Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-८३

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-८३
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-८३


प्रेरणा आता रेखा, अस्मी-अंकित बरोबर रोज वेळ घालवू लागली. ती हळूहळू आता त्यांच्यामुळे नॉर्मल होत होती. रेखाची सुट्टी संपून तिला ऑफिस मधून घरुन काम करण्याची काही महिने परवानगी मिळाली असल्याने ती आता घरुन काम करायला लागली होती. Client बरोबर मिटिंग असताना मात्र तिला ऑफिसमध्ये जावं लागत होतं. अस्मी अंकित जसजसे मोठे होत होते तसतशी त्यांची मस्ती वाढत होती. कुठे हे उचललं, कुठे ते उचललं. कोणी ओरडायला आलं तर अस्मी अंकितकडे बोट दाखवून मोकळी व्हायची. पण घरातल्या सगळ्यांना नक्की त्यामागे कोण आहे हे आधीच ठाऊक असायचं. रेखा नसताना प्रेरणा बरोबर मात्र दोघेही शांतपणे खेळायचे. प्रेरणाबरोबर हे दोघे इतके शांत कसे राहतात याचं नवल तर दोन्ही घरांना होतं.

 

आजही रेखाला ऑफिस मधून मिटिंगसाठी बोलावलं होतं. प्रेरणा आणि मालती दोघींनी तिला नेहमी प्रमाणे काही काळजी करु नकोस, निश्चिंतपणे जा म्हणून सांगितलं. तिला मिटिंग पुरतंच ऑफिसमध्ये बोलावलं असल्यामुळे ती लवकर घरी येणार होती. तिने ऑफिस मधून निघताना प्रेरणाला कॉल केला. प्रेरणा कॉलेजमधून येऊन जेवून वगैरे झाल्यावर नंदा, मालती बरोबर रेखाच्याच घरी होती. दोघेही मस्त खेळत आहेत हे प्रेरणाकडून ऐकल्यावर तिने प्रेरणाला ती राजीवच्या अचानक ऑफिसमध्ये जाऊन त्याला surprise देऊन येत असल्याचं सांगितलं. प्रेरणाने ही मग तिला हसत हसत ऑल द बेस्ट म्हणून सांगितलं.

***

 

रेखा राजीवच्या ऑफिसमध्ये आली तेव्हा ४-५ मुली इंटरव्ह्यू साठी आल्या होत्या. तिने त्याच्या रिसेप्शनिस्टकडे एवढया मुली का आल्या आहेत असं विचारलं. रिसेप्शनिस्टने तिचं काम करता करता रेखाकडे न पाहताच तिला अनोळखी समजून काहीही सांगण्यास नकार दिला पण जेव्हा तिने वर पाहिलं तेव्हा ती राजीवची बायको असल्याचं तिच्या लक्षात आलं तसं तिने रेखाची माफी मागून तिचं पुण्याच्या एका मुलाशी लग्न ठरलं असून ती लग्नानंतर तिथेच जॉब बघणार असल्याचं सांगितलं. त्यासाठीच तिच्याजागी नवीन मुलगी घेण्यासाठी सर इंटरव्ह्यू घेत असल्याचं सांगितलं. रेखाने तिला अभिनंदन केलं आणि तिथेच इंटरव्ह्यूला आलेल्या एका बुरखा घातलेल्या मुलीच्या बाजूला बसली. त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा पडदा तिने बाजूला केलेला होता. तिने रेखाकडे पाहून स्माईल दिली. रेखाने ही स्माईल देत दुसरीकडे लक्ष वळवलं. रेखाला का कोण जाणे त्या मुलीचं खूप कुतूहल वाटत होतं. कारण पोस्ट तर रिसेप्शनिस्टची आहे मग त्यावेळी तिला असं राहून कसं चालेल.... तिच्या मनात असा विचार आला आणि तिचं तिलाच हसू आलं. "तू पण ना रेखा, काय पण विचार करत असतेस...!!" ती पुन्हा त्या मुलीकडे लक्ष नको जायला म्हणून मोबाईलमध्ये गेम खेळत बसली. एव्हाना 4 मुलींचे इंटरव्ह्यू झाले होते. रिसेप्शनिस्टने बुरखातल्या मुलीला आवाज दिला, "खुशी देशमुख, नाऊ यू कॅन गो फॉर ऍन इंटरव्ह्यू..." बुरखातल्या मुलीचं नाव मराठी कसं...? रेखा प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागली. नेमकं खुशीचं ही तिच्याकडे लक्ष गेलं तसं रेखाने तिचे चेहऱ्यावरचे हावभाव बदलत तिला ऑल द बेस्ट म्हटलं. खुशी स्माईल करुन तिला thank you म्हणत राजीवच्या केबिन मध्ये निघून गेली. बराच वेळाने खुशी केबिन मधून बाहेर पडली. रिसेप्शनिस्टने तिला उद्यापर्यंत कळवू असं सांगून जायला सांगितलं. निघताना खुशी न विसरता रेखाला बाय बोलून गेली. रेखा ही तिला बाय बोलून राजीवच्या केबिनच्या दिशेने गेली.

***

 

रेखा: (केबिनचा दरवाजा ठकठक करत) May I come in Sir...?

राजीव: (वर न बघता) Yes come in...

रेखा राजीवच्या समोरच्या खुर्चीत येऊन त्याला न विचारता बसते. असं न विचारता कसं कोणी बसलं म्हणून राजीवने समोर पाहिलं.

राजीव: (रेखाला पाहून आश्चर्यचकित होऊन) आई शप्पथ, तू इथे... कधी आलीस....

रेखा: (हसून त्याच्या जवळ येत) ते काय आहे ना वकिलसाहेब आज आम्हाला आमच्या मिस्टरांना surprise द्यायचं होतं... सो मग आले निघून....

तिचा रोमँटिक आवाज ऐकून राजीव स्वतःला सावरू नाही शकला आणि त्याने तिला अजून जवळ ओढत तिच्या ओठांवर ओठ टेकवले. बऱ्याच वेळाने दोघेही एकमेकांपासून दूर झाले. रेखाचा चेहरा लाजून गुलाबी झाला होता. दोघेही आपापल्या खुर्चीत बसले.

राजीव: काय घेणार बोल... आता मागवतो...

रेखा: काही नको, मला फक्त थोडा वेळ हवा आहे माझ्या नवऱ्या बरोबर फिरायला...

राजीव: (हातातील पेन ठेवत) ओह मॅडमची ख्वाईश आहे, तर मग नक्की जाऊया...

रेखा: (लाजून हसत) ये हुई ना बात...

राजीवने लगेच रिसेप्शनिस्टला आणि त्याच्या असिस्टंटला कॉल करुन बाकीचं काम उद्या करुया सांगत त्यांना घरी जायला सांगितलं. कॉल ठेवून त्याने त्याचं आवरायला घेतलं. रेखा फक्त त्याची चाललेली धावपळ बघत होती. त्याचं आवरुन झालं तसे दोघेही ऑफिसमधून बाईकवरुन गार्डनमध्ये जायला निघाले.

***

 

गार्डनमध्ये येऊन दोघे मस्त पैकी मिळून भेळ खात बसले.

राजीव: आपले junior angry birds शांत राहतील ना...?

रेखा: (हसून) ते त्यांच्या प्रेरणा माऊ बरोबर आहेत मग ते शांतच असणार. मघाशी कॉल केला होता तेव्हा म्हणाली, नुकतेच दोघे झोपले आहेत.

राजीव: ते तिच्या बरोबर इतके शांत राहतात असं कसं...?

रेखा: (स्वतःच्या पोटावर हात ठेवून) प्रेरणाचा आवाज दोघेही ऐकायचे ना... म्हणून असावं...

राजीव: मग असं असेल तर माझं जास्त ऎकायला हवं ना त्यांनी...

रेखा: (जोरजोरात हसून) कोण बोलतंय ऐका... तुम्ही कधी शेवटचं शांत बसला होता... नेहमी तर माझी मस्करी करत असायचात. मग बाळ ही तुमच्या बरोबर मस्तीच करणार ना...

राजीव: ओह असं पण असतं... आता नेक्स्ट टाईम ही चूक नाही होणार...

रेखा: एक मिनिट, नेक्स्ट टाईम म्हणजे अजून एका बाळाचा विचार करताय की काय तुम्ही...?

राजीव: (तिच्या कानाजवळ हळूच म्हणतो) तुझी इच्छा असेल तर माझी ना नाही.

रेखा: पुरे हां, तुम्हाला तर काय क्रिकेट टीमही चालेल...

राजीव तिचं बोलणं ऐकून जोरजोरात हसू लागला.

रेखा: हसताय काय...

राजीव: मी असं imagine केलं... की तू मी आणि आपली क्रिकेट टीम...

रेखा: छे तुमच्याशी बोलायचं म्हणजे... 

राजीव: पण काहीही म्हण हां, आज तू अशी अचानक आलीस ऑफिसमध्ये मला भेटायला... आवडलं मला...

रेखा: (त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून) हं इंटरव्ह्यू चालू होते म्हणून थांबले नाहीतर कधीच केबिनमध्ये आले असते. मग सिलेक्ट केली का तुम्ही...रिसेप्शनिस्ट...?

राजीव: हं, खुशी देशमुख म्हणून एक सिलेक्ट केली आहे फक्त तिला उद्या कॉल करुन कळवू.. मग थोडं व्हेरिफिकेशन प्रोसेस पण करुन घेईन.

रेखा: (आठवून) खुशी देशमुख... तुम्हाला तिच्या बाबतीत काहीतरी वेगळं नाही का जाणवलं.

राजीव: वेगळं काय...?

रेखा: म्हणजे नाव तिचं मराठी होतं आणि ती आलेली बुरख्यात...

राजीव: ओह हो, शोभताय शोभताय advocate राजीव यांच्या सौ..

रेखा: विषय नका ना बदलू, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं.

राजीव: (बाकड्यावरुन उठत) देईन, पण इथे नाही... ही जागा त्या विषयावर बोलायला योग्य नाही. चल निघूया आपण आता घरी जायला.

रेखा: (बाकड्यावरुन उठत) हं चला निघू... म्हणत दोघेही घरी यायला निघाले.

***

 

 

प्रेरणाने अस्मी-अंकित बरोबर नेहमीपेक्षा जास्त वेळ घालवला होता. त्यामुळे आज ती खूपच खूश होती. नंदाला मदत करत तिने सगळं जेवण बनवून घेतलं. सोबत खीर ही केली आणि अभ्यास करण्यासाठी ती तिच्या रुममध्ये निघून गेली. प्रतिक नुकताच फ्रेश होऊन बाथरुम मधून आला होता. प्रेरणाला रुममध्ये आलेलं पाहून त्याने तिला दरवाजा बंद करत भिंतीकडे उभं करत स्वतःचे हात भिंतीला टेकवून तिला बंदिस्त केलं.

प्रेरणा: प्रतिक, जाऊ दे ना मला अभ्यास करायचा आहे.

प्रतिक: (स्वतःच्या ओठांवर बोट ठेवत) आधी माझा मूड ठीक कर... प्रतिक हळूहळू तिच्या जवळ येऊ लागला तसं ती लाजत शिताफीने प्रतिकपासून तिची सुटका करून अंगठा दाखवत बेडच्या दिशेने पळाली. प्रतिक उगाचच नाटकी रागवत खुर्चीत जाऊन बसला आणि त्याने त्याचा लॅपटॉप सुरु करुन काम करत असल्याचं दाखवलं. तिला ही आता त्याच्या नाटकी रागाची सवय झाली असल्याने तिने पुस्तक उघडून अभ्यास करायला सुरुवात केली. दोघेही एकमेकांना आपापलं काम करत पाहत होते पण बोलत मात्र कोणी नव्हतं. प्रतिक मग त्याला खरंच खूप राग आला आहे असं दाखवण्यासाठी लिविंग रुममध्ये निघून गेला. प्रेरणाला त्याचं वागणं पाहून हसू आवरेना. पण तिने परीक्षा जवळ येत असल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. रात्री सगळ्यांच जेवण वगैरे उरकल्यावर प्रेरणा रुममध्ये यायला निघाली. प्रतिक तिची चाहूल लक्षात घेऊन आधीच रुमच्या दरवाजाच्या मागे लपून राहिला होता. ती रुममध्ये येताक्षणी त्याने रूमचा दरवाजा बंद करत तिला मागूनच पकडून उचलून घेतलं. 

प्रतिक: आता कशी पळ काढणार... त्याने तिला बेडवर हळूच ठेवलं. तो जसजसा जवळ येऊ लागला तसतशी तिची हृदयाची धडधड वाढू लागली. तिला त्यांची प्रणयाची पहिली रात्र आठवू लागली. दोघेही आज कित्येक दिवसांनी एकमेकांच्या जवळ आले होते. एकमेकांना आज ते नव्याने अनुभवत होते.

***

 

असेच काही महिने निघून गेले. प्रेरणाचं कॉलेजचं post graduation च पहिलं वर्ष पूर्ण होऊन ती दुसऱ्या वर्षाला गेली होती. विवेक ही त्याच्या नवीन कंपनी मध्ये जॉईन झाला होता. कंपनीने २ वर्ष ट्रेनिंगसाठी त्याला त्यांच्या दुबईच्या ब्रँच मध्ये पाठवलं होतं. अधून मधून तो प्रेरणा आणि त्याच्या फॅमिलीला विडिओ कॉल करुन त्यांची चौकशी घेत असे. प्रतिकला डॉ गोवेकर आणि डॉ मेहता दोघींकडून बाळाचा विचार करण्यासाठी होकार मिळाला होता. मधल्या काळात खुशी देशमुख आणि रेखा या दोघींमध्ये चांगली मैत्री झाली होती. राजीवला खुशीच्या रुपात एक छोटी बहीण मिळाली होती. सर्व काही काळाच्या ओघात मार्गी लागू पाहत होतं. आजी फक्त लीला आजीला दिलेला शब्द खरा होण्याची वाट पाहत होती.

***

 

प्रेरणाला आज कॉलेजमधून यायला उशीरच झाला होता. येऊन फ्रेश होऊन ती अशीच डोळे बंद करुन खुर्चीत बसून होती. तोच आजीच्या रुममध्ये असलेले अस्मी-अंकित तिच्याजवळ आले. तोपर्यंत आजीही त्यांच्या रूममधून बाहेर आल्या होत्या. प्रेरणाला डोळे बंद केलेलं पाहून अंकित अस्मीला इशारा करु लागला. दोघांनी तिच्या हाताला हात लावला. तसं तिने डोळे उघडून त्यांच्याकडे पाहिलं. 

अस्मी तिच्याकडे पाहत हळूच म्हणाली, "माऊ..."

प्रेरणाला अस्मिच्या तोंडून पहिला शब्द माऊ ऐकून खूप आनंद झाला. तिने आनंदाच्या भरात तिला उचलून घेत तिच्या गालावरून हात फिरवले.

प्रेरणा: बोल अस्मी, पुन्हा माऊ बोल...

अस्मी: (हसून तिच्याकडे पाहत) मा ऊ

अस्मिलाच फक्त उचलून घेतलेलं पाहून अंकित प्रेरणाचा ड्रेस पकडून ओढू लागला. तसं तिने अस्मिला खाली ठेवलं. आजी त्या तिघांना कौतुकाने पाहत होत्या. आजीने चॉकलेट दाखवत अंकितला हाक मारुन बोलावलं.

आजी: अंकित, आजी बोल... आजी...

अंकित हातातून चॉकलेट घेत नाचून दाखवत फक्त आ आ करु लागला.

आजी: अरे पुढे जी कोण बोलणार.

नंदा तोपर्यंत बाहेर आली.

नंदा: प्रेरणा, जेवायचं नाही आहे का तुला...?

प्रेरणा: हो आई बसते जेवायला.... आई, अस्मिने मला हाक मारली माऊ म्हणून. माझं नाव घेतलं तिने पहिलं. बोलतां बोलता तिच्या डोळ्यात पाणी आलं.

नंदा: (तिच्याजवळ जाऊन) असं रडतं का कोणी... तू तर आनंदित व्हायला हवं.

प्रेरणा: हो आई म्हणत ती हसत नंदाला बिलगली.

आजी: प्रेरणा, आता रेखाला ही मावशी बोलणार कोणी आणायला तुझी हरकत नाही ना...!!

प्रेरणा: (लाजून) आजी... तुम्ही पण ना... म्हणत ती पळत किचनमध्ये निघून गेली.

***

 

रात्री प्रेरणाने प्रतिकला घडलेली सगळी गोष्ट सांगितली.

प्रतिक: (प्रेरणाचा हात जवळ घेऊन) मग बनवायचं का रेखाला मावशी...

प्रेरणा: होईल ना सगळं ठीक... का कोण जाणे थोडी भीती वाटत राहते मला.

प्रतिक: डॉ म्हणालेत ना आता सगळं ठीक होईल म्हणून... मग उगाच पुन्हा मनात नको ते विचार नको आणू.

प्रेरणा: हं, नाही करणार.

प्रतिकने लाईट बंद करून प्रेरणाला जवळ घेऊन तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले.

***

 

काही महिन्यानंतर प्रेरणाची दुसऱ्या वर्षाची पहिली परीक्षा सुरु झाली. यावेळी तिने परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली होती. रात्र रात्रभर ती जागरण करून अभ्यास करत होती. आज परीक्षेचा तिचा शेवटचा पेपर होता. परीक्षेचा पेपर देऊन ती घरी आली तोच चक्कर येउन सोफ्यावर पडली. नंदाने तातडीने डॉ ना कॉल करुन घरी बोलावलं तर आजीने तिच्या डोळ्यावर पाणी शिंपडून तिला जागं केलं. डॉ नी येऊन तिचं चेकअप केलं आणि तिला आराम करायला सांगून ते निघून गेले.

 

संध्याकाळी प्रतिक ऑफिस मधून येऊन फ्रेश होऊन आला तर त्याला प्रेरणा कुठे दिसेना.

प्रतिक: आई, प्रेरणा कुठे आहे...?

नंदा: अरे आईंच्या रुममध्ये आहे. आराम करतेय.

प्रतिक: आराम करतेय... काय झालं आई तिला...?

नंदा: अरे चक्कर आली होती तिला.

प्रतिक: म्हणून म्हणून मी हिला सांगितलं होतं जास्त जागरण करू नकोस... पण माझं तिने अजिबात ऐकलं नाही आणि बघ आज चक्कर आली तिला... थांब बघतोच तिला आता... म्हणत तो आजीच्या रुममध्ये निघून गेला.

नंदा मात्र त्याला असं रागावून जाताना पाहून हसू लागली.

***

 

प्रतिक आजीच्या रुम मध्ये आला तर प्रेरणा त्याच्याकडे पाहून हसली. आजी देवघरात होती त्यामुळे रुममध्ये फक्त तेच दोघे होते.

प्रतिक: (तिच्याजवळ येऊन ) हे असं चक्कर येऊन पडल्यावर कोणी हसतं का...? किती सांगितलं तुला स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करायचं नाही... पण तुला जागरण करायची खूप हौस ना... तो तिला ओरडत होता आणि ती मात्र फक्त हसत होती.

प्रेरणा: (हसणं थांबवत) प्रतिक, शांत व्हा... एवढं काहीही झालेलं नाही आहे... उलट तुम्ही खूश व्हायला हवं.

प्रतिक: बायको जागरण करुन चक्कर येऊन पडते आणि मी खूश होऊ...?

"प्रतिक, तुम्ही बाबा होणार आहात.. !!" प्रेरणाने हळूच त्याच्या कानाजवळ येऊन म्हटलं. तिचं बोलणं ऐकून प्रतिकने तिला आनंदाने उचललं आणि एक गिरकी घेत तो मोठमोठ्याने बोलू लागला, " प्रेरणा, प्रेरणा, मी बाबा होणार आहे... आणि तू आई होणार आहे...!!"

त्याचं बोलणं ऐकून ती ही आनंदाने हसू लागली.

 

क्रमशः

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...