Jan 26, 2021
नारीवादी

अखेर ती वेगळी झाली

Read Later
अखेर ती वेगळी झाली

अखेर ती वेगळी झाली

उजू हे बरं नाही केलंस तू. केवढ्या विश्वासाने मी माझ्या मैत्रिणीला तुझं स्थळ सुचवलं होतं. एकच मुलगा तिचा तोही दुरावलास तिच्यापासून. सासू एवढी शिकलेली,शांत स्वभावाची आणि तू! काय कमी होतं तुला त्या घरात. माझच चुकलं. उगा त्या प्रांजलीला तुझं स्थळ सुचवलं तिच्या लेकासाठी.

इंदुताईंनी आपल्या भाचीला,उजूला फोनवर चांगलच धारेवर धरलं होतं. उजूने काही नं बोलताच फोन ठेवून दिला होता.
 
आठवड्याभरानंतर एकेदिवशी दुपारी इंदुताई बाहेरच्या ओट्यावर बसल्या असताना पोष्टमन पत्र देऊन गेला. बऱ्याच वर्षांनी असं कोणी पत्र पाठवलं होतं त्यांना. इंदुताईंनीनी पत्रावरचं नाव वाचलं..सौ.उज्वला उमेश काणे
इंदुताईंनी पत्र फोडलं नि भिंतीला टेकून वाचू लागल्या.

प्रिय इंदूमावशी,

सप्रेम नमस्कार,

             मावशी रागावली आहेस नं तुझ्या उजूवर फार. त्यादिवशीच्या तुझ्या बोलण्यातून लक्षात आलं गं माझ्या. मावशी,मला खूप काही सांगायचंय तुला म्हणून हा पत्रप्रपंच.

             लहान असताना तुझ्याकडे येऊन रहायचे मी तेव्हा तू सासूची जशी सेवा करायचीस ना ते पाहून मीही मनोमन ठरवलेलं की मोठं झालं की आपणही असंच वागायचं. तुझ्या व तुझ्या सासूमधले स्नेहबंध मला फार आवडायचे.

              मावशी मी उमेशच्या आईशीही खूप छान वागायचा प्रयत्न करत होते. पण नाही जमलं मला. उमेशची आई म्हणजे माझ्या सासूने मला कधी आपलं मानलच नाही. अगदी साध्यासुध्या गोष्टींतही त्यांचीच मक्तेदारी. टिव्हीवर कोणती सिरियल पहायची ते याच ठरवणार,उमेशने कोणते कपडे घालायचे,त्याला डब्यात कोणती भाजी द्यायची..सगळं त्याच ठरवायच्या. 

              उमेशला काही काम सांगितलं तर त्याला नको लावूस कामाला,तुला नाही जमत तर मी करेन असं म्हणायच्या. घरात उमेशच्या नि त्याच्या बहिणीच्या,इशाच्याच आवडीचे पदार्थ बनायचे. तेही त्यांना विचारुन. अरे पण सून म्हणून आणलत नं मला घरात..मुलगी नका मानू पण एक माणूस म्हणून तरी मला काय आवडतं ते विचारा की. कधीतरी माझ्या आवडीचंही बनवू द्या मला. कोणतीही भाजी,आमटी करायची झाली की यांच्याच पद्धतीने..त्यात सतरा सूचना.

               ऑफिसला जायला लेट होतो म्हणून वरकामाला बाई लावली तर तिला नको जीव करु लागल्या. याच कोनात पूस,त्या तिथे पूस,कपड्यांत साबण ठेवलास..एकही बाई टिकेना. 

                माझ्या लेकाला,अर्णवला घेऊन बसणार सदानकदा. मला जरा कामाला मदत करतील तर नाही. तोही हट्टी बनत चालला होता. तो जे मागेल ते त्याच्या हातात देणार. दिवसाला दोनतीन आईसक्रीम. मी जरा रागे भरायला गेली की माझ्या अंगावर यायच्या. शाळेतही अर्णवचं इतर मुलांशी पटेना झालं. हवं ते हवं तेव्हा मिळायची सवय लागली होती त्याला. कोणी मुलाने अगदी बसच्या खिडकीजवळ बसू दिलं नाही तरी त्याच्या पोटावर बसून बुकलायचा.

                मी पहाटे उठून केरवारा काढायचे.  पोळीभाजी, दुपारचा कुकर सगळं करुन जायचे. संध्याकाळी सात वाजायचे घरी यायला. आले की कपडे बदलून परत सुरुवात..स्वैंपाक,लादी. नणंद फक्त कपडे वॉशिंग मशीनला लावायची. रात्रीची भांडी,ओटाही मीच पुसायचे.  बरं,त्या चार दिवसांत जरा आराम देतील तर तोही नाही. चार वर्ष होत आली. बरंच केलं पण ते केलं तर काय झालं तिचं कर्तव्यच आहे ते ही भाषा.

                काही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर नणंद आणि सासू घेणार. त्यावेळी मी परकी. फक्त काम करण्यासाठी तिचंच घर आहे तिनं केलंच पाहिजे हा पवित्रा पण एखादा निर्णय घेताना मात्र तिला काय कळतय त्यातलं!, ती थोडीच आपल्या घरातली आहे! असा या दोघींचा पवित्रा. माझे सगळे नवीन ड्रेस,साड्या नणंद हक्काने वापरे. मी कधीच नाही म्हंटलं नाही तिला पण वापरलं की धुवायला टाकायची पद्धत नाही. 

               सासूला मधुमेह आहे तरी गोडधोड खात असते. नका खाऊ म्हणलं तर आता माझ्या खाण्यावर उठली म्हणायची. कधी सणासमारंभाला माहेरी जायचं म्हंटलं की ह्यांची तोंडं लगेच पडलेली,इथलं कोण करणार? असं कसं घर टाकून जाते?

               शेजाऱ्यांना माझ्याबद्दल काही वाईटसाईट सांगायच्या..मी आळशी आहे,घर अस्वच्छ ठेवते वगैरे. काही वर्ष सहन केलं मग बाचाबाची होऊ लागली. बराच मानसिक ताण सहन करत होते मी. शेवटी ठरवलं,बस. सासूला बरेचदा माझी बाजू समजावून द्यायचा प्रयत्न केला. त्यांना म्हंटलं,"घर आपल्या सर्वांच आहे. प्रत्येकाने वाटून घेऊ कामं तर या वयात मला कामं करायला लावतेस का असं म्हणून रडू लागल्या. नणंद म्हणे थोड्या दिवसांची पाहुणी..तिला कामं सांगायची नाहीत. 

                 शेवटी उमेशचं प्रमोशन झालं त्याच दिवशी हा ब्लॉक बुक केला. गणेशपूजन करुन रहायला आलो इथे. सासू,नणंद दोघीही घर बघायलाही आल्या नाहीत. त्यांच्या मुलाला मी तोडलं त्यांच्यापासून असं गावभर सांगत बसतात. मला इथूनतिथून कळतं. मी नाही लक्ष देतं. मला माझं आयुष्य सुखाने जगायचय. मावशी मला एकत्र कुटुंबात खरंच रहायला आवडलं असतं पण त्यांनी मला सुनेची जागा न देता एका मोलकरणीची दिली. लोक हसत असतील तर हसूदेत. लोक दोन्ही बाजूने बोलतात. मी ठरललय माझ्या मनाला पटेल तेच करायचं. 

                  नणंदेचं लग्न ठरलय. तिच्यासाठी मी मोत्याची नथ,सोन्याच्या बांगड्या केल्या. तिच्यासोबत सासूसाठीही सोन्याच्या पाटल्या केल्या. अहेरात द्यायच्या साड्या,इतर शर्टपीस,पँटपीस घेतले. हॉलचा एडव्हान्स उमेश भरुन आला. जर आमच्या मनात वाईट असतं तर आम्ही हे सगळं केलच नसतं. वेगळं राहूनही मनाने एकत्र रहाता येतं ना मावशी तशी राहीन मी. सासूला खरंच अंतर देणार नाही. 

                  मावशी,तू खरंच ये एकदा चार दिवस रहायला माझ्याकडे. इथे मी माझ्या पद्धतीने घर सजवलय. पडदे,उशांचे अभ्रे,किचन सगळं माझ्या मनासारखं मांडलय जे मला सासूने तिथे कधीच करु दिलं नव्हतं. तिथे मला चॉईसचं नव्हता. तिला काय कळतय,बावळट आहे ती असंच सासू म्हणायची. अर्णव मोठा झाला की मीही सासू होईन तेव्हा मात्र मी सुनेला नक्की तिची स्पेस देईन बघ.

                 इंदुमावशीने चष्मा काढला व पदराच्या टोकाने डोळे पुसले. मनात म्हणाल्या,"उजू,माफ कर लेकी मला. मी उगाच तुला वाईट समजत होते. घरफोडी समजत होते. सुखाने नांद तू. माझे शुभाशीर्वाद आहेत तुम्हा उभयतांना."

---------सौ.गीता गजानन गरुड.