Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-८१

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-८१
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-८१


प्रेरणा माहेरी आल्यापासून प्रधानांच्या घरात लेकीच्या आवडीच्या गोष्टी रोज जेवणात बनवणं चालू होतं.

विवेक: काय हे आई, दीदी आल्यापासून मला या घरात तर कोणी ही विचारतच नाही. जाऊदे मी निघतोय कॉलेजमध्ये जायला.

प्रेरणा: (किचनमधूनच) हो का बरं, मग आज जे अळूवड्या करणार आहोत ते नको ना तुला....?

विवेक: (किचनमध्ये धाव घेत) अळूवड्या करताय... अहाहा माझ्या तर नुसतं नाव ऐकूनच आताच तोंडाला पाणी सुटलंय.

प्रेरणा: बरं मग नाही खाणार आहेस का?

विवेक: (तिच्या खांद्यावर हात ठेवत लाडीकपणे) असं कसं... माझी दीदी एवढं प्रेमाने करणार आणि मी नाही खाल्ल्या तर ते बरोबर नाही ना वाटणार...

प्रेरणा: हो का...? एक नंबरचा नौटंकी... ती त्याला धपाटा मारणार तेवढ्यात त्याने तिथून पळ काढला. प्रेरणा आणि आई दोघेही त्याला पाहून हसू लागले.

आई: तुला नाही निघायचं आहे का कॉलेजसाठी...?

प्रेरणा: हो आई निघतेय... हे आवरते आणि तयारीला लागते.

आई: अग राहूदे ते... मी बघते... तू तयारीला लाग... उशीर नको व्हायला. 

प्रेरणा: हो आई... म्हणत ती तयारी करायला रुममध्ये निघून गेली. काही वेळाने ती तयारी करून आईला बाय बोलायला आली.

आई: प्रेरणा, संध्याकाळी मालगुडे काकी काकांना भेटून ये. आल्यापासून तू त्यांच्याकडे गेली सुद्धा नाही आहे. काल अनू आलेली... तुला भेटायला... पण मग तू कॉलेजला गेली आहे कळल्यावर निघून गेली.

प्रेरणा: (सँडल घालत) हो आई, बोलते मी नंतर... चल बाय उशीर होतो आहे.

प्रेरणा कॉलेजला निघून गेली खरं, पण आईला ही आता प्रतिकने लीला आजीचं बोलणं प्रेरणाने खूप मनावर घेतलं असल्याचं जे सांगितलं होतं ते लक्षात आलं. आईने मनाशीच काहीतरी ठरवलं आणि ती पुन्हा कामाला लागली.

***

 

संध्याकाळी प्रेरणा कॉलेजमधून घरी आली तर तिला घरात गप्पांचा आवाज ऐकू आला. मालगुडे काकी, अनू आणि ओवी तिला भेटण्यासाठी आले होते. प्रेरणाला पाहून तर ओवी तिच्याकडे हसत धावतच आली. प्रेरणाने तिला तिथेच थांबायला सांगितलं. छोटी ओवी तर तिच्या अशा वागण्याने गप्पच झाली. घरातील ही सगळे ती अशी का वागली ते पाहू लागले. प्रेरणाच्या ते लगेच लक्षात आलं. तिने हळूच ओवीकडे वाकत तिला म्हंटलं, "ओवी, आतू घेणार आहे तुला... पण ती बाहेरून आली ना... मग तिला पटकन हातपाय धुवून येऊ दे... चालेल ना...?"

तिचं हातवारे करुन बोलणं ऐकून ओवीने तिचे आलेले चार दात दाखवत हसून दाखवलं आणि ती प्रेरणा यायची वाट पाहत थांबली. प्रेरणा फ्रेश होऊन कपडे बदलून ओवीसमोर आली आणि हातानेच तिने तिला जवळ यायची खूण केली. ओवी हसत धावत येऊन तिला बिलगली आणि तिच्या बोबड्या भाषेत प्रेरणाला काही न काही सांगू लागली. प्रेरणा ही तिचं बोलणं ऐकून तिच्या हां ला हां करत होती. आई, मालगुडे काकी आणि अनू सगळे तिचं वागणं पाहून सुखावले. असेच दिवसामागून दिवस जात होते. प्रेरणा अनू-ओवीमुळे बऱ्यापैकी तिच्या मनात चाललेल्या विचारातून बाहेर पडली होती. प्रतिक ही तिला रोज न विसरता कॉल करुन तिच्याशी बोलत होता. ती ही न विसरता सासरच्या घरी आणि रेखाला कॉल करत होती. तिच्या कॉलेजमधून पहिल्या वर्षाच्या सहामाही परीक्षेची तारीख सांगण्यात आली होती. परीक्षा एक आठवड्यांवर येऊन ठेपली होती. तिने आधीच मन लावून अभ्यासाला सुरवात करायला घेतली होती. तिचा सासरी जायचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतसं तिला पुन्हा लीला आजीचं बोलणं आठवून एक अनामिक भीती जाणवू लागली होती.

***

 

शशी आजी आज खूप दिवसांनी त्यांच्या पार्कमधल्या कट्ट्यावर आली होती. तिला इतक्या दिवसांनी आलेलं पाहून साने आजी म्हणाल्या, काय हो शशी आजी, खूप दिवसांनी आलात इथे... आम्हाला तर वाटलं इतकी चांगली नातसून मिळाली ते आता आम्हाला भेटणारच नाही की काय..!!

शशी आजी: (हसून) नातसून खरंच चांगली आहे माझी. अशी नातसून मिळायला भाग्यच लागतं. पण तुम्हां सगळ्यांना कसं विसरेन मी... तुम्ही तर माझ्या खास मैत्रिणी आहात.

हे ऐकून आजींच्या कट्ट्यावरच्या सगळ्या मैत्रिणी मनापासून हसल्या. मात्र आजीच्या मागून येणाऱ्या लीला आजीला हे ऐकून सगळ्यांच हसत बोलणं खटकलं. त्यांनी टोमण्यातच शशी आजीला ऐकू जाईल असं म्हंटलं, "शशी, तुझ्यासारखी महान तूच ग...!" तिचा टोमणा आजीच्या लक्षात आला पण आजीने थोडा वेळ गप्पच राहून तिला बोलू द्यायचं ठरवलं.

तारे आजी: म्हणजे लीला, तू काय बोलतेय ते आम्हाला कळलं नाही...?

लीला: (शशी आजीकडे पाहत) अच्छा म्हणजे, तुम्हाला सांगितलं नाही तर शशीने...?

साने: कशाबद्दल....?

लीला: हेच की, तिची नातसून कधीही आई होऊ शकत नाही. वांझ आहे ती... बोलत असताना तिने कुत्सितपणे शशी आजीकडे पाहिलं. सगळ्या आजींना प्रेरणाबद्दल हे ऐकून वाईट वाटलं पण त्याहून जास्त राग लीला ज्या पद्धतीने म्हणाली त्याचा आला.

सुमनआजी: (रागाने लीलाला) लीला, तुझ्या जिभेला काही हाड... एक बाई असून असं बोलतेस तू...!! (मग शशी आजीकडे पाहत) शशी तू हिला का काही बोलत नाही आहेस... तुझ्या नातसुनेला बोलतेय ही... एरवी हीच जेव्हा दुसऱ्या कोणाला काही टोमण्यात बोलते तेव्हा तू तिला बोलून गप्प करते मग आज का गप्प आहेस...?

लीला: ही काय बोलणार....? सत्य कितीही लपवलं तरी ते लपत नाही.

साने: गप्प ग तू लीला...स्वतःच्या मुलाला तर घराबाहेर काढलं आणि एकटीच राहतेस... का तू आमच्या बरोबर इथे येतेस समजत नाही मला...? आताच्या आता माफी माग शशीची नाहीतर निघून जा इथून...

लीला: मी का माफी मागावी... खरंच म्हणाले आहे मी... हवं तर शशीला विचारा...(तिने पुन्हा कुत्सितपणे शशी आजीकडे पाहिलं) सगळ्यांचे आजी काय बोलतेय त्याकडे कान टवकारले होते.

शशी आजी: लीला, तू म्हणतेय तसं जर खरं ठरलं तर मी किंवा आमच्या मधलं कोणीही तुला यापुढे एक शब्द काही बोलणार नाही. पण जर माझ्या नातसुनेकडे या २ वर्षात गोड बातमी राहिली तर तू या सगळ्यांसमोर आणि माझ्या घरातल्यांच्या समोर ही मनापासून माफी मागशील... आणि त्यानंतर कोणाला ही काहीही बोलणार नाही... बोल आहे का कबूल...?

लीला आजीने हसत हसत शशी आजीचं चॅलेंज स्वीकारलं आणि ती बाकी आजींकडे रागाने बघत तिथून निघून गेली.

साने: शशी, तू असं का म्हणालीस, तुला ती लीला माहिती आहे ना... कशी आहे ती...

शशी आजी: सध्या आपण नको बोलूया त्या विषयावर...

साने आजी: हं चालेल म्हणत साने आजींनी विषय बदलला. पुन्हा कट्ट्यावर आधीसारखाच हसण्याचा आवाज घुमू लागला.

***

 

प्रेरणा सासरी आली आणि तिने दुसऱ्या दिवशीच नंदाला तिने किचनमध्ये काम करत असताना परीक्षेची तारीख सांगितली.

नंदा: आज संध्याकाळपासूनच तुला किचनमध्ये नो एन्ट्री. आता फक्त परीक्षेच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं.

प्रेरणा: आई, पण मी करेन तुम्हाला मदत करुन अभ्यास...

नंदा: नाही बिलकुल नाही. परीक्षा झाल्यावर काय ती मदत कर. आता फक्त अभ्यास आणि मला चांगले मार्क्स हवेत हां...!

प्रेरणा: हो आई.

दोघींचं बोलणं देवघरात जाणाऱ्या आजींच्या ही कानावर पडलं. मग आजी ही प्रेरणाला अभ्यासासाठी बोलायला नंदाबरोबर सामील झाल्या.

***

 

प्रेरणाची परीक्षा होऊन एक महिना उलटला होता. रेखाचे 9 महिने पूर्ण होऊन डिलीव्हरीची तारीख जवळ येत होती. डॉ नी आता तिला एक दिवसाआड सोनोग्राफी करायला सांगितलं होतं. राजीव तिला न विसरता क्लिनिक मध्ये घेऊन जात होता. वजन वाढल्याने तिला फार चालायला ही जमत नव्हतं. राजीव तिला सावकाश धरून नेऊन कारने नेत असे. घरी ती अधून मधून चालण्याचा प्रयत्न करत असे. रेखाचा भाऊ अमित तर ती बेडवर बसली असताना लगेच उठू शकणार नाही हे जाणून घेऊन  मुद्दामून तिला काही ना काही बोलून चिडवत असे. मग रेखाही त्याला बेडवरची उशी घेऊन फेकून मारत असे. 

 

डॉ ने आज सकाळीच रेखाचा आदल्या दिवशीचा रिपोर्ट बघून तिला डिलिव्हरी साठी ऍडमिट व्हायला सांगितलं. साधारण 11-12 च्या दरम्यान तिला प्रसववेदना सुरु झाल्या. राजीव ऑपरेशन थिएटरच्या बाहेर टेन्शनमध्ये इकडून तिकडे फिरत होता. रेखाचे, त्याचे आईबाबा बाकड्यावर बसून डॉ कधी बाहेर येत आहेत त्यांची वाट पाहू लागले. काही वेळाने लहान मुलांच्या रडण्याचा आवाज आला. राजीवने आनंदाने अमितला मिठी मारली. काही वेळाने डॉ OT मधून बाहेर आले आणि राजीवसमोर येऊन म्हणाले, Congratulation Mr Rajiv. तुम्ही बाबा झाला आहात. तुम्हाला मुलगा आणि मुलगी झालेले आहेत. राजीवने आनंदाने तोंडावर हात ठेवला मग स्वतःला सावरत त्याने रेखाबद्दल विचारलं.

डॉ: yes she is also fine. सध्या गुंगी आहे. नंतर तुम्ही त्यांना भेटू शकता. फक्त गर्दी जास्त करु नका.

राजीव: येस डॉक्टर.

त्याने आनंदाने आईबाबांना ही मिठी मारली. रेखाच्या आईबाबांनी राजीवचं अभिनंदन केलं. राजीवनेही त्यांचं अभिनंदन केलं. दोन्ही आजोबा आजी आनंदाने एकमेकांना गळाभेट करु लागले. मध्येच त्यांचा आवाज ऐकून नर्सने येऊन त्यांना शांत रहायला सांगितलं. तसं त्यांनी कसंबसं स्वतःच्या आनंदावर संयम ठेवला. जो तो कॉल करुन आता ही बातमी सांगू लागला. राजीवनेही लगेच प्रतिकला कॉल करुन ही बातमी दिली आणि इतर नातेवाईकांना सांगायचं असल्याने लगेच कॉल ठेवला. प्रतिक राजीवला अभिनंदन करत असतानाच प्रेरणा तिथे आली.

प्रेरणा: प्रतिक, कोणाचा होता कॉल...?

प्रतिक: (तिचे दोन्ही हात हातात घेऊन तिला गोल फिरवत म्हंटलं) राजीव आणि रेखाला twins झाले.

प्रेरणा: वा वा... पण म्हणजे twins boy की twins girl...?

प्रतिक: (तिला गोल गोल फिरवणं थांबवत) एक मुलगा आणि एक मुलगी... ते ऐकून प्रेरणा हसली.

प्रतिक: हसते आहेस कशाला...?

प्रेरणा: ते मला रेखाचं बोलणं आठवलं.

प्रतिक: (तिला जवळ घेत) काय ते...?

प्रेरणा: तिला twins आहेत हे कळल्यावर खूप टेन्शन आलं होतं. म्हणजे ओळखायचं कसं याला अंघोळ घालून झाली की त्याला...?

प्रतिक: हं पण तिच्या मदतीला तर तू असणारच ना... मग तिला कसली एवढी काळजी...?

प्रेरणा: (त्याच्याकडे आश्चर्याने पाहत) तुम्हाला कसं कळलं की मी हे असंच काही तिला म्हणाले होते ते...?

प्रतिक: (तिला अजून जवळ घेत) जानेमन, आप कुछ ना बोलो तो भी हम आपकी दिल की बात जान जाते है...

प्रेरणा: (त्याच्या हातावर फटका मारुन स्वतःला सोडवत) आईंना सांगून येऊ चला... म्हणत तिने तिथून पळ काढला. ती पळून बाहेर गेली तसा तो ही गालात हसत तिच्या मागे रूममधून बाहेर पडला. दोघांनी घरातल्या सगळ्यांना ही आनंदाची बातमी सांगितली. राजाध्यक्षांच्या घरात या बातमीने आनंदी आनंद झाला.

***

 

एक महिन्यानंतर रेखाच्या माहेरच्या घराजवळ असलेल्या हॉलमध्ये दोन्ही बाळांचा नामकरण सोहळा होता. मुलीचं नाव अस्मी तर मुलाचं नाव अंकित ठेवण्यात आलं. दोन्ही बाळांना हातात घेऊन सगळ्यांनी फोटो काढले. फोटो काढताना अंकित शांत रहायचा तर अस्मी रडायला सुरवात करायची. त्यामुळे अस्मिला घेऊन फोटो काढण्याची इच्छा बऱ्याच जणांची अपुरीच राहिली. प्रेरणा कोणाला काय हवं नको त्याकडे लक्ष देत होती. त्यामुळे ती आणि प्रतिकचं फक्त फोटो काढायचे बाकी होते. राजीवने जबरदस्तीने प्रतिकला ओढून बाळांकडे आणलं. त्याने अंकितला प्रतिकच्या हातात दिलं आणि तो प्रेरणाला बोलावून घेऊन आला. रेखा रडत असलेल्या अस्मिला शांत करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. प्रेरणाला समोर पाहून तिने अस्मिला तिच्या स्वाधीन केलं. प्रेरणाने अस्मिच्या नाजूक गालांवरून हात फिरवत बोबड्या स्वरात म्हंटलं, "अले काय झालं, आमच्या अस्मिला...?तुला फोतो काढायला नाही आवडत का...?" प्रेरणाचा गोड आवाज ऐकून अस्मिच्या डोळ्यातलं पाणी थांबलं आणि ती प्रेरणाकडे डोळ्यांची पापणी न हलवता पाहू लागली. प्रेरणाने तिला हातांचा झोपाळा करत हलवलं तशी ती खुदकन हसली. फोटोग्राफरने लगेच राजीव-रेखा आणि प्रतिक-प्रेरणा यांचा बाळाला घेऊन फोटो काढला. फोटो काढून झाला तसं प्रतिकने अंकितला राजीवकडे दिलं आणि ते दोघे त्यांच्या मित्रांच्या घोळक्यात गप्पा मारायला सामील झाले. प्रेरणा अस्मिला रेखाकडे द्यायला पाहत होती पण अस्मिने घट्ट प्रेरणाची चैन हातात पकडून ठेवली होती. जेणेकरून प्रेरणाने तिला सोडून जाता कामा नये. प्रेरणाने कसंबसं तिच्या नाजूक बोटांतून चैन काढत रेखाकडे अस्मिला सोपवलं. तसं पुन्हा अस्मी जोरजोरात रडू लागली. 

रेखा: (अस्मिला शांत करायचा प्रयत्न करत) प्रेरणा, आता तुझ्याकडे किती शांत होती ही... आणि माझ्याकडे येताक्षणी लगेच मॅडम रडू लागल्या. (तिला थोपटत) अस्मी, झोप ग... मम्मा थकली ग... आज खूप... पण अस्मी काही केल्या गप्प बसेना. रेखा इकडून तिकडे फिरत तिला झोपवायचा प्रयत्न करु लागली. प्रेरणाला ही आता तिला असं रडताना पाहून वाईट वाटलं.

प्रेरणा: (रेखाकडे येऊन) दे मी शांत करते तिला.

थकलेल्या रेखाने लगेच अस्मिला तिच्या हवाली केलं. प्रेरणाने पुन्हा तिला हाताच्या हिंदोळ्यावर थोडा वेळ हलवलं. अस्मी तिलाच पाहत होती. हळूहळू तिचं रडणं बंद झालं आणि ती शांत झोपी गेली. तसं रेखाला ही थोडं मोकळं वाटलं आणि तिने शांतपणे खुर्चीवर बसून घेतलं. प्रेरणाने अस्मिला हळूच पाळण्यात ठेवलं आणि त्याला हलवू लागली. तोपर्यंत तिकडे राजीवची आई मालती आल्या.

मालती: (रेखा, प्रेरणाला) झोपली वाटतं अस्मी...?

रेखा: हो, प्रेरणाने झोपवलं तिला... मी प्रयत्न करुन थकले.

मालती: अच्छा, तुम्ही दोघी एकत्र जायचात ना फिरायला... ती ओळख लक्षात राहिली वाटतं अस्मिला...

रेखा: हो वाटत. तिच्याकडे किती पटकन शांत झाली ती. (मग प्रेरणाला) आता मी तिकडे आले ना की अस्मीला मी तुझ्याकडेच ठेवणार. मला तर कधी कधी समजतच नाही तिला कसं गप्प करु ते...हा एक महिना तर अक्षरशः तिने रडून रडून घर डोक्यावरच घेतलं होतं. चालेल ना तुला...? म्हणजे तुझ्याकडे मोकळा वेळ असेल तेव्हा बघ... बाकी वेळी मी करेन कसंतरी शांत तिला.

प्रेरणा: (दिलखुलास हसून) अग तू पूर्ण दिवस ठेवलं तिला माझ्याकडे तरी माझी काही हरकत नाही. मी बघेन तिला...

रेखा: (तिला मिठी मारून) मैत्रीण असावी तर अशी...

प्रेरणा म्हणाली खरं तिला असं पण तिच्या मनात पुन्हा लीला आजीचं वाक्य घुमू लागलं.

***

 

एक महिन्यानंतर विवेकच्या कॉलेजमध्ये MNC company मधून कॅम्पस इंटरव्ह्यू झाले. विवेकने त्यात भाग घेऊन इंटरव्ह्यू दिला. त्याचा आधीचा अनुभव आणि प्रतिकच्या कंपनीमध्ये केलेली इंटर्नशिप पाहून ते लोक त्याच्यावर इम्प्रेस झाले आणि इंटरव्ह्यूमध्ये ही त्याने चांद चांद लावले. मग काय त्याला त्यांनी लगेच जॉब साठी निवडलं. बस आता फक्त त्याला सेकंड इअर पूर्ण करण्यासाठी थांबायचं होतं. त्याने घरी आल्यावर ही आनंदाची बातमी आईबाबांना दिली. दोघेही ऐकून खूप खूश झाले.

आई: अरे प्रेरणाला दिलीस का बातमी ही....?

विवेक: नाही आई, थांब आताच सांगतो... म्हणत त्याने तिला कॉल करुन ही बातमी दिली. तिने त्याचं अभिनंदन केलं. तिच्या मागून येणाऱ्या प्रतिकने तिला खुणेनेच कोणाचा कॉल असल्याचं विचारलं.

प्रेरणा: विवेक, तुझ्या जीजूंना पण सांग.. तिने लगेच कॉल प्रतिकला दिला. विवेकने त्याला जॉबची बातमी दिल्यावर प्रतिकने ही त्याच भरभरुन अभिनंदन केलं.

प्रतिक: तुझ्या जॉबची पार्टी पाहिजे बरं हां आता...

विवेक: हो नक्की जिजू, anytime.

विवेकला कोणाचा तरी कॉल येत असल्याने त्याने प्रतिकला नंतर करतो सांगत कॉल ठेवला. प्रतिकने मोबाईल प्रेरणाच्या हातात दिला. सगळं ऐकून खूश झालेली प्रेरणा प्रतिकच्या मिठीत गेली. प्रतिकने ही तिच्यावरची पकड घट्ट केली. तिच्या पाठीवरुन हात फिरवत त्याने तिला विचारलं, "छान वाटतंय ना, विवेकचं सिलेक्शन झालं हे ऐकून...!!"

प्रेरणा: (त्याच्या मिठीत असतानाच म्हणाली) हं... अजून एक गोष्ट मिळाली मला आयुष्यात की माझ्यासारखी लकी दुसरी कोणीही नसेल.

प्रतिक: (मिठीतून दूर करत तिच्याकडे पाहत) कोणती गोष्ट...

प्रेरणाने काही न बोलता त्याचा हात तिच्या पोटावर ठेवला.

प्रेरणा: (त्याला पुन्हा मिठी मारून) होईल ना ही माझी इच्छा पूर्ण... तिच्या अचानक हळव्या झालेल्या आवाजाने प्रतिकही निशब्द झाला. त्याने तिला हळुवारपणे थोपटत त्याच्या प्रेमळ स्पर्शाने फक्त होकार दिला.

***

 

अडीच महिने माहेरी राहून रेखा आज राजीव सोबत त्यांच्या घरी आली होती. प्रतिकचं कुटुंब आधीच राजीवच्या घरी त्यांची वाट पाहत थांबलं होतं. दोघेही बाळांना घेऊन आत येणार तेवढ्यात आजीने त्यांना बाहेरच थांबायला सांगितलं. मग आजीने रीती प्रमाणे आईची, बाळांची नजर काढली आणि त्यांना आत यायला सांगितलं. अस्मी, अंकित दोघेही कारमध्ये शांत झोपी गेले होते. त्यामुळे अजूनही ते झोपेतच होते. दोघांना रेखा राजीवने पाळण्यात ठेवलं.

आजी: (पाळण्यात त्यांना पाहून हसून) यांना भेटायला आले आणि हे दोघे किती शांत झोपलेत.

रेखा: हां आजी, हे दोघे झोपतात तेवढीच काय ती शांतता असते. एकदा का झोपतून जागे झाले की मग शांतता काय असते हे आठवत ही नाही.

तिचं बोलणं ऐकून सगळे हसू लागले.

नंदा: काहीही काय बोलतेस रेखा. त्यांच्याकडे पाहून कोणी म्हणेल का इतके त्रास देतात असं.

रेखा: काकू, एकदा दोघांना उठू दे झोपेतून मग तुम्हाला माझं म्हणणं पटेल. अंकित तर खेळणी दिली की खेळतो तरी पण अस्मी बिलकुल नाही. तिला सतत कोणी ना कोणी हवंच असतं बाजूला. नसेल तर मग मॅडम रडायला सुरु करतात.

राजीवने रेखाचं आणलेलं सगळं सामान रुममध्ये नेऊन ठेवलं आणि पुन्हा त्यांच्यात सामील झाला.

आजी: (राजीवकडे पाहत) अस्मी कोणावर गेली म्हणायची मग...? तुझ्यावर की रेखावर....? आजीचं बोलणं ऐकून राजीव गप्पच बसला.

मालती: राजीववर... राजीव लहान असताना असाच त्रास द्यायचा. म्हणून मी याचे बाबा घरी असतानाच सगळं काम लवकर उठून आटपून घ्यायचे. मग हे ऑफिसवरुन येईपर्यंत सतत याच्या बाजूलाच बसून रहायचं. कुठे चिऊ उड... कावळा उड... कर... आणि खेळ सतत एकच खेळायला नाही आवडायचं आम्हाला. राजीवच्या आईचं बोलणं ऐकून रेखाला टेन्शनच आलं. तिने घाबरुन राजीवकडे पाहिलं. राजीवच्या लक्षात आलं हिला हे सगळं ऐकून टेन्शन आलं आहे ते. त्याने लगेच त्याच्या आईला थांबवत म्हंटलं, "अग आई बस कर, तुझी सून नुसतं ऐकूनच घाबरली..."

मालती: (हसून रेखाच्या खांद्यावर हात ठेवून) ए रेखा, घाबरतेस काय...? तेव्हा आम्ही दोघेच होतो. पण इथे तर आम्ही सगळे आहोत या दोघांना बघायला. जा आराम कर जा... थकली असशील.

रेखा: हो आई, प्रेरणा चल ना रुममध्ये... तुला मी या दोघांसाठी घेतलेले कपडे दाखवते.

प्रेरणा: अग राहू दे नंतर बघूया. तू थकली असशील ना... थोडा वेळ आराम कर...मी येते नंतर.. मग बोलू आपण निवांत.

रेखाने प्रेरणाकडे पाहिलं. प्रेरणा बोलताना नजरेला नजर देऊन बोलत नव्हती. हिच्या मनात नक्की काहीतरी चाललं आहे पण नक्की काय... रेखा स्वतःशीच म्हणाली.

आजी: रेखा, जा बाळा आराम कर जा...

तसं सगळ्यांनीच रेखाला जबरदस्तीने आराम करायला रुममध्ये पाठवलं. काही वेळ अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारुन झाल्यावर राजाध्यक्ष कुटुंबीय राजीवच्या घरुन त्यांच्या घरी जायला निघाले.

***

(लीला आजींच्या बोलण्यामुळे हरवलेली आधीची प्रेरणा रेखा कशी परत आणेल....आणि यात तिला आजीची ही कशी साथ मिळेल... जाणून घ्यायला वाचायला विसरु नका पुढचा भाग...)

 

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...