Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-७९

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-७९
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-७९


प्रेरणा प्रतिक ऑफिसमध्ये आल्यावर प्रेरणाने लंच ब्रेक मध्ये मीना आणि समिधाला तिच्या राजीनाम्याबद्दल सांगितलं. दोघींना एकीकडे तिचं शिकण्याचं स्वप्न पूर्ण होणार हे ऐकून आनंद झाला तर दुसरीकडे आता आपली मैत्रीण दुरावणार हे ऐकून दुःख झालं.

प्रेरणा: अग जॉब सोडतेय याचा अर्थ हा थोडी ना होतो की आपली मैत्री तुटणार...

दोघी : हं

प्रेरणा: जाऊदे मी नाही पुढे शिकत... तुम्हाला असं वाटतं तर...

मीना: अग नाही ग... तसं काही नाही. आम्ही दोघी खूश आहोत. तुला पुढे शिकायला मिळत आहे हे ऐकून... खूप कमी जण असतात जे सूनेला शिकू देतात.

समिधा: हो खरं बोलतेय मीना... आम्ही दोघी फक्त तू नसताना आम्हाला हे ऑफिस कसं वाटेल त्याचाच विचार करत होतो.

मीना: Yes... we are happy for you... दोघींनी प्रेरणाला group hug केलं.

***

 

संध्याकाळी प्रतिक प्रेरणाला घेऊन तिच्या माहेरी गेला. तिथे सगळेच त्या दोघांना बघून खूश झाले. मालगुडे फॅमिली ही प्रेरणा-प्रतिक आले आहेत हे कळल्यावर त्यांची विचारपूस करायला प्रधानांच्या घरी आले. सगळ्यांच्या गप्पा इतक्या रंगल्या होत्या की कोणालाच वेळेचं भान नव्हतं. अनू प्रेरणाला म्हणाली, आज राह ना... मस्त पार्कमध्ये जेवून झाल्यावर शतपावली करायला जाऊ. प्रेरणाने प्रतिककडे पाहिलं. प्रतिकने ऑफिस मध्ये असतानाच नंदाला कॉल करुन ते प्रेरणाच्या घरी एक रात्र राहून दुसऱ्या दिवशी येणार असल्याचं आधीच कळवून टाकलं होतं. त्याने तिला मानेनेच होकार दिला. प्रतिकचा होकार ऐकून तिला खूप आनंद झाला. 

प्रेरणा: (प्रतिकला) आईंना कॉल करुन कळवायला हवं ना...!

प्रतिक: मी आधीच आईला कॉल करुन सांगितलं की, आम्ही दोघे उद्याच येऊ म्हणून...

त्याचं बोलणं ऐकून सगळेच प्रेरणा बरोबर अजून काही वेळ घालवता येणार म्हणून खूश झाले. प्रेरणाची आई तर जावयासाठी जेवणाचा फक्कड बेतच करण्यासाठी कामाला लागली. त्यांनी मालगुडे फॅमिलीला पण आज त्यांच्या घरीच जेवणाचं आमंत्रण दिलं. आई, अनू, प्रेरणा आणि मालगुडे काकू चौघी गप्पा मारत किचनमध्ये काही ना काही काम करू लागल्या. आदी त्याच्या ड्रॉवरमधून खेळण्यासाठी पत्ते घेऊन आला. प्रेरणाचे बाबा, आदी, प्रतिक, विवेक आणि मालगुडे काका नातीला मांडीवर घेऊन पत्ते खेळू लागले. किचनमध्ये बायकांच्या गप्पा रंगल्या होत्या तर लिविंग रुममध्ये पुरुषांच्या. जेवणाची वेळ झाली तसं प्रेरणाने सगळ्यांना आवाज दिला. आधी पुरुषांना जेवण वाढून मग बायकांनी एकत्र बसू असा सगळ्या महिला मंडळाचा विचार झाल्यामुळे तिने पत्रावळी ठेवायला सुरवात केली. प्रतिकने ते सगळं बघत तिला विचारलं, तुम्ही कधी जेवणार..?

प्रेरणा: तुमचं झालं की...!!

प्रतिक: नाही हां मुळीच नाही.

आई: असं काय म्हणताय तुम्ही... 

प्रतिक: आई, आज तुम्ही सगळ्यांनी जेवायला बसायचं आणि आम्ही तुम्हाला वाढणार.... चालेल ना बाबा, आदी, काका आणि विवेक...?

चौघे: चालतंय की...

आई: (बाबांना) काय तुम्ही, बरं दिसतं का ते...

काकू: हो ना...

प्रतिक: तुम्ही मला मुलगा मानतात ना... मग माझा हट्ट तुम्ही ऐकलाच पाहिजे.... आणि नाही मानत असाल तरी जावयाचा हट्ट तर तुम्हाला मान्यच करावा लागेल. प्रतिकने त्यांना एकदम कात्रीतच पकडलं. मग काय सगळ्यांना ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रतिकच्या म्हणण्याप्रमाणे आधी महिलावर्गाची पंगत बसली मग बाकी पुरुष मंडळी बसली. जेवणाचा कार्यक्रम हसत खेळत पार पडला. जेवून झाल्यावर आदी सगळयांसाठी आईस्क्रीम घेऊन आला. आईस्क्रीम खाता खाता प्रेरणाने ती पुढे शिकणार असल्याची आनंदाची बातमी सगळ्यांना दिली. आईबाबांचं हृदय तर हे ऐकून आनंदाने भरुन आलं. त्यांना आज पुन्हा एकदा प्रतिक जावई म्हणून मिळाला याचा अभिमान वाटू लागला.

***

 

दुसऱ्या दिवशी प्रतिक-प्रेरणा सगळ्यांचा निरोप घेऊन जायला निघाले. विवेकही त्याला कॉलेज मध्ये जायचं असल्याने त्यांच्या बरोबर जायला निघाला. विवेक त्यांना कारपर्यंत सोडून बाय बोलून निघतच होता तेवढ्यात प्रतिकने त्याला कॉलेज मध्ये सोडतो म्हणत जबरदस्तीने बसायला लावलं. प्रतिकने कार विवेकच्या कॉलेजच्या दिशेने वळवली. तिघांच्या गप्पा रंगल्या होत्या.

प्रतिक: (कार चालवत बोलतो) विवेक, तुझी इंटर्नशिप आता १-२ महिन्यात पूर्ण होतेय. मग पुढे सेकंड इअरवरच लक्ष केंद्रित करायचा विचार आहे की पार्ट टाईम जॉब ही करणार आहे..?

विवेक: नाही जिजू, सेकंड इअरवर फुल फोकस ठेवायचं ठरवलं आहे मी.... आणि कॉलेजच्या प्लेसमेंट मध्ये MNC company मध्ये प्रयत्न करायचा विचार आहे माझा.

प्रतिक: Oh that's good... माझी काही research or studies मध्ये मदत लागली तर सांग मला.... अजूनही मला आठवतं बरं का... कॉलेजमधलं.... त्यामुळे तू मला विचारु शकतोस... त्याचं बोलणं ऐकून तिघेही हसतात.

विवेक: (हसत हसत) हो नक्की नक्की...

प्रेरणा: विवेक, ती सध्या काय करतेय...? आता कोणत्या वर्षाला आहे ती...?

प्रतिक: कोण ती...? (प्रेरणा आणि विवेककडे पाहत) अरे, तुम्ही दोघांनी मला काही कळेल असं काही बोला ना...?

प्रेरणा: हं, सांगते... ती आमच्या विवेकची खास फ्रेंड.

प्रतिक: ओह... नाव काय तिचं...?

प्रेरणा: नाव तर मला ही कधी या कार्टूनने सांगितलं नाही. नेहमी तिच्याशी मोबाईल वरून लपून चॅटिंग करायचा. एक दिवस मी पकडलं तेव्हा म्हणाले महाशय, की त्यांना ती आवडते... आणि जेव्हा तिचा होकार येईल तेव्हा मला तिच्या बरोबर ओळख करून देईल म्हणून... (मागे बसलेल्या विवेककडे वळून पाहत) मग विवेक, कधी करुन देतोय ओ...पुढचे शब्द तिच्या ओठांवरच राहिले. तिचा उल्लेख निघाला आणि विवेक तिच्याच आठवणींत हरवला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून प्रेरणाला पुढे काही बोलताच आलं नाही. प्रतिकने ही तिच्या हातावर त्याचा एक हात ठेवत तिला शांत रहायला सांगितलं. काही वेळाने तिघेही कॉलेजपाशी पोहचले. प्रतिकने विवेकला आवाज दिला तसा तो भानावर आला. मग कारमधून खाली उतरत काही घडलंच नाही या आविर्भावात तो दोघांना बाय बोलून कॉलेजमध्ये निघून गेला. 

***

 

एक महिन्याच्या नोटीस पिरियड नंतर प्रेरणाचा आज ऑफिस मधला शेवटचा दिवस होता तर आशिष, विवेक यांची इंटर्नशिप त्याच महिन्याच्या शेवटी संपणार होती. त्यांच्या सगळ्या टीमला आज प्रतिक डिनरला घेऊन गेला होता. समिधा, मीनाने तिकडे गेल्यावर प्रेरणासाठी आणलेले गिफ्टस प्रेरणाला दिले आणि सगळ्यांसमोर तिला खोलून बघायला सांगितलं. आशिष, विवेक दोघेही तिचा गिफ्ट ओपन करतानाचा व्हिडिओ काढू लागले. गिफ्ट उघडल्यावर त्यातला एक सुंदर ड्रेस पाहून तिचे बदलणारे चेहऱ्यावरचे हावभाव दोघे ही विडिओ मध्ये घ्यायला विसरेल नाहीत. तिने दुसरं गिफ्ट उघडलं त्यात तिला कॉलेजला होईल अशी छोटी सॅकबॅग आणि All the best ग्रीटिंग होतं. गिफ्ट बघून तिने दोघांना ही hug करत Thank you म्हंटलं.

मीना: wait wait, हे गिफ्ट फक्त आम्हा दोघींकडून नाही आहे हे पूर्ण टीम कडून आहे सो तुला आम्हा सगळ्यांना thank you म्हणावं लागेल. (हळूच तिच्या कानात बोलते) आता आशिष, विवेक यांना तू thank you म्हणू शकतेस पण सरांना Thank you कसं आणि केव्हा म्हणायचं हा तुझा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. तिचं बोलणं ऐकून प्रेरणाने तिला अक्षरशः ढकलून बसायला भाग पाडलं. मीनाला मात्र तिचं असं वागणं पाहून हसू आवरेना.

प्रतिक: काय झालं प्रेरणा, मीना...?

मीना: ते सर...

प्रेरणा: (ती काही बोलणार इतक्यातच) आशिष, विवेक आणि प्रतिक सर तुम्हां सगळ्यांना ही Thank you. मला खरंच हे असं surprise पाहून काय वाटत आहे ते आता शब्दांत सांगणं कठीण आहे. तेवढ्यात त्यांची जेवणाची ऑर्डर आली तसे सगळेजण जेवणावर तुटून पडले. प्रेरणाची फेअरवेल पार्टी खूप हसत खेळत पार पडली.

***

 

प्रेरणाचं कॉलेज सुरु व्हायला अजून २ महिने अवकाश होता. ती आता नंदाला घरकामात, कुकिंग क्लासेस मध्ये मदत करत होती. रोज रेखा बरोबर टेरेसवर सकाळ संध्याकाळ फिरायला जायचा तिचा नेम झाला होता. अशाच एका सकाळी दोघी फिरुन घरी आल्या. दोघींनी पाहिलं दोन्ही घरची मंडळी प्रतिकच्याच घरी होती. प्रेरणा रेखाचा हात पकडून तिला त्यांच्या घरी घेऊन आली. त्या दोघींना आलेलं पाहून प्रतिक राजीव दोघेही खूश होऊन जोरात ओरडत म्हणाले, आम्ही दोघे मामा झालो. सोना दीदीला मुलगी झाली हो... दोघांनी आजीला जबरदस्तीने त्यांच्या बरोबर ओढून घेत नाचायला भाग पाडलं. रेखा, प्रेरणा ही सोनाची गोड बातमी ऐकून खूप खूश झाल्या.

नंदा: आताच समीररावांचा कॉल येऊन गेला. २ तासापूर्वी झाली डिलिव्हरी. आपण झोपले असू म्हणून त्यांनी आता केला कॉल.

दोघी: आई, नॉर्मल झाली ना डिलिव्हरी.

नंदा: हो हो, अजून गुंगीमुळे सोना शुद्धीवर नाही आली आहे. पण येईल थोड्या वेळात. बाळाचा फोटो नंतर पाठवतो म्हणाले. सगळ्यांना कॉल करुन सांगायचं होतं म्हणून लगेच कॉल ठेवला त्यांनी..

प्रेरणा आणि रेखा दोघीही बाळाचा फोटो पाहायला मिळणार हे ऐकून खूश झाल्या. समीर फोटो कधी पाठवणार याची दोघींसकट सगळ्यांना उत्सुकता लागून होती.

***

 

एक महिन्यानंतर सोनाच्या बाळाचं बारसं होतं. यावेळी राजीवच्या घरातील रेखा सोडून सगळे आणि प्रतिकच्या घरातील आजी सोडून सगळे सोनाच्या US च्या घरी गेले होते. रेखाला जाणं शक्य नसल्याने ती माहेरी काही दिवसांसाठी राहायला गेली होती तर आजी प्रतिकच्या आत्येकडे राहायला गेली होती. यावेळी ही मिलिंद यांनी प्रतिकच्या आत्येच्या मोबाईलवर तर राजीवने रेखाच्या मोबाईल वर व्हिडिओ कॉल केल्यामुळे त्या दोघींना कार्यक्रम पाहता आला. बाळाच्या आत्येने हळूच कानात रुही नाव सांगताच पडद्यामागचं नाव सगळ्यांना दाखवण्यात आलं. छोट्या रुहीला हातात घेऊन दोन्ही आजी आजोबांनी फोटो काढले. सोनाची सासरची इतर मंडळीही त्यांच्या ५ पिढ्यांनंतर ही जन्मलेली पहिलीच मुलगी असल्याने खूप हौसेने सोना-समीर, रुही बरोबर फोटो काढत होते.

 

सोनाने प्रतिक-प्रेरणाला बोलावून त्यांना ही रुही बरोबर फोटो काढायला सांगितलं. छोट्या रुहीला हातात घेताना प्रेरणाचं हृदय प्रेमाने भरुन आलं. छोटी रुही सुद्धा तिच्याकडे पाहून शांत हसू लागली. त्यांचा फोटो काढून झाला तसा राजीव मामा ही फोटो काढायला आला. त्याने चित्रविचित्र आवाज करत रुहीला पुन्हा हसवलं. तिच्या हसण्याचा आवाज ऐकून ऑनलाइन असलेली आजी राजीवच्या बाजूलाच उभ्या असलेल्या मिलिंदला म्हणाली, "मिलिंदा, शोभतेय बरं का आपल्या सोनाची लेक...!" आजीचं बोलणं ऐकून मिलिंद ही हसू लागले.

***

 

एक आठवड्यानंतर सगळेजण पुन्हा मुंबईला आले. सगळ्यांना रुहीचा एका आठवड्यात चांगलाच लळा लागून गेला होता. दुसऱ्या दिवशी आजी, रेखा ही त्यांच्या घरी आले. रेखाने गेल्या एक आठवड्यात तिच्या खाण्यापिण्याच्या बऱ्याच इच्छा तिच्या आईकडून पूर्ण करुन घेतल्या होत्या. घरी आल्यावर पुन्हा प्रेरणा आणि रेखा यांचा सकाळी टेरेसवर फिरायचा कार्यक्रम सुरु झाला.

***

 

आशिष-विवेकच्या जागी 2 इंटर्न घेण्यात आले होते. दोघांनी त्यांना कराव्या लागणाऱ्या कामाचं ट्रेनिंग दिलं. प्रेरणाच्या जागी ही एक नवीन अनुभवी मुलगी रुजू झालेली. समिधा, मीना तिला अधून मधून काही शंका कुशंका असतील तर मदत करु लागल्या. आज आशिष-विवेकचा ऑफिसमधला शेवटचा दिवस होता. HR ने त्या दोघांकडून experience letter साठी काही फॉर्म प्रोसेस करुन घेतलं आणि एक आठवड्याने त्यांना लेटर घ्यायला बोलावलं. प्रेरणा संध्याकाळी ऑफिसच्या टाईम मध्ये त्या दोघांना भेटायला आली होती. ती आल्यावर प्रतिकसकट टीम मधल्या सगळ्यांनी आशिष-विवेक दोघांना मिळून केक कापायला लावला. प्रतिकने त्या दोघांना थोडा थोडा केकचा तुकडा भरवला. सगळ्यांनी मस्त केकवर ताव मारला. समिधा, मीना आणि प्रेरणाने त्या दोघांसाठी टीमतर्फे घेतलेलं गिफ्ट दिलं. टीशर्ट गिफ्ट बघून दोघेही खूश झाले. प्रतिक आणि टीम मधल्या प्रत्येकाने त्या दोघांना All the best केलं. ते दोघेही आज ऑफिस मधला शेवटचा दिवस म्हणून भावूक झाले होते. मीनाने मोबाईल रेकॉर्डिंग चालू करुन त्या दोघांना त्यांच्या इंटर्नशिप बद्दल 2 शब्द बोलायला सांगितले. पहिल्यांदा तिने आशिषला बोलायला सांगितले. बोलता बोलता त्याला अश्रू अनावर झाले तसं त्याने विवेकला बोलायला सांगितलं. विवेक बोलू लागला, "खूप छान वाटलं कंपनीचा एक इंटर्न म्हणून भाग झालो. आम्ही दोघे नवीन होतो तरी तुम्ही आम्हाला कधी एकटं पडू दिलं नाही. टीममधल्या प्रत्येक व्यक्ती कडून सतत काही ना काही नवीन शिकत गेलो. प्रतिक सरांनी तर कधीच आम्हाला बॉसी वागणूक दिली नाही. नेहमीच ते आम्हाला मित्रासारखे आमच्या चुका समजावत आले. आम्हाला दोघांना ही आमचा पहिला जॉब या कंपनी मधला आहे याचा खरंच खूप समाधान वाटत आहे. तो ही मग भावूक झाला. प्रतिकने दोघांना ही hug करुन शांत केलं. मीनाने मग एक जोक सांगत वातावरण हलकं फुलकं केलं. ऑफिस सुटायची वेळ झाली तसे प्रतिक-प्रेरणासकट सगळे एकमेकांना निरोप देत घरी जायला निघाले.

***

 

प्रतिक-प्रेरणा दोघेही कार मध्ये असताना राजीवने त्याच्या मोबाईलवर कॉल केला. प्रतिकने bluetooth ने कॉल रिसिव्ह केला.

प्रतिक: हां बोल राजीव...

राजीव: कुठे आहात तुम्ही दोघे... मी आणि रेखा चेकअप करुन निघालो आहोत तर एकसाथच जाऊ.

प्रतिक: इथेच LBS रोडच्या सिग्नलला आलोय... येतोच तिकडे. तुम्ही तिथेच थांबा.

राजीव: हो चालेल.

प्रतिक कार घेऊन हॉस्पिटलपाशी पोहचला. प्रेरणाने कारमधून बाहेर पडत रेखाला मागच्या सीटवर बसायला मदत केली आणि ती सुद्धा तिच्या बरोबर बसली. राजीव प्रतिकच्या बाजूच्या सीटवर बसला तसं प्रतिकने कार घरी न्यायला वळवली. त्यांची कार अपार्टमेंटपाशी आली तसं राजीवला रेखाच्या मेडिसिन मेडिकल मधून आणायचं राहून गेल्याचं आठवलं.

राजीव: तुम्ही दोघी पुढे जाल का...? मी बाजूच्याच मेडिकल मधून मेडिसिन राहिलेत ते घेऊन येतो.

प्रतिक: चल मी पण येतो.

रेखा: वकिलसाहेब, तुम्ही दोघे येईपर्यंत आम्ही दोघी इथेच पार्कमध्ये तोपर्यंत एक फेरी मारतो. मग एकसाथच जाऊ घरी.

राजीव: बायको, चालतंय की... आम्ही असे गेलो आणि असे आलो...

रेखा: (हसत)बरं...

ते दोघे मेडिकलमध्ये गेले तसं प्रेरणा-रेखा दोघीही त्यांच्या अपार्टमेंटच्या खाली असलेल्या पार्कमध्ये फेरी मारण्यासाठी गेल्या.

प्रेरणा: (रेखाचा हात पकडून) सावकाश चाल हां...

प्रेरणा आणि रेखा दोघी हळूहळू चालू लागल्या. त्यांच्याच मागून त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लीला आजी आल्या.

लीला: (प्रेरणाला) काय ग तू, शशीची नातसून ना...?

प्रेरणा: हो हो... तुम्ही ओळखता आजींना...?

लीला: (काहीशा टोमणा मारत) आम्हा जेष्ठ लोकांचा ग्रुप आहे हो... (मग रेखा कडे पाहत) ही कोण...? तू त्या नवीनच राहायला आलेल्यांची सून का...?

रेखा: हो

लीला: कितवा महिना चालू आहे

रेखा: चौथा संपून पाचवा लागेल आता...

लीला: (पुन्हा प्रेरणाला) माझ्या माहिती प्रमाणे तुझं आणि हिचं एकाच मंडपात लग्न झालं होतं ना...?

प्रेरणा: हो, आमचं दोघींचं एकाच दिवशी लग्न झालं.

लीला: (पुन्हा टोमणा मारत) तुझ्याकडे अजून बातमी कशी नाही मग...? की काही प्रोब्लेम तर नाही ना...?

प्रेरणाने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं पण रेखाला हे ऐकून रागच आला.

रेखा: ओ आजी, आम्ही काही बोलत नाही तर तुम्ही जास्तच बोलत सुटलाय... मनाला वाटेल ते बोलताय.

प्रेरणा: (तिच्या पाठीवरुन हात फिरवत) शांत हो रेखा. नको लक्ष देऊस.

लीला: (प्रेरणाकडे बघत रेखाला) तुझ्या भल्यासाठी सांगते... हिची नजर तुझ्या बाळांवर पडू देऊ नकोस. अशा वांझ बायकांची नजर पडणं चांगलं नाही. 

रेखा: ओ आजी, तुम्ही बोललात तेवढं पुरे झालं हां आता... अजून एक शब्द जरी काढला ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही.

लीला: (तिथून निघून जात) घ्या हिच्या भल्याचं सांगायला गेले तर ही मलाच ऐकून दाखवतेय.

लीला आजी निघून गेल्या पण नेमकं हे सगळं बोलणं प्रतिक आणि राजीवच्या कानावर पडलं. प्रेरणा रेखाला शांत करत होती पण तिला हे बोलणं टोचलं आहे हे प्रतिकच्या लक्षात आलं. दोघेही त्या दोघींपाशी आले.

प्रतिक: काय बोलत होत्या त्या...?

प्रेरणा: अं काही नाही... नका लक्ष देऊ... चलायचं का घरी...?

रेखाने राजीवकडे पाहिलं. राजीवने तिला घरी जाऊन बोलू असं इशाऱ्यानेच सांगितलं. चौघेही त्या विषयावर काहीही न बोलता घरी जायला निघाले.

***

 

प्रेरणा घरी आल्यापासून शांतच होती. तिने नंदाला घरकामात मदत केली. जेवण वगैरे सगळं आटपल्यावर ती तिच्या रुममध्ये आली. प्रतिक तिची वाट पाहत शांतपणे डोळे मिटून होता. ती त्याच्याकडे न बघताच दुसऱ्या कुशीवर वळून झोपली. पण तिच्या डोक्यात सतत लीला आजीचे शब्द येत होते. नकळत तिला हुंदका अनावर होत तिच्या डोळ्यांत पाणी आलं. प्रतिकच्या लक्षात आलं ती रडतेय. त्याने तिला जवळ ओढत स्वतःकडे तिचा चेहरा वळवला.

प्रतिक: प्रेरणा, रडू नकोस... मी नाही पाहू शकत तुझ्या डोळ्यात पाणी...

त्याचं बोलणं ऐकून तिला अजूनच रडू कोसळलं. प्रतिकने तिला त्याच्या मिठीत घेतलं. तिच्या डोक्यावरुन हात फिरवत तो तिला म्हणाला, "त्या लीला आजीचं बोलणं तुला लागलं ना...!"

त्याचं बोलणं ऐकून तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं.

प्रतिक: नवरा आहे मी तुझा, तुझं दुखावलेलं मन कळत नाही का मला...

प्रेरणा: (त्याच्या मिठीतच रडत) प्रतिक, खरंच मी वांझ आहे का...? खरंच माझ्यामुळे रेखाच्या बाळाला काही होईल का...?

प्रतिक: (तिचे डोळे पुसत) चुप्प असं काही बोलू नकोस... हे बघ आपल्याला पण बाळ होणार... आज नाहीतर उद्या... काहींना थोडा उशीर होतो आईबाबा व्हायला म्हणून आपण रडत राहायचं का...? आणि तुझ्यात किंवा माझ्यात काहीच प्रोब्लेम नाही आहे. त्यामुळे असा विचार मनात आणू सुद्धा नकोस. आपलं बाळ असेल आपल्याबरोबर 2 वर्षांनी...

प्रेरणा: 2 वर्षांनी का...? आता का नाही...

प्रतिक: आता त्याच्या या रडक्या मम्मीला तिचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना...

त्याचं बोलणं ऐकून प्रेरणाच्या चेहऱ्यावर रडता रडता हसू आलं. प्रतिक तिला डोक्यावरुन कुरवाळत जवळ घेऊनच झोपला.

***

 

काही आठवड्यानी प्रेरणाचं कॉलेज सुरु झालं. तिचे आधीचे कॉलेजचे दिवस ती पुन्हा नव्याने जगत होती. नंदा तिचं स्वप्न प्रेरणाकडून पूर्ण होणार या आनंदात तिला शक्यतो अभ्यासाकडेच लक्ष द्यायला सांगायच्या. तरी प्रेरणा त्यांना कामात मदत करायला यायचीच. सोना-समीर रुहीला घेऊन काही दिवसांसाठी आले होते. आजी, रेखा-प्रेरणा या तिघांकडेच ती असायची. सोना ही मग तिला त्यांच्याकडेच सोपवून दुपारची शांत झोप काढायची. प्रेरणाला रुहीच्या घरी येण्याने हळूहळू आपण ही आई व्हावं असं वाटू लागलं होतं. तिच्या मनात नकळत का होईना लीला आजीचं बोलणं येत राहायचं. सोनाचा पुन्हा घरी जायचा दिवस जवळ आला तसं आदल्याच दिवशी प्रेरणा रुहीसाठी बरीच सारी वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रेसेसची शॉपिंग करुन आली. रुहीला बाय बोलताना तिला खूप भरुन आलं होतं. प्रतिकने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला धीर दिला. 

 

त्या रात्री न राहवून तिने पुन्हा प्रतिकसमोर तोच विषय काढला.

प्रेरणा: प्रतिक, मला आई व्हायचंयं... मी करेन सगळं मॅनेज... कॉलेज बरोबर.

प्रतिक: प्रेरणा, समजून घे.. हे एक वर्ष जाऊदे आपण पुढच्या वर्षी हवं तर विचार करु.

प्रेरणा: प्रतिक, तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही ना...?

प्रतिक: म्हणजे...?

प्रेरणा: म्हणजे माझ्या बाबतीत जे झालं तेव्हा मी ऍडमिट होते तेव्हा तर माझ्या बाबतीत काही तुम्हाला डॉ नी सांगितलं नाही ना...?

प्रतिक: प्लीज प्रेरणा, नको तो विचार करु नकोस...

प्रेरणा: मग माझं ऎकालं का...? तरच मी असं काही बोलणार नाही.

प्रतिक: बोल ना...

प्रेरणा: आपण टेस्ट करायच्या का..?

प्रतिक: ठीक आहे.. पण रिपोर्ट सगळे नॉर्मल आल्यावर तू माझं ऐकून फक्त अभ्यासावर लक्ष देशील...

प्रेरणा: बरं बाबा, ऐकेन मी तुमचं... मग उद्याच जाऊया का...?

प्रतिक: अग पण अपॉइंटमेंट वगैरे घ्यावी लागेल ना...

प्रेरणा: मी आधीच रेखाच्या डॉ कडे अपॉइंटमेंट घेतली आहे.

प्रतिक: म्हणजे तू सगळं ठरवूनच आली आहे तर... चालेल जाऊया आपण उद्या... आता शांत झोप... म्हणत प्रतिकने तिला स्वतःच्या मिठीत घेत झोपवलं. त्याच्या मनात आता प्रेरणाच्या अशा वागण्याची भीती वाटू लागली होती. उद्याची सकाळ नक्की काय आणून समोर ठेवणार होती... हे तर त्याला ही माहीत नव्हतं.

 

(लीला आजीने प्रेरणाला असं काही बोलून तिच्या आयुष्यात आणलेलं हे वादळ प्रेरणा थांबवू शकेल का...? राजाध्यक्ष कुटुंब प्रेरणाला यात कशी मदत करतील...? वाचायला विसरु नका पुढचा भाग लवकरच...

 

विवेकच्या आयुष्यात असलेली ती... कोण होती ती... तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का...? तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरु नका...)

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...