Jan 26, 2022
नारीवादी

संघर्ष आणि एक ध्येय

Read Later
संघर्ष आणि एक ध्येय

"लव्ह यू काकू..."

हा शेवटचा मेसेज वाचून गायत्रीच्या चेहेऱ्यावर एक छान हसू खुलले आणि नकळत, मागील काही वर्ष डोळ्यां समोर तरळत गेली.

तिला तो दिवस स्पष्ट आठवत होता, त्या दिवशी गायत्री आणि राजचं लग्नं होतं, त्यावेळी स्टेजवर राजने, गायत्रीची ओळख करून दिली,

“ ही कनिका माझ्या चुलत भावाची मुलगी."

तेव्हा गायत्रीने कनिकाला पहिल्यांदा पाहिले बारीक, चुणचुणीत, निखळ हसणारी, निरागस, ती साधारण सहावी सातवीत असेल तेव्हा, अशी ही कनिका गायत्रीच्या मनात भरली. का कुणास ठाऊक पण तिच्याबद्दल गायत्रीला आपुलकी जाणवली.. ती स्टेजवरून खाली गेली तेव्हा हळूच राजने गायत्रीच्या कानात सांगीतले की...

“तिचे वडील माझ्या खूप जवळचे होते, पण दुर्दैवाने ती लहान असतानाच दादास एका ॲक्सिडेंत मध्ये देवआज्ञा झाली.”

हे ऐकून गायत्री चा जीव जागीच बसला. इतक्या गर्दीत सुद्धा गायत्री कनिकाला निरखून बघत होती.

त्यानंतर काहीवर्ष गायत्री आणि कनिकाची भेट झाली नाही, पण तीन चार वर्षानंतर राजला घरच्यां कडून समजलं, की कनिका दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून पहिली आली आहे, त्यानी ही वार्ता गायत्रीला सांगितली. दोघेही खूप खुश झाले.

गायत्रीला खरंच खूप कौतुक वाटलं तिचं. त्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती, त्यात घरातील इतर मंडळी ह्यांनी पण साथ दिली नाही. म्हणतात ना संकटात कोण काका नी कोण मामा, कोणी साथ देत नाही. तसच कनिकाचं सुद्धा झालं, आधाराला फक्त ती, तिची आई तिचा लहान भाऊ आणि आजी.

वडीलगेल्यानंतर तिच्या आईने शिलाई काम करायला सुरुवात केली, त्यातून घर खर्च आणि मुलांचं शिक्षण असं सुरू होतं. विदर्भातील एका छोट्याशा गावात ते रहात होते. मामाच्या घरी आसरा मिळाला पण.... शेवटी ते परकेच होते.

 मुळातच समंजस असलेल्या कणिकाला आलेल्या परिस्थितीने अजूनच जबाबदार बनवले.

काही लोकांचा जन्मच मुळात संघर्ष करण्यासाठी झालेला असतो, त्यातील एक म्हणजे कनिका , गायत्रीने अनेक लोकांचे संघर्ष बघितले, तिच्या बाबांचा संघर्ष बघितला, नवऱ्याचा बघितला पण, कनिकाचा संघर्ष फार कठीण आहे असं तिला वाटायचे, कारणं, पुरुष आणि स्त्रीच्या संघर्षात फरक असतो. समाज मुलींना कशा नजरेने बघतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यात वडील नसलेल्या मुलीला जास्त सोसावं लागतं, त्यामुळे तिला तिचं फार कौतुक वाटायचं.

 राजने तिच्या वडिलांबद्दल सांगितलं पण गायत्रीची विचारायची हिम्मत नाही झाली की, कनिका किती लहान होती तेव्हा, कारणं लग्नातच तर ती लहान होती, कसं वाटतं असेल त्या चिमुरड्या जीवाला, ह्याची कल्पना पण करवत नाही.

पुढे बारावीत पण कनिका मेरिट मध्ये आली. पुढचं शिक्षण कनिकाने आर्टस् मधून करायचा निर्णय घेतला, पुण्याला आली, तिथल्या कॉलेज मध्ये दाखला घेतला आणि आयएएसच्या तयारीला लागली.

संघर्षाची सुरुवात घरापासूनच होत असते, तिचं पण तसच झालं, तिचं कौतुक कमी आणि तिची टिंगल जास्त केली, कोणाचं चांगलं होतंय हे बघवत नाही लोकांना.तेव्हा लोक अशा कर्तृत्ववान लोकांचं मनोबल खच्चिकरण करायचा प्रयत्न करतात.

“जास्त शिकून काय करणार आहे.? असे कोणते दिवे लावणार आहे? ती कसली बनते आयएएस? लग्न करून दे मुलीच."

असे सल्ले दिले गेले. पण ती जराही डगमगली नाही. तिला तिचे ध्येय माहीत आहे, आणि तिला ते पूर्ण करायचे आहे. त्यासाठी तिच्या आईने पुरेपूर तिची साथ दिली.

स्वतः बरोबर मोठ्या बहिणीची जबाबदारी ही कनिका चोख पार पाडत होती, तिने लहान भावाला प्रोत्साहन देऊन त्याला पण पुण्याला इंजिनियरिंगसाठी दाखला मिळवून दिला, काही दिवसांनी आई आणि आजीला पुण्याला घेऊन आली. विदर्भातल्या छोट्याश्या गावातून आलेल्या कनिकाचा प्रवास सुरू झाला.

आता प्रश्न होता पैशांचा, त्यासाठी तिच्या आईने घरगुती मेस सुरू केली, जबाबदार कनिका सकाळी लवकर उठून आईला मदत करून मेस चे डब्बे पोहोचवण्याची पण जबाबदारी बजावत होती, त्यानंतर कॉलेज, क्लास करून घरी येताना ते डब्बे परत आणायचे, आल्यावर ते सगळे डब्बे धूवून ठेवायचे आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा, असा तिचा नियम सुरू झाला. इतक सगळं करून सुध्दा ती कॉलेज मध्ये टॉपर होती.

पण ईश्वराने तिची अजून परीक्षा बघायचं ठरवलं. करोना मुळे मेसचे डब्बे पण बंद झाले, पण ती हिमतीने लढत होती, तिने त्यातून मार्ग काढत शाळेतील मुलांची ऑनलाईन ट्यूशन सुरू केली. त्यात तिचा भाऊ आजारी पडला, आणि त्याच मेजर ऑपरेशन करावे लागणार होते. ४-५ लाखांचा खर्च येणार होता. जवळच्या नातेवाईकांनी काही बोलण्या आधीच हात वर केले, वरून त्याला गावी घेऊनजा आणि उपचार कर असे फुकटचे सल्ले दिले. पण तिला माहित होतं, त्याचा ईलाज गावी होणार नाही.

तरी सुद्धा कोणाला कधी उलटून बोलली नाही, सगळ्यांचं ऐकून घेतलं. तिला फार वाईट वाटत होतं, आपण कोणाला मदत मागितली सुद्धा नाही तरी लोक असं वागतात ते पण सख्खे काका असूनसुद्धा!

तिने स्वतः सगळे पैसे जमले, राज आणि गायत्रीने मदतीचा हात पुढे केला पण तिने तो नाकारला... “काका मी पैशांची सोय केली आहे, लागले तर सांगेल तुम्हाला”, पण ती वेळ तिने येऊ दिलाच नाही. पैसे कसे जमवले विचारणा केली तर म्हणाली, “मी एज्युकेशन लोन साठी अर्ज दिला होता ते मंजूर झालं, त्याची रक्कम आहे माझ्याकडे, काही रक्कम माझ्या फ्रेंड्सने जमाकरून दिली, जबरदस्तीने, जी मी हळू हळू परत करणार ह्या बोलीवर स्वीकारली, आजीच्या पेन्शनचे काही पैसे आहेत, आणि काही एँडव्हान्स घेतला ट्यूशन शिकवते त्यांच्याकडून, ती रक्कम फी मधून वाजाहोत राहील. “

तिचं उत्तर ऐकून राज आणि गायत्रीचा डोळ्यात पाणी आलं.

चांगल्या हॉस्पिटल मध्ये तिने भावाच ऑपरेशन केलं, मरणाच्या दारातून तिने त्याला खेचून आणल. तरी अजून पण तिचे संकट काही कमी होत नाहीत.

भाऊ हॉस्पिटल मध्ये असतांनाच तिची आई चक्कर येऊन पडली, नशिबाने काही मेजर नव्हतं. नंतर काही दिवसांनी आजीचे पण ऑपरेशन झाले.

हे सगळ गायत्री बघत होती, तिच्या मनात तिच्याबद्दल अजूनच प्रेम निर्माण झालं. शक्य तितका तिला आधार द्यायचा प्रयत्न गायत्रीने केला. खरंच किती तो स्वाभिमान, किती ती जिद्द. ती विचार करत होती, खरंच लाखात एक आहे कनिका. अगदी तिच्या नावसारखी, शंभर नंबरी सोनं आहे ती. सोन्याला पण खूप ताप सहन करावा लागतो, तेव्हा त्याला चकाकी येते, तसच कनिकाचे आहे. पण ह्यातून ती खूप घडणार आहे हे नक्की. तिचा संघर्ष अजून सुरू आहे, जिद्दीने ती परत उभी राहते, लढत राहते. कोणाचीही साथ नाही, आधार नाही.

आई, आजी भाऊ यांच्यासाठी डोळ्यात अश्रू सुद्धा येऊ देत नाही. कुठून आणते इतकी ऊर्जा, इतकं बळ देव जने.

तीही थकत असेल.. पण तरी चेहेऱ्यावर कोणतंच दुःख त्रास वेदनांचा लवलेश पण दिसू न देता, सदा हसत राहते, हसवत रहाते. 

 

धन्य तिची आई, जिच्या पोटी अशा कर्तबगार मुलीने जन्म घेतला. धन्य ती मुलगी, जी निरंतर संघर्ष करत आहे.

विचारांच्या भरात आपसूकच गायात्रीच्या डोळ्यात पाणी आलं.

कनिका वडीलांसारख राजला मानते, त्यांचं मार्गदर्शन घेत राहते, मदत देऊकेली की मात्र हसत नाकारते.

राज सुद्धा मुलीप्रमाणे तिच्यावर प्रेम करतो. तिला मार्गदर्शन करतो.

गायत्री आणि कनिकाचे सुद्धा एक वेगळेच बाँडींग आहे. गायत्री तिची आई नसली तरी ती कनिकाला मुलगी मानते.

त्याचबरोबर दोघे कनिकाचा स्वाभिमान दुखावणार नाही ह्याची सुद्धा काळजी घेतात.

 

 

 

धन्यवाद...

 

मित्रांनो ही कथा सत्य कथा आहे, कनिकाच्या जीवनाची, तिचा संघर्ष अजून सुरू आहे, तिचा संघर्ष कधी संपेल माहीत नाही, पण ती आयएएस बनावी हीच इच्छा आहे. तिचं ध्येय पूर्ण होऊदेत. त्याचबरोबर ती एक चांगली व्यक्ती तर आहेच ह्यात शंकाच नाही.

तुम्हाला माझी कथा कशी वाटली नक्की सांगा, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.

 

 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now