अस्तित्व एक संघर्ष-भाग-७०

It is a story of a girl who faced such a situation where she totally destroyed and at one point she fight for her identity.

अस्तित्व एक संघर्ष

भाग-७०


प्रतिकने प्रेरणाला 2 दिवसांत नक्की मुंबईला येईन असं कबूल केल्यावरच प्रेरणा राजीव बरोबर मुंबईला जायला तयार झाली. सुरेश सामंत सर प्रतिक बरोबरच मदत करायला थांबले. दोघांनी न विसरता PI नायर आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. घोटाळ्याचा खरा सूत्रधार कळल्यामुळे सुरेश सर आणि प्रतिक थोडे रिलॅक्स होऊन ऑफिस मध्ये आले. सुरेश सरांनी सुब्रमण्यम आणि शेट्टी यांची आतापर्यंतची कामातली मेहनत आणि कंपनीमधला घोटाळा शोधण्यासाठी त्यांनी केलेली मदत पाहून दोघांना मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर म्हणून प्रमोशन दिलं. 2 दिवसांत ऑफिसच काम आटपून सुरेश सर आणि प्रतिक सर निघत आहे हे कळल्यावर सुब्रमण्यम आणि शेट्टी यांनी त्यांना बेंगलोरचा फेमस असलेला डमरोट हलवा दिला. ते दोघेही त्यांची ती भेट घेऊन मुंबईला येण्यासाठी त्यांचा निरोप घेऊन निघाले.

***

घरी आल्यावर दरवाजातून आत प्रवेश करायच्या आधीच आजीने नंदाला प्रतिकची नजर काढून टाकायला सांगितलं.

नंदाने आजीच्या सांगण्याप्रमाणे प्रतिकची नजर काढून त्याला घरात घेतलं.

प्रतिक: (सोफ्यावर बसत) आजी, हे काय पण काय करायला लावते...

आजी: हे बघ, तुला समजायचं नाही ते... एकतर तिथे जाते वेळी डोक्यात हजार गोष्टींचा विचार करत गेला होतास... त्यात तुला फोन करायची ही सोय नाही. तो पण बिचारा वाजून वाजून थकला असेल... 

प्रतिक: अगं आजी, कामच तसं होतं....

आजी: मग झालं ना आता सगळं काम की अजून काही आहे बाकी...?

प्रतिक: नाही आजी... झालं सगळं... (आईकडे पाहत) आई, ते त्या बॅगेत ऑफिस मधल्यानी स्वीटस दिले आहेत ते घेशील का..? तोपर्यंत मी अंघोळ करुन येतो... म्हणत तो बाथरुम मध्ये निघून गेला.

आजी: नंदा, मी आहे हा देवघरात... माझ्या देवाकडे मी प्रतिकला सुखरुप आण म्हणून प्रार्थना केली होती ते त्याचे आभार मानून येते.

नंदा: बरं आई...

आजीने देवघरात जाऊन गणपतीच्या चरणी नतमस्तक होत त्याचे आभार मानले. आजी प्रार्थना करत असतानाच मागून येत प्रतिकही हात जोडून बसला. आजीने प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहिलं तर प्रतिक डोळे बंद करून बसला होता. त्याचं पाया पडून झाल्यावर त्याने डोळे उघडले. आजी त्याच्याचकडे पाहत होती.

प्रतिक: आजी, अशी काय पाहतेय...?

आजी: बाळा, तुझी खूप धावपळ झाली ना रे तिकडच्या ऑफिस मध्ये...? 

प्रतिक: हो झाली तशी थोडी फार... पण आता पुन्हा पुन्हा जावं लागेल असं वाटत नाही.

आजी: हं ठीक आहे मग...

प्रतिक: (आजीला हात देऊन उठवत) चल नाश्ता करायला जाऊ... म्हणत दोघेही लिविंग रुममध्ये आले. मिलिंद ही तोपर्यंत अंघोळ करुन सोफ्यावर पेपर वाचत बसले होते. नंदा सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन बाहेर आली. सगळ्यांचा नाश्ता झाला तोच सोनाने video कॉल केला.

सोना: Hi, झाला सगळ्यांचा नाश्ता...?

प्रतिक: हो जस्ट झाला...

सोना: ग्रेट... मला तुम्हाला सगळ्यांना एक न्यूज द्यायची आहे... आजी कुठे आहे... दिसत नाही आहे स्क्रीनवर...

नंदा: हां बोल ना सोना... आई आहेत ना...

आजी पण स्क्रीनसमोर येते.

सोना: तो दिल थाम के बैठीए... 

आजी: सोना, तुझं सुरु झालं परत... सांग की एकदाच काय ते...

सोना: हो हो my darling आजी... सांगते सांगते... तर ऐक तुझं प्रमोशन होणार आहे...

आजी: माझं प्रमोशन... म्हणजे म्हणजे...

सोना: yes आजी... तू पणजी होणार आहे... आईबाबा आजी आजोबा होणार आहेत... आणि प्रतिक तू मामा होणार आहे...

आजी: वाह वाह काय गोड बातमी दिली ग... नंदा नातीचं माझ्या तोंड गोड कर ग...

प्रतिक: अग आजी अजून असं video कॉलवर तोंड गोड करायची सोय नाही झाली...

आजी: हो, पण या म्हातारीचं तितकंच समाधान... नंदा आण बरं तू...

नंदाने किचनमध्ये जाऊन लगेच स्वीटस आणलं आणि आजीकडे दिलं.

आजी: सोना, आ कर पाहू...

सोना: (action करत) आ...

आजी: (आजीने ही तिला भरवल्या सारखं केलं) आता एक काम कर, तुझ्या फ्रीजमध्ये तू चॉकलेट्स ठेवते ते घेऊन खा.. 

प्रतिक: आजी, हे तर तू तिला मघाशीही सांगू शकली असती ना...!!

आजी: हो पण मला तिला भरवल्या सारखं वाटायला हवं ना म्हणून मी हे असं केलं. हो ना सोना...!!

सोना: हो आजी... मी लगेच कॉल ठेवला की चॉकलेट खाऊन घेते... म्हणजे तू मला भरवल्या सारखंच होईल.

आजी: बघ प्रतिक, माझ्या नातीला कळली माझी भावना...

प्रतिक: आजी, सोना तुम्ही दोघी म्हणजे impossible आहात...

सोना त्याचं बोलणं ऐकून हसू लागली.

मिलिंद: सोना, बस बस किती हसशील...आता काळजी घ्यायची आहे तुला स्वतःची...

नंदा: आणि काही खावंसं वाटलं तर जावईबापूंना सांग...

सोना: हो हो नक्की नक्की... चला ठेवते मी कॉल... म्हणत सोनाने सगळ्यांना बाय बाय बोलून video कॉल ठेवला. सोनाची गोड बातमी ऐकून सगळेच खूश झाले. माझ्या नातीची काळजी घे म्हणत आजीने देवाचे आभार मानले.

***

प्रेरणा ऑफिस मधलं काम करता करता प्रतिकच्या येण्याची वाट पाहत होती. मीनाला तिला असं दरवाजाकडे टक लावून पाहत असलेलं पाहून हसू आलं.

प्रेरणा: (तिच्याकडे रागाने पाहत) हसतेय कशाला ग...?

मीना: जिनका आप इतनी बेइमताह इंतजार कर रहे हो उनका संदेश आपने देखा नहीं शायद...?

प्रेरणा: काय... कसला संदेश... आणि तुला कसं माहिती संदेश आला ते...

मीना: (हसत हसत) अग सरांनी ग्रुप मध्ये काल मेसेज नाही का केला... की आज ते येणार नाही आहेत म्हणून... आणि आमच्या सगळ्यांबरोबर तू ही त्यावर ओके म्हणून रिप्लाय दिला होता.

प्रेरणा: (डोक्यावर हात लावत) ओह सॉरी विसरले मी...

मीना: (हसत हसत) होतं असं कधी कधी... कोणाला तरी भेटायची इच्छा खूप असेल की...

प्रेरणा: गप्प ग... काम कर लवकर... जायचं आहे ना घरी...

मीना: हो का... मला जायचं आहे का लवकर घरी...!! की कोणाला तरी कोणाला भेटायला जायचं आहे.

प्रेरणा: मार च खाशील बघ हां मीना तू आता... तुला वाटतं तसं काही नाही...

मीना: नाही आहे का तसं काही ठरलं... मग ठरेल ना त्यात काय एवढं... अजून दुपार बाकी आहे मग संध्याकाळ बाकी आहे... 

तेवढ्यात एक कस्टमर मीनाच्या डेस्ककडे आला.

कस्टमर: मॅडम, हे documents बरोबर आहेत का चेक करायचं होतं.

मीना: हां बसा ना... म्हणत मीना त्याचे documents चेक करु लागली. तिचं काम चालू असताना प्रेरणाच्या मोबाईलच्या मेसेजची रिंग बीप झाली. मेसेज वाचून तिने लाजून हसत मीनाकडे पाहिलं. मीनाने काम करता करता तिच्याकडे पाहिलं आणि डोळ्यांनीच आपण बरोबर असल्याचा इशारा देत पुन्हा कामात डोकं खुपसलं. प्रतिकचा संध्याकाळी ऑफिसच्या खाली  येत असल्याचा मेसेज वाचून तिला आता काम कधी एकदा संपवतेय असं झालं. तिने excitement मध्ये भरभर काम करायला सुरुवात केली.

***

संध्याकाळी प्रतिक ऑफिस सुटण्याच्या अर्धा तास आधीच थोडं दूर पार्क करुन कार मध्ये बसून प्रेरणाची वाट पाहत होता. कधी येतेय ही... म्हणत एकदा तो ऑफिस गेटकडे तर एकदा घड्याळाकडे बघत होता. अर्धा-पाऊण तास होऊन गेल्यावर प्रेरणा, मीना, आशिष आणि विवेक त्याला गेटमधून बाहेर पडताना दिसले. प्रेरणाने आधीच विवेकला ती त्याच्या बरोबर येत नसल्याचं सांगितलं असल्याने तो आणि आशिष तिला बाय बोलून घरी जायला निघून गेले. मीना ही अभि आलेला पाहून प्रेरणाला बाय बोलून त्याच्या बाईकवरून निघून गेली. प्रेरणा एकटीच उभी राहून प्रतिक कधी येतोय म्हणून त्याची वाट पाहत होती. तिला असं त्याची वाट पाहत थांबलेलं पाहून प्रतिकला खूप भारी वाटत होतं. त्याने मुद्दाम प्रेरणाला त्रास देण्यासाठी तिला कॉल केला.

प्रेरणा: हॅलो प्रतिक, हां बोला... मी निघाले ऑफिस मधून खालीच थांबले आहे गेटकडे...

प्रतिक: ऐकना प्रेरणा, मी अजून ट्रॅफिक मध्येच अडकलो आहे... मला उशीर होईल...

प्रेरणा: ठीक आहे मी थांबते... 

प्रतिक: ऐकना नको थांबूस... अजून बराच वेळ लागेल ग... तू एक काम कर... आता घरी जा... आपण उद्या जाऊ... ऑफिस मधूनच...

प्रेरणाचा हे ऐकून मूड ऑफ झाला. तिचा पडलेला चेहरा बघून प्रतिकला हसू येऊ लागलं.

प्रतिक: प्रेरणा, ऐकतेय ना... सॉरी खरंच सॉरी...

प्रेरणा: Its ok Pratik... no need to say sorry... आपण जाऊ उद्या... चला ठेवते मी फोन.. म्हणत तिने मोबाईल purse मध्ये ठेवून दिला. स्टेशन ऑफिस पासून जवळ असल्याने तिने स्टेशनच्या दिशेने चालायला सुरवात केली. "ट्रॅफिक मध्ये अडकले म्हणे... माहीत नव्हतं का.... मुंबईचं ट्रॅफिक...? निघायचं होतं ना थोडं लवकर... पण नाही..." असं स्वतःशीच मोठ्याने बोलत ती चालू लागली. ती चालत असतानाच अचानक कोणीतरी मागून तिचा हात ओढला.. घाबरुन तिने मागे वळून पाहिलं... काहीसा घाबरलेला,  काहीसा चिडलेला आणि आश्चर्य सगळे मिश्र भाव तिच्या चेहऱ्यावर तिचा हात पकडून प्रतिक  पाहत होता. तिने कसंबसं स्वतःला सावरलं.

प्रेरणा: प्रतिक हात सोडा बघू...

प्रतिक: अं हं... हा हात सोडण्यासाठी थोडीच पकडला आहे...

प्रेरणा: सोडा म्हणते ना मी... ट्रॅफिक लागलं म्हणे... मग आता कसे आलात... ती रागा रागात त्याला बडबडत होती. आणि तो होता की फक्त तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत होता. त्याला बडबडण्याच्या नादात त्याने हात सोडलेल्याचं ही तिच्या लक्षात नाही आलं. " सोडा म्हणते ना हात..." ती हात तसाच वर पकडून प्रतिककडे पाहत म्हणाली. प्रतिकने काहीही न बोलता हसत हवेत दोन्ही हात त्याचे वर करुन दाखवले. प्रतिकने आपला कधीच सोडला आहे हे पाहून तिला लाजून लाजल्या सारखं झालं. प्रतिक तिच्या कडे हसून पाहत होता. तिने लाजून मान खाली घातली. पण परत तिला आठवलं मघाशी त्यांनी आपल्याला ट्रॅफिक मध्ये अडकल्याचं सांगितलं होतं. ती पुन्हा रागाने निघून जाण्यासाठी वळली. प्रतिकने पटकन तिचा रस्ता अडवत त्याचा एक कान पकडून माफी मागत कारचा दरवाजा उघडून तिला बसायची खूण केली. ती रागातच कारमध्ये window च्या दिशेने तोंड करून बसली. प्रतिकला लक्षात आलं प्रेरणा मॅडम खूपच रागावल्या आहेत. त्याने कारची काच तिचा चेहरा दिसेल अशी adjust केली आणि कार सुरु केली. प्रेरणा त्याच्याकडे काही केल्या बघेना. तो तिला बोलतं करण्यासाठी म्हणू लागला, कोणी तरी रागात अजूनच सुंदर दिसतं... तरी ती काही बोलेना... तसा तो पुन्हा म्हणाला, अग मी खूप आधीच येऊन थांबलो होतो... ते तुझी मस्करी करण्यासाठी मी तसं म्हणालो.

प्रेरणा: हं मग आली ना मज्जा तुम्हाला... तिने पुन्हा विंडो कडे मान वळवली.

प्रतिक: हाय ये गुस्सा... चल आता तुझा मूडच चेंज करतो की नाही बघ... सीट बेल्ट बांध...

प्रेरणा: म्हणजे, कुठे चाललो आहोत आपण... तिने खुणेनेच त्याला विचारलं.

प्रतिक: surprise आहे ते... तू आधी सीटबेल्ट तर बांध...

तिने सीट बेल्ट बांधला. तसा प्रतिकने कारचा थोडा वेग वाढवला. ती विंडो मधून आपण नक्की कुठे जातोय याचा अंदाज घेत होती. कारण प्रतिक तिला विचारुन ही सांगणार नव्हता. आणि तिला प्रतिकचा थोडा राग ही आला होता म्हणून विचारण्याचा ही प्रश्न नव्हता. त्याने कारमधला music system स्टार्ट केला.  ती फक्त डोळे बंद करून गाणं ऐकत होती.. आणि तो तिला अधून मधून काचेतून न्याहाळत कार चालवत होता. अर्धा तास होऊन गेला असेल आणि window मधून पावसाचे थेंब तिच्या चेहऱ्यावर पडू लागले. 

प्रतिक: प्रेरणा, विंडो बंद करून घे... अंगावर पाणी पडत असेल तर...

पण तिच्या कानात त्याचा आवाज जात कुठे होता. ती हातात ते पाण्याचे थेंब पकडण्याचा अट्टाहास करत होती. चला मॅडमचा मूड बदलतो आहे प्रतिक तिला पाहून मनात म्हणाला. त्याने बराच वेळानंतर कार एका ठिकाणी थांबवली. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्यानेही समोर तिला कुठे आलो आहोत हे बघायला सांगितलं. 

प्रेरणा: मरीन ड्राईव्ह... ती अक्षरशः किंचाळत म्हणाली... मी उतरु का कार मधून... प्लीज... तिने त्याच्याकडे डोळे किलकिले करत विचारलं. तो हसला आणि मानेनेच हो म्हणाला. त्याने मागच्या सीटवर ठेवलेली छत्री घेईपर्यंत ती कार मधून उतरून बाहेर ही पडली. प्रतिकने कार लॉक केली आणि तो छत्री घेऊन तिच्या मागे आवाज देत राहिला.... प्रेरणा, थांब छत्री मध्ये ये... भिजू नकोस...

प्रेरणा: तुमची छत्री तुमच्याकडेच ठेवा... पहिल्या पावसात कोणी छत्री घेत का...? बोलताना तिच्या डोळ्यांची होणारी उघडझाप प्रतिकच्या काळजाचा ठाव घेत होती. त्यानेही मग छत्री बंद करुन तिला पावसात भिजण्यासाठी कॉपी केलं. त्यांच्या सारखेच आजूबाजूला बरेच जण पहिल्यावहिल्या पावसाचा आनंद घेत होते.

प्रेरणा: प्रतिक, माझा एक फोटो काढाल का... त्या तिकडच्या दगडावर बसलेला असताना...?

प्रतिक: हो चालेल चल...

प्रतिकचा हात पकडून तिने ठरवलेल्या दगडावर बसून तिने 2-3  फोटो काढले. मग प्रतिकला ही जबरदस्तीने बसवून सेल्फी फोटो काढले. पावसाचा जोर वाढू लागला तसे तिथे फिरणारे पोलीस काका प्रत्येकाला तिकडून निघायला सांगू लागले.

प्रतिक: चल आपण ही निघूया आता... प्रतिक दगडावरुन उठत म्हणाला.

प्रतिकने प्रेरणाला हात देत तिला उठायला मदत केली. दोघेही दगडावरून उतरत रोडवर आले.

प्रेरणा: प्रतिक, ते बघा तिकडे मका भाजत आहेत... चला ना खाऊ...

प्रतिक: हं चल... पण मी असं कधी पावसात मका वगैरे नाही ग खाल्ला.

प्रेरणा: इतकंच ना... आता खाऊ त्यात काय... 

तिने मके भाजणाऱ्याला तिला आवडलेले 2 मके निवडून दिले. आणि मस्तपैकी लिंबू, चाट मसाला वगैरे लावायला सांगितलं. सांगताना तिचे हावभाव पाहून प्रतिकला मोठी गंमत वाटली. असं काय बघताय... प्रेरणाने प्रतिककडे पाहून विचारलं.

प्रतिक: काही नाही... ते तू त्याला काय काय सांगते आहेस ते ऐकत होतो.

मकेवाल्याने मका भाजून झाला तसं प्रेरणा आणि प्रतिककडे दिला.

प्रतिक: (मका खात) सॉलिड गरम आहे ग...

प्रेरणा: (हसत हसत) गरमच मस्त लागतो... पण टेस्ट कशी आहे...

प्रतिक: एकदम मस्त...

दोघांनी हसत हसत मका खाल्ला आणि मकेवाल्याला पैसे देऊन निघाले.

प्रतिक: मग अजूनही राग आहे का माझ्यावर...प्रतिक तिचा हात हातात घेऊन म्हणाला. त्याच बोलणं ऐकून प्रेरणा त्याच्याकडे पाहून हसली.

प्रेरणा: निघूया आपण उशीर होईल घरी जायला...

प्रतिक: अग पण सांग तरी मला... प्रतिक तिच्या मागे जात म्हणाला. दोघेही कार मध्ये जाऊन बसले.

प्रेरणा: हं आता सांगते मी, खूप छान वाटलं तुमचं surprise मला... आणि असं surprise मिळणार असेल तर मी पुन्हा रागावण्यासाठी तयार आहे... तसे दोघेही हसू लागले.

प्रतिक: प्रेरणा थांब हलू नकोस... प्रतिक हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ येत म्हणाला.

प्रेरणाने घाबरुन डोळे मिटून घेतले. तसं प्रतिकने तिच्या गालावर लागलेला पापणीचा केस हळुवार त्याच्या बोटात पकडला.

प्रतिक: हे घे... wish माग...

प्रेरणा: (हसून) तुम्ही सुद्धा या गोष्टीवर विश्वास ठेवता...

प्रतिक: माग ना तुझं wish...

प्रेरणा: माझं wish आधीच पूर्ण झालं आहे... तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यावर... आता मला अजून काही नको आहे... तिने पापणीचा केस हवेने उडवला.

प्रतिक: माझं ही wish पूर्ण झालं... तू माझ्या आयुष्यात आल्यावर... प्रतिकने तिच्या डोक्यावर आपलं डोकं लावत म्हटलं. दोघेही हसले.

प्रेरणा: निघूया... उशीर होईल

प्रतिक: हो निघूया म्हणत प्रतिकने कार सुरु करुन घरच्या दिशेने वळवली.

क्रमशः

🎭 Series Post

View all