Feb 26, 2024
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-८०

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-८०

अस्तित्व एक संघर्ष

भाग-८०


प्रेरणा-प्रतिक दोघेही रेखाच्या डॉ मेहता यांच्याकडे गेले. प्रेरणा रेखा बरोबर त्यांच्याकडे अधून मधून येत असल्याने त्या तिला ओळखत होत्या.

डॉ मेहता: या या मिसेस प्रेरणा.... बसा... दोघेही डॉ च्या समोरच्या खुर्चीत बसले.

प्रेरणा: डॉ ते आम्हाला... पुढे तिला सुचेना कसं बोलावं... तिने प्रतिककडे पाहिलं.

प्रतिक: डॉ, ते आम्ही बाळाचा विचार करतोय.

डॉ मेहता: अच्छा

प्रेरणा: मला बाळ हवंय डॉ... बोलताना प्रेरणाच्या आवाजातली सल डॉ ना जाणवली.

डॉ मेहता: (खुणेने बेडवर झोपायला सांगत) या आपण तुमचं चेकअप करु. डॉ नी तिचं बीपी नॉर्मल आहे का हे आधी चेक केलं. डॉ ना प्रेरणाच्या आवाजावरुन ज्या गोष्टीचा संशय वाटत होता तसंच झालं. स्ट्रेस घेतल्याने तिचा बीपी थोडा वाढला होता. त्यांनी तिचं चेकअप केलं आणि तिला पुन्हा जागेवरुन येऊन बसायला सांगितलं.

डॉ मेहता: मी काही टेस्टची नावं लिहून देते आहे ते तुम्ही उद्या दोघांनी करुन घ्या.

प्रेरणा: डॉ आता तुम्ही चेकअप केलं तेव्हा सगळं ठीक होतं ना...?

डॉ मेहता: हो हो सगळं ठीक होतं. आता उद्या संध्याकाळची तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन ठेवा आणि तेव्हा आपण तुम्हा दोघांचे रिपोर्ट्स बघू... मग मी नक्की काय ते सांगू शकेन. चालेल ना मिसेस प्रेरणा.

प्रेरणा: हो चालेल. दोघेही डॉ चा निरोप घेऊन क्लिनिक मधून निघाले.

 

दुसऱ्या दिवशी प्रतिकने सुट्टी घेऊन प्रेरणाला घेऊन तो डॉ नी सांगितलेल्या टेस्ट करायला गेला. घरातील सगळ्यांना त्याने याबाबत वेळ बघून बोलेन असं आधीच सांगितलं असल्याने कोणीही त्या दोघांना एक अवाक्षर ही विचारलं नाही. प्रेरणाला तर कधी एकदा रिपोर्ट मिळतोय आणि डॉ कडे जातेय असं झालं होतं. संध्याकाळी दोघेही रिपोर्ट घेऊन डॉ कडे गेले. डॉ नी दोघांचे रिपोर्ट्स नीट बघून घेतले. प्रेरणा-प्रतिक दोघेही डॉ आता काय सांगत आहेत म्हणून वाट बघत होते. डॉ नी सगळे रिपोर्ट बघून त्यांच्याकडे पाहिलं. तसं प्रतिक-प्रेरणाने त्यांना विचारलं, "डॉ, सगळं ठीक आहे ना...?"

डॉ मेहता: (थोडं हसून) हो हो सगळे रिपोर्ट्स नॉर्मलच आहेत. तुम्हां दोघांमध्ये कोणताही प्रोब्लेम नाही आहे आणि तुम्ही दोघेही आईबाबा होऊ शकतात.

प्रेरणा: (हसून) खरंच डॉ... तुम्ही खरंच सांगताय ना... मी आई होऊ शकते हे...!

डॉ: हो हो मिसेस प्रेरणा... तुम्ही खरंच आई होऊ शकतात पण एक थोडा प्रॉब्लेम आहे.

प्रतिक: (काहीसा घाबरुन) कोणता डॉ...?

डॉ: मिसेस प्रेरणा, यांनी स्ट्रेस घेणं बंद करायला हवं. जास्त विचार करणं सोडून द्या. स्वतःला जितकं होईल तितकं प्रसन्न ठेवा. तरच प्रेग्नन्सीसाठी तुम्ही विचार करु शकतात.

प्रेरणा: हो डॉ. मी आनंदी राहीन यापुढे. पण मी आई कधी होणार डॉ...? 

डॉ: (समजावण्याच्या सुरात) हे बघा मिसेस प्रेरणा, तुम्ही आता ही प्रेग्नन्सीचा विचार केला तर चालू शकेल पण मी सांगितलं तेच तुम्हाला आधी करावं लागेल. स्ट्रेस घेणं पूर्णपणे बंद.

प्रतिक: चालेल डॉ मी काळजी घेईन प्रेरणाची.

डॉ: मि राजाध्यक्ष, मला हे उत्तर मिसेस प्रेरणाकडून हवं आहे. बोला मिसेस प्रेरणा, राहणार ना आता यापुढे स्ट्रेस फ्री.

प्रेरणा: हो डॉ.

डॉ: मी या काही व्हिटॅमिन मेडिसिन आणि अजून काही मेडिसिन लिहून देते आहे. त्याचा कोर्स काही महिने करुया चालेल ना...?

दोघे: ओके डॉ. असं म्हणत दोघेही डॉ च्या क्लिनिक मधून तळमजल्यावर आले आणि घरी कॉल करण्यासाठी म्हणून प्रतिक खिशात मोबाईल बघू लागला. मोबाईल खिशात दिसेना तसं त्याच्या लक्षात आलं की तो मोबाईल डॉ च्या केबिनमध्येच विसरुन गेला आहे.

प्रतिक: प्रेरणा, ऐक ना ही चावी घे कारची आणि कारमध्येच बसून रहा. मी आलो लगेच... (असं म्हणत त्याने तिच्या हातात चावी दिली)

प्रेरणा: प्रतिक, पण तुम्ही कुठे चालला आहात.

प्रतिक: (मागे वळून पाहत) अग मी मोबाईल डॉच्या क्लिनिक मध्येच विसरुन आलो. तू बस कारमध्ये मी आलो लगेच.

प्रतिक क्लिनिक मध्ये गेला तसं प्रेरणा कारमध्ये बसली. प्रतिकची वाट पाहत असताना तिला समिधाचा कॉल आला आणि ती तिच्याशी गप्पा मारत बसली.

***

 

प्रतिक डॉ च्या केबिनमध्ये आला.

डॉ: बोला मि राजाध्यक्ष... काही विचारायचं राहिलं का...?

प्रतिक: डॉ, ते माझा मोबाईल राहिला होता तो घ्यायला आलोय.

डॉ: (डोळ्यांवरचा चष्मा काढत) मि राजाध्यक्ष, तुम्ही मोबाईल विसरलात नाही. मुद्दाम ठेवून गेला होतात. बोला काय बोलायचं होतं...

प्रतिक: खरं आहे ते डॉ. मला प्रेरणासमोर त्या विषयावर बोलता आलं नसतं म्हणून मी हे असं केलं. बोलता बोलता तो खुर्चीत बसला.

डॉ: हं बोला.

प्रतिकने प्रेरणाच्या बाबतीत घडलेला प्रसंग डॉ ना सांगितला. त्यानंतर डॉ गोवेकर यांनी सांगितलेली गोष्ट त्यांनी डॉ मेहता यांना सांगितली. डॉ मेहता यांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं.

डॉ: हं, बरं केलं तुम्ही मला हे सगळं सांगितलं. पण मिसेस प्रेरणा यांनी अचानक बाळासाठी हट्ट का धरला आहे...?

प्रतिकने त्यांना लीला आजीने केलेला प्रकार सांगितला.

डॉ: ओह माय गॉड. काळ किती पुढे गेला आहे पण लोकं अजूनही अशा प्रकारे वागतात.... आता माझ्या मिसेस प्रेरणा यांच्या स्ट्रेसचं कारण नेमकं लक्षात येत आहे. डोन्ट वरी मि राजाध्यक्ष, मिसेस प्रेरणा यांना यातलं काहीही कळणार नाही. 

प्रतिक: थँक यू डॉक्टर.

डॉ: काळजी घ्या मिसेस प्रेरणा यांची.... आणि एक वर्षांनंतर नक्की विचार करा.

प्रतिक: हो डॉ. येतो मी... ती वाट पाहत असेल माझी... म्हणत तो क्लिनिक मधून निघाला.

प्रतिक निघून गेल्यावर डॉ कितीतरी वेळ प्रतिकने जे काही प्रेरणा बद्दल सांगितलं त्याचा विचार करत होत्या. त्यांनी मग डॉ गोवेकर यांना कॉल करुन भेटून प्रेरणाची केस समजून घ्यायचं ठरवलं आणि त्या पुन्हा त्यांच्या कामाला लागल्या.

***

 

प्रतिक कारपाशी आला तसं प्रेरणाने समिधाला बाय बोलून कॉल ठेवला.

प्रतिक: बराच वेळ लागला का मला...?

प्रेरणा: नाही नाही फार नाही. काही म्हणाल्या का डॉ...?

प्रतिक: (प्रेरणाच्या सीटचा बेल्ट लावत) हं म्हणाले ना... मेडिसिन कोर्स झाल्यावर विचार करायला सुरुवात करा म्हणून.

प्रेरणा: खरंच...?

प्रतिक: (तिच्या कपाळावर ओठ टेकवत) अगदी खरं... माझं प्रॉमिस लक्षात आहे ना...?

प्रेरणा: हो आहे ना लक्षात...

प्रतिक: हं मग आता कॉलेजकडे सगळं लक्ष द्यायचं. अभ्यास करायचा मन लावून.... आणि कोर्स पूर्ण करुन डिग्री घेताना मला तुला आपल्या बाळासोबत पहायचं आहे.

प्रेरणा: (त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून) मला ही... होईल ना आपलं हे सुंदर स्वप्न पूर्ण...?

प्रतिक: (तिचा हात हातात घेऊन) होईल ना...! का नाही होणार...? डॉ काय म्हणाले, आठवत आहे की नाही तुला....!!

निघूया ना आता...? घरी सगळे वाट पाहत असतील.

प्रेरणा: (हसून) हो निघूया.. हबी..

प्रतिक: (कार सुरु करत लाडीकपणे) काय म्हणाली, पुन्हा बोल ना...!!

प्रेरणा: जावा तिकडे...

प्रतिक: (कार चालवत) यापुढे ही मला तसंच बोल ना... आवडलं माझं नामकरण...

प्रेरणा: (लाजून) तुमचं ना आपलं काहीतरीच असतं.

प्रतिक: काहीतरी नाही, तुझ्या प्रिय नवरोबाचा हट्ट आहे हा...! करशील ना मग पूर्ण...?

प्रेरणा: हो बाबा हो नक्की करेन.

दोघेही हसत गप्पा मारत घरी पोहचले.

***

 

प्रेरणाने प्रतिकचं म्हणणं ऐकून आता कॉलेज आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं होतं. पण अधून मधून लीला आजीचं बोलणं आठवून तिचं मन बैचेन व्हायचं. तिने त्यामुळे रेखाशी बोलायचं, फिरायचं प्रमाण ही खूप कमी केलं होतं. प्रेरणाची अवस्था आधीच रेखाला लक्षात आल्यामुळे तिने सध्यातरी ही गोष्ट वेळेवर सोडली होती. रेखाला ठाऊक होतं, एकदा का तिने बाळाला जन्म दिला की मग ती प्रेरणाला बाळाचं कारण पुढे करुन यातून बाहेर काढू शकणार. रेखाचा काही महिन्यांनी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला तशी ती तिच्या माहेरी निघून गेली होती. अधून मधून प्रेरणा रेखाची तब्येत विचारायला फोन करत असायची. राजाध्यक्ष कुटुंबात प्रेरणाच्या वागण्यातला बदल हळूहळू जाणवू लागला होता. हल्ली तिचं भरभरुन बोलणं ही कमी झालं होतं. रात्री झोपताना ही प्रतिक तिची वाट पाहत असायचा त्यावेळी त्याच्याशी बोलावं लागता कामा नये म्हणून ती अभ्यास करायला बसायची. प्रतिकला तिचं असं वागणं खटकत होतं पण आता नक्की काय करावं हे त्याला समजेनासं झालं होतं. आज पुन्हा ती रुममध्ये तेच करु लागली. तसा प्रतिक तिच्याजवळ गेला आणि त्याने तिचं हातातलं पुस्तक काढून घेऊन टेबलवर ठेवत तिला उचलून घेऊन बेडवर ठेवलं. प्रतिकच्या अशा प्रेमळ वागण्याने क्षणभर तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिला जाणवत होतं तिच्या अशा त्याच्या पासून दूर दूर राहण्याने ती प्रतिकवर कुठेतरी अन्याय करतेय पण तिचं मन कुठेतरी घाबरत होतं. नक्की ही भीती कसली आहे हे तिला ही कळत नव्हतं. प्रतिक तिच्याजवळ आला तसं तिला समजेना आता मी काय करु. पण प्रतिकने तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव वाचले आणि त्याने तिला मिठीत घेतलं. प्रतिकच्या मिठीत जाऊन ती सुखावली. इतक्या दिवसांची सल तिच्या अश्रूंवाटे बाहेर आली. तिला जसजसे हुंदके येऊ लागले तसतसं प्रतिक तिच्या पाठीवरुन हात फिरवत तिला शांत करु लागला. खूप वेळानंतर दोघांनाही एकमेकांच्या मिठीत शांत झोप लागली.

***

 

दुसऱ्या दिवशी प्रेरणाने प्रतिकला तिला काही दिवस माहेरी जाऊन रहायचं असल्याचं सांगितलं. प्रतिकने तिला त्यासाठी होकार दिला. त्याचा होकार ऐकून ती त्याला बिलगली.

प्रतिक: (तिला मस्करीत) असं रोज तू सकाळी करण्यासाठी मी आणखी आणखी काय काय करु सांगशील का मला...?

प्रेरणा: प्रतिक, तुम्ही पण ना...

प्रतिक: (तिच्या कमरेला धरुन तिला जवळ ओढत हळूच तिच्या कानात म्हणाला) मी पण ना काय... बोल ना... कान ऐकण्यासाठी आतुरले आहेत माझे... त्याचे गरम श्वास तिच्या कानापाशी तिला जाणवत होते. त्याने हळूच तिचा चेहरा स्वतःकडे करत तिच्या ओठांचा ताबा घेतला. दोघेही बराच वेळ असेच एकमेकांत गुंतले होते. तोच प्रतिकच्या मोबाईल रिंगच्या आवाजाने दोघेही भानावर आले. प्रतिकने मोबाईल उचलला तसं तिने लाजून त्याच्यापासून दूर होत किचनकडे धाव घेतली.

***

 

दुपारी कॉलेजमधून आल्यावर प्रेरणाने नंदाला तिला माहेरी काही दिवस राहायला जायचं असल्याचं सांगितलं. नंदाने ही तिला हसत हसत परवानगी दिली. फक्त अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस म्हणून त्यांनी तिला प्रेमाने सांगितलं. तिनेही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होणार नाही असं आश्वासन दिलं. संध्याकाळी प्रतिक तिला तिच्या आईबाबांच्या घरी सोडून त्यांच्या आग्रहास्तव जेवून पुन्हा आपल्या घरी आला. प्रतिकच्या घरी सगळेच त्याच्या येण्याची वाट पाहत होते. तो फ्रेश होऊन लिविंग रुममध्ये आला.

प्रतिक: आईबाबा, आजी मला तुम्हां तिघांशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे.

मिलिंद: हो बोल ना.

प्रतिकने त्या तिघांना त्या दिवशी पार्कमध्ये लीला आजी आणि रेखा-प्रेरणा यांच्या मधला संवाद सांगितला.

आजी: (रागात) त्या लीलाचा स्वभावच तसा आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा. उगाच नाही तिचा एकुलता एक मुलगा आणि सून दुसरीकडे राहत आहेत. काय सुख मिळतं तिला असं वागून मला आजपर्यंत कळलं नाही. पण आता मी गप्प नाही बसणार आहे. माझ्या नातसुनेशी अशा शब्दांत बोलायची हिंमत कशी झाली तिची. नाही तिला ऐकवलं तर नावाची शशिकला राजाध्यक्ष नाही मी.

नंदा: (आजींच्या खांद्यावर हात ठेवत) आई, प्लीज तुम्ही शांत व्हा.

आजी: नंदा, काहीही झालं तरी मी त्या लीलाला बघणारच आहे.

मिलिंद: आई, सध्या तू शांत रहा. आधी प्रतिकला काय बोलायचं आहे ते ऐकून घेऊ. तशी आजी मनात लीला आजीला ऐकवायचंच असा ठाम निर्णय घेत शांत झाली.

प्रतिक: आईबाबा, आजी मी तुम्हां तिघांपासून आणि प्रेरणा आणि प्रेरणाच्या फॅमिली पासूनही एक गोष्ट लपवून ठेवली आहे.

नंदा: कोणती गोष्ट... तिघांचे चेहरे खूप गंभीर झाले. तिघेही तो पुढे काय बोलतोय याकडे पाहू लागले.

प्रतिक: तुम्हाला तर माहिती आहे प्रेरणाच्या बाबतीत जे घडलं त्यानंतर तिची डॉ गोवेकर यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती.

मिलिंद: हो, पण मग त्याचं काय...?

प्रतिक: मी डॉ ना मला प्रेरणाशी लग्न करायचं असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी डॉ नी लग्न झाल्यावर एक- दीड वर्ष तरी प्रेग्नन्सीचा विचार करु नका म्हणून सांगितलं होतं.

आजी: पण असं का म्हणाल्या होत्या डॉ...?

नंदा: आई, प्रेरणाची मनस्थिती ठीक झाल्यावर तिने लगेच लग्न झाल्यावर बाळाचा विचार करणं तितकं योग्य ठरत नाही. कारण पेशंटला ट्रीटमेंट देताना अशाही काही मेडिसिन दिल्या जातात ज्यामुळे त्या मेडिसिनचा जो शरीरावर इफेक्ट होतो तो लवकर निघून जात नाही. म्हणजे अशा वेळी जर काही महिन्यांत बाळाचा विचार केला तर त्यामुळे बाळ नॉर्मलचं होईल का याची शाश्वती नसते. आणि ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर पेशंट त्याचं नॉर्मल आयुष्य जगतोय की पुन्हा डिप्रेशनमध्ये जातोय हे ही पहावं लागतं. बरोबर बोलले ना मी प्रतिक...? हेच सांगितलं ना डॉ नी.

प्रतिक: हो आई, पण तुला इतकं कसं माहीत...?

मिलिंद: नंदाला कसं माहीत ते महत्त्वाचं नाही आहे. सध्या मला सांग मग डॉ गोवेकर आणि डॉ मेहता काय म्हणाले आहेत...?

प्रतिक: त्यांनी एक वर्षांनंतर विचार करायला हरकत नसल्याचं सांगितलं. पण प्रेरणाच्या मनात लीला आजीचं बोलणं खूप लागलं आहे. मला समजत नाही आहे तिला कसं समजावू ते.

आजी: ते तू माझ्यावर सोड. काय आणि कसं बोलायचं ते.

मिलिंद: डॉ गोवेकर यांनी जे सांगितलं होतं ते तू प्रेरणा किंवा तिच्या फॅमिली पासून का लपवून ठेवलं...?

प्रतिक: कारण मला अशी भीती होती की हे कळलं तर प्रेरणा माझ्याशी कधीच लग्नासाठी तयार होणार नाही. तिला सतत असं वाटत राहिलं असतं की माझ्याशी लग्न करून ती माझ्यावर अन्याय करतेय. आणि तिच्या घरी मी याकरता नाही सांगितलं कारण त्यांनी या गोष्टीचं टेन्शन घेतलं असतं.

मिलिंद: खूप अभिमान वाटतो आहे मला तुझ्या अशा वागण्याचा. किती समजून घेतलं तू हे सगळं.

प्रतिक: बाबा, मला प्रेरणाला कायम आनंदी ठेवायचं आहे आणि हे कळू देऊन मला तिला दुखवायचं नव्हतं.

आजी: (प्रतिकच्या गालावरून मायेने हात फिरवत) हं मिलिंद म्हणतोय त्याप्रमाणे खरंच चांगलं केलंस.

नंदा: प्रतिक, प्रेरणाला एक महिना राहू दे तिच्या आईबाबांकडे. त्यांच्या बरोबर राहून तिच्या मनातून या गोष्टी निघून जातील. ती पडेल यातून बाहेर.

प्रतिक: चालेल आई.

आजी: चला आता काहीही विचार न करता झोपा सगळ्यांनी, गजानन सगळं ठीक करेल. नका जास्त काळजी करु... असं म्हणत आजीने सगळ्यांना झोपायला पाठवलं आणि ती ही उद्या लीलाची खबर घ्यायचीच असं मनाशी ठरवून झोपायला निघून गेली.

 

क्रमशः

 

(शशी आजी लीला आजीची घेणार आहे चांगलीच खबर. पुन्हा कोणाच्या वाटेला येण्या आधी आता यापुढे नक्की करेल ती विचार... असं काय बोलणार आहे आपली डॅशिंग आजी जाणून घेऊया पुढच्या भागात लवकरच)

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ujwala Desai

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...

//