मज्जाही करतो. सांगायचं तात्पर्य हे की आम्ही असे क्रिकेटवेडे मग आमचा चिमुकला अश्वथ कसा मागे राहणार.

तो पोटात असताना आठव्या महिन्यात २०१८चे IPL चे सामने बघताना मी अक्षरशः वेडी झाले होते आणि त्या सिजनमध्ये चेन्नईच्या टीमने बाजी मारली  होती मग काय मी तर अगदी खुश आणि मी खुश तर माझं बाळ पोटात खुश!

आम्ही आतापर्यंत सगळ्या मॅच टीव्हीवरच बघत आलो,खूप इच्छा होती स्टेडियममधे जाऊन live मॅच बघायची पण कधी पैशाअभावी तर कधी वेळेअभावी जमलंच नाही.पण आमच्या बाळाच्या नशिबात हे सुख लवकर लिहलं होतं किंवा त्याचा पायगुण की आम्हाला हे सुख अनुभवायला मिळालं माहीत नाही.

तर वडोदरामधे रिलायन्स स्टेडियममधे भारतीय महिला संघाचा एकदिवसीय सामना होता साऊथ आफ्रिका विरोधात. सोसाटीतल्या ओळखीच्या काकांनी तिकीट्स घेतलेले होते पण काही कारणास्तव त्यांना जायला जमणार नव्हते. त्यांना कल्पना होती की आम्ही क्रिकेट वेडे आहोत त्यांनी फोन करून विचारलं की जाणार का आणि जाणार असाल तर आमच्या मुलाला सोबत घेऊन जाता आलं तर बरं होईल. मग काय आम्ही एक पायावर तयार पण एकीकडे वाटत होतं दिवसभराचा सामना आहे घरापासून बरंच दुरही आहे स्टेडियम आणि अश्वथ तेव्हा फक्त १५ महिन्यांचा होता.
तसं तो घरात एन्जॉय करायचा क्रिकेट मॅच बघणं म्हणजे तो त्यावेळीही घरात "इंडिया ......इंडिया..." असं अगदी सुरात ओरडायचा. त्याचं निरीक्षण आणि आकलनशक्ती दोन्हीही खूपच तीक्ष्ण आहे. आम्ही उत्साहात व्हॉट अ शॉट, फोर, सिक्स, आऊट असं बोलून जायचो तर ऐकून ऐकूनत्यालाही सवय लागली होती हे शब्द बोलायची.. कधीकधी तर तो एकटाच जोरात ओरडायची "ए शॉट ए" ,त्याच्या बोबड्या आवाजात ते ऐकून आम्ही खूप हसायचो. पण स्टेडियममधे इतक्या गर्दीत तो राहील का की घाबरून जाईल असा प्रश्न होता पण नंतर ठरवलं की जाऊन बघूया नाहीच राहिला तर निघून घरी येत येईल.

आम्ही अगदी उत्सुक होतो पण आमच्यापेक्षा जास्त उत्सुक अश्वथ होता. मी त्याला 'आपण मॅच बघायला चाललोय हा पिल्लू तिथे मस्त मज्जा येईल',असं सांगितलं की तो उडयाच मारायचा.

तो दिवस होता १४ ऑक्टोबर,२०१९चा...आम्ही सकाळी साडेनऊच्या सुमारास तिथे पोहचलो. मॅच नऊ वाजेला सुरू झाली होती.मी अगदी मोठी बॅग खचाखच भरून सोबत घेतली होती, नवरा बोललाही होता हिमालयावर नाही चाललो आपण इतकी तयारी केलीये तू पण शेवटी आई ती आईच. मी अश्वथचे खेळणी, खाऊ,जेवण, पाणी असं बरंच सामान सोबत ठेवलं होतं जेणेकरुन तो रडला तर काहीतरी देऊन त्याला शांत करता येईल. आमच्यासोबत 'साई' त्या काकांचा छोटा मुलगाही होता. आम्ही मधे जाऊन आमच्या सिट्सवर बसलो. स्टेडियमचं वातावरण खूपच छान होत,गर्दीने खचाखच भरलेलं. लोक इंडिया इंडिया, वंदे मातरमचे नारे देत होते. सगळीकडे उतासहच उत्साह आणि जल्लोष. नजर जाईल तिकडे तिरंगा उंच मानेने हवेत डौलाने डोलत होता.

मी अश्वथला मांडीवर घेऊन बसले होते तर साहेबाना वेगळं सीट हवं होतं. मी त्याला किती समजावलं पण पठ्ठा काही ऐकायला तयार नाही मग मी साईला मांडीवर घेतलं आणि त्याची सीट घेऊन अश्वथसाहेब बसले. आमचं सीट पुढचंच होतं पण टीव्हीस्क्रीन वर जितकं स्पष्ट दिसतं तितकं स्टेडियममधे दिसत नाही.अश्वथला तर काहीच दिसत नसावं म्हणून तो सीटवर उभाच राहिला. मला वाटतच नव्हते इतक्या गर्दीत आणि आवाजात तो थांबेल. मी मनाची पूर्ण तयारी ठेवली होती की कधीही उठून जावं लागू शकते.

पण आश्चर्याची गोष्ट अशी की अश्वथ खूपच मज्जा करू लागला. जसे आजूबाजूचे लोक ओरडायचे तसा तोही ओरडायचा. त्याचा इंडिया...इंडिया...चा तो सूर आणि आवाज आजूबाजूच्या लोकांना भुरळ घालत होता. तो खुर्चीवर अक्षरशः उडया मारत होता, तर कधी नाचत होता. पहिली फलंदाजी भारताचीच होती. आपल्या महिला खेळाडूंनी चौकार षटकारांचा पाऊसच पाडला होता. अश्वथ सगळ्यांचं ऐकून ऐकून फोर, सिक्स अगदी हातवारे करून ओरडत होता. अश्वथला एक सवय आहे कुठेही भारताचा राष्ट्रध्वज दिसला की तो उभा राहून तिरंग्याला सलाम करतो आणि जय हिंद म्हणतो. तिथेही तसंच झालं. बाजूलाच कॉलेजच्या मुलांचा एक ग्रुप बसलेला होता. त्याचं ते सॅल्युट करणं बघून तर ती मुलं अगदी आश्चर्यचकित झाली. त्यांना मॅचपेक्षा जास्त अश्वथला बघून मजा येतेय असं वाटत होतं. कुणाशीही लवकर न मिसळणारा अश्वथ दादा दादा करत त्यांच्याशीही मस्ती करू लागला. आम्हालाही खूप मजा आली. आधी तुफान चाललेली भारताची फलंदाजी नंतर थंडावली त्यामुळे साऊथ आफ्रिकेसमोर खूप मोठं टार्गेट नव्हतं. आता मॅच जिंकायची म्हणजे गोलंदाजी खूपच चांगली करावी लागणार होती. संपूर्ण पहिली इनिंग अश्वथ खूप छान मूडमधे राहिला.

ब्रेकमधे आम्ही नाश्ता केला, अश्वथलाही खाऊ घातलं. त्याला थोडं फिरवून आणलं. मॅच पुन्हा एकदा सुरू झाली आता खरी मॅच रंगात येणार होती पण अश्वथच्या झोपण्याची वेळ झाली होती. तो थोडी चिडचिड करायला लागला होता. मी खूप प्रयत्न केला त्याला झोपवण्याचा,माझ्या प्रयत्नांना थोडं यश मिळतंय असं वाटायला लागलं की  मधेच विकेट जायची पुन्हा लोकांचा आवाज आणि पुन्हा हा पठ्ठा जोशात येऊन ओरडायचा. शेवटी मी त्याला झोपवण्याचा अट्टाहास सोडूनच दिला. लोक पुढे जाऊन सेल्फीस काढत होते, खेळाडूंचे ऑटोग्राफ घेत होते तर अश्वथलाही तेच करायचं होतं मग काय पुन्हा हट्ट मग त्याचे पप्पा त्याला पुढे घेऊन गेले. त्याच्या पप्पांनी त्याचे दोन तीन फोटो काढले, मग अश्वथनेही स्वतः सेल्फी काढले तेव्हा कुठे तो शांत झाला. मॅच रंगात अली होती. आम्ही सगळे डोळ्यात प्राण आणून मॅच बघत होती शेवटची विकेट बाकी होती पण रन खूप थोडे शिल्लक होते आणि ओव्हर्स तर खूप बाकी होत्या. मॅच जिंकण्यासाठी ती शेवटची विकेट जाणं खूप गरजेचं होतं. प्रत्येक बॉलसोबत स्टेडियममधला आवाज अजूनच वाढत होता. सगळेच टीम इंडियाला प्रोत्साहन देत होते त्यात अश्वथचा खारीचा वाटा उचलण्याचं काम जोरात सुरूच होता. पुढच्या बॉलला मागून काही मुलं ओरडली .."ए गयी गयी...विकेट गयी"... पण त्या बॉलला फोर गेला आणि सगळेच निराश दिसत होते. त्या शांत वातावरणात अश्वथ मोठ्याने ओरडला "अरे यार"! आणि डोक्याला हात लावला. आमच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांच्या हसण्याने एकच हशा पिकला. पुढचा बॉल पडताच अश्वथ पुन्हा ओरडला, "ए गयी गयी गयी....????" आणि खरंच विकेट गेली????आणि भारताने मॅच जिंकली.

सगळीकडे नुसता जल्लोष... अश्वथ तर वेडा होऊन नाचत होता. जाताना आजूबाजूच्या लोकांनी , त्या कॉलेजच्या मुलांनी अश्वथसोबत सेल्फी काढले. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटत होते की एवढूसा हा पिटुकला पण किती बोलतो आणि किती एन्जॉय करतो.

मला महित नाही त्याला खरोखर मॅच कितपत समजते किंवा तो जे बोलतो त्याचा अर्थही त्याला नीट समजत नसावा कदाचित,सगळ्यांच बघून तो अनुकरण करत असेल पण तरीही त्याने ती मॅच खूप एन्जॉय केली आणि आम्हालाही एन्जॉय करू दिली.

अशी माझ्या अश्वथची स्टेडियममधे जाऊन बघितलेली पहिली क्रिकेट मॅच खूपच रोमांचक होती. तुम्हाला आवडली तर लाईक आणि कमेंट जरूर करा.

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//