Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष- भाग-१९ 

Read Later
अस्तित्व एक संघर्ष- भाग-१९ 
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-१९ 


आज विवेक प्रेरणाबरोबर हॉस्पिटलमध्ये थांबला होता. तो तिला काही ना काही सांगून हसवण्याचा प्रयत्न करत होता. दिदी तुला आठवतं आपण दोघेही टॉम अँड जेरी बघायचो....आणि ते बघण्यासाठी आपण आपला अभ्यास पटापट पूर्ण करायचो... तुला गंमत सांगू, अजूनही ते कार्टून आपल्या इकडची कित्येक लहान मुले आवडीने बघतात... दिदी थांब हा मी लावतो आता कार्टून असं म्हणून त्याने हॉस्पिटलचा टीव्ही सुरु केला. टिव्ही सुरू करताक्षणी खरी खबरचा न्यूज चॅनेल सुरु झाला....विवेक चॅनेल बदलण्याचा प्रयत्न करु लागला पण चॅनेल बदलेना. चॅनेलवर पत्रकार मोनिका म्हणत होती, आज एका निर्भयाला एका वेगळ्या पद्धतीने न्याय मिळाला... रिक्षा ड्रायव्हर नरेशचा जागीच मृत्यू झालेला असून त्याचा गुन्ह्यातला साथीदार मनोजला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे... प्रेरणाच्या कानात मोनिकाची वाक्ये फिरु लागली...ती जोरजोरात टाळ्या वाजवून एकटीच हसू लागली....तिला असं अचानक हसताना पाहून विवेक घाबरला...दिदी, काय होतं आहे तुला....तो तिला हात लावून विचारु लागला. तसं हसणं थांबवत प्रेरणा जोरजोरात किंचाळू लागली. तिला हळूहळू सगळं काही आठवू लागलं होतं. तिच्या आवाजाने बाजुच्याच रूममध्ये पेशंटला चेक करायला आलेले नर्स आणि डॉ दोघेही धावत आले... डॉ तिला शांत करण्याचा प्रयत्न करु लागले... विवेक घाबरुन एका बाजूला झाला. डॉ नी नर्सला तिला पकडून ठेवायला सांगून तिला इंजेक्शन दिलं. इंजेक्शनमुळे प्रेरणा गुंगी येऊन झोपी गेली.

 

डॉ नी टीव्ही वर पाहिलं, त्यांच्या प्रेरणाच्या किंचाळण्यामागचं कारण लक्षात आलं. डॉ विवेक जवळ आले.

डॉ: प्रेरणाने किंचाळण्या अगोदर काय केलं होतं.

विवेक: मी दिदीला कार्टून आवडतं म्हणून कार्टून लावायला टीव्ही चालू केला. तर न्यूज बघून दिदी टाळ्या वाजवून हसू लागली...आणि मी हसत का आहेस म्हणून विचारायला गेलो तशी ती किंचाळायला लागली.

डॉ: घाबरु नकोस, दिदी न्यूज बघून रिऍक्ट झाली आहे म्हणजे कदाचित ही चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी... तुला भिती वाटत असेल तर आईला किंवा बाबांना बोलव हवं तर...मी डॉ गोवेकर यांना कॉल करुन यायला सांगतो...आता शांत हो...घाबरुन जाउ नकोस... काही झालं तर लगेच बेल मार... असं म्हणून डॉ त्यांच्या केबिन मध्ये गेले.

 

विवेक प्रेरणाच्या बाजूला असलेल्या खुर्चीत बसला. घाबरुन त्याने घरी कळवण्यासाठी मोबाईल बाहेर काढला. तर त्यावर प्रतिकचा मिसकॉल येऊन गेला होता. त्याने लगेच त्याला कॉल केला. प्रतिकची नुकतीच दुसऱ्या ऑफिस मधली मिटिंग संपून तो तिथून निघत होता. विवेकचा कॉल पाहून त्याने कॉल उचलला.

विवेक: हॅलो प्रतिक सर, तुम्ही कॉल केला होता ना, ते मी दिदी बरोबर आहे म्हणून मोबाईल सायलेंट वर ठेवला होता.

प्रतिक: अरे काही हरकत नाही. ते मी तुला हे सांगायला कॉल केला होता, तुला उद्या काही documents submit कराव्या लागतील. तर तुला कॉल करुन सांगेल किंवा मग मेल करेल. तेव्हा आठवणीने सगळं ready ठेव.

विवेक: हो सर, मी आधीच सगळं ready ठेवलं आहे फक्त एकदा चेक करेन काही मिस तर नाही झालं असेल तर...

प्रतिक: that's good, प्रेरणा कशी आहे आता...

प्रतिक ने असं विचारल्यावर विवेकने त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला. 

विवेक: सर मी खूप घाबरलो आहे, दिदी जशी करत होती ते पाहून आईबाबांनाच कॉल करत होतो. तुमचा कॉल बघून आधी तुम्हाला कॉल केला.

प्रतिक: ओके ओके, काळजी करु नकोस, ठीक आहे मी ठेवतो कॉल.... तू करून घे कॉल आईबाबांना... असं म्हणून प्रतिकने कॉल ठेवला.

विवकने लगेच कॉल करून घरी कळवलं. हे कळताक्षणी आईबाबा तातडीने हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी निघणार तेवढ्यात मालगुडेबाई त्यांच्या दारात हजर होतात. त्यांना दारात अचानक आलेलं पाहून प्रेरणाचे बाबा किचनमध्ये गॅस वगैरे सगळं बंद केलं आहे की नाही हे चेक करायला गेलेल्या आईला आवाज देतात. तशी आई बाहेर येते.

बाबा: तुमचं काही काम होतं का ताई...?

मालगुडे: नाही नाही, ते मी...(थोडा वेळ गप्पच राहून पुन्हा बोलतात) तुमची माफी मागायला आले होते.

बाबा: माफी कशाबद्दल..?

मालगुडे: म्हणजे (प्रेरणाच्या आईकडे पाहून) वहिनींनी तुम्हाला काही सांगितलं नाही...?

आई: नाही मी यांना काहीच सांगितलं नाही.

मालगुडे: वहिनी, तुम्ही खरंच खूप समंजस आहात. मी तुमच्या जागी असते तर पूर्ण बिल्डिंगला सांगून मोकळे झाले असते. खरंच माझं खूप चुकलं त्यादिवशी... तो जो कोणी मुलगा होता त्यादिवशी तुमच्या घरी.... त्याने माझे डोळे उघडले. माझ्यापायी माझ्या भावाची नोकरी जाणार होती. त्यानेच ती जाण्यापासून थांबवली. माझा भाऊ मला खूप बोलला... आणि मला सुद्धा माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या चुकांचा पश्चाताप होत आहे. माझ्या स्वभावामुळे माझा मुलगा आणि माझी गुणी सून दोघेही मला कंटाळून वेगळे रहायला लागले. पण मी आता माझ्या सगळ्या चुका सुधारणार आहे. (हात जोडून म्हणाल्या) दादा, वहिनी मला माफ करा...

आई: अहो, माफी कसली मागत आहात, तुम्हाला तुमची चूक कळली ना... त्यातच सगळं आलं. 

बाबा: हो हो, ही म्हणतेय ते योग्य म्हणते आहे. ताई आम्हाला आता लगेच हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे.... त्यामुळे आम्ही निघू का...?

मालगुडे: माफ करा मला, हो हो चालेल तुम्ही निघा. थांबा मी यांना सोडायला सांगते तुम्हाला.....असं म्हणून त्यांनी मि मालगुडेंना त्यांना कारने सोडायला सांगितलं.

आईबाबा: तुम्ही कशाला उगाच त्रास देत आहात त्यांना... आम्ही गेले असतो...

मालगुडे: त्रास कसला त्यात, प्रेरणा आम्हाला मुली सारखीच आहे.

मालगुडे बाईंच्या तोंडून हे वाक्य ऐकून आईला एकदम भरुन आलं. तिच्या त्याक्षणी मनात आलं की या त्याच होत्या का...ज्या त्या दिवशी नको नको ते बोलल्या...आई असा विचार करत असतानाच प्रेरणाच्या बाबांनी तिला हात लावून भानावर आणलं. तसे ते दोघेही मालगुडेंच्या कारमधून हॉस्पिटलमध्ये जायला निघाले. प्रतिक ही प्रेरणा बद्दल कळल्यावर समिधा आणि मीनाला सांगून हॉस्पिटलमध्ये जायला निघाला.

 

रेखा ने बातमी बघून राजीवला कॉल केला. राजीवने रेखाचा कॉल आलेला पाहून नक्कीच काहीतरी काम असावं म्हणून लगेच कॉल उचलला.

राजीव: हां बोल रेखा...

रेखा: तुम्ही न्यूज बघितली का...? आज तुमची केस होती ना कोर्टात...?

राजीव: हो आज केस होती कोर्टात.... हो कळलं मला त्या न्यूज बद्दल...!

रेखा: मग आता, तुम्हाला केस नाही ना लढावी लागणार...

राजीव: (हसत म्हणाला) असं नसतं ग, ही केस लढणार मी, म्हणजे कोर्टात केस गेल्यावर तिचा निकाल हा द्यावाच लागतो. फरक फक्त हा असणार की गुन्हेगाराने त्याचा गुन्हा आधीच कबूल केला आहे, त्यामुळे ही केस लवकर संपेल.

रेखा: ओह असं पण असतं, मला त्यातलं तितकं माहीत नाही...

राजीव: मग मी आहे ना सांगायला...

रेखा: (लाजत हसून म्हणाली) तर मग आज तुम्ही खूश असणार ना...! म्हणजे तुमची ही केस लवकर संपेल ना आता...!!

राजीव: हो खूश तर मी आहेच... पण आता तुझं माझं भेटणं कमी होणार... म्हणजे तू मला केसच्या निमित्ताने कधीतरी भेटत होतीस...

रेखा: (थोडा वेळ गप्पच राहते) केस संपली म्हणजे आपलं बोलणं पण संपत का...? आणि असं तुम्हाला वाटतं असेल तर मग आज भेटायचं का...?

राजीव: (थोडा वेळ विचार करुन) मी सांगतो तुला, आज मला कोर्टातून पुढची तारीख घ्यावी लागेल...कळवतो तुला...!!

रेखा: (काहीशी नाराज होत) ओके वकिलसाहेब जशी तुमची आज्ञा... असं म्हणून ती बाय न बोलताच कॉल ठेवून टाकते...

तिच्या अशा बोलण्याने राजीवच्या लक्षात येतं रेखाचा मूड आपण हो न बोलण्याने खराब झाला आहे. पण त्याच्याकडे त्यावेळी विचार करायला बिलकुल वेळ नसतो. कोर्टातून पुढची तारीख घ्यायची असते. तो त्याचा कोट घेऊन लगेच कोर्टात जायला निघतो.

 

नरेशच्या बायकोला तिच्या आईने डोळ्यावर पाणी टाकून शुध्दीवर आणलं. ती डोळे उघडून उठून बसते तोच इतका वेळ न उठलेल्या आईला उठलेलं पाहून तिची मुलगी राणी स्वतःचे डोळे पुसत तिला हसत हसत बिलगते. राणीला असं बिलगलेलं पाहून तिच्या डोळ्यात पाणी येतं... आपली आई रडते आहे हे पाहून राणी तिच्या इवल्या इवल्या हाताने तिचे डोळे पुसते... तिला असं करताना पाहून तिचे आईबाबा सुद्धा तिला खांद्यावर हात ठेवून राणीसमोर शांत राहायला सांगतात.क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...