अस्तित्व एक संघर्ष-भाग-६४

It is a story of a girl who faced such a situation where she totally destroyed and at one point she fight for her identity.

अस्तित्व एक संघर्ष

भाग-६४


घरी आल्यावर सगळयांच्या मध्ये आजी बसली. नंदा, सोनाने सगळ्यांसाठी सरबत आणून दिलं. प्रत्येकाचं लक्ष आजी काय बोलतेय याच्याकडे होतं. प्रतिक प्रेरणा एकमेकांच्या समोर बसले होते. राजीवने प्रतिकच्या मोबाईलवर एक फोटो पाठवला. तो फोटो पाहून प्रतिकला हॉलमधील नातेवाईक घरी गेल्यावर त्याने प्रेरणाला सगळ्यांच्या नकळत बाजूलाच असलेल्या कारंजाकडे नेल्याची गोड आठवण झाली. तो आणि ती दोघेही तिथे कारंजाच्या बाजूलाच असलेल्या बाकड्यावर बसले होते. त्याने तिचा हात हातात घेऊन म्हंटलं, प्रेरणा...

प्रेरणा: (त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून) हं बोला ना प्रतिक, मी ऐकतेय...

प्रतिक: आजची रात्र संपूच नये असं वाटतंय मला...

प्रेरणा: मला ही...

प्रतिक: (तिचा चेहरा स्वतःच्या हातात घेऊन) खरं सांगू प्रेरणा, तुझ्याशिवाय हे दिवस कसे गेलेत हे माझं मलाच माहीत...

प्रेरणा: नको ना तो विषय... ज्या आठवणींनी मनाला त्रास होईल त्या क्षणांची आठवण नाही काढायची...

प्रतिक: (तिच्या डोळ्यांत पाहत) असं सोडून नाही ना जाणार पुन्हा मला... पुन्हा असं काही घडलं तर मी नाही जगू शकणार....

प्रेरणा त्याच्या ओठांवर हात ठेवत म्हणाली, असं बोलू नका परत कधी...

प्रतिक तिचे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेत म्हणाला, हे हात असतील माझी साथ द्यायला तर पुन्हा नक्कीच मी असं बोलणार नाही.. दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत इतके पूर्ण बुडून गेले होते की रेखा-राजीव तिथे आल्याचं भान ही त्यांना राहिलं नाही. प्रतिकने नकळत तिच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवले.

राजीव त्या दोघांचा फोटो मोबाईलमध्ये काढत म्हणाला, perfect shot... त्याच्या आवाजाने प्रेरणाने लाजून मान खाली घातली... तर प्रतिक काही झालंच नाही या आविर्भावात इकडे तिकडे पाहू लागला.

रेखा: (दोघांना चिडवण्याच्या उद्देशाने) राजीव, तुम्ही काही बघितलं का आता....???

राजीव: कशाबद्दल म्हणतेय तू रेखा...माझ्या लक्षात नाही आलं..

प्रतिक: (प्रेरणाचा हात हातात घेऊन) सांग ना... काय बघितलं...

प्रेरणा: (लाजत) प्रतिक.... पुरे ना आता....

रेखा-राजीव दोघेही त्यांच्या जवळ गेले. चौघांनी एकत्र मिळून hug केलं...

रेखा-राजीव: we both are happy for you.... now let's go everyone is waiting for us...

तसे चौघेही पुन्हा हॉलच्या दिशेने गेले. सगळे खरंच त्या चौघांची वाट पाहत थांबले होते.

आजी: कुठे होतात रे चौघे तुम्ही...? आज हॉलमध्येच रहायचा विचार आहे का...?

प्रतिक, राजीव: नाही आजी ते... या दोघींना कारंज्यांच्या इथे फोटो काढायचे होते म्हणून गेलो होतो...

आजी: फोटो काढायचे होते... बरं... दाखवा बघू आम्हाला पण...

आजीचं बोलणं ऐकून चौघेही चपापले. त्यांच्या चेहऱ्याचा उडालेला रंग बघून आजीसकट सगळे हसू लागले... आणि या चौघांना त्यांच्या हसण्याचं कारण उमगेना.

आजी: प्रतिक, राजीव हे केस पांढरे झालेत ते असेच काय...

(वर्तमानकाळात)

फोटो पाहत हरवलेल्या प्रतिकला राजीवने हात लावून वास्तवात आणलं... सगळे त्याच्याचकडे बघत होते...

सोना: काय झालं प्रतिक, कुठे हरवलाय...? आजी कधी पासून तुला आवाज देतेय...

समीर: सोना, बहुतेक तो प्रेरणाशी एंगेजमेंट करायला हॉलमध्ये पुन्हा गेला... त्यांचं बोलणं ऐकून प्रेरणाचे तर गाल लाजून गुलाबी झालेच पण प्रतिक ही लाजला.

आजी: (सगळ्यांना उद्देशून) मला तुम्हां सगळ्यांशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे...

मिलिंद: हां आई बोलना...

आजी: (दीर्घ श्वास घेत) मी प्रतिकच्या म्हणण्यानुसार प्रेरणाला भेटायला होकार दिला होता. पण माझा त्यावेळी खरंच तिला नातसून बनवण्यासाठी विरोध होता आणि म्हणूनच मी तिला प्रतिकपासून दूर कर स्वतःला म्हणून तयार केलं होतं. आजीचं बोलणं ऐकून सगळ्यांना धक्का बसला.

मिलिंद: पण आई असं का केलंस...?

प्रतिक: आजी... मला अजून ही माझ्या कानावर विश्वास बसत नाही आहे...तू असं करु शकतेस यावर... आणि प्रेरणा तू मला हे का नाही सांगितलंस...? का स्वतःला त्रास करुन घेत राहिलीस, तुझा तुझ्या प्रेमावर इतका ही विश्वास नव्हता का...? प्रेरणाने प्रतिकचं बोलणं ऐकून मान खाली घातली. ती बोलणार तरी काय होती यावर...

प्रतिक तिथून आजीच्या रागाने निघूनच जाणार होता. तेवढ्यात राजीवने त्याचा हात पकडून त्याला थांबायला सांगितले.

आजी: थांब प्रतिक, तू प्रेरणाला काही बोलणार नाही आहेस...  मी तिला अशा अटींमध्ये अडकवलं होतं की तिने त्या कधीच मोडल्या नसत्या. आणि राहिला विश्वासाचा प्रश्न... तिचा स्वतः पेक्षाही जास्त विश्वास तुझ्यावर आहे.

मिलिंद: पण आई तुला माहित होतं प्रतिकचं आणि तिचं ही प्रतिकवर किती प्रेम आहे तरी तू असं का केलंसं...?

आजी: तो माझा खूप चुकीचा निर्णय होता. प्रेरणा माझ्या सांगण्यावरून प्रतिकपासून दूर राहत होती.... तेव्हा त्याला आतून तुटताना मी पाहत होते... पण मला मी चुकीची आहे असं अजिबात वाटत नव्हतं... राजीवकडून प्रेरणाबद्दलचं मत ऐकून माझा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. पण मला निर्णय घेताना अवघड होत होतं... मंदिरात जाताना आमची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर रस्त्याच्या पलीकडे एका गजरे विकणाऱ्या छोट्या मुलीची काही मुले छेड काढत होती. त्यावेळी मला त्या छोट्या मुलीची मदत करायची असूनही करता आली नाही नेमकं त्यावेळी प्रेरणा तिच्या मदतीला धावून आली. त्यानंतरही प्रेरणाला मी मंदिरात काही अनाथ मुलांना घेऊन मंदिर पाहताना बघितलं. त्याक्षणी माझे डोळे उघडले...की मी घेत असलेला निर्णय चुकीचा आहे. आजीचं बोलणं ऐकून प्रेरणा, तिच्या आईबाबांच्या डोळ्यांत पाणी आलं. प्रतिकने प्रेरणाचा हात पकडून तिला शांत केलं. तर मिलिंद, नंदा यांनी प्रेरणाच्या आईबाबांना..

आजींच्या ही डोळ्यांत पाणी तरळलं. सोनाने त्यांना थोडं पाणी प्यायला लावलं. पाणी पिऊन पुन्हा आजी सांगू लागली, बुवांचं कीर्तन ऐकताना माझ्या डोक्यात सतत प्रेरणा-प्रतिकचा विचार चालू होता. शुद्धीत आल्यावर तिच्याशी हॉस्पिटलमध्ये बोलावं म्हणून मी विचारलं तर मी शुध्दीवर येण्यापूर्वीच ती निघून गेली होती. मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप होत होता. त्यादिवशी सोनाकडूनही प्रेरणाबद्दल भरभरून ऐकताना, तिची बाजू घेऊन बोलताना तिला पाहून मी मनाशीच ठरवलं आता काहीही करुन या दोघांना एकत्र आणायचं पण कसं ते समजत नव्हतं.... म्हणून मी राजीवशी बोलायचं ठरवलं. राजीवचं नाव ऐकून सगळे राजीवकडे आश्चर्याचा धक्का लागल्यागत पाहू लागले. राजीवने सगळ्यांच लक्ष पुन्हा आजीच्या बोलण्याकडे वळवलं.

आजी: मी राजीवला त्यादिवशी सगळं सगळं सांगितलं... त्याला ही सगळं ऐकून धक्का लागला. मी त्याला म्हणाले, प्रतिक-प्रेरणा दोघांना मला एकत्र आणायचं आहे... त्यावर त्याने मला तुम्हां सगळ्यांसमोर प्रतिकसाठी मी मुलगी ठरवली असून लगेच 2 दिवसांनी साखरपुडा करायचा आहे असं सांगायला सांगितलं. पण प्रतिक दुसऱ्या मुलीशी साखरपुडा ठरवला आहे हे कळल्यावर तयार होईल का हा माझ्या मनात प्रश्न होता... तसा तो म्हणाला, यासाठी तो प्रतिकला तयार करेल... फक्त सगळ्यांसमोर ती मुलगी प्रेरणा नसून दुसरी कोणी आहे हे मला त्याने तुम्हाला पटवून द्यायला सांगितलं. आजीचं बोलणं ऐकून सोना राजीवच्या अंगावर pillow मारत म्हणाली..... राजीव तू छुपा रूस्तम निघालास... प्रतिकनेही राजीवच्या मानेमागून हात घालून त्याला जवळ ओढत म्हणाला, तू एकदाही का मला सांगितलं नाही....

राजीव: (स्वतःला सोडवत) guys.... listen me.... न सांगून जो आनंद तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला आहे तो सांगून तेवढा मिळाला असता का...?

सगळ्यांना त्याचं म्हणणं पटलं.

सोना: तरी सुद्धा राजीव, तू मला तरी प्लॅनमध्ये घ्यायचं होतं...

राजीव: दीदी, तुझी excitement तू लपवून ठेवू शकली नसतीस...even काकी-काकापण... आणि राहिला प्रश्न समीर जिजूंचा... तू पुरी इन्फो उनसे निकाल लेती... आणि मग प्लॅन सगळ्यांनाच कळला असता...!!

सोना: हं, तेरी बात में दम है इसलिये इस बार तुझे छोड दिया.... म्हणत ती पुन्हा खुर्चीत बसली. तसे सगळेजण हसू लागले.

मिलिंद: आई, पण मग प्रेरणाचे आईबाबा, मालगुडे फॅमिली सगळे एंगेजमेंटला कसे आले...

आजी: (हसत म्हणाली) मी त्यांना कॉल करुन सगळं खरं सांगितलं... आणि हे ही सांगितलं की यातली एकही गोष्ट कोणाला कळता कामा नये....

प्रेरणाच्या आईबाबांनी मिलिंद-नंदाकडे पाहत मानेने होकार दिला.

सोना: आजी, तू प्रेरणाला का नाही खरं सांगितलं...?

आजी: कारण मला भिती होती की, मी प्रेरणाशी जसं वागले त्या नंतर तिने एंगेजमेंट साठी होकार नाही दिला तर...

नंदा: पण मग आई, प्रेरणाला हे सगळं माहीत नसताना ती एंगेजमेंट साठी तयार होऊन कशी आली...? नंदाचा प्रश्न ऐकून सोना, आजी काय बोलतेय याकडे पाहू लागली.

आजी: याच उत्तर माझ्यापेक्षा जास्त चांगलं राजीव देऊ शकेल...

हो ना राजीव...!!

राजीव: (हसत म्हणाला) ते मी रेखाला या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं होतं.... आणि आजी प्रेरणाशी बोलत असताना माझ्या हे कानावर आलं की प्रेरणा तिथून घरी जायला बघतेय...

मग आजीकडून कोल्डड्रिंक काढून घेताना रेखाने मुद्दाम पाय लेहेंग्यावर ठेवून प्रेरणाच्या साडीवर कोल्डड्रिंक सांडवलं. मग प्रेरणा कपडे चेंज करायला तयार नसताना सुद्धा रेखा तिला जबरदस्तीने घेऊन गेली. आणि ठरल्याप्रमाणे रेखाने प्रेरणाला लेहेंगा घालायला सांगितलं. As expected प्रेरणा तो घालायला तयार नव्हती. मग रेखाने तिला तो घालून आजीने तिला तिच्याकडे बोलवलं आहे म्हणून सांगितलं..

सोना: पण मग प्रेरणाने लेहेंगा का घालायचा म्हणून विचारलं नाही का..?

प्रेरणा: मी विचारलं रेखाला... ती म्हणाली की, आजीची इच्छा आहे प्रतिकच्या हातात आणि प्रतिकच्या होणाऱ्या बायकोच्या हातात मी रिंग द्यावी... आणि हाच लेहेंगा घालून यावं. जेणेकरून प्रतिकला हे वाटलं पाहिजे की आता मला त्यांच्याबद्दल काहीही वाटत नाही आणि ते एंगेजमेंटला तयार होतील... मला तयार करून रेखा माझ्या बरोबर हॉलमध्ये आली... पण नेमकी light गेली असल्याने तिने मला स्टेजवर एकटंच जायला सांगितलं... मी स्टेजवर जाऊन आजींच्या मागे उभी राहिले आणि आजींनी मला जवळ बोलावून माझ्या आणि प्रतिकच्या एंगेजमेंटची अनाउन्समेंट केली. सगळं इतकं भरभर झालं की मला काही क्षण काय खरं काय खोटं हे ही लक्षात आलं नाही. (बोलताना प्रेरणाचा चेहरा आनंदाने खुलला होता) ती बोलत असताना आजी तिच्याजवळ गेली.

आजी: (तिचे दोन्ही हात जोडून) बाळा या आजीला माफ करशील ना... मी जे तुझ्याशी वागले त्यासाठी... 

प्रेरणा: (आजींचे हात हातात घेऊन) आजी, काय करताय तुम्ही.... असं करुन तुम्ही मला लाजवत आहात...

आजी: बेटा हे बघ, माझा निर्णय खरंच खूप चुकीचा होता... आणि तू जोपर्यंत या आजीला माफ करत नाही तोपर्यंत या आजीला समाधान मिळणार नाही.

प्रेरणा: आजी, माझा तुमच्यावर कधीच राग नव्हता... ती परिस्थितीच तशी होती....

आजी: (तिच्या डोक्यावरुन हात फिरवत) हा तुझा मोठेपणा आहे बेटा...(आजीने तिला मिठीत घेतलं. आजीच्या मायेचा स्पर्श तिच्या मनाला सुखावून गेला.

सोनाने सुद्धा त्या दोघींना एकत्र hug केलं. मिलिंद आणि नंदाने प्रेरणाच्या आईबाबांना प्रेरणा आता त्यांचीच मुलगी झाली असं गळाभेट करुन सांगितलं. राजीवच्या आईबाबांची ही प्रेरणाच्या आईबाबांबरोबर गळाभेट झाली. समीर, राजीव प्रतिकच्या बाजूला बसून प्रेरणाच्या नावाने चिडवत होते.... विवेक आपल्या बहिणीला, फॅमिलीला खूश पाहून सुखावला होता. तो ही राजीव-समीर बरोबर सामील झाला. प्रतिक सुद्धा न रागावता सगळं एन्जॉय करत होता. 

प्रेरणाचे आईबाबा: आई, आता आम्हाला निघायची परवानगी द्या...

आजी: हो पण एका अटीवर...

सगळ्यांचे कान आता आजी काय बोलतेय याकडे टवकारले.

प्रेरणाचे बाबा: कोणती अट...?

आजी: आमचा प्रतिक तुम्हाला घरी सोडायला येईल... चालेल ना...

प्रेरणाचे बाबा: (हसून) हो चालेल...

आजी: (मस्करीत) प्रतिक, चालेल ना रे तुला... तुला न विचारताच मी सांगून मोकळी झाले... तूला शक्य नसेल म्हणत असशील तर राजीवला सोडायला सांगते...

प्रतिक: (काहीसा लाजून) आजी तू पण ना...

राजीव: (चिडवण्याच्या उद्देशाने) आजी, मी फ्री च आहे मी सोडायला जातो...

प्रतिक कोणालाही कळणार नाही असं राजीवच्या गळ्यात हात घालून कानात म्हणाला, मी जातोय म्हंटलं ना... तू घरीच थांब...

दोघांचं काय चाललं आहे ते आजीच्या लक्षात येतं.

राजीव: आजी, मी नाही जात... मी आपला घरीच बरा...प्रतिक तू जा सोडायला...

आजी: (प्रतिकला मस्करीत) हां प्रतिक तू प्रेरणाचे आईबाबा आणि भावाला सोडून ये...

प्रतिक: आणि आजी, प्रेरणा...

आजी: ती आज आपल्याकडेच राहणार आहे... आता माझ्या बरोबर माझ्या खोलीत झोपणार आहे... आजीचं बोलणं ऐकून प्रतिकचा चेहरा पडला... आता आपल्याला प्रेरणाशी काहीचं बोलता येणार नाही... तो मनात म्हणाला. त्याचा पडलेला चेहरा बघून सगळे हसायला लागले.

सोना: (हसणं थांबवत) ओ भाऊराया, आपली आजी तुझी मस्करी करते आहे... प्रेरणा तिच्या फॅमिली बरोबर घरीच जाते आहे... त्याने सोनाचं बोलणं ऐकून आधी आजीकडे पाहिलं. आजीने हसून मानेनेच कबूल केलं. मग त्याने प्रेरणाकडे पाहिलं. तिने लाजून मान खालीच घातली. प्रतिकने मग उगाचच कोणाला त्याची excitement कळू नये म्हणून मिलिंद आणि नंदाला म्हणाला, आईबाबा, मी काकी-काकांना सोडून येतो...

सोना: (मुद्दामून चिडवत) बरं, ये तू आरामात... आणि जाताना extra key पण घेऊन जा... म्हणजे उशीर झाला तरी चालेल.

राजीव: हां प्रतिक, दीदी म्हणतेय त्याप्रमाणे extra key घेऊनच जा..

प्रतिक: आता घाईत आहे पण येतो मी लगेच जाऊन आणि मग बघतो तुम्हां दोघांना...

सोना, राजीव: (हसत हसत) हां हां बघ, आम्ही दोघे इथेच आहोत...

प्रेरणाचे आईबाबा आजींच्या पाया पडले. विवेक, प्रेरणाही आजींच्या, राजीवच्या आणि प्रतिकच्या आईबाबांच्या पाया पडले आणि सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून घरी जायला निघाले.

क्रमशः

🎭 Series Post

View all