Jan 27, 2022
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-६२

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-६२

अस्तित्व एक संघर्ष

भाग-६२


राजीवचे आईबाबा आजींनी सांगितल्या प्रमाणे सकाळीच प्रतिकच्या घरी आले होते. एंगेजमेंट जरी संध्याकाळी होती तरी आजी सगळ्यांना काही ना काही विचारुन सगळी तयारी झाली आहे की नाही याची खात्री करून घेत होती. सगळं काम व्यवस्थित चाललं आहे हे बघून मिलिंदला स्वतःच्या रुममध्ये बोलवून ती आराम करायला गेली. आजीने बोलवल्यामुळे मिलिंद तिच्या रुममध्ये गेले.

मिलिंद: आई, तू बोलवलं होतं.

आजी: हो, संध्याकाळी आठवणीने अंगठ्या बरोबर घे हेच सांगायचं होतं. नाहीतर जो कार्यक्रम ठरवला आहे तोच राहून जायचा...

मिलिंद: नाही ग आई, घेईन मी आठवणीने... आई, रागावणार नसशील तर एक विचारु...?

आजी: हं विचार...

मिलिंद: तू ४ अंगठ्या का सांगितल्या बनवायला..?

आजी: (नकळत हसून) कळेल तुला संध्याकाळी... फक्त सगळ्या गोष्टी आठवणीने घे...

मिलिंद: हो आई...

आजी: चल मी झोपते जरा आता....

मिलिंद: हो चालेल आई, मी बघतो तोपर्यंत सगळं ठीक झालं का ते...

मिलिंद आजीच्या रुमचं दार ओढून पुन्हा लिविंग रुममध्ये आले आणि राजीवच्या बाबांबरोबर गप्पांमध्ये सामील झाले.

***

 

अखेर तो क्षण आला ज्याची माझ्यासकट तुम्ही सगळेजण वाट पाहत होतात. घरातील सगळी मंडळी हॉलमध्ये जाण्यासाठी तयारीला लागली होती. राजीवने तयारी करुन झोपलेल्या प्रतिकला उठवलं... अरे उठ, आज संध्याकाळी तुझी एंगेजमेंट आहे विसरलास की काय...? प्रतिक मनात उठायचं नसलं तरी उठला... आज जर त्याची आणि प्रेरणाची एंगेजमेंट असती तर याच गोष्टी तो खूप हौसेने करत असता...

राजीव: अरे जा पटकन शॉवर घेऊन ये... आपल्याकडे फक्त 45 मिनिटे आहेत.

प्रतिकने त्याच्याकडे पाहिलं... "अरे तू तयार झालास पण..."

राजीव: म्हणजे काय...? मेरे यार की एंगेजमेंट है... जा पटकन तू बाथरुम मध्ये... मी तुझं costume बाहेर काढून ठेवतो तोपर्यंत.. राजीवने अक्षरशः प्रतिकला बाथरूम मध्ये पिटाळून लावलं. प्रतिक शॉवर घेऊन बाहेर आला. राजीव रुममध्ये नव्हता. बेडवरती राजीवने त्याचे एंगेजमेंटचे कपडे काढून ठेवले होते. कपडे बघून तो धपकन बेडवर बसला. "हे तेच कपडे होते जे त्याने शॉपमध्ये पाहिले होते..." प्रेरणाच्या विचारात तो हरवून गेला असताना राजीव रुममध्ये आला.

राजीव: अरे, तयार नाही झालास अजून...?

प्रतिक: हे कपडे का घेतले तू...?

राजीव: तुझ्या डोळ्यांत दिसलं मला, तुला आवडले होतं ते collection....!!

प्रतिक: हो पण, जिच्यासाठी मला हे घालायचं होतं ती मुलगी प्रेरणा नाही आहे ना...!!

राजीव: हे बघ, ते आपण नंतर बघू...तसं ही जर सोना दीदी चा प्लॅन successful झाला तर तुझी आज एंगेजमेंट नाही होणार... आता तयार हो पटकन सगळे तयार होऊन बाहेर वाट बघत आहेत तुझी... तसा प्रतिक तयार होऊन राजीव बरोबर रूममधून बाहेर आला. आजीने सोना-समीर, राजीव आणि प्रतिक यांची दृष्ट काढायला लावली आणि सगळेजण हॉलवर जायला निघाले.

काही वेळाने प्रतिक आणि राजीवची फॅमिली एंगेजमेंटच्या हॉलवर पोहचले. हॉलचं एन्ट्री डेकोरेशन सूर्यफुल आणि वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबांनी सजवलं होतं. ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलं होतं ते हळूहळू येत होते. प्रतिकच्या टीम मधले समिधा, मीना, आशिष आणि विवेकही आले होते. स्टेजवर उभ्या असलेल्या प्रतिकची नजर मात्र प्रेरणालाच शोधत होती. तिला न पाहून तो काहीसा अस्वस्थ होत खुर्चीवर बसून राहिला. त्याला असं शांत बसलेलं पाहून राजीव त्याच्याशी बोलायला गेला.

राजीव: (प्रतिकच्या खांद्यावर हात ठेवून) काय रे काय झालं...

प्रतिक: प्रेरणा नाही आली रे... मला तिला सगळं खरं खरं सांगायचं आहे...

राजीव: अरे येईल रे... कशाला काळजी करतोय...

प्रतिक: येणार असती तर विवेक बरोबर येऊ शकली असती ना...!

राजीव: का ती एकटी येऊ शकत नाही... इन्फॅक्ट मी म्हणेन ती एकटीच येते आहे... माझं आताच विवेकशी बोलणं झालं तेव्हा तो म्हणाला.

प्रतिक: (राजीवचे हात घट्ट पकडत) तू खरंच सांगतोय ना...?

राजीव: अरे हो तर...(मग त्याचं प्रतिकच्या बोटांकडे लक्ष जातं) प्रतिक, हे काय झालं तुझ्या बोटांना...

प्रतिक: तुला म्हणालो होतो ना मी... या बोटामध्ये अंगठी फक्त प्रेरणाच घालेल.

राजीव: अच्छा, म्हणून तू हे असं बँडेज केलं. प्रतिकने त्याला मानेनेच होकार दिला. त्या दोघांचं बोलणं नेमकं नुकतंच येऊन बाजूला उभ्या राहिलेल्या एका व्यक्तीच्या कानावर गेलं... ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आजीच होती.

***

 

राजीवशी बोलत असताना प्रतिकची नजर दरवाजातून आत येणाऱ्या प्रेरणाकडे गेली. तिला पाहून त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. तिने बेबी पिंक रंगाची कॉटनची साडी नेसली होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू कुठेतरी हरवलं होतं. ती आजूबाजूला कोणाकडेही न बघता सरळ समिधा आणि मीनाच्या बाजूला जाऊन बसली. प्रतिक तिला पाहताक्षणी स्टेजवरुन उतरुन तिच्या दिशेने गेला. प्रतिक त्यांच्याकडेच येत असल्याचं समिधाने प्रेरणाला सांगितलं. तशी प्रेरणा त्याला टाळण्यासाठी तिथे न थांबता उठून दुसरीकडे गेली. प्रतिकने तिचा पाठलाग केला. आजूबाजूला कोणाच्या काही लक्षात यायच्या आधी प्रतिकने तिचा हात पकडून तिला हॉलच्या एका कोपऱ्यात नेलं. तिने प्रतिकच्या हातातून स्वतःचा हात सोडवायचा खूप प्रयत्न केला पण त्याने त्याची मूठ घट्ट केली होती. आदल्या दिवशी प्रेरणाला लागलेला चटका प्रतिकच्या अशा पकडण्याने दुखावला आणि ती कळवळली. तिच्या डोळ्यांतल्या पाण्याने प्रतिक अस्वस्थ झाला. त्याचं लक्ष तिच्या पकडलेल्या हाताकडे गेलं. 

प्रतिक: (तिच्या हाताला लागलेल्या चटक्याकडे पाहत) प्रेरणा, काय केलं हे तू...(प्रतिकने बोलता बोलता तिच्या हातावरून हळुवारपणे हात फिरवला आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी तिच्या हातावर पडलं)

प्रेरणाने कसंबसं स्वतःचा हुंदका आवरला आणि तिचा हात सोडवून ती तिथून पुन्हा समिधाकडे जायला निघाली. प्रतिक मात्र तिच्या अशा वागण्याने गलबलून उठला. त्याने त्याचे डोळे बंद करुन अश्रूंना जायला वाट मोकळी करुन दिली.

तूने  जो  ना  कहा , मै  वो  सुनता  रहा

खामखा  बेवज़ह,  ख्वाब   बुनता  रहा

जाने  किसकी  हमें,  लग  गई  है  नज़र

इस  शहर  में  ना,  अपना  ठिकाना  रहा

दूर  चाहत  से  मै,  अपनी  चलता  रहा

बुझ  गई  आग  थी,  दाग  जलता  रहा

स्वतःला सावरत चेहऱ्यावर खोटं हसू आणत पुन्हा तो सगळ्या माणसांत मिसळून गेला. पण त्याची नजर प्रेरणावरची हटतच नव्हती. प्रेरणा मात्र खाली मान घालून बसली होती.

***

 

काही वेळाने आजीने स्टेजवर जाऊन अनाउन्समेंट केली, आज तुम्ही सगळेच जण इथे माझ्या नातवांच्या साखरपुड्याला आलात त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार.... तर आता मी ज्या कार्यक्रमासाठी बोलावलं आहे त्याची सुरवात करते. आज इथे एक नाहीतर दोन जणांचा साखरपुडा समारंभ आम्ही योजिला आहे. हे ऐकून सगळेजण आश्चऱ्याने आजीकडे पाहू लागले. त्यांची अजून उत्कंठा वाढवत न बसता आजीने राजीव आणि रेखा यांना तिच्याजवळ बोलावलं... आणि राजीवच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली, जसं मी म्हणाले त्याप्रमाणे आज पहिला साखरपुडा माझा नातू राजीव आणि माझी होणारी नातसून रेखा यांचा होणार आहे. आजीच्या अनाउन्समेंटने दोघेही आश्चर्यचकित होत तिच्याकडे पाहू लागले.

आजी: (हसत) मग कसं वाटलं तुमच्या लेडी डॉन आजीचं surprise...? 

आजीच्या तोंडून Lady don ऐकून प्रतिकने जीभ चावली....तर राजीवची reaction पाहून रेखा लाजून हसली. त्याने लगेच एका हाताने स्वतःचा कान पकडत आजीला सॉरी म्हंटलं. आजीने हसत त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि राजीवच्या आणि रेखाच्या आईबाबांना स्टेजवर बोलावलं. नंतर मिलिंद-नंदाला ही स्टेजवर बोलावलं. तसे सोना-समीर प्रेरणा आणि प्रतिकला ही जबरदस्तीने स्टेजवर घेऊन गेले. आजीने मिलिंदला अंगठीचा बॉक्स राजीवकडे तर नंदाला रेखाकडे द्यायला सांगितला. दोघांनी एकमेकांना अंगठी घातली.... तसं सगळयांनी टाळ्या वाजवून त्यांना अभिनंदन केलं.

सोना तर आनंदाने समीरला बिलगली. प्रतिक रेखाच्या बाजूला उभ्या असलेल्या प्रेरणालाच न्याहाळत होता. सोना मग आजीकडे जाऊन हळूच कानात म्हणाली, आजी कसं केलं तू हे सगळं.... आजीने हसत रेखा आणि राजीवच्या आईबाबांकडे पाहिलं. मिलिंद आणि नंदा ही आजीच्या या surprise ने थक्क झाले होते. मिलिंदला आता चार अंगठ्या मागचं रहस्य कळलं होतं. 

***

 

प्रेरणाला स्टेजवर प्रतिकपासून जास्त वेळ नजर लपवणं अशक्य होतं. तिने रेखा आणि राजीवला congratulate केलं आणि ती जायला निघणार तोच फोटोग्राफरकडे इशारा करत सोना समीर आणि प्रतिकला फोटो काढायला घेऊन आली. त्यांच्या फोटोमध्ये आपण नको यायला म्हणून प्रेरणा निघत असताना सोनाने तिचा हात पकडून तिला थांबवलं आणि राजीवच्या बाजूला प्रतिक आणि प्रेरणाला उभं करुन ती आणि समीर रेखाच्या बाजूने उभे राहिले. प्रेरणा प्रतिकच्या बाजूला उभं असताना नकळत तिच्या हाताचा स्पर्श प्रतिकला झाला. प्रतिकने लगेच तिचा हात घट्ट पकडून ठेवला. प्रतिकने असं अचानक केल्याने ती काही बोलू ही शकत नव्हती. फोटोग्राफरने सगळ्यांना स्माईल करायला सांगून फोटो काढला. फोटो काढून झाल्यावर सोना आणि समीरने दोघांना hug करून congratulate केलं आणि समीर-सोना, प्रतिक-प्रेरणा फोटो फ्रेम मधून बाहेर आले. सोना समीर आजीशी तर तिघांचे आईबाबा आलेल्या लोकांशी बोलत असल्याने प्रतिकने हीच वेळ योग्य समजून प्रेरणाचा हात पकडून तिला स्टेजवरुन उतरवून दुसरीकडे नेलं. त्याला आता कोणाचीही पर्वा नव्हती. याक्षणी त्याला फक्त प्रेरणाच्या डोळ्यांत त्याच्याबद्दल असलेलं प्रेम, विश्वास दिसत होता. त्याला काहीही करुन एंगेजमेंट करण्यामागचं कारण तिला सांगायचं होतं. प्रेरणाने स्वतःचा हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न केला पण प्रतिकने त्याची पकड घट्ट ठेवली होती. त्याने तिचा हात पकडून तिला हॉलच्या मागच्या जागेमध्ये आणले.

प्रेरणा: सर, सोडा माझा हात... कोणी बघितलं तर.... ती पुढे काही बोलणार तेवढ्यात प्रतिकने त्याचा हात तिच्या ओठांवर ठेवला.... आणि तो पुढे बोलू लागला... प्रेरणा, मला तुला काही सांगायचं आहे... ही एंगेजमेंट मला नाही करायची आहे... पण situation अशी निर्माण झाली की मला हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रेरणाने तिच्या ओठांवरचा त्याचा हात बाजूला केला आणि काही न बोलता तिथून हॉलमध्ये जायला निघाली. प्रतिकने तिला आवाज दिला "थांब प्रेरणा....थांब.... मी ही एंगेजमेंट होऊ नाही देणार आहे... तुझ्याशिवाय कोणत्याही मुलीचा मी विचार नाही करु शकत गं....!" पण तिने मागे वळून नाही पाहिलं. प्रतिक जाणाऱ्या प्रेरणाकडे हतबल होऊन पाहत राहिला. प्रेरणाची अवस्था फार वेगळी नव्हती. आजीला दिलेला शब्द तिला पाळायचा होता. त्यासाठी तिला असं करणं भाग होतं. तिने तिच्या डोळ्यांतलं पाणी पुसलं आणि पुन्हा त्या दोघांमध्ये काही होऊ नये म्हणून भरभर हॉलच्या दिशेने पावलं उचलली.

***

 

हॉलमध्ये आल्यावर ती पुन्हा समिधा आणि मीनाच्या बाजूला येऊन बसली. तिचा रडवलेला चेहरा बघून समिधाने न राहवून तिला विचारलंच, "प्रेरणा, तू रडलीस का, काही झालं आहे का...?"

नाही ग काही नाही...थोडा कचरा गेला होता डोळ्यांत... त्यामुळे ते...तिने चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हटलं. समिधा आणि मीनाचा यावर विश्वास नाही बसला पण तिला अजून याबाबत विचारुन त्यांना तिला त्रास द्यायचा नव्हता. थोडया वेळाने प्रतिक ही तिच्या मागोमाग हॉलमध्ये आला. त्याचा चेहरा बघून सोनाने त्याला त्यामागचं कारण विचारलं. प्रतिक सांगायला तयार नव्हता... पण प्रतिकला तिने बोलतं केलंच. त्याचं म्हणणं ऐकून ती प्रेरणाशी बोलण्यासाठी तिच्याकडे गेली.

सोना: (प्रतिकच्या टीममधल्या सगळ्यांना) Hi everyone, तुमची कोणाची हरकत नसेल तर मला प्रेरणाशी थोडं बोलायचं होतं... सगळ्यांनी मानेने हो म्हटलं.. तसं सोना लगेच तिला घेऊन एका ठिकाणी बसली. प्रेरणा मान खाली घालूनच बसली होती. सोना तिची हनुवटी हाताने वर करत म्हणाली, प्रेरणा तू समजतेस तसं मी काही होऊ देणार नाही आहे.... ती अजून पुढे काही बोलणार तोच आजी तिथे आली.

आजी: (सोनाला) सोना, समीरराव शोधत आहेत तुला... त्यांचं काहीतरी काम आहे बहुतेक तुझ्याकडे...

सोना: आजी, ते मी प्रेरणाशी बोलत होते... नंतर बघते ग त्याला...

आजी: अग काहीतरी महत्त्वाचं असेल म्हणून तर तुला शोधत असेल ना... जा बघ आधी... आणि प्रेरणा तर आहेच ना इथे... मग येऊन बोल... आजीच्या बोलण्यावर सोना पुढे काही बोलू शकली नाही. प्रेरणाला मी लगेच येते म्हणत, ती समीरला मनातल्या मनात बडबडत तिथून निघून गेली. सोना तिथून गेल्यावर आजी प्रेरणाच्या बाजूला बसल्या.

आजी: (प्रेरणाच्या हातावर हात ठेवून) प्रेरणा, मला खरंच खूप छान वाटलं तुला इथे पाहून... माझ्यासारख्या म्हातारीच्या शब्दाला मान देऊन तू इथे आलीस...

प्रेरणा: आजी, तुमच्या इच्छेमुळे इथे आले पण मी अजून इथे नाही थांबू शकत...प्लीज मला घरी जायची परवानगी द्या...

आजी: बरं ठीक आहे पण प्रतिकचा साखरपुडा होईपर्यंत तरी थांबू शकते ना...?

प्रेरणा त्यावर काहीच नाही म्हणाली.

आजी: ठीक आहे तू जाऊ शकते घरी... पण कोल्डड्रिंक तरी घेऊन जा...असं म्हणत त्यांनी वेटरला आवाज दिला. वेटर कोल्डड्रिंक घेऊन त्यांच्यापाशी आला. आजीने स्वतःला आणि प्रेरणाला असे दोन कोल्ड ड्रिंकचे ग्लास घेतले. त्या दोघींचं बोलणं चालू असताना राजीव आणि रेखा त्यांच्याकडे आले.

राजीव: आजी, तुमची तब्येत आता कुठे ठीक झाली आहे आणि लगेच कोल्डड्रिंक पीत आहात...

रेखा: हो आजी, द्या बघू आधी... म्हणत तिने आजीकडून ग्लास घेतला आणि नेमका तिच्या लेहेंग्यामध्ये तिचा पाय अडकून ग्लासमधलं कोल्डड्रिंक प्रेरणाच्या साडीवर पडलं.

रेखा: I am extremely sorry Prerna... माझा पाय अडकला लेहेंग्यामध्ये आणि त्यामुळे ते सांडलं... I am again sorry...

राजीव: (तिच्यावर रागवत) तुला समजत नाही का... खराब केलीस बघ तिची साडी....

राजीव ओरडल्यामुळे रेखाचा चेहरा पडला...ती मान खाली घालून म्हणाली, मी मुद्दाम नाही केलं...

आजी: राजीव, कशाला तिला उगाच ओरडतोय, तिचा पाय अडकला म्हणून हे सगळं झालं..

प्रेरणा: हो राजीव सर, Its ok... मी साफ करते पाण्याने... म्हणत ती उठली.

रेखा: नाही प्रेरणा, साडी खूप खराब झाली आहे... ऐकना मी येताना काही कपडे extra घेऊन आले होते तर त्यातलं बघ तुला काही आवडतं का ते...

प्रेरणा: अग नको... ठीक आहे इतकं कशाला...

रेखा: हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाही आहे... हे सगळं माझ्यामुळे झालं ना... सो हे नीट पण मीच करणार...

राजीव: प्रेरणा, जा तू तिच्या बरोबर.... ती नाही ऐकणार...

आजी: हो जा प्रेरणा, 

तशी प्रेरणा, रेखा बरोबर निघून गेली. ते दोघे गेल्यावर आजी राजीवला म्हणाली, बाकी सगळी व्यवस्था ठीक आहे ना...

राजीव: (आजीला चिडवत) Yes lady don...

आजी: (त्याचा कान ओढून) पुन्हा बोलशील तर याद राख... माझ्याशी गाठ आहे...

राजीव: सॉरी आजी, नाही वागणार पुन्हा असं...

आजी: (खळखळून हसत) अरे उलट मी म्हणेन, तू मला याच नावाने हाक मारत जा...

राजीव: (हसत) खरंच आजी...

आजी: हो १००% खरं... मला आमचा प्रतिक असाच तुझ्या सारखा मस्करी करणारा हवा होता... पण त्याने बरोबर आमच्या नंदाचा शांतपणा उचलला आहे... सोना आमची आली की, तिचं आणि माझं असंच चालतं पण आता तिचं येणं ही कमी झालं आहे... 

राजीव: (आजीच्या हातावर हात ठेवत) आजी मैं हूं ना... तुमचं केव्हाही असंच वागायचं मन झालं की बिनधास्त मला कॉल करा... नाहीतर मी म्हणेन मला तुमच्याकडेच बोलवून घ्या... मग करु आपण धमाल मस्ती... आणि प्रतिकला ही मस्तीमध्ये ओढू...

आजी: बरं, तुझ्या तोंडात साखर पडो.... हे असंच होउदे...

राजीव: होणार होणार नक्की होणार...

आजी: चल ते सोड, मला प्रतिकच्या साखरपुड्याची घोषणा करायची आहे...

राजीव: (आजीला हात देऊन उठवत) चला तर मग Lady Don... हम आपके साथ ही है...

 

राजीव आजीला घेऊन पुन्हा स्टेजवर आला. आजीने अनाउन्समेंट केली... आता लवकरचं तुमच्या सगळ्यांच्या उपस्थित मी माझ्या दुसऱ्या नातवाचा प्रतिकचा साखरपुडा करणार आहे. आजीने प्रतिकला स्टेजवर बोलावलं. प्रतिकच्या हृदयाचे ठोके वाढले होते. त्याची नजर प्रेरणालाच शोधत होती. आजी प्रतिकचा हात हातात घेऊन म्हणाली, करायचा ना साखरपुडा...? प्रतिकने मानेनेच आजीला हो म्हटलं. राजीव नातेवाईकांमध्ये गप्पा मारत बसलेल्या सोना-समीरला बोलावण्यासाठी स्टेजवरुन खाली उतरला. आजी पुढे म्हणाली, मी खरंच खूप भाग्यवान आहे जे आज मला माझ्या दोन्ही नातवांचा साखरपुडा पाहायचा योग आला. सोना-समीर, राजीव, प्रतिकचे आईबाबा सगळे श्वास रोखून आजीचं बोलणं ऐकत होते. आजी बोलत असतानाच अचानक हॉलची light गेली. हॉलच्या स्टाफने लगेच एक generator light आणून स्टेजवर लावली. राजीवचे आणि प्रतिकचे बाबा नक्की काय प्रॉब्लेम झाला म्हणून बघायला गेले. हॉलमध्ये अचानक light गेल्यामुळे सगळे भांबावले होते. आजी प्रतिकचाच हात पकडून उभी होती. ती पुन्हा पुढे म्हणाली, आता light गेली असली तरी माझ्या नातवाचा साखरपुडा हा ठरलेल्या मुहूर्तावरच होणार आहे. आता मी माझ्या होणाऱ्या दुसऱ्या नातसूनेला बोलावलेलं आहे... ती बघा ती येते आहे म्हणत आजीने दरवाजाकडे बोट दाखवलं. सोना-समीरसकट सगळ्यांच्या नजरा दरवाजाच्या दिशेने गेल्या.

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...