पहिले पत्र

First letter to fiance

प्रिय,

       पत्र बघून तुम्ही नक्कीच विचारात पडाल की ही मुलगी कशी आहे? आजकालच्या व्हाट्सएप व मेलच्या आधुनिक काळात पत्र लिहीत आहे पण मला अस वाटतं की पत्रातून भावना व्यक्त करण्यात जी मजा आहे ती मेल व व्हाट्सएप मध्ये नाहीये. आयुष्यात सगळच काही अनुभवलं पाहिजे.दहा वीस वर्षांनी ज्यावेळी आपण हे पत्र वाचू त्यावेळी कदाचित मला माझ्या बालिशपणावर हसायलाही येऊ शकते किंवा हेच पत्र पाहून आपल्या आठवणींना उजाळा द्यायला मदतच होईल. पत्र पूर्ण वाचून झाल्यावर मला याचे उत्तर हवे आहे भले तुम्ही व्हाट्सएप किंवा मेल केला तरी चालेल.

        येत्या काही महिन्यांत आपलं लग्न होणार आहे.काही दिवसांपूर्वी आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो पण आज आपलं लग्न ठरलं आहे. जेव्हापासून लग्न काय असतं? किंवा आयुष्याचा जोडीदार कोण असतो? हे कळायला लागल्यावर दोन गोष्टी मनात पक्क्या करून ठेवल्या होत्या त्या अश्या की एक म्हणजे आपल्याला अरेंजमॅरेज करायचे आहे आणि दुसरं म्हणजे ज्या मुलाला मी आवडेल त्याच मुलाशी मी लग्न करेल. तुम्ही मला बघायला येण्याआधी एक-दोन मुलं मला बघायला येऊन गेली होती पण त्या मुलांकडे बघून हे आपल्यासाठी परफेक्ट आहेत असं कधीच वाटलं नाही. तुम्ही बघायला येण्याआधी मनात सतत धाकधूक चालू होती. माझ्या घरचे सर्व म्हणत होते की मुलगा खूप चांगला आहे, आपल्या मुलीसाठी हा परफेक्ट आहे. सगळेच तुमचं खूप कौतुक करत होते म्हणूनच का कोण जाणे तुम्हाला बघण्याची, भेटण्याची मला घाई झाली होती. Positive vibes बद्दल इतक्या दिवस फक्त ऐकून होते पण तुम्ही जेव्हा पहिल्यांदा मला भेटलात त्यावेळी positive vibes काय असतात? हे जाणवलं.आपण एकांतात बोलत असताना तुम्ही अगदी मनमोकळ्या गप्पा मारत होत्या पण माझ्या घरातील मंडळी आसपासच असल्याने मी मात्र जास्त काही बोलू शकले नाही आणि मी काही न बोलता तुम्हाला हे जाणवलं, तुमचा निर्णय झाला असला तरी माझ्यासाठी म्हणून तुम्ही बाहेर भेटता येईल का? अशी माझ्या आईकडे परवानगी मागितली.

       आईने परवानगी दिल्यावर आपण दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये भेटलो, त्या दोन तासाच्या भेटीत आपल्यात ज्या गप्पा झाल्या, तुमच्या वागण्यातून बोलण्यातून मला खूप आपलेपणा वाटत होता. तुम्ही माझ्या ईच्छा, आकांक्षा बद्दल जाणून घेतलं. अपूर्ण असलेली माझी स्वप्ने पूर्ण करायला मला मदत करणार हे सांगितलं. तुमच्यातील मला काय आवडलं? हे आत्ता लगेच सांगणं जरा कठीण आहे पण तसा विचार केला तर तुम्ही जसे आहात तसेच एकंदरीत मला आवडला आहात. माझ्या घरी आपली भेट झाली त्यावेळी मी तुम्हाला माझ्या लिखाणाच्या छंदाबद्दल सहजच बोलून गेले आणि मी ब्लॉग लिहिते हे कळाल्यावर तुम्ही घरी जाऊन एका रात्रीत सर्व ब्लॉग्स वाचून काढले व त्यावर कमेंट सुद्धा केलीत, प्रत्येक ब्लॉगवर त्या रिलेटेड एक एक कमेंट केलीत, त्यावेळी मला वाटलं की चला आपल्याला एक हक्काचा वाचक मिळेल आणि तुम्हालाही वाचायची आवड असेल म्हणजे आपल्या आवडीनिवडी बऱ्यापैकी जुळतील परंतु दुसऱ्या भेटीत मला कळलं की तुम्हाला वाचन अजिबात ही आवडत नाही. तुम्ही फक्त मला जाणून घेण्यासाठी, मी लिहिलेत म्हणून सर्व ब्लॉग्स मन लावून वाचलेत ही गोष्ट माझ्या मनाला सुखावणारी होती आणि त्याच वेळी मी तुमच्या प्रेमात पडले होते. कोणीतरी एक अनोळखी व्यक्ती आपल्यासाठी न आवडणारी गोष्ट मन लावून करतोय यापेक्षा अजून आपल्याला आयुष्यात काय हवं आहे? सगळंच काही मिळाल्यासारखं वाटतंय.

       मी अगदी लहानसहान गोष्टींत आनंद शोधणारी मुलगी आहे. मला महागडे गिफ्ट्स नाही दिले तरी चालेल पण तुमचा वेळ आणि प्रेम मला भरपूर प्रमाणात हवे आहे.मी तुमच्या सुखदुःखात नेहमीच तुमच्या सोबत असेल आणि तुम्हीही माझ्या सुखदुःखात असाल याची मला खात्री आहे. मी ज्या व्यक्तींना आपलं मानते त्यांच्यासाठी काहीही करण्याची माझी तयारी असते. आज मी खूप आनंदी आहे कारण मला माझ्या मनासारखा जोडीदार भेटला आहे फक्त दुःख एकाच गोष्टीचे आहे की माझ्या चेहऱ्यावरील आनंद बघायला आज माझे पप्पा हवे होते. माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी खंत म्हणजे मला माझ्या पप्पांच्या पसंतीने लग्न करायचे होते पण काय करणार देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. 

       पत्राच्या शेवटी मला असे सांगायचे आहे की पुढे जाऊन आपल्यात मतभेद, वादविवाद होऊच शकतात, ते आपण त्या त्या वेळी बोलून मिटवून टाकूयात म्हणजे मनात काही राहणार नाही. आपल्यात मैत्रीपूर्ण नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करूया.मला तुमची बेस्ट फ्रेंड व्हायचं आहे.

           "साथ माझी तुला

            शेवटच्या श्वासापर्यंत असेल

            नाही सोडणार हात तुझा

            जोपर्यंत प्राण माझ्यात असेल"

                                                 तुमची,

                                              होणारी अर्धांगिनी

                                                       

   ©®Dr Supriya Dighe