अस्तित्व - एक संघर्ष भाग-१४

It is a story of a girl who face such situation where she destroyed totally...and at one point she fights for her identity...

अस्तित्व - एक संघर्ष

भाग-१४


घरी आल्यावर प्रतिकने आईबाबांना, राजीवला डॉ गोवेकर काय म्हणाल्या ते सांगितलं. तशी आई म्हणाली, हां बरोबर म्हणाल्या डॉ, डिप्रेशन मध्ये गेलेल्या पेशंटशी पॉजिटीव्ह बोललो तरच त्याचे विचार पॉजिटीव्ह होतात नाहीतर तो नकारात्मकच विचार करू लागतो आणि अजून डिप्रेशनमध्ये जातो....प्रतिक, तुला सुद्धा ही गोष्ट follow करावी लागेल प्रेरणासाठी...म्हणजे तुझं अधूनमधून जाणं होतं...त्यावेळी तुला सुद्धा या गोष्टी सांभाळाव्या लागतील हे लक्षात ठेव. तुला तिच्याशी फक्त आणि फक्त चांगलंच बोलायचं आहे.. म्हणजे एखादी गोष्ट जी तिने खूप एन्जॉय केली असेल... किंवा मग ऑफिसमधल्या चांगल्या गोष्टी असं तू तिला सांगत जा...हा तुला तुझ्याकडून प्रयत्न करायचा आहे...आणि सगळं तिच्या कलेने व्हायला हवं...हे लक्षात ठेव...आणि एखादी गोष्ट तिच्या बाबतीत वेगळी आढळली म्हणजे एखाद्या विषयाने ती घाबरली किंवा रागावली तर त्या गोष्टी डॉ ना सांगायच्या. हो आई, मी हे सगळं लक्षात ठेवेन तिच्याशी बोलताना...प्रतिक म्हणाला. That's like my good boy...राजीव मध्येच प्रतिकला चिडवण्याच्या उद्देश्याने म्हणाला. ओह गुड बॉय, आहेच मी बरं का...प्रतिकने राजीवकडे उशी फेकत म्हंटल. तसे बाबा दोघांच्या मध्ये पडत म्हणाले, अरे काय हे लहान असल्यासारखे मस्ती करत आहात दोघे...जरा मोठ्यांसारखं वागा. तसे दोघेही मुद्दाम मोबाईल हातात घेऊन बसले...तसे बाबा म्हणाले, मोठ्यांसारखं वागा म्हणजे हातात मोबाईलच घेऊन बसायला हवा का...अरे जरा घरात गप्पा गोष्टी मारायच्या असतात, मोठ्यांचे ही किस्से ऐकायचे असतात...त्यांच्याकडून सुद्धा काही तरी मजेशीर ऐकायला मिळत असतं की...तशी आई हसून म्हणाली, चालू द्या तुमचं तिघांचं मी आहे किचनमध्ये, राधामावशी काय करत आहेत बघते..असं म्हणून आई आत गेली. ओह काकू आत गेल्या म्हणजे नक्कीच काका, तुम्ही तुमची लव्हस्टोरी सांगणार आहेत वाटतं. तसे बाबा म्हणाले, तसंच काहीसं समज हवं तर...तसा प्रतिक म्हणाला, बाबा तुम्ही कधी मला आणि दीदीला कधी काही बोललात नाही की आईच आणि तुमचं love marriage होतं ते...तसे बाबा म्हणाले, अरे आमचं  love marriage नव्हतच मुळात..बघायला गेलो एक पसंत पडली एक, असं झालं होतं माझं. पण बाबा तुम्ही ते ही कधी म्हणालात नाही आम्हाला....प्रतिक म्हणाला. तसे बाबा म्हणाले, म्हणून तर मी म्हणालो ना, जरा मोठ्यांसारखं वागावं म्हणजे त्यांच्याशी थोडं गप्पा गोष्टी कराव्यात...त्यांना नाही का वाटतं आपल्याही मुलांनी ऐकावं आपला वाला टाइम....तुम्ही आजकालची जनरेशन सतत मोबाईलला चिकटलेली असतात, आणि याच कारणामुळे जास्त बिघडलेली आहेत. जाऊदे ना, काका आता lecture नका ना झाडू, तुम्हाला ही माहित आहे आम्ही दोघे नाही त्यातले ते...ते सोडा तुम्ही सांगा ना... जे सांगायचं होतं ते...राजीव म्हणाला. तसा प्रतिक ही म्हणाला, हो बाबा सांगा ना. तसे बाबा म्हणाले, अरे सांगतो सांगतो ऐका दोघांनी, तर मग मला खरं तर तुझ्या आईच्या मावसबहिणीच स्थळ आलं होतं...आणि मी माझे आईबाबा आणि माझे दूरचे मामा जे तिच्या काकांच्या ऑफिसमधले मित्र...होते आणि त्यांच्या ओळखीमुळेच हा बघण्याचा कार्यक्रम ठरला होता तो ही अचानक म्हणजे एक दिवस आधी आम्ही फक्त कळवलं होत तसं..तर आम्ही गेलो बघायला तर त्यावेळी तुझी आई बाहेर आली असेल नसेल थोडा वेळासाठी, तर मला तीच बघताक्षणी आवडली...म्हणजे मनात आलं लग्न करेन तर हिच्या बरोबरच करेन...मग नंतर जेव्हा मुलीला बघितलं तेव्हा लक्षात आलं, अरे ही तर दुसरी आहे...पण त्यावेळी बोलून काही उपयोग नव्हता. मग आम्ही पोहे वगैरे खाल्ले, फक्कड चहा वगैरे झाला...आणि घरी आलो...२ दिवसांनी माझ्या मामांनी कळवलं की मुलीला आधीच कोणीतरी तिच्या कॉलेजचा मित्र आवडतो आणि त्यांना त्यांच्या मुलीच्या मनाविरुद्ध काही करायचं नव्हत म्हणून त्यांनी नकार कळवला आहे...माझ्या घरातल्याना त्यांची फॅमिली पसंत पडली होती...म्हणजे माझ्या घरून सगळं ठरल्यात जमा असं होतं...पण नेमका मुलीला आधीच कोणी आवडत असल्याने त्यांनी नकार दिला...म्हणून मी सोडलो तर सगळे नाराज होते...मी मात्र तेव्हा खुश होतो...कारण मला आता माझी लाईन क्लिअर दिसत होती...फक्त आता प्रश्न होता मामाच्या कानावर घालण्याचा...मग मी विचार करू लागलो की असं काय करता येईल की, आपल्याला जे हवं आहे ते आपोआप घरातल्याना कळेल...मग मी विचार केला, आईशी बोलणं अवघड आहे त्यापेक्षा मामांशी बोलणं जास्त सोपं जाईल....म्हणजे काका तुम्ही तेव्हाही आजीला घाबरायचात..? राजीव म्हणाला. अरे मग, माझी आई होतीच तशी कडक एकदम, आतातरी ती तेव्हा जशी होती तशी नाही आहे...तेव्हा तर आम्ही खूप घाबरून असायचो....बाबा म्हणाले. मग पुढे काय झालं...तुम्ही कसं सांगितलं मामांना... बाबा...प्रतिकने विचारलं. तसे बाबा म्हणाले, मग मी ऑफिसमधूनच मामांना फोन केला आणि आईबाबांना ती फॅमिली किती आवडली याच भरभरून कौतुक केलं....आणि मामा तुझी तारीफ ही खूप करत होते असं अजून काय काय सांगितलं...मग मामा म्हणाले, हो रे, पण आता काय उपयोग म्हणा, तिला दुसरा मुलगा आवडतो ना...तसं मी म्हणालो, आईबाबा असे ही म्हणत होते, की तिची बहीण असती तर तिलाच आमची सून केली असती म्हणून...म्हणजे इतके आईबाबा तुमच्या आणलेल्या स्थळाच्या चॉईसवर खुश होते...मी बरोबर हाथोडा मारला होता...तसे मामा म्हणाले, अरे हो रे, हा मी विचारच नाही केला, तिला सख्खी नाही पण मावसबहीण आहे एक....ती त्यांच्याकडे कॉलेजला सुट्टी मिळाल्यामुळे सध्या आली आहे राहायला...म्हणजे ती कॉलेजमध्ये शिकवते... मला दामोदर सांगत होता काही दिवसांपूर्वी. दामोदर म्हणजे तिचा काका रे...माझा मित्र...खूप तारीफ करत होता तिची सुद्धा... थांब मी बघतो विचारून त्याला आधी...म्हणजे त्या मुलीच्या मनात कोण नाही ना हे आधी जाणून घेऊया.. मग विचारतो तुझ्या आईबाबांना...लाखात एक फॅमिली आहे बरं का...आणि तिची मावसबहीण म्हणजे तिच्यासारखीच असणार ना.  हो मामा, तुम्ही म्हणतात म्हणजे असेल ही...म्हणजे तुम्हाला त्यातलं खूप चांगलं कळतं असं बाबा एकदा म्हणत होते, मी मामांचं अजून कौतुक केलं...तसे मामा म्हणाले, हो हो, तू फोन ठेव, मी आताच विचारतो दामोदरला...आणि ताईला पण कळवतो, असं म्हणून मामांनी फोन ठेवून टाकला...आणि मी तीर बरोबर निशाण्यावर लागला म्हणून खुश होतो...पण माझ्या डोक्यात आता वेगळाच प्रश्न निर्माण झाला, मामा म्हणतात तसं हिला तर कोणी नाही ना आवडत असेल...लगेच मी आमच्या कुलदेवतेला  साकडं घातलं.., माझ्या मनात जी आहे तिच्याबरोबर लग्न झालं ना, तर जोडीने तुझ्या दर्शनाला येईन आणि तिच्याच हवाली सगळं करून ऑफिसच्या कामाला लागलो... काका, मानलं तुम्हाला बरं का...तुमच्याकडून खरंच टिप्स घ्यायला पाहिजेत मला...असं म्हणून राजीवने काकांना सॅल्यूट केला. मग पुढे काय झालं बाबा, प्रतिक विचारू लागला.. तसे बाबा म्हणाले, आणि काय होणार...! मामांनी तिच्या काकांना विचारलं, मग काकांनी घरी येऊन तुझ्या आईला विचारलं, आणि तिच्या घरातल्यांना ही विचारलं...मग काय सगळीकडून होकारच होता...पण फक्त पुन्हा बघण्याचा कार्यक्रम नाही झाला...डायरेक्ट तिच्या घरातले आमचं घर बघून गेले...मग कधीतरी आम्ही भेटायचो...भेटणं म्हणजे तरी ते काय होतं...फक्त मोजून १५-२० मिनिटे...कारण भेटणं तेव्हा आमचं लपून छपून होतं...आताच्या पिढीला जसं विचारून भेटता येत तसं आमच्या वेळेला नव्हत... मग काय एक महिन्याने आमचा साखरपुडा झाला आणि लगेच १५ दिवसांनी लग्न...आणि हां आम्ही जोडीने दर्शनाला पण जाऊन आलो बरं का...!!  काका राजीवच्या हातावर टाळी मारत म्हणाले. तसा राजीव म्हणाला, काका खरंच, कसं मस्त डोकं चाललं होतं तुमचं तेव्हा...माझं असं का नाही चालत...?? तसे काका हसून म्हणाले, हे बघ आपल्याला एखादी व्यक्ती आवडली ना...आणि ती व्यक्ती आपल्याला आयुष्यभर साथीदार म्हणून हवी असेल ना मग आपोआप न चालणार डोकं पण चालू लागतं. बाबा म्हणजे राजीवच डोकं तसं रेखाच्या बाबतीत चालू शकेल ना...प्रतिक राजीव चिडवत म्हणाला...तसे बाबा जोरजोरात हसत म्हणाले, हो हो चालेल की, फक्त रेखाला बघून त्याला काय बोलायचं हे सुचलं पाहिजे...तसा राजीव म्हणाला, काका तुम्ही पण या प्रतिक बरोबर सामील झालात...मी इतके दिवस समजत होतो तुम्ही माझ्या टीममध्ये आहात म्हणून....तसे काका म्हणाले, अरे मी तुझ्या पण टीममध्ये आहे जेव्हा प्रतिकला चिडवायची वेळ येईल तेव्हा...काका टाळी देत राजीवला म्हणाले. त्यांचं दोघांचं बोलणं चालू असतानाच प्रतिकचा मोबाईल वाजला...त्याने पाहिलं तर तो कॉल प्रेरणाच्या बाबांचा होता...त्याने  कॉल उचलला आणि त्यांच्याबरोबर बोलला...हो हो काका मी येईन,नाही मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही काळजी करू नका असं म्हणून त्याने कॉल ठेवला. तसे बाबा म्हणाले, कोणाचा कॉल होता रे...आणि कसला प्रॉब्लेम...? त्यावर प्रतिक म्हणाला, प्रेरणाच्या बाबांचा कॉल होता...त्यांना उद्या त्यांच्या ऑफिसमध्ये जावं लागणार आहे त्यामुळे त्यांनी मला request केली आहे की मी काही तास प्रेरणा सोबत हॉस्पिटलमध्ये थांबू शकतो का असं...तसा राजीव म्हणाला, आणि तिची आई, आणि भाऊ..? तसा प्रतिक म्हणाला, त्याचं काहीतरी कॉलेजमध्ये इम्पॉर्टन्ट प्रोजेक्ट आहे जे external auditor येऊन घेणार आहेत म्हणून तो नाही जाऊ शकत. त्यांनी कोणाला याबद्दल काही सांगितलं नाही म्हणून ते इतर कोणाकडून मदत ही मागू शकत नाही..आणि प्रेरणाची आई येणार आहे पण त्यांना प्रेरणासाठी जेवण बनवून आणावं लागेल म्हणून त्या लगेच येऊ शकत नाही. त्यांना हॉस्पिटलमध्ये जायला दुपारचे १-२ तरी होतील मग तोपर्यंत मी थांबू शकतो का असं त्यांनी मला विचारलं....आणि मला त्यांना नाही म्हणता आलं नाही. तसे बाबा म्हणाले, ठीक आहे रे...जा तू...पण डॉ जसे म्हणाले होते तसं सगळं follow कर...आणि आईला पण सांगून ठेव...की तू उद्या ऑफिसला न जात हॉस्पिटलला जाणार आहेस ते. हो बाबा, सांगतो मी आईला असं म्हणून प्रतिकने आईला आवाज दिला...तशी आई बाहेर आली...काय झालं रे...आवाज दिलास ते...त्यावर प्रतिकने आईला झालेलं सगळं बोलणं सांगितलं...तशी आई म्हणाली, फक्त तिच्याशी बोलताना डॉ म्हणाले, ती काळजी घे...आणि तिला  जरा देखील काही त्रास झाला की लगेच कळवं डॉ ना....आणि ऑफिसमध्ये कॉल करून सांगून ठेव आताच म्हणजे तुझ्या टीममधल्याना...! हो आई, मी तसंच करेन, हा लगेच करतो कॉल समिधाला आणि बॉसला...असं म्हणून प्रतिकने दोघांना ही उद्या सुट्टी घेत असल्याचं कळवून टाकलं.

दुसऱ्या दिवशी तो तयार होऊन लगेचच हॉस्पिटलमध्ये गेला..प्रेरणाचे बाबा त्याचीच वाट बघत होते...त्यांनी त्याचे पुन्हा एकदा आभार मानले आणि ते ऑफिसला जाण्यासाठी घरी जायला निघाले. आज प्रतिकला हिम्मत करून प्रेरणाबरोबर तिच्या रूममध्ये बसायचं होतं...त्याने दीर्घश्वास घेतला आणि रूमचा दरवाजा उघडला...प्रेरणा शांतपणे बेडवर झोपली होती... प्रतिक खुर्चीवर लांब बसून तिला न्याहाळत होता...प्लीज प्रेरणा, तू लवकर ठीक हो...तो मनात म्हणत होता...थोड्या वेळाने प्रेरणाला जाग आली...तिने घाबरून आजूबाजूला पाहिलं...ती घाबरली आहे ते प्रतिकच्या लगेच लक्षात आलं...तो तिच्याजवळ गेला...आणि म्हणाला, प्रेरणा मी प्रतिक...तिने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं...त्याला बाजूला पाहून तिची मनातली भीती थोडी निघून गेली. त्यावरून प्रतिकच्या लक्षात आलं की प्रेरणाला ती एकटीच आहे का रूम मध्ये असं वाटलं असणार म्हणून ती घाबरली असणार...आता तो तिच्याच बाजूला खुर्ची घेऊन बसला...ती मात्र स्तब्ध समोर पाहत बसून होती...तिची नजर कुठेतरी हरवल्यासारखी दिसत होती...त्याने प्रेरणाला ही माहित असतील अशा टीममधल्या गमती जमती सांगायला सुरवात केली...ती फक्त ऐकत होती ना काही बोलत होती, नाही हसत होती...प्रतिकने घड्याळात पाहिले १० वाजायला आले होते...त्याने पाहिलं प्रेरणा त्याच्या कोणत्याही बोलण्यावर रिस्पॉन्स देत नाही आहे...म्हणून तो तिला म्हणाला, प्रेरणा मी बाहेर थांबतो..डॉ आले की पुन्हा येतो...असं म्हणून तो खुर्ची वरून जाण्यासाठी उठला...तशी ती पुन्हा बैचैन झाली आणि तिने घाबरून त्याचा हात घट्ट पकडला...तसा तो तिला म्हणाला, ठीक आहे मी नाही जात कुठे, आहे मी इथेच तुझ्या बाजूला बसून...असं म्हणून तो पुन्हा खुर्चीमध्ये बसला...आणि आठवून आठवून पुन्हा तिला काही ना काही सांगू लागला.

तिकडे खरी खबर न्यूज चॅनेलमध्ये कॅमेरामन संजय रिपोर्टर मोनिकाला convince करत होता...मॅडम आपण जाऊया खरंच...खूप चालेल ही बातमी...लोकांना जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल काय झालं त्या मुलीचं...अरे मला सरांची परमिशन लागेल...उगाच नको ते व्हायला नको...थांब मी सरांना कॉल करते..मोनिका म्हणाली. मी काय म्हणतो मॅडम, आपण एकदा जाऊन तर येऊ... बघून तर येऊ ना काय नक्की घडलं आहे ते...संजय म्हणाला. सर बहुतेक मीटिंगमध्ये आहेत, काय करू मी आता... ठीक आहे, आपण फक्त जाऊन येऊया....फक्त बघून येऊया...काही शूट वगैरे नको करूया, समजलं का...मोनिका म्हणाली. हां मॅडम, मी पण तेच म्हणतो आहे....आपण फक्त जाऊन येऊया तिथे...मग सरांशी बोलू.. आणि ही बातमी १००% खरी आहे मॅडम ती मुलगी त्याच हॉस्पिटल मध्ये आहे...मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो त्या हॉस्पिटलमध्ये तेव्हा मी तिकडे जे डॉ आणि पोलीस बोलत होते ते ऐकलं...संजय म्हणाला. पण मी काय म्हणते, तिथे आपल्याला डायरेक्ट कसं जाता येणार आहे...मोनिकाने विचारलं. तसा तो म्हणाला, मॅडम मी म्हणालो ना माझा मित्र ऍडमिट आहे म्हणून तिथे आपण त्यालाच भेटायला चाललो आहोत म्हणून सांगायचं...संजय म्हणाला. तशी दोघांनी बॅग घेतली आणि ते ऑफिस मधून हॉस्पिटलमध्ये जायला निघाले.

हॉस्पिटलमध्ये डॉ गोवेकर प्रेरणाच चेकअप करायला तिच्या रूममध्ये आल्या. त्यांनी प्रतिकला काही जाणवलं का विचारलं...तसं प्रतिकने ती घाबरल्याचं आणि तो बाहेर जात असताना हात घट्ट पकडून राहिल्याचं सांगितलं...त्यावर डॉ म्हणाल्या, ओके म्हणजे प्रेरणा एकटी राहायला घाबरते...आणि तिने तुमचा हात घट्ट पकडला म्हणजे ती तुम्हाला ओळखते आणि तिला तुम्ही बाजूला होतात तेव्हा सुरक्षित वाटत होतं...म्हणजे ती तिच्या ओळखीच्या व्यक्तींना ओळखते तर...ओके तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा मी चेकअप करते प्रेरणाचं...तसा प्रतिक बाहेर सोफ्यावर जाऊन बसून राहिला.

क्रमशः

🎭 Series Post

View all