Feb 26, 2024
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-८२

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-८२

अस्तित्व एक संघर्ष

भाग-८२


सकाळी प्रतिकने ऑफिसची तयारी करुन निघण्यासाठी दरवाजा उघडला. त्याला बाय करायला प्रेरणा ही दारापाशी आली.

प्रेरणा: (दरवाजापाशी उभं राहून) प्रतिक, घरी लवकर याल का प्लीज...

प्रतिक: इतकं मला मिस करतेस तर... आज तुझी इच्छा नसेल तर मी नाही जात ऑफिसमध्ये.

प्रेरणा: (लाजून) काहीही काय... आईबाबा, आजी काय म्हणतील.

प्रतिक: (नाटकी रागवत) बरं बाई, जातो मी ऑफिसला... आणि येतो घरी लवकर... तू तयार रहा... जाऊ मस्त long drive ला.

प्रेरणा: (हसून) हं, निघा आता लवकर... बोलता बोलता ती लाजली. प्रतिकही मस्त हसत हसत ऑफिसला जायला निघून गेला. तो निघून गेला तसं प्रेरणा दरवाजा बंद करायला जाणार इतक्यात तिला अस्मीच्या रडण्याचा आवाज आला. काय करु मी बघून येऊ का एकदा..., जाऊ की नको... मनात तिच्या पुन्हा विचारांचा कल्लोळ माजला. तिने मनावर दगड ठेवून कसाबसा दरवाजा बंद करुन घेतला आणि तिच्या रूममध्ये निघून गेली.

***

 

रेखा अस्मीला शांत करण्यासाठी लिविंग रूममध्येच इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. शांत झोपलेला अंकित ही तिच्या आवाजाने उठला आणि तो ही तिला रडण्यासाठी साथ देऊ लागला. राजीवच्या बाबांनी पाळण्याला झोका देत झोपवलं. मालती ही किचन मधून बाहेर आल्या.

रेखा: बघा ना आई, शांतच होत नाही आहे ही... तिने अस्मिला त्यांच्या हातात दिलं. त्यांनी तिला एक खेळणं दाखवत बोलायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यांतलं पाणी थांबलं आणि ती हुंकार देऊ लागली.

मालती: रेखा, बघ आता ही लबाड कशी करतेय... 

रेखा: हो ना आई, एक काम करा तुम्ही हिला घेऊन रहा. मी किचनमध्ये बघते काय करायचं आहे ते.... असं म्हणत ती किचनमध्ये निघून गेली.

मालती: सांभाळून काय ते कर ग.

रेखा: हो आई.

थोड्या वेळाने अस्मिला झोप लागली तसं मालतीने तिला पाळण्यात ठेवलं आणि त्या ही रेखाला मदत करायला किचनमध्ये निघून गेल्या.

***

 

अस्मिच्या रडण्याचा आवाज येईनासा झाला तशी प्रेरणाच्या जीवाची होणारी घालमेल थांबली. झोपली वाटत ती बहुतेक... विचार करत असतानाच तिने घड्याळाकडे पाहिलं... "अरे देवा, कॉलेजला जायचंय...!!" तिने पटकन तयारी केली आणि नंदाचा निरोप घेऊन कॉलेजमध्ये जायला निघाली. प्रेरणा कॉलेजला गेल्यावर बऱ्याच वेळाने देवघरातून पोथी वाचून आजी लिविंग रुममध्ये आल्या. नंदा, मिलिंद दोघेही मटार सोलत बसले होते. खरं तर मिलिंद मटार सोलायचं काम कमी खायचं काम जास्त करत होते. आजी त्यांच्या बाजूला येऊन बसली.

आजी: मिलिंदा ऑफिस नाही का आज तुला...? आणि प्रेरणा गेली का कॉलेजला...?

मिलिंद: अग आई, सुट्ट्या बऱ्याच बाकी होत्या. मग म्हंटलं घेऊ आज एक... आणि दोन्ही नातवंडांबरोबर थोडा वेळ घालवू.

नंदा: हो आई प्रेरणा गेली कॉलेजला मघाशी..

आजी: तुम्हाला दोघांना प्रेरणाच्या वागण्यातला बदल जाणवतो का...? म्हणजे लीला जे बोलली ते तिने खूपच मनावर घेतलं आहे असं नाही का वाटत....?

नंदा: हं, मला ही तसंच वाटत. मघाशी अस्मी रडत होती तेव्हा प्रेरणा त्यांच्याकडे जाता जाता थांबली आणि परत मागे वळून ती तिच्या रुममध्ये गेली. असं वाटतं की...

मिलिंद: ती त्यांच्या घरी जाण्यापासून स्वतःला रोखते आहे.

नंदा: हां हेच... म्हणायचं होतं मला.

आजी: तू बोललीस का तिच्याशी या विषयावर...?

नंदा: आई, कसं बोलणार... तिला कुठे माहीत आहे की आम्हाला हे माहीत आहे... आणि असं तिच्याशी डायरेक्ट बोलायचं म्हणजे तिला असं वाटता कामा नये की प्रतिक आम्हाला त्यांच्या सगळ्या खाजगी गोष्टी सांगतो. म्हणजे प्रेरणाचा स्वभाव तसा नाही आहे पण न जाणो असं विचारण्यामुळे ती दुखावली गेली तर...

नंदाचं बोलणं आजी खूप कौतुकाने ऐकून घेत होत्या.

नंदा: आई, माझं काही चुकलं का...? तुम्ही काहीच का नाही बोलत आहात...?

आजी: नाही ग तुझं काही चुकलं नाही. मला उलट कौतुक वाटतंय की तू एखादी गोष्ट करताना समोरचा दुखावला जाणार नाही याची किती काळजी घेते.

मिलिंद: शेवटी बायको कोणाची आहे.

आजी: (मिलिंदचा कान पकडून) हो का...? आता यामागे तुझा हात आहे म्हणू का मग मी...?

मिलिंद: आई ग, सोड ग... आता तर मी आजोबा पण झालोय तरी तू अशी वागतेस माझ्याशी...

नंदाला त्याला असं विनवणी करताना पाहून हसू आवरेना.

मिलिंद: नंदा, नवऱ्याची बाजू घ्यायची सोडून हसतेस काय...?

आजी: (पुन्हा कान जोरात ओढत) कसली बाजू रे...? आई आहे मी तुझी. तू आजोबा जरी झालास ना तरी माझ्यासाठी तू अजून मिलिंदच आहे.

मिलिंद: चुकलं माझं, माफ कर मला...

आजीने हसत मिलिंदचा पकडलेला कान सोडला. मिलिंद अजूनही कान चोळत होते.

आजी: तुम्ही दोघे बसा, मी राजीवकडे जाऊन येते.

नंदा: (मटार सोलत सोलतच) चालेल आई.

दोघांना सांगून आजी राजीवकडे निघून गेली.

***

 

आजी राजीवच्या घरी आली तेव्हा राजीवचे आईबाबा दोन्ही नातवंडांना खेळवत होते. रेखा किचनमध्ये घरकाम करायला येणाऱ्या मावशींबरोबर होती.

मालती: (आजींना) आई, या बसा ना...

आजी: राहत आहेत ना दोन्ही नातवंडे शांत की त्रास देत आहेत...?

मालती: (हसून) चालायचंच आता ते... त्याच्या बाबांवर जे गेले आहेत. (मग रेखाला आवाज देत) रेखा, आजी आल्या आहेत बघ. त्यांचा आवाज ऐकून रेखा आजींसाठी आणि सासू सासऱ्यांना सरबत घेऊन आली. तिघांना सरबत देऊन ती पुन्हा जाणार तेवढ्यात आजीने तिने थांबायला सांगितलं.

आजी: रेखा, मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे.

रेखा: हां बोला ना आजी...

राजीवचे बाबा प्रकाश आजींना म्हणाले, "तुम्हाला हवं असेल तर आम्ही दोघे आत जाऊ का...?"

आजी: नाही त्याची काही गरज नाही. मला जे सांगायचं आहे त्यात तुमच्या दोघांचीही मदत मला लागू शकते. तिघांचे ही कान आजी काय बोलतेय याकडे टवकारले गेले.

आजी: रेखा, तू आणि प्रेरणा जेव्हा पार्क मध्ये फिरत होता तेव्हा जे लीला म्हणालेली ते मला न घाबरता जरा सविस्तर सांगशील का...?

रेखा: हो आजी म्हणत तिने सगळा घडलेला प्रकार सांगितला.

आजी: रेखा, तू त्यांच्याशी जसं वागलीस त्याला मी चुकीचं नाही म्हणणार. कारण जे पटत नाही किंवा अयोग्य वाटतं तिथे जरुर बोलावं. पण बोलताना तू त्यावेळी तुझ्या तब्येतीचाही विचार करून थोडं शांत रहायला हवं होतं.

रेखा: आजी, मला तुमचं म्हणणं पटतं आहे पण मला त्यांनी प्रेरणा बद्दल जे काही बोलले त्यानंतर खरंच खूप राग आला होता. म्हणून मी धडाधड बोलून मोकळी झाले आणि तुमच्या लक्षात आलं आहे की नाही मला माहित नाही पण प्रेरणावर या गोष्टीचा परिणाम झाला आहे. तिने त्या दिवसापासून माझ्याबरोबर फिरायला जाणं बरंच कमी केलं आणि बारशाला ही राजीवनी बोलावून आणलं म्हणून ती स्टेजवर आली. लांब राहते ती अस्मी अंकित पासून...

आजी: हं, आलं आहे ते माझ्या लक्षात... म्हणूनच मी तुझ्याशी या विषयावर बोलायला आले आहे. मला तुमची मदत हवी आहे यातून प्रेरणाला बाहेर काढण्यासाठी.

रेखा: हां चालेल आजी, मी करेन मदत.

आजीने तिघांना त्यांचा प्लॅन सांगितला. तिघांनी ही त्याप्रमाणे करायचं कबूल केलं. 

***

 

काही दिवसांनी प्रेरणा नेहमी प्रमाणे दुपारी कॉलेजमधून घरी आली. सगळ्यांच जेवून झालं तसं आजी त्यांच्या खोलीत झोपायला निघून गेल्या. नंदा प्रेरणा बरोबर किचनमधलं काम आटपून झाल्यावर सोफ्यावर बसून तिच्या कॉलेजवरुन गप्पा मारत होत्या. त्यांचं बोलणं चालू असतानाच त्या दोघींना अस्मी आणि अंकितच्या रडण्याचा आवाज ऐकू आला.

प्रेरणा: आई, ते दोघे खूप रडत आहेत ना... बघून येता का...? 

नंदा: चल आपण दोघी जाऊन येऊ.

प्रेरणा: नको आई, तुम्ही जाऊन या. मी थांबते घरीच.

नंदा: अग अशी काय करतेस. रेखाला 2 दिवस झाले बरं नाही वाटत आहे तिची तरी तब्येत विचारायला चल.

प्रेरणा: रेखाला बरं नाही.... काय झालं...?

नंदा: हो बरं नाही वाटत आहे तिला ऍसिडिटीचा खूप त्रास ही होतो आहे आणि झोप होत नाही पूर्ण तिची दोघेही रडत असतात अधून मधून रात्री त्यामुळे. चल माझ्या बरोबर.

प्रेरणा: सॉरी आई, मला नव्हतं माहीत.

नंदा: तू हल्ली गेलीच नाही आहेस त्यांच्याकडे मग कसं माहिती असणार...? आधी कसं तुम्ही दोघी मिळून मिसळून वागायचात. आणि आता तर तिला येऊन बरेच दिवस झालेत तरी तुम्हां दोघींचं बोलणं कमी झालंय. तुमचं काही भांडण झालं आहे का...?

प्रेरणा: नाही आई, ते वेळच मिळत नाही आता पूर्वी सारखा.

नंदा: चल राहूदे आता सगळं बाजूला... चल जाऊ त्यांच्याकडे. बघू तरी, का रडत आहेत ते एवढं. दोघी राजीवच्या घरी आल्या. मालतीने दरवाजा उघडून त्यांना आत घेतलं. प्रेरणाने पाहिलं, अस्मी आणि अंकित दोघेही खूप रडत होते. रेखा त्यांना कुठे दिसेना.

मालती: या ना बसा.

नंदा: (अस्मिला उचलून घेत) रेखा कुठे आहे.... आणि आता तब्येत कशी आहे..?

मालती: झोपली आहे थोड्या वेळापूर्वी... ते डॉ च्या औषधांनी झोप येईल म्हणून त्यांनी सांगितलं आहे. रात्रभर झोप नाही तिला.... त्यांनी अंकितला पाठीवर थोपटत म्हंटलं.

प्रेरणाला पाहून नंदाकडे अस्मी अजूनच रडायला लागली तसं त्यांनी तिला प्रेरणाकडे दिलं. प्रेरणाकडे येताक्षणी ती रडण थांबवत हसली.

नंदा: बघ मालती, मी घेऊन होते तर ही लाडोबा थांबत नव्हती रडायची आणि आता बघ प्रेरणाकडे कशी गप्प झाली.

मालती: हो ना... रेखा पण मला तेच सांगत होती बारशाला कशी प्रेरणाला ती सोडायला तयार नव्हती. बहुतेक अस्मी आणि प्रेरणाचं गेल्या जन्मीची जुनी ओळख असल्यासारखं नातं आहे.

प्रेरणा: काकू, तुम्ही जेवलात का...?

मालती: कुठे ग... हे दोघे रडू लागलेत ते जेवायचं राहिलं बाजूला.

त्या तिघांचं बोलणं चालू असताना अस्मी आणि अंकित दोघेही झोपले. मालतीने दोघांनाही मग हळूच उचलून पाळण्यात ठेवलं.

प्रेरणा: काकू, रेखा जेवली का...?

मालती: नाही ग... सकाळी थोडं खाल्लं होतं तिने तेवढंच काय ते... तिला झोपेतून उठवू की नको ते ही कळत नाही आहे बघ.

प्रेरणा: थांबा मी उठवून येऊ का तिला...?

मालती: (काही विचार करून) हं बघ उठते का... आणि उठली तर जबरदस्तीने तिला जेवायला भाग पाड. तुझं ऐकून तरी दोन घास जास्त खाईल तरी ती.

प्रेरणा: हो काकू, तुम्ही पण जेवून घ्या. (मग नंदाकडे पाहून) आई मी येतेच रेखाला बघून.... म्हणत ती रेखाच्या रुममध्ये निघून गेली. ती गेल्यावर मालती आणि नंदा कसा आपला प्लॅन यशस्वी होण्याच्या मार्गी लागतोय हे पाहून एकमेकांना विजयी हास्य करत अंगठा दाखवू लागल्या.

***

 

प्रेरणा रेखाच्या रुममध्ये आली. रेखा शांत बेडवर झोपली होती. तिच्या चेहरा निस्तेज दिसत होता. प्रेरणाने तिच्या बाजूला बसत तिला आवाज दिला.

प्रेरणा: रेखा, रेखा उठ... थोडं जेवून घे... पण रेखा झोपेतून उठली नाही. मग तिने तिच्या हाताला हात लावून तिला आवाज देत पुन्हा उठवण्याचा प्रयत्न केला. तसे रेखाने डोळे हळूहळू डोळे उघडले. प्रेरणाने तिला उठण्यासाठी मदत केली.

रेखा: अग इतकी पण आजारी नाही आहे ग मी... थोडं ऍसिडिटी सारखं होतंय आणि झोप ही पूर्ण होत नाही आहे इतकंच.

प्रेरणा: (काहीशी रागवत) हो का, किती बघ चेहरा ओढल्या सारखा वाटतोय. कोण म्हणेल तू आजारी नाही आहेस. आणि तुझ्या काळजीनेच तुला मदत करत होते उठवायला.

रेखा: हं खूप काळजी आहे ना तुला माझी, म्हणूनच आज इतक्या दिवसांनी येतेय तू... तब्येत विचारायला.

रेखाचं बोलणं ऐकून प्रेरणा गप्पच बसली.

रेखा: बोल ना आता, आता का गप्प बसलीस.

प्रेरणा: (स्वतःची नजर चोरत) अग ते कॉलेजमध्ये लेक्चर खूप असायचे आणि घरी येऊन पण आईंना मदत करुन मग कॉलेजचे प्रोजेक्ट त्यात दिवस कधी संपायचा हे कळतंच नव्हतं.

रेखा: प्रेरणा, तू आता खोटं ही बोलायला शिकलीस तर..

प्रेरणा: नाही ग असं काही नाही.

रेखा: टाळते आहेस ना तू मला आणि अस्मी-अंकितला...?

प्रेरणा: अं...( तिला पुढे काय बोलावं ते समजेना मोठ्या प्रयत्नाने ती म्हणाली) अग तुला वाटत तसं काही नाही.

रेखा: हे बघ, जे तू बोलते आहेस ते तू दुसऱ्या कोणाला तरी पटवून सांग... मला नको.... त्या लीला आजीचं तू इतकं मनावर घेतलंस. अग ती काय कोणी डॉ आहे का...? तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मोकळी झालीस ते... आणि इतका तुझा इथे असण्याचा माझ्या आणि त्या दोघांवर परिणाम होतो आहे असं तुला वाटतंय तर आता तरी तू का आलीस...? नको यायचं होतं ना... बोलता बोलता रेखा मुद्दामून खोकू लागली. प्रेरणाने लगेच बाजूला असलेल्या ग्लासमधलं पाणी रेखा समोर केलं.

रेखा: (खोकत खोकतच) नकोय मला पाणी... तुला त्या आजीचंच ऐकायचं आहे ना... जा मग ऐक... आणि पुन्हा येऊ पण नको इथे..

प्रेरणा: प्लीज रेखा, हट्ट नको करुस... पाणी पी ग... बघ किती खोकला येतोय.

रेखा: मी आजारी पडो नाहीतर ते दोघे कितीही रडो तुला काय ना त्याचं...? (पुन्हा खोकत खोकत) मला वाटलं होतं, या 2 बाळांना इथे आल्यावर 2 आजी-आजोबा, एक पणजी, प्रतिक काका आणि तुझ्या रुपात मावशीचं प्रेम मिळेल पण छे, मी किती चुकीची होते.. हे तू दाखवून दिलं. बोलता बोलता तिच्या डोळ्यांत पाणी आलं आणि पुन्हा ती खोकू लागली.

प्रेरणा: चुकलं माझं, मी लीला आजीच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला नको होतं. पण प्लीज मला जे काय बोलायचं ते नंतर काय ते बोल ग... आता थोडं तरी पाणी पी...बघ किती त्रास होतो आहे तुला...

रेखा: (खोकत खोकतच) खरंच ऐकशील माझं...

प्रेरणा: हो ग खरंच ऐकेन मी तुझं. आता तरी थोडं पाणी पी ना...

तसं रेखा लगेच पाणी प्यायली. प्रेरणाने तिच्या हातातला ग्लास बाजूला ठेवला.

प्रेरणा: रेखा, मी जेवण घेऊन येते, थोडं जेवून घे.

रेखा: नकोय मला जेवण... तुला माझं ऐकायचं नाही तर मी तुझं का ऐकू...?

प्रेरणा: हे बघ सगळं ऐकेन मी तुझं, फक्त आधी जेवून घे.

रेखा: हं ठीक आहे, चालेल मी जेवते...

प्रेरणा: (हसून) आणते मी लगेच... म्हणत ती रेखासाठी जेवण आणायला किचनमध्ये निघून गेली. मालती आणि नंदा बाहेर बसून प्रेरणाचं काय चाललं आहे याचा तिच्या नकळत अंदाज घेत होत्या. प्रेरणा जेवण घेऊन पुन्हा रुममध्ये आली.

प्रेरणा: हे घे, थोडं जेवून घे.

रेखा: असं नाही... आधी प्रॉमिस कर मला...

प्रेरणा: कसलं प्रॉमिस...?

रेखा: हेच की तू यापुढे आम्हाला तिघांना इग्नोर करणार नाही. रोज आमच्या घरी येणार... चालणार असेल तरच मी जेवेन नाहीतर ठेवून ये होतं तिकडे.

प्रेरणा: हो ग माझे आई, प्रॉमिस... सगळं यापुढे तू म्हणशील तसं होईल... पण मी रोज रोज येणं बरोबर दिसेल का...?

रेखा: त्यात काय एवढं... कधी तू ये माझ्याकडे. कधी मी येईन तुझ्याकडे... आणि आपल्या दोघींच्या फॅमिली आधीपासून इतक्या जवळ आहेत तर मग आपल्याला कशाला कोण काही बोलेल.

प्रेरणा: बरं बाबा, हे घे जेवून घे आता.

रेखा: junior angrybird झोपले का...?

प्रेरणा: (काही विचार करून) ओह अस्मी-अंकित ना..?

रेखा: (जेवता जेवता) हो... त्याच्या बाबांची कॉपी आहेत दोघेही. अंकित आधी शांत होता पण आता तो ही त्याच्या दीदी सारखाच वागायला लागलाय.

प्रेरणा: ओह म्हणजे अस्मी मोठी आहे....?

रेखा: हो, ती आधी झाली मग हा झाला. बसं झालं यार, नाही जमत आहे मला अजून काही खायला.

प्रेरणा: नाही हां, सगळं संपवायचं आहे... म्हणत तिने जबरदस्तीने रेखाला चमच्याने भरवलं.

रुमच्या दरवाजातून मालती आणि नंदा आनंदाने हे सगळं पाहत होत्या.

***

 

संध्याकाळी प्रतिक जेव्हा घरी आला तेव्हा त्याला रुममध्ये असताना प्रेरणाने रेखाची तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं. प्रेरणाचं बोलणं ऐकून प्रतिकला खूप आश्चर्य वाटलं कारण आदल्याच दिवशी तो आणि राजीव मस्तपैकी पार्कमध्ये गप्पा मारत होते. तसं असतं तर नक्कीच त्याने आपल्याला सांगितलं असतं. त्याने प्रेरणाला यातलं काहीही बोलून नाही दाखवलं. खरं काय आहे ते नंतर कळेलच म्हणत त्याने फक्त तिचं बोलणं ऐकून घेतलं. रात्री सगळ्यांच जेवण आटपलं तसा तो नेहमी प्रमाणे आजीच्या रुममध्ये तिला गोळ्या द्यायला गेला.

प्रतिक: आजी, या घे गोळ्या... एक महिना कधी होतोय तो... डॉ ने यायला सांगितलं आहे लक्षात आहे ना...?

आजी: हो रे आहे लक्षात... एवढे का तुझ्या चेहऱ्यावर बारा वाजलेत... तुला किती वेळा सांगितलं घरी आल्यावर ऑफिसचा विचार करणं कमी करायचं म्हणून...

प्रतिक: नाही ग आजी... ते मी राजीव-रेखाचा विचार करतोय...

आजी: त्यांचं काय आता...?

प्रतिक: अग प्रेरणा मला मघाशी सांगत होती की रेखाची तब्येत ठीक नाही म्हणून...

आजी प्रतिकचं बोलणं ऐकून हसली.

प्रतिक: आजी, हसतेस कशाला...? म्हणजे प्रेरणा मस्करी करत होती का माझी...? (प्रतिक प्रश्नार्थक चेहऱ्याने आजीकडे पाहू लागला)

आजी: नाही रे, ती खरंच म्हणाली, तिने मस्करी नाही केली तुझी, पण रेखाची तब्येत ठीक आहे.

प्रतिक: प्रेरणाने मस्करी नाही केली. ती खरं म्हणाली आणि रेखाची तब्येत ठीक आहे... मला काही समजत नाही आहे तुला काय म्हणायचं आहे ते....!!

आजीने मग त्याला त्यांनी केलेला सगळा प्लॅन सांगितला.

प्रतिक: (हसून) ओह असं आहे तर... (आजीला मिठी मारून) आजी तुस्सी ग्रेट हो... काय भारी डोकं चालत तुझं...

आजी: मग.... चालवावं लागतं ते असं अधून मधून...

प्रतिक: आता हे सगळं ऐकून माझं प्रेरणा बद्दलच टेन्शन कमी झालं आहे.... बस ती या विचारातून बाहेर पडू दे.... आणि आधी सारखी नॉर्मल होऊ दे. बाकी मला काही नको.

आजी त्याच्या पाठीवर थोपटत मनात म्हणते, "मला हवं आहे ना पण... त्या लीलाकडून माफी हवी आहे मला....!!"

 

क्रमशः

 

 

(टीप: इथे मी धनश्री यांचे आभार मानू इच्छिते त्यांनी दिलेल्या मागील भागावरच्या कंमेंट मुळे मला रेखाकडून हे संवाद लिहायचं सुचलं...

"त्या लीला आजीचं तू इतकं मनावर घेतलंस. अग ती काय कोणी डॉ आहे का...?" )

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ujwala Desai

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...

//