Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-७४

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-७४
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-७४


प्रतिक, राजीवच्या घरी सगळे तयारीला लागले होते. प्रतिक, राजीव अजूनही झोपलेलेच होते. राजन, सुमित दोघे त्यांना एकदा आवाज देऊन त्यांच्या त्यांच्या तयारीला लागले होते. "अरे, प्रतिक, राजीव कुठे आहेत...नक्की उठले तरी आहेत की नाही...." मिलिंद लग्नासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही याची खात्री करत करत म्हणाले. आजीने लगेच राजन-सुमितला ते कुठे आहेत हे बघायला पाठवलं. दोघांनी सगळीकडे शोधलं पण दोघेही कुठे दिसले नाहीत. मग एकदा टेरेसवर जाऊन बघावं म्हणून दोघे टेरेसवर गेले. त्या दोघांना अजूनही निवांत झोपलेलं पाहून सुमित-राजनने डोक्यावर हात मारला.

सुमित प्रतिकला तर राजन राजीवला झोपेतून उठवू लागले...

राजन: दादा, उठ वाजले बघ किती... मघाशी उठवून गेलो तेव्हा म्हणालास, हा काय जागाच आहे... येतोच आहे... म्हणून आम्ही परत येऊन पाहिलं नाही... 

सुमित: दादा, आज तुमच्या दोघांचं लग्न आहे विसरलात की काय...?

दोघे: काय लग्न.... (दोघेही झोपेतून खाडकन उठले)

प्रतिक: वाजले किती..?

राजन: फक्त एक तास बाकी आहे निघायला..

राजीव:- (डोक्याला हात लावून) आई शप्पथ...

प्रतिक: चल लवकर आता...

राजीव: तुम्ही दोघांनी उठवलं का नाही आम्हाला...

सुमित: घ्या आता... हेच दोघे म्हणाले आम्ही जागेच आहोत... येतोच आहोत... म्हणून आम्ही आमच्या तयारीला लागलो.

प्रतिक: राजीव सोड... चल लवकर... दोघेही पटापट बिछान्यावरुन उठले.

 

दोघेही धावतपळत घरी आले. त्यांनी पटापट अंघोळ आटपली. जो तो आपापल्या तयारीत असल्याने प्रतिक आणि राजीव हे अजून तयार नाहीत हे कोणाच्या लक्षात आलं नाही. सुमितने प्रतिकला तर राजनने राजीवला भरभर तयार व्हायला मदत केली. 

समीर: (दरवाजा ठकठक करत) अरे झाली नाही का तयारी, फोटोग्राफर आला आहे...

राजन-सुमित दोघेही रूममधून बाहेर आले.

समीर: अरे आजचा ज्यांचा दिवस आहे ते दोघे कुठे आहेत...?

सुमित: हे काय...!! म्हणत सुमित-राजन रूमच्या दरवाजातून बाहेर आले. त्यांच्या मागोमाग प्रतिक-राजीव ही आले.

राजीवने पिस्ता रंगाचा कुर्ता आणि त्याखाली शुभ्र रंगाची धोती असा पेहराव केला होता. तर प्रतिकने मरुन रंगाचा कुर्ता आणि त्याखाली सोनेरी रंगाची धोती असा पेहराव केला होता.

समीरने त्या दोघांना बघून एक शिट्टी वाजवली.

समीर: आज काही प्रेरणा, रेखाचं खरं नाही.... 

प्रतिक: काय जीजू... तुम्ही पण...

शिट्टीचा आवाज ऐकून सोना ही तिथे आली.

सोना: ओह हो मेरे दो अनमोल रतन... (म्हणत तिने दोघांना ओढत लिविंग रुममध्ये आणलं)

आजी: नंदा, मालती जरा दोन्ही मुलांची दृष्ट काढा ग...

प्रतिक: आजी, हे काय आता..

आजी: तू गप्प बस... तुला काय करायचं आहे... तुम्ही दोघांनी फक्त शांत उभं रहा आणि त्या दोघींना त्यांचं काम करु दे..

दोघांच्या आईंनी आजींच्या सांगण्याप्रमाणे त्यांची दृष्ट काढली आणि इतका वेळ थांबलेल्या फोटोग्राफरने त्या दोघांचे आणि कुटुंबातील सदस्यांचे असे एकत्र फोटो काढायला सुरवात केली.

***

 

प्रेरणा तयार होऊन घरातील प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वस्तूला हात लावून डोळ्यात, स्पर्शात माहेरच्या घरची आठवण जपत होती. अपार्टमेंटच्या कॉमन बाल्कनी मध्ये शांत उभी राहून कसला तरी विचार करत होती. विचार करता करता अचानक तिच्या चेहऱ्यावर हसू आलं.

आई तिला शोधत शोधत बाल्कनी पाशी आली. पिवळ्या रंगाच्या नऊवारी मध्ये प्रेरणा खूपच सुंदर दिसत होती. आपली लेक आता सासरी जाणार... या वास्तवाने प्रेरणाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. आपल्या आईच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून प्रेरणा भानावर आली.

प्रेरणा: (तिचे डोळे पुसत) काय झालं आई, तुझ्या डोळ्यांत पाणी...?

आई: काही नाही ग... इतके दिवस लेक लग्न करून सासरी जाणार म्हणून खूश होते आणि आता अचानक असं वाटू लागलं.. आपली लेक आता फक्त आपली लेक नसणार... ती आता एका घरची सून होणार... तुझ्या आईबाबांना विसरुन तर नाही ना जाणार बाळा...?

प्रेरणा: (आईला रडत मिठी मारून) आई... मी कुठेही असले तरी मी माझ्या आई बाबांना कसं विसरु शकते...

आई: (तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत) छे बाई, मी उगाच तुला नको ते विचारत बसले आणि तुझ्या डोळ्यात माझ्यामुळे पाणी आलं. चल लवकर आता... निघायचं आहे आपल्याला.

प्रेरणा: हो आई म्हणत पुन्हा एकदा आईला बिलगली. विवेक आणि बाबाना सुद्धा त्या दोघींना असं पाहून भरुन आलं. तेवढ्यात तिथे शांततेचा भंग करायला मीना हजर झाली.

मीना:(दोन्ही हात कमरेवर ठेवत) काय प्रेरणा हे... आतापासून रडायला सुरवात झाली तुझी.. ये देख आज तेरी शादी है, और ऐसा अभी से रोना स्टार्ट करेगी तो कैसे चलेगा...? ए समिधा घेऊन ये ग त्या फोटोग्राफरला... "आज मौका भी है, हम आए भी है तो क्यूँ ना इस दिन को यादगार बना दिया जाए...!!"

तोपर्यंत समिधा फोटोग्राफरला घेऊन आली. मीनाने लगेच फोटोग्राफरला प्रेरणाचे सिंगल आणि तिच्या फॅमिली बरोबर असे वेगवेगळ्या प्रकारे फोटो काढायला लावले. तोपर्यंत समिधा मालगुडे फॅमिलीला ही प्रेरणाबरोबर फोटो काढण्यासाठी बोलवून घेऊन आली. फोटोग्राफरने मालगुडे फॅमिलीचे ही तिच्या बरोबर काही फोटोज काढले. मग मीना आणि समिधाने ही तिच्या बरोबर फोटो काढून घेतले.

समिधा: मीना बघ, प्रेरणा मॅडमचा चेहरा बघ किती खुलला आहे.

मीना: मग काय, आजचा दिवस आहेच मुळी खास... हो की नाही प्रेरणा !

प्रेरणा तिचं बोलणं ऐकून लाजून हसली. फोटोग्राफरने लगेच तिचा एक तशा पोज मध्ये फोटो काढला.

***

 

आनंद यांनी कार अपार्टमेंटपाशी आणली आणि सगळ्यांना कॉल करुन पटापट खाली यायला सांगितलं. सगळेजण हळूहळू खाली उतरले. काहीजण एका कार मध्ये तर काहीजण दुसऱ्या कारमध्ये बसून हॉलमधली तयारी करण्यासाठी पुढे गेले.  आनंद यांना नेमकं आपण काहीतरी विसरल्याच आठवलं म्हणून ते पुन्हा घरी आले. फोटोग्राफर दरवाजापाशी रेखाला उभं राहायला सांगून तिचे फोटो काढत होता. जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडी मध्ये लग्नासाठी तयार झालेलं आपल्या लेकीला बघून आनंद तिथेच थांबले. तोपर्यंत फोटोग्राफरने त्याच रेखाचे फोटो काढण्याचं काम पूर्ण केलं होतं.

रेखा: बाबा, काय झालं... असं काय बघताय...?

आनंद: माझी लेक इतकी लवकर मोठी झाली... की आज तिच्या आयुष्यातला लग्नाचा खास दिवस आला आहे... बोलता बोलता त्यांचे डोळे पाणावले.

रेखा: (बाबांना मिठी मारून) बाबा, तुम्ही रडायला लागलात तर माझ्या पण डोळ्यात पाणी येणार... हसा बघू आधी... (बाबांचे डोळे पुसत ती म्हणाली)

रेखाचे बाबा लेकीचं बोलणं ऐकून हसले. तिने लगेच तिच्या आईबाबांबरोबर आणि भावा बरोबर एक फॅमिली फोटो काढून घेतला.

***

 

चला चला मुलीला बोलवा... भटजींनी मुलीकडच्यांना आवाज दिला. प्रतिक आणि राजीव यांना अंतरपाट कधी काढत आहेत आणि प्रेरणा, रेखा यांना पाहतोय असं झालं होतं. भटजींनी मंगलाष्टके म्हणायला सुरवात केली. राजीव रेखाला पाय उंच करुन पाहण्याचा प्रयत्न करु लागला... भटजींनी लगेच त्याच्याकडे डोळ्याने इशारा करत अंतरपाट अजून वर घेतला. प्रतिकने त्याला थोडा शांत रहा म्हणून इशारा केला. राजीवच्या अशा वागण्याने रेखाने कसंबसं स्वतःच हसू थांबवलं. जसजसे भटजी मंगलाष्टके म्हणत होते तसतसं प्रेरणाच्या हृदयाची धडधड वाढू लागली. शुभमंगल सावधान म्हणताक्षणी दोन्ही जोडप्यांच्या मधला अंतरपाट दूर झाला. चौघांवर ही अक्षतांचा, वर्षाव झाला. प्रतिकने प्रेरणाच्या तर राजीवने रेखाच्या गळ्यात वरमाला घातली. आता वरमाला घालायची वेळ होती प्रेरणा आणि रेखाची. राजीव आणि प्रतिकच्या भावंडांनी लगेच दोघांना उचलून घेतलं. मग मुलींकडचे ही काही कमी नाही या थाटात रेखा-प्रेरणाच्या काका- मामांनी त्या दोघींना ही उचलून घेतलं आणि दोघींनी प्रतिक-राजीवच्या गळयात वरमाला घातली. तसं दोन्ही कडच्या मंडळींनी त्यांना खाली उतरवलं. फोटोग्राफरचं न सांगता फोटो काढायचं आणि व्हिडिओग्राफरचं व्हिडिओ काढण्याचं काम चालूच होतं.

***

 

आपल्या लाडक्या मुलीचा हात जावयाच्या हाती देताना प्रेरणा-रेखा दोघींचे आईबाबा भावूक झाले होते. प्रतिक,राजीवने त्यांना डोळ्यांनीच तुमची मुलगी ही माझं यापुढे सर्वस्व असेल... याची न बोलता कबूली दिली. भटजी रिवाजाप्रमाणे सगळ्या गोष्टी दोन्ही जोडप्यांकडून करुन घेत होते. त्यांनी सांगितल्या प्रमाणे प्रतिकने प्रेरणाच्या तर राजीवने रेखाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं... दोघींच्या भांगात कुंकू लावलं. प्रेरणा आता खऱ्या अर्थाने मिसेस प्रतिक तर रेखा मिसेस राजीव झाली होती.

फोटोग्राफरने त्यांचे वेगवेगळ्या अँगलने फोटो घेतले. सप्तपदी घेऊन झाल्यावर चौघेही आधी आजींच्या आणि नंतर आपल्या आईबाबांच्या पाया पडले. लग्नासाठी आलेल्या सगळ्या नातेवाईकांना त्यांनी स्टेजवरुनच हात जोडून अभिवादन केलं तसं सोनाने लगेच त्यांना रिसेप्शनसाठी तयार होऊन यायला सांगितलं. लग्नासाठी आलेली काही मंडळी जेवणाच्या रांगेत तर जेवून आलेली काही मंडळी रिसेप्शनसाठी थांबले होते. चौघांचे आईबाबा सगळं व्यवस्थित पार पडत आहे ना याची खात्री करून घेत होते. 

***

 

सुमितने आपल्या आईबाबांना लीनाबद्दल सांगितलं. त्यांनाही आपल्या मुलाची पसंत आवडली. सुमितच्या बाबांनी मग राजीवच्या बाबांशी बोलून रेखाच्या बाबांकडे म्हणजे आनंद यांच्याकडे लीनाच्या आईबाबांची चौकशी केली. लीनाला स्थळ आलं आहे हे ऐकून आनंद खुश झाले आणि त्यांनी लीनाच्या आईबाबांशी त्यांची ओळख करुन दिली. लीनाची पसंती असेल तर आमचा या लग्नाला होकार आहे.... म्हणत लीना आणि सुमितला एकमेकांशी बोलण्यासाठी दोघांच्या आईबाबांनी वेळ घ्यायला सांगितला. दोघांनी त्यांना हवा असलेला वेळ घेतला आणि एकमेकांची पसंती असल्याचं आपापल्या आईबाबांना सांगितलं. हे ऐकून दोन्हीकडची मंडळी आनंदित झाली. दोन्ही फॅमिलीचं एकमेकांशी बोलणं चालू असतानाच राजनचे आईबाबा ही राजीवच्या बाबांबरोबर टीना-लीनाच्या आईबाबांकडे टीनासाठी बोलायला आले. दोघांच्या आईबाबांनी त्या दोघांनाही त्यांचा त्यांचा वेळ घ्यायला देऊन त्यांचा निर्णय घेऊ दिला. टीना-लीनाच्या बाबांनी आपल्या दोन्ही मुलीचं लग्न ठरलं या आनंदात रेखाच्या बाबांना गळाभेट केली. त्यांना आता आनंद यांनी बोललेलं बोलणं खरं ठरल्याचं जाणवलं. टीना-लीना, सुमित-राजनही आपण प्रेमात पडलेल्या व्यक्तीलाच आपला आयुष्याचा जोडीदार होताना पाहून खूश झाले.

***

 

फोटोग्राफरने हॉलच्या बाजूलाच असलेल्या गार्डनमध्ये रेखा-राजीवचे काही फोटो काढले. रेखाने गडद गुलाबी रंगाचा लेहेंगा तर राजीवने फिकट गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती. राजीव तिला पाहून हरकून गेला आणि रेखाने त्याला असं तिला पाहताना बघून लाजून मान खाली घातली. 

दोघांचं फोटोसेशन झाल्यावर राजीव-रेखाने हॉलच्या एका स्टेजवर एन्ट्री केली. नातेवाईकांनी त्यांच्या एन्ट्रीवर टाळ्या वाजवल्या. फोटोग्राफरने त्यांचे काही स्टेजवर फोटो काढल्यावर राजीव-रेखाच्या रिसेप्शनला सुरवात झाली.

***

 

आता एन्ट्री होती प्रतिक-प्रेरणाची. प्रेरणाने गडद लाल रंगाचा लेहेंगा तर प्रतिकने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती. फोटोग्राफरने प्रेरणाला थोडं खाली पायऱ्यावर उभं राहायला सांगून आणि प्रतिकला तिचा हात हातात घेऊन वेगवेगळ्या अँगलने फोटो काढले. फोटोसेशननंतर त्यांचं ही हॉलच्या दुसऱ्या स्टेजवर रिसेप्शनला सुरवात झाली.

***

 

रिसेप्शन झाल्यावर चौघांना ही जेवताना सोना-समीरने जबरदस्तीने उखाणा घेऊन एकमेकांना स्वीट्स भरवायला सांगितलं. प्रतिक-राजीव दोघांनी उखाण्याची काहीच तयारी केली नसल्याने नेमक्या वेळी त्यांना हळूच सोनापासून लपवून गुगलची मदत घ्यावी लागली. सोनाला दोघेही किती घाबरतात हे पाहून रेखा-प्रेरणा यांना हसू आवरेना. त्यांचं हसणं सोनाच्या लक्षात येऊ नये म्हणून राजीव-प्रतिकने दोघींच्या तोंडात गुलाबजामुन टाकला. हसतखेळत चौघांचा ही जेवणाचा कार्यक्रम आटपला.

***

 

प्रेरणा आणि रेखाच्या पाठवणीला दोघांच्या आईबाबा, भाऊ, आणि इतर नातेवाईकांचा कंठ दाटून आला होता. प्रेरणा-रेखाला ही अश्रू अनावर झाले. मालगुडे काकी-काकांना, आदीला ही अश्रू अनावर झाले. अनू आणि प्रेरणाने गळाभेट करुन अश्रूंना वाट मोकळी केली. क्षणच असा होता की सगळेच जण खूप भावूक झाले होते. दोघींचे बाबा प्रतिक, राजीवचा हात हातात घेत म्हणाले, आमच्या लेकीचं काही चुकलं तर तिला समजून घ्या. तिच्या सुखदुःखात सदैव साथ द्या. आपल्या वडिलांना असं बोलताना ऐकून प्रेरणाला अजूनच रडू येऊ लागलं. तसं प्रतिकने तिला लगेच स्वतःच्या हातांचा हिंदोळा करुन उचलून घेतलं.

प्रेरणा: प्रतिक, सोडा मला... कोणी काय म्हणेल...!!

प्रतिक: अं हं, मी तुला म्हणालो होतो, तुझ्या डोळ्यात मला पाणी दिसलं तर मी तुला असंच उचलून घेणार... सो घेतलं तुला उचलून...

प्रतिकचं बोलणं ऐकून प्रेरणाने लाजून तिचा चेहरा लपवला. प्रतिकला पाहून राजीवने ही रेखाला उचललं. फोटोग्राफरने चौघांचे ही त्या पोज मध्ये फोटो घेतले. सगळ्या नातेवाईकांच्या दोन्ही जावयाच्या अशा कृतीने आता हसू उमटलं होतं.

***

 

रेखा आणि प्रेरणाचा त्यांच्या त्यांच्या सासरी गृहप्रवेश झाला. सोना, सुमित आणि राजनने पुन्हा चौघांना उखाणा घ्यायला भाग पाडले. यावेळी मात्र कारमध्ये प्रतिक, राजीवने आधीच एक उखाणा पाठ करून ठेवल्याने तो नेमका यावेळी उपयोगी पडला.  गृहप्रवेश झाल्यावर करायच्या सगळ्या रीती यथासांग पार पडल्या.

***

 

रात्री जेवणाचा कार्यक्रम झाल्यावर प्रेरणा एकटीच त्यांच्या खोलीत खिडकीतून चंद्र पाहत होती. ती चंद्राला पाहण्यात इतकी गुंग झाली होती की तिला प्रतिक तिच्या समोर कधी येऊन उभा राहिला हे ही लक्षात नाही आलं.

प्रतिक: चंद्राला बघतेय...?

प्रेरणाने चमकून आवाजाच्या दिशेने पाहिलं.

प्रेरणा: तुम्ही कधी आलात...?

प्रतिक: जेव्हा तू त्या चंद्राकडे पाहण्यात हरवून गेली होती.

त्याचं बोलणं ऐकून प्रेरणाचे गाल लाजून गुलाबी झाले.

प्रेरणा: (त्याला एकटक तिच्याकडे पाहताना बघून) प्रतिक, तुम्ही असं का बघताय माझ्याकडे...?

प्रतिक: मी माझ्या चांदणीला बघतोय...

प्रेरणा त्याचं बोलणं ऐकून पुन्हा लाजली. प्रतिकने तिची हनुवटी वर केली. तिने डोळे मिटून घेतले. प्रतिक तिच्या मनातले भाव समजून गेला. त्याने तिला हळूच स्वतः जवळ ओढले. तिच्या कपाळावर आणि मग गालांवर ओठ टेकवले. प्रतिकच्या कृतीने तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली. मग त्याने हसून हळूच तिच्या कानात गुड नाईट म्हटले आणि तो तिच्या पासून दूर झाला. प्रेरणाने बंद केलेले डोळे उघडले. प्रतिकला उशी, चादर घेताना पाहून तिला त्याचं काय चालू आहे ते कळेना. तिने न राहवून त्याला विचारलं.

प्रेरणा: प्रतिक, तुम्ही काय करताय...?

प्रतिक: काय करतोय म्हणजे... झोपायला जातोय...

प्रेरणा: कुठे...? आणि मी इथे एकटी झोपणार का...?

प्रतिक: मी समीर जीजूंबरोबर झोपायला जातोय. जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत मी इथे झोपू शकत नाही.

प्रेरणा: पण मी एकटी नाही झोपू शकत तुम्हाला माहित आहे ना...!

प्रतिक तिच्याजवळ आला आणि तिचा चेहरा त्याच्या हाताच्या ओंजळीत पकडून म्हणाला, "माहीत आहे मला म्हणूनच सोना दीदी तुझ्या बरोबर झोपायला येते आहे.... सो काळजी करु नकोस..." प्रतिकचं बोलणं ऐकून प्रेरणाला जाणवलं की प्रतिक तिची किती काळजी घेतो ते.. दोघेही एकमेकांना किती तरी वेळ असेच पाहत होते. तेवढ्यात सोनाने त्यांच्या रूमचा दरवाजा ठकठक केला. प्रतिकने दरवाजा उघडून सोनाला रुममध्ये घेतलं आणि दोघीना गुड नाईट बोलून तो समीर जीजूंबरोबर झोपायला निघून गेला.

 

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...