Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष- भाग -१६

Read Later
अस्तित्व एक संघर्ष- भाग -१६
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग -१६


 

एक 28-30 च्या आसपास वय असलेली महिला पोलिस स्टेशनमध्ये येते. ती आजूबाजूला बघते पण नक्की कोणाला काय विचारावं हे तिला समजत नाही. तिला असं बुचकळ्यात पडलेलं पाहून हवालदार दळवी यांनी तिला काही तक्रार दाखल करायची आहे का म्हणून विचारलं. 

महिला: नाही नाही मला ते अटक करण्यात आलेल्या नरेशला भेटायचं होतं.
दळवी: नरेश (काहीसं आठवून) तो रिक्षावाला...?
महिला: हो तोच रिक्षावाला...(थोड्या कपाळावर आठ्या येत तिने उत्तर दिले)
दळवी: तो तुमचा कोण लागतो म्हणजे तशी आम्हाला नोंद करावी लागते म्हणून विचारलं.
महिला: मी त्याची बायको आहे...
दळवी: अच्छा, मी लिहून ठेवतो... पण तुम्हाला साहेब आल्याशिवाय भेटता येणार नाही... तशी वरुन ऑर्डर आहे आम्हाला म्हणून..तुम्ही बसून घ्या या बाकड्यावर. साहेब राउंड मारायला गेले आहेत, आले की मी सांगतो.
महिला: हां ठीक आहे भाऊ...(असं म्हणून ती महिला बाकड्यावर बसते)

थोड्या वेळाने मि. जाधव पोलिस स्टेशनला येतात आणि थकून खुर्चीत बसतात. थोडं रिलॅक्स झाल्यावर ते दळवींना हाक मारुन बोलवतात.
जाधव: या बाई कोण आहेत...यांची तक्रार दाखल करुन घेतली का...?
दळवी: नाही सर, त्या भेटायला आल्या आहेत त्यांच्या नवऱ्याला....तुमची परवानगी लागेल म्हणून मी त्यांना बसायला सांगितलं तुम्ही येईपर्यंत...
जाधव: असं होय बोलवा त्यांना, सांगा मी बोलावलं आहे म्हणून...
तसे दळवी यांनी तिला साहेबांनी बोलावलं असल्याचं सांगितलं. तशी ती बाकड्यावरून उठली आणि जाधव यांच्या समोर जाऊन उभी राहिली...आणि म्हणाली, साहेब मला ते भेटायचं होत...
जाधव: बसा तुम्ही ( खुर्चीकडे हात दाखवून त्यांनी तिला बसायला सांगितलं). 
ती बसल्यानंतर..
जाधव: तुम्ही तुमच्या नवऱ्याला भेटायला आला आहेत म्हणजे त्याचा गुन्हा काय आहे हे तुम्हाला माहीतच असेल...म्हणजे तुमच्या पर्यंत ही बातमी आली असेल.
महिला: हो साहेब, कितीदा सांगितलं मी माझ्या नवऱ्याला तो मनोज चांगला माणूस नाही पण कधी ऐकलंच नाही त्याने माझं...आणि आज हा दिवस बघावा लागतोय...
जाधव: तुझा नवरा मनोजला कधी पासून ओळखतो...
महिला: माझा नवरा आमचं लग्न होण्यापूर्वी एका फॅक्टरीमध्ये कामाला होता...तिथेच मी आणि तो मनोज सुद्धा होता...नरेश आणि मी एकमेकांना पसंत करू लागलो मग घरून थोडा विरोध झाला पण नंतर सगळे तयार झाले..  आम्ही लग्न केलं आणि मग मी त्याला फॅक्टरी सोडून स्वतःची रिक्षा घेऊन चालवायला गळ घातली...आम्हाला एक दोन वर्षाची मुलगी पण आहे...पण हा मनोज अधून मधून माझ्या नवऱ्याला भेटायचा...हळूहळू तो दारू प्यायला लागला आणि कधी कधी जुगार पण खेळून येत असे...मी वैतागून माहेरी गेले कि पुन्हा कधी असं करणार नाही म्हणत घेऊन येत असे...काही दिवस चांगले जायचे मग परत हा भेटला की पुन्हा तो त्याच वळणावर...कितीदा समजावलं मी त्याला...पण कधी ऐकलं नाही त्याने माझं...आज हा दिवस बघावा लागेल असं वाटलं पण नव्हत..कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली या माणसाने...सगळी लोक जणू काही मला मारतील असं वाटत.. आता लेकीला आईकडे ठेवून आले आहे मी...तुमची परवानगी मिळेल भेटायला तर उपकार होतील...
जाधव: (कॉन्स्टेबल पाठक बाईंकडे पाहत काही इशारा करत म्हणाले) यांना जरा त्या नरेशला भेटवा.. पण १० मिनिटाच्यावर बोलता येणार नाही तुम्हाला...(त्याच्या बायकोला उद्देशून म्हणाले)

ती महिला कॉन्स्टेबल पाठक यांच्या मागे तिच्या नवऱ्याला भेटायला गेली...पाठक बाई एका जेलपाशी जाऊन बोलल्या तुमच्या मधला नरेश कोण आहे त्याला भेटायला कोणी तरी आलं आहे...असं म्हणून त्या जाधव यांनी इशाऱ्याने सांगितल्याप्रमाणे.. त्यांना कळणार नाही असं बाजूलाच त्यांचं बोलणं ऐकत थांबल्या.

नरेश: (बायकोला समोर बघून नरेश रडू लागला...) तुझं मी ऐकायला हवं होतं ग...आज हा दिवस पाहावा लागला नसता...मला माफ कर ग...मी तुझा आणि आपल्या राणीचा गुन्हेगार आहे...
बायको: आता खूप उशीर झाला आहे हे सगळं समजायला...तू केलेली गोष्ट माफ करण्यासारखी नक्कीच नाही...माझ्या बाबतीत असं काही घडलं असतं तर केलं असतं का तू माफ त्या माणसाला....
नरेश: (संतापून) त्याला जिवंत नसतं सोडलं...
बायको: मग...तूच सांग तुला खरंच माफ करायला हवं मी...तुला माहित तरी आहे की तुझ्या अशा वागण्याने आम्हाला जगणं मुश्किल झालं आहे...कुठे यायची जायची सोय नाही...२ दिवस राणी खूप रडत होती...सतत तुला शोधत होती...मग मी तिला घेऊन आईकडे आले...आजूबाजूच्या लोकांमध्ये सतत चर्चा असते...मी अचानक माहेरी आल्यामुळे...
नरेश: राणीला का नाही आणलं..?
बायको: कशाला आणायला हवं होतं मी तिला...हे दाखवायला का...की तिच्या बापाने काय गुन्हा केला आहे ते...मला माझ्या मुलीवर तुझी सावली पण पडू द्यायची नाही आहे...तुला काय वाटत मी इथे तुझ्यावरच्या प्रेमापोटी आले आहे...? माझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसत तरी आहे का तुला...? माझा नरेश कधीच मेला...आता जो माझ्या समोर आहे तो कोणी भलताच आहे...आणि खबरदार पुन्हा माझ्या लेकीचं नाव जरी तू तुझ्या तोंडावर आणलंस तर...तुला तुझा मित्र खूप महत्त्वाचा वाटायचा त्याच्या प्रत्येक गोष्टीला तुझा होकार असायचा...त्याच्यासमोर तुला बायको, पोटची लेक कधीच महत्त्वाची वाटली नाही....आता म्हणतोस मी तुला माफ करावं...
नरेश: (हात जोडत म्हणाला) असं नको बोलूस...मला माझी चूक कळली ग...खूप उशीर झाला ती समजायला मला...तू बरोबर बोलतेस, खरंच माझ्यासारख्या बापापासून राणीला लांब ठेवायला हवं...खूप मोठी कर तिला आणि कधी सांगू नकोस की तिच्या बापाने काय गुन्हा केला ते....आणि आपली खोली विकून तुझ्या आईच्या इथे घे...आणि लोकांना सांग, की तुझ्या नवरा अपघातात गेला म्हणून....आपल्या लेकीवर माझ्या गुन्ह्याची सावली पडता कामा नये...
बायको: (रडत) नरेश, तुला आधी का नाही जाणवलं हे...आज तू आपल्या सुखी संसाराचं तुझ्या मैत्रीपायी वाटोळं केलं...

तेवढ्यात कॉन्स्टेबल पाठक आल्या आणि म्हणाल्या, तुमची भेटायची वेळ संपली आहे...चला आता...तशी नरेशची बायको पाठक बाईंच्या मागे जायला वळली...तिला जाताना पाहून नरेश म्हणाला, काळजी घे माझ्या राणीची आणि तुझी सुद्धा..आणि...आणि म्हणत तो खाली रडत बसला...त्याला रडताना पाहून मनोज म्हणाला, कशाला रडतो आहेस, माझ्याकडे एक प्लॅन आहे, जो आपल्याला इथून बाहेर काढेल असं म्हणून तो त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला.

बाहेर मि जाधव यांच्याबरोबर राजीव बोलत बसला होता. तोच नरेशची बायको पुन्हा मि जाधव यांच्याकडे आली आणि म्हणाली, साहेब माझं काम होतं तुमच्याकडे... थांबा हा यांचं काय काम आहे ते बघतो आधी...राजीवला उद्देशून जाधव म्हणाले. हो हो चालेल, राजीवने मानेने होकार दिला...तसे मि जाधव तिला म्हणाले, हां बोला, तुमचं काय काम होतं... साहेब कुठे काम मिळालं असतं तर बरं झालं असतं, किती दिवस असं आईबापाच्या पैशावर जगणार...काय पण काम चालेल, धुनी भांडी, कपडे, लहान मुलांना सांभाळायचं... नरेशची बायको म्हणाली. ठीक आहे कुठे असेल तर कळवतो, तुमचा घरचा नंबर देऊन जा...मग सांगतो तुम्हाला, कुठे असेल काही तसं काम...तर.. तसं ती हात जोडून पोलीस स्टेशनमधून निघून गेली...ती गेल्यावर राजीव म्हणाला, या बाई कोण होत्या...आणि कामाबद्दल का विचारत होत्या...तेव्हा मि जाधव यांनी तिची ओळख राजीवला सांगितली.

राजीव: काय नशीब असतं एकेकाचं...चांगला संसार चालला होता...वाईट संगतीने घात झाला पुऱ्या आयुष्याचा...
जाधव: हो, म्हणूनच ते म्हटलं आहे ना, सुसंगती सदा घडो...
राजीव: आता हिला काम तरी कोण देणार...नाही म्हटलं तरी लोक आजकाल कामवाली बाई ठेवताना पण खूप चौकशी करून ठेवतात आणि हिच्या नवऱ्याने केलेला गुन्हा लपून थोडीच राहणार आहे..
जाधव: हो ते आहेच म्हणा, वय पण फार जास्त नसावं..आमच्या ओळखीमध्ये कुठे काम असेल तर सांगतो...तुम्ही पण बघा तुमच्या ओळखीने कुठे काही काम असलं तर...
राजीव: हां म्हणजे माझ्याकडे तशी ऑफिसमध्ये लादी वगैरे पुसायला कचरा काढायला वगैरे एक हवी होती...आधीच्या मावशी होत्या त्या त्यांचं वय झालं म्हणून यायच्या बंद झाल्या...मी शोधतच होतो..
जाधव: मग बघा...तुम्हाला योग्य वाटत असेल तर...आणि तिच्याबद्दल पूर्ण माहिती आम्ही काढून देऊ तुम्हाला, म्हणजे चुकीच्या माणसाला कामाला लावणं कधीही अयोग्य म्हणून...तिची खात्री झाली तरच ठेवा तिला कामावर...  
राजीव: ठीक आहे, तुम्ही काढा माहिती...आणि तुमची खात्री पटली तरच बघू पुढचं...
जाधव: हो हो चालेल. (नंतर कॉन्स्टेबल पाठक यांना उद्देशून) काय बोलणं झालं तिचं नवऱ्याबरोबर...
तसं पाठक यांनी तिचं झालेलं सगळं बोलणं त्यांना सांगितलं.
जाधव: हां मी तोच विचार करत होतो, लग्न झालं आहे मग मंगळसूत्र का नाही गळ्यात..
राजीव: पण मानलं पाहिजे सर तुम्हाला, म्हणजे तुम्ही त्या मागचं कारण शोधून काढलं..
जाधव: शेवटी पोलीस डिपार्टमेंटच ना, सगळीकडे लक्ष ठेवावं लागत आम्हाला, आणि त्यात गुन्हेगारांशी बोलायला कोणी आलं की ते जास्त लक्ष द्यावं लागत..
राजीव: हो ते आहेच म्हणा, चला मी निघतो..माझं काम पण झालं आहे...आणि सांगा त्या बाईंची चौकशी करून मला...
जाधव: (राजीवच्या हातात हात मिळवत) हो हो जरूर..
तसा राजीव पोलीस स्टेशनमधून निघाला.

प्रतिक घरी ऑफिसचे मेल चेक करत असताना समिधाने त्याला कॉल केला. त्याने कॉल उचलला.
प्रतिक: हां समिधा बोल..काही काम होतं का..?
समिधा: नाही सर मला काही विचारायचं होतं...
प्रतिक: हां विचार ना..
समिधा: सर मला प्रेरणाला भेटायचं आहे...
प्रतिक: (काहीसा विचार करून) हां ठीक आहे मी उद्या जाणार आहे सकाळी... तुला शक्य आहे का सकाळी यायला.. पण तिथूनच तुला ऑफिसमध्ये जावं लागेल..आणि तिच्याशी फक्त चांगल्या आठवणींवर बोलायचं असं डॉ म्हणाले आहेत. तुला ते फोल्लो करावं लागेल
समिधा: चालेल सर
प्रतिक: ठीक आहे, उद्या सकाळी मी ८ ला जाणार आहे तुला ऑन द वे pickup करेन...
समिधा: ओके सर..(असं म्हणून तिने कॉल ठेवला)

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहचले. प्रेरणाबरोबर प्रेरणाची आई बसली होती...दोघेही तिच्या रूममध्ये गेले...प्रेरणाला बसवत आई म्हणाली, बघ प्रेरणा समिधा आली आहे तुला भेटायला. समिधाने प्रेरणाचा हात हातात घेतला आणि म्हणाली, तुला आठवत प्रेरणा, आपण पिझ्झा खाल्ला होता ते...असं म्हणून ती तिला काही ना काही सांगू लागली...प्रतिक बाजूलाच खुर्चीवर बसून त्यांचं बोलणं ऐकत होता...मध्येच समिधाने तिला त्यांच्या ऑफिसमध्ये एकेकाळी असलेल्या मॅग्गीचा किस्सा सांगायला सुरवात केली..तुला आठवते ती मॅग्गी कशी चिडवत होती तुला कॅन्टीनमध्ये...ट्रॅडिशनल डे ला...तुला खूप राग आला होता तिचा...पण तू कंट्रोल केला होतास आणि नेमकं कॅन्टीनमधून बाहेर पडताना तिचा पाय घसरून ती पडली होती...आणि आपण खूप जोरजोरात हसलो होतो...तसं सगळं आठवून प्रेरणा जोरजोरात हसू लागली....तिला हसताना बघून आई आणि प्रतिक खुश झाले...समिधा तिला अजून काही ना काही सांगू लागली...थोड्या वेळाने प्रेरणाचे बाबा हॉस्पिटलमध्ये आले आणि सगळ्यांना रूममध्ये पाहून ते सोफ्यावर येऊन बसले. तसं प्रतिक सुद्धा त्यांच्या बरोबर येऊन बसला.
थोड्या वेळाने समिधा प्रेरणाच्या आईचा निरोप घेऊन रूममधून बाहेर आली.
समिधा: सर मी ऑफिस मध्ये जायला निघते.
प्रतिक: हां चालेल...मी पण येतो थांब थोडा वेळ...
तिच्या मागोमाग आई तिथे आली...तसे बाबा म्हणाले, आता तू घरी जा...मी थांबतो प्रेरणाबरोबर. तसा प्रतिक म्हणाला, काकू तुमची हरकत नसेल तर मी सोडतो तुम्हाला, घरी...आणि तिथून आम्ही जातो पुढे ऑफिसला...
काकू: नको तुम्हाला उगाच त्रास नको...
समिधा: काकू, कसला त्रास, चला तुम्ही...आम्ही सोडतो तुम्हाला...आमचे सर तसे चांगले आहेत...हो ना सर...
तसा प्रतिक हसला..आणि म्हणाला, हो काकू चला तुम्ही...आम्ही सोडतो तुम्हाला.
तसे ते तिघेही तिथून निघाले आणि प्रेरणाचे बाबा प्रेरणाच्या रूममध्ये गेले.

प्रतिकची कार प्रेरणाच्या घरापाशी येऊन थांबली. तशी आई कारमधून उतरत म्हणाली, तुम्ही आज आमच्याकडे याच...काही नाही तर चहा तरी घेऊन जावा...मला बरोबर नाही वाटत तुम्ही घरी येत नाहीत ते...
प्रतिक: ठीक आहे काकू, पण लगेच निघू आम्ही...
काकू: हां ठीक आहे. तुम्ही चला तर...
तसे ते तिघेही प्रेरणाच्या घरी जायला निघाले. विवेक कॉलेज मध्ये गेला असल्यामुळे आईने चावीने दरवाजा उघडला. आणि त्यांना चहा आणि चिवडा खायला दिला... ते दोघे ही खात असताना प्रेरणाच्या शेजारी राहणाऱ्या मालगुडे बाई आल्या...आणि त्यांनी त्या दोघांना जाणूनबुजून न बघताच प्रेरणाच्या आईला आवाज दिला...
मालगुडे: मी काय म्हणते प्रेरणाची आई, तुमची प्रेरणा म्हणे ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये...खरं ना... 
आई: हो, ते तिचं accident झालं ना त्यामुळे तिला ऍडमिट केलं आहे...
मालगुडे: प्रेरणाची आई, खरं किती दिवस अजून लपवणार आहेत तुम्ही...? मला माहित नाही असं वाटत का तुम्हाला, तुमची प्रेरणा ज्या हॉस्पिटल मध्ये आहे त्या हॉस्पिटल मध्ये माझा भाऊ प्रभाकर गोळे काम करतो...मला त्याने सांगितलं आहे सगळं...मी म्हणते मुलीला एवढं रात्रीच काम करायला लावायचाच कशाला...काय तर म्हणे स्त्री पुरुष समानता..आता मला सांगा तुमच्या मुलीच्या बाबतीत जे घडलं त्यानंतर कोणता मुलगा तिच्याशी लग्न करणार आहे...? त्यांचं हे ऐकून प्रेरणाची आई खुर्चीवरच बसली त्यांना काय बोलावं ते सुधरेना. तसे प्रतिक आणि समिधा दोघेही मालगुडे बाईवर भडकले..
समिधा: ओ काकू, तुम्ही पण एक बाईचं आहात ना...आणि बोलवत कसं तुम्हाला हे असं...आणि अशी परिस्थिती कोणाच्याही आयुष्यात घडू शकते...
मालगुडे: ए पोरी, तुला काय संस्कार वगैरे आहेत की नाहीत, आईबाबांनी मोठ्यांशी कसं बोलावं ते शिकवलं नाही वाटत..? आणि मी काय चुकीचं म्हणाले, खरं तेच म्हणाले, कोण करणार आहे अशा अब्रू गेलेल्या मुली बरोबर लग्न..
प्रतीक: (तावातावाने उठत म्हणाला) तुम्ही वयाने मोठे आहात, म्हणून अजून गप्प होतो आम्ही, आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात काय होतं आहे याच्या तुम्हाला नसत्या चौकशा कशाला हव्या आहेत...आणि प्रेरणा जिच्याबद्दल तुम्ही अशी विधाने करत आहात त्या मुलीने एक मुलगी म्हणून नाही तर एक मुलगा म्हणून आजपर्यंत तिच्या आईबाबांना खूप मदत केली आहे आणि या ही पुढे ती करेल..आणि कोण म्हणालात तो तुमचा भाऊ...नाही आताच्या आता त्याच्यावर action घ्यायला लावली तर बघा...असं म्हणून त्याने डॉ ना कॉल केला आणि आणि मि गोळे यांच्यावर action घ्यायला लावली.
मालगुडे: तुम्ही हे केलं ते बरोबर नाही केलं....खरं बोललं की माणसाला लागतं...जाते मी प्रेरणाची आई....तुमच्याशी बोलायला आले हीच मी चूक केली असं म्हणून ती तिथून निघून गेली..

त्या गेल्यावर प्रेरणाची आई रडू लागली. खरंच बोलल्या ना त्या खरंच कोण लग्न करणार आहे... असं सगळं कळल्यावर..माझ्या मुलीच्या आयुष्याचा खेळ मांडला आहे देवाने... प्रतिकने समिधाला तिच्या आईला पाणी द्यायला सांगितलं...तसं समिधा त्यांना शांत करत म्हणाली...काकू असं काही नाही होणार आहे तुम्ही नका काळजी करू...प्रेरणाच्या बाबतीत तुम्ही विचार करतात तसं काही होणार नाही. तरी प्रेरणाची आई रडत होती...आज एक जण येऊन माझ्या मुलीच्या बाबतीत असं काही बोलतो आहे उद्या कोणी दुसरं येईल...माझ्या मुलीची यात काही चूक नसताना लोक तिच्यावर बोट ठेवणार...मला नाही सहन होत आहे सगळं....तसा प्रतिक प्रेरणाच्या आईजवळ येऊन म्हणाला, काकू तुम्हाला याच गोष्टीची भीती वाटते ना, की प्रेरणाच लग्न कसं होईल...कोण करेल प्रेरणाशी लग्न...मी करेन लग्न प्रेरणाशी....मी साथ निभावेन आयुष्यभर...आणि राहिला अशा लोकांशी बोलण्याचा मी आहे अशा लोकांना उत्तर द्यायला तयार...आता तुम्ही रडू नका... तशी आई म्हणाली, तुम्ही खरंच बोलत आहात का..? तसा प्रतिक म्हणाला, हो काकू, मी खरंच म्हणतो आहे...पण प्रेरणा ठीक झाल्यावर मला तिचा होकार हवा आहे...तिच्या मनाविरुद्ध मला हे लग्न नाही करायचं...त्याच्या या उत्तराने आईला भरून आलं.. त्या दोघांच्या बोलण्यात समिधा मध्येच येत म्हणाली, काकू मी म्हणाले, ना तुम्हाला, तुम्ही उगाच टेन्शन घेत आहात. चला आता रडणं थांबवा..आणि आम्हाला ऑफिसला जाऊ द्या....असं म्हणून तिने प्रेरणाच्या आईला डोळे पुसायला लावले. त्या नॉर्मल झाल्यावर समिधा आणि प्रतिक दोघेही त्यांना बाय बोलून ऑफिस मध्ये जायला निघाले.

 

क्रमशः
 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...