अस्तित्व एक संघर्ष-भाग-७५

It is a story of a girl who faced such situation where she totally destroyed and at one point she fight for her identity.

अस्तित्व एक संघर्ष

भाग-७५


आज पूजेचा दिवस होता. सोना आणि प्रेरणा दोघीही सकाळी लवकर उठल्या. सोना तिची तयारी करण्यासाठी तिच्या रुममध्ये निघून गेली. प्रेरणाने एकटं वाटता कामा नये म्हणून रूमचा दरवाजा उघडाच ठेवला होता. पूजा आहे म्हणजे लवकर तयार व्हायला हवं म्हणत तिने तिच्या बॅगमध्ये साडी कोणती नेसावी या विचाराने 2-3 साड्या बाहेर काढल्या. "कोणती नेसू मी साडी... मला तर हे सगळेच रंग आवडतात. आता इथे प्रतिक हवे होते. मग त्यांनीच मला सांगितलं असतं कोणती नेसू ते...!" मनाशी विचार करत तिने त्यातली मरुन रंगाची साडी हातात घेतली आणि आरशासमोर उभं राहून तिने साडीचा पदर खांद्यावरुन टाकला. "कशी दिसतेय मी...?" तिने स्वतःच्याच आरशातल्या प्रतिमेला विचारलं. तिला तिच्या मागून प्रतिकचा आवाज आला, "अं हं, दुसरी बघू..." प्रतिकला पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने मग जांभळ्या रंगाची साडी हातात घेतली आणि तिचा पदर खांद्यावर टाकत प्रतिककडे पुन्हा पाहिलं. प्रतिकने मानेनेच नकार दिला आणि बेडवर ठेवलेली हिरव्या रंगाची, सोनेरी-गुलाबी रंगाची बॉर्डर असलेली साडी उचलली आणि तिच्या खांद्यावर त्या साडीचा पदर लावत म्हणाला, ही नेस.... मला आवडेल तुला पूजेला या साडीत पहायला... तो हळूच तिच्या कानात म्हणाला. तिने लाजून मान खाली घातली आणि पुन्हा त्याच्याकडे पाहण्यासाठी मान वर केली तर प्रतिक समोर नव्हता. तिने रुममध्ये एकवार पाहिलं. तो कुठेच नव्हता. म्हणजे मला प्रतिक इथे असल्याचा भास झाला तर... ती डोक्यावर टपली मारत साडी बेडवर ठेवत ब्रश घेऊन अंघोळीला निघून गेली.

***

थोड्या वेळाने प्रतिक त्याची तयारी करायला त्याच्या रुममध्ये आला. दरवाजा उघडाच असल्याने त्याने रुममध्ये आधी डोकावून पाहिलं. त्याच्या लक्षात आलं की प्रेरणा अंघोळीला गेली आहे. चला, तोपर्यंत थोडा वेळ एक झोप काढू म्हणत तो बेडवर पडून राहिला. प्रेरणा नाईट गाऊन घालून बाथरूममधून केस पुसत बाहेर आली. बेडवर झोपलेला प्रतिक म्हणजे पुन्हा आपला भासच आहे असं वाटून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आरशातल्या प्रतिकच्या भासाकडे पाहत म्हणाली, आज मला वाटतं, सगळीकडे तुमचाच भास होणार आहे. तिच्या आवाजाने प्रतिकला जाग आली. ओह, म्हणजे मॅडमना मी समोर असूनही भासच आहे असं वाटत आहे तर... तो तिच्याकडे पाहून हसला. 

प्रेरणा: (बेडवरुन तिच्याकडे पाहत असलेल्या प्रतिकला म्हणाली) आता हसायला काय झालं... माहीत आहे मला... मला दिवसाढवळ्या तुम्ही असल्याचे भास होत आहेत. आता मी लक्षच देणार नाही तुमच्याकडे... तिने तिचा चेहरा दुसऱ्या दिशेला वळवला.

ओह, आता असं करणार तर तू... प्रतिक स्वतःशीच बोलत बेडवरुन उठला आणि तिच्यामागे उभा राहिला.

प्रेरणा: हे बरंय, लक्ष देणार नाही म्हंटलं तसं आता माझ्या मागे येऊन उभे राहिलात. जा नाही देत मी लक्ष तुमच्याकडे.

प्रतिकला तिचं बोलणं ऐकून हसू आलं. तो हळूच तिच्या कानाकडे येऊन म्हणाला, खरंच लक्ष देणार नाही आहेस माझ्याकडे...?

प्रेरणा: नाही बिलकुल नाही...

प्रतिक: बरं तर मग... म्हणत त्याने तिला जवळ ओढलं. हा आपला भासच आहे असं वाटत तिने घट्ट डोळे बंद केले. प्रतिक तिला जवळ घेऊन तिचा चेहरा न्याहाळू लागला.

प्रतिक: खरंच उघडणार नाही आहेस का डोळे...

प्रेरणा: नाही... तुम्ही निघून जात नाही तोपर्यंत नाही.

प्रतिक: अच्छा, पण पूजेला बिना अंघोळीच बसू देणार नाही घरी त्याचं काय....?

प्रेरणाने त्याचं बोलणं ऐकून हळूच डोळे उघडले. काय खरं काय खोटं तिला काहीच समजेना.

प्रतिकने अजून तिला स्वतःच्या जवळ ओढत विचारलं, अजूनही मी तुला भासच वाटतो आहे का...? ठीक आहे तर मग... घे चिमटा काढ मला. प्रेरणाने त्याच्या सांगण्याप्रमाणे तो भासच असावा असं समजून त्याला जोरात हाताला चिमटा काढला. प्रतिक तिच्या जोरदार काढलेल्या चिमट्याने कळवळला.. "आई ग..." इतकं जोरात कोण काढतो का चिमटा...?

प्रेरणा: (प्रेरणाने त्याचा हात हातात घेतला) सॉरी सॉरी, मला वाटलं नव्हतं तुम्ही खरंच इथे आहात ते.... (फुंकर मारत) खूप दुखतंय का...?

प्रतिक: तू प्रेमाने फुंकर घातली ना... मग आता नाही दुखत...

प्रेरणाने लगेच फुंकर मारणं बंद केलं.

प्रतिक: (केविलवाणा चेहरा करत) अग अजून दुखतंय मला...

प्रेरणा: हो का... जावा बघू आधी अंघोळीला... आपल्याला पूजेला ही बसायचं आहे. तिने प्रतिकला जबरदस्तीने अंघोळीला पाठवलं. प्रतिकची अंघोळ होईपर्यंत ती पटकन साडी नेसून किचनमध्ये काही मदत करायची आहे का बघायला गेली.

***

प्रेरणा: (नंदाला) आई, काही करायचं आहे का...? मला सांगा मी करते.

नंदा: अग झालंच आहे सगळं... पूजेचा प्रसाद ही भटजी येईपर्यंत होऊन जाईल. तू प्रतिकची तयारी झाली की नाही एकदा बघून ये...

प्रेरणा: हो आई, ते अंघोळीलाच गेले आहेत.

नंदा: बरं, मग तू तुझी तयारी करून घे... ( सोनाला आवाज देत) सोना, प्रेरणाला घेऊन जा... आणि तिला तयार व्हायला मदत कर.

प्रेरणा: पण आई, मी साडी नेसून तयार आहे.

नंदा: हो हो, सोना येऊ दे... मग बघ ती तुला कशी तयार करते ते... (नंदा प्रसाद बनवता बनवता म्हणाल्या)

सोना: आई, बोलवलं तू...

नंदा: हो, प्रेरणाला मस्त पैकी तयार कर पूजेसाठी...

सोना: येस बॉस... म्हणत ती प्रेरणाला स्वतःच्या रुममध्ये घेऊन गेली.

***

काही वेळाने भटजी पूजेसाठी घरी आले. प्रतिक सदरा पाजयमा घालून तयार होऊन आला. प्रेरणाला प्रतिक बरोबर न पाहून आजीने नंदाला आवाज दिला. तशी मागोमाग सोना प्रेरणाला घेऊन आली. " हे काय आजी, आम्ही आलो", सोना म्हणाली. प्रतिकने मागे वळून पाहिलं. हिरव्या रंगाची साडी, कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्राबरोबर ठुशी, डोळ्यात काजळ, गालांवर लाली... हातातल्या हिरव्या बांगड्यांचा होणारा आवाज... तिला पाहून प्रतिकची नजर तिच्यावरुन हटेना. सोना तिला घेऊन त्याच्या जवळ आली आणि चुटकी वाजवून त्याला भानावर आणलं.

सोना: बसत आहात ना पूजेला...?

प्रतिक: (काहीच झालं नाही या आविर्भावात) हो हो बसतोय...

दोघेही सत्यनारायणच्या पूजेला बसले. काही वेळाने पूजा शास्त्रोक्त पद्धतीने पार पडली. दोघांनी सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेतला आणि भटजींना त्यांची दक्षिणा देऊन दोघेही त्यांच्या पाया पडले. दोघांनी मिळून सगळ्यांना पूजेसाठी केलेला प्रसाद दिला. संध्याकाळी प्रेरणाचे आईबाबा, विवेक आणि मालगुडे फॅमिली ही पूजेसाठी प्रतिकच्या घरी आले. प्रेरणा तिच्या माहेरच्या माणसांना भेटून खूप इमोशनल झाली. सगळ्यांशी तिला खूप काही बोलायचं होतं पण असं सगळ्यांच्या समोर कसं बोलू हे ही तिला कळेना. प्रतिकला सांगावं तर तो त्याच्या भावंडांशी गप्पा मारत होता. तिला काय करावं सुचेना. तिला असं पाहून नंदाला नेमकं तिच्या मनात काय चाललं आहे लक्षात आलं. तिने प्रेरणाला सरबत बनवण्यासाठी किचनमध्ये पाठवलं आणि तिच्या माहेरच्या मंडळीशी बोलून त्यांना प्रतिकच्या रुममध्ये पाठवून त्या प्रेरणाच्या मागोमाग किचनमध्ये गेल्या.

नंदा: प्रेरणा, झालं का सरबत बनवून...?

प्रेरणा: हो आई, आणतच होते बाहेर...

नंदा: बाहेर नको नेऊस, तुमच्या रुममध्ये ने... आणि तिथे थोडा वेळ बस... आणि जे पूजेसाठी आले आहेत त्यांच्या बरोबर गप्पा मार... त्यांना पण बरं वाटेल.

प्रेरणा: पण आई, इकडे तुम्हाला काही मदत हवी असेल तर...?

नंदा: मला काही मदत नको आहे... इतके नातेवाईक आहेत घरात कोणी ना कोणी करेलच की मदत... तू आधी हे सरबत घेऊन जा बघू...

नंदाने सांगितल्या प्रमाणे प्रेरणा सरबत घेऊन त्यांच्या रुमच्या दिशेने जाऊ लागली. असं कसं मी पटकन अनोळखी लोकांशी बोलू... मला खरंच काही समजत नाही आहे... मनात विचार करत करत तिने रूमचा दरवाजा हळूच उघडला. रुममध्ये आपल्या फॅमिलीला, मालगुडे फॅमिलीला पाहून ती खूप खूश झाली. तिला प्रतिकच्या आईने न सांगता समजून घेतलं या गोष्टीचा खूप आनंद झाला. तिने सगळ्यांना सरबत दिलं आणि आईबाबांशी, विवेकशी आणि मालगुडे फॅमिलीशी मनसोक्त गप्पा मारल्या. गप्पांच्या नादात तिला एक तास कधी होऊन गेला याचं भानही राहिलं नाही. काही वेळाने प्रतिक प्रेरणाला शोधत शोधत नंदापाशी आला.

प्रतिक: आई, प्रेरणा कुठे आहे...?

नंदा: अरे, तिचे आईबाबा आले ना म्हणून मीच तिला त्यांच्याशी गप्पा मारायला तुमच्या रुममध्ये पाठवलं. 

प्रतिक: अग हो, मला त्यांच्याशी बोलताच आलं नाही.

नंदा: अरे मग जा ना... बोल त्यांच्याशी... आणि प्रतिक आणखी एक गोष्ट जसं बायकोने लग्नानंतर नवऱ्याच्या आईबाबांची तिच्या आईबाबांसारखी काळजी घ्यावी असं नवऱ्याचं म्हणणं असतं तसंच मत बायकोचं ही असतं. पण प्रत्येक वेळी बायकोला हे बोलणं शक्य नसतं. ती या गोष्टी बऱ्याचदा मनातच ठेवते आणि या गोष्टी जो नवरा समजून घेतो तोच खऱ्या अर्थाने त्याच्या बायकोला सुखी ठेवू शकतो.

प्रतिक: (आईला मिठी मारत) आई, मला समजलं तुला काय म्हणायचं आहे ते... मी प्रेरणाच्या मनाला नक्कीच समजून घेईन.

नंदा: जा बघू आता... मी आणि तुझे बाबा पण येतो थोड्या वेळात त्यांच्याशी बोलायला.

प्रतिक: हो आई जातो... म्हणत तो त्याच्या रुममध्ये गेला.

***

प्रतिकने त्याच्या रूमचा उघडाच असलेला दरवाजा ठकठकवला.

प्रतिक: येऊ का आत...

मि प्रधान: या ना जावईबापू, परवानगी कसली मागत आहात... तुम्ही असं बोलून आम्हाला लाजवत आहात.

प्रतिक: (आतमध्ये येत) नाही हो बाबा... (त्यांच्या बाजूला बसत) आणि आधी मला ते जावईबापू वगैरे म्हणणं बंद करा बघू...

मिसेस प्रधान: पण जावई बापू, तो तुमचा मान आहे...

प्रतिक: आई, तुम्हाला तुमच्या जावयाचा मानच ठेवायचा आहे ना... तर मी सांगेन ती गोष्ट कराल का...?

प्रतिकचं बोलणं ऐकून तो काय बोलतोय याच विचारात प्रेरणासकट सगळेजण पडले.

मिसेस प्रधान: बोला ना... जावईबापू...

प्रतिक: आई, यापुढे तुम्ही आणि बाबांनी मला नावानेच हाक मारायची. मी तुम्हाला मुलासारखाच आहे ना...! मग हे असं जावईबापू बोलून मला तुमच्या सगळ्यांपासून परकं करु नका.

प्रतिकचं बोलणं ऐकून प्रधान फॅमिली आणि मालगुडे फॅमिली सगळ्यांनाच प्रेरणाच्या पसंतीवर अभिमान वाटला. कोणी काही बोलेना हे पाहून प्रतिकने पुन्हा त्यांना म्हणाला, " कराल ना, तुमच्या या मुलाची इच्छा पूर्ण...?"

प्रतिकचं बोलणं ऐकून मि प्रधान त्याला उराशी कवटाळत म्हणाले, "आज खऱ्या अर्थाने माझी माझ्या लेकीबद्दलची चिंता मिटली.."

त्यांचं बोलणं चालू असतानाच प्रतिकचे आईबाबा आले.

मिलिंद: चला जेवायला... सगळ्यांनी मिळूनच जेवू...

मि प्रधान: नको नको मिलिंदराव, लेकीच्या सासरी जेवणं योग्य नाही.

मिलिंद: तुम्ही कोणत्या जुन्या रीती घेऊन बसला आहात... प्रधान साहेब...

मालगुडे: नको नको, तुम्ही बोललात यातच आम्ही भरुन पावलो.

मिलिंद: प्रतिक तूच सांग बघू आता त्यांना...

प्रतिक: आईबाबा, काकी काका, तुम्ही तुमच्या या मुलाच्या ही घरी जेवणार नाहीत का...?

मिसेस प्रधान: नको नको, आजी काय म्हणतील.

तोपर्यंत आजी ही मागोमाग आल्या.

आजी: काहीही म्हणायची नाही ही आजी... चला बघू सगळ्यांनी जेवायला... आता माझं बोलणं तर तुम्हाला ऐकावंच लागेल.

आजी सगळ्यांना जबरदस्तीने लिविंग रुममध्ये फक्त घेऊन नाही आली तर त्यांना जेवायला ही भाग पाडलं. मालगुडे आणि प्रधान फॅमिलीचं जेवून झालं तसं ते आजी आणि सगळ्यांचा निरोप घेऊन घरी जायला निघाले.

***

पूजा पार पडल्याने रात्री प्रेरणा बरोबर प्रतिक ही झोपायला रुम मध्ये आला होता. दोघेही बेडवर शांतपणे पडून होते.

प्रतिक: (तिचा हात हातात घेऊन) मग मिसेस प्रतिक राजाध्यक्ष, कसा होता आजचा दिवस...

प्रेरणा: (त्याच्या मिठीत जात) खूप छान... (पुढे काही न बोलता ती प्रतिकच्या टीशर्ट वरुन नुसतंच बोट गोल गोल फिरवत राहिली)

प्रतिक: (तिला असं करताना पाहून त्याने तिच्या केसांवरून हात फिरवत विचारलं) बोल ना काय बोलायचंय...?

प्रेरणाने तिचं गोल गोल फिरवणार बोट थांबवत विचारलं, "तुम्हाला कसं कळलं, मला काही बोलायचंय ते...?"

प्रतिक: (तिला अजून जवळ घेत) बोल ना काय बोलायचंय...?

प्रेरणा: प्रतिक, तुम्ही माझ्या आईबाबांशी आज जसं बोललात ते पाहून मला खरंच खूप छान वाटलं. तुम्ही खूप समजून घेतलं त्यांना...

प्रतिक: (तिच्या ओठांवर बोट ठेवत) अं हं, ते आता फक्त तुझे आईबाबा नाहीत ते आता माझे ही आईबाबा आहेत... जसं तू या घराला आपलं मानलं तसंच मी ही मानलं तुझ्या घराला आपलं...

प्रेरणा: प्रतिक... म्हणत ती प्रतिकला बिलगली.

प्रतिक: मी काय म्हणतोय प्रेरणा, आता अजून काही दिवस आपलं कुलदेवतेचं दर्शन आणि अजून काही रीती रिवाज करण्यात जातील मग त्यानंतर आपण कुठे जायचं... हनिमूनला...?

प्रेरणा त्याचा प्रश्न ऐकून लाजली.

प्रतिक: बोल ना... 

प्रेरणा: प्रतिक, झोपा बघू, उद्या जायचं आहे ना आपल्याला दर्शनाला...!

प्रतिक: हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे प्रेरणा... सांग ना... (त्याने तिची हनुवटी पकडत विचारलं)

प्रेरणा: तुम्ही म्हणालं तिथे...

प्रतिक: अच्छा... असं आहे तर... म्हणत त्याने तिला जवळ ओढलं आणि तिच्या थरथरणाऱ्या ओठांना आपलंसं केलं.

क्रमशः

🎭 Series Post

View all