Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-६०

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-६०
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-६०


सगळेजण जेवायला टेबलवर हजर झाले. आजी मध्ये असलेल्या खुर्चीवर बसली होती. जेवता जेवता आजी म्हणाली, प्रतिक कामाचा खूप ताण होता का...?

प्रतिक: (आजीकडे बघून) हो आजी, ते तिकडच्या ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम्स झाले होते त्यामुळे थोडं टेन्शन होतं...

आजी: पण कामाच्या नादात तुझ्या जेवणाकडे पण तुझं दुर्लक्ष झालंय असं वाटतं आहे... नक्की ऑफिसचच काम आहे हे कारण की दुसरं काही...?

प्रतिक आता पुढे काय बोलतोय हे ऐकायला सगळ्यांचे कान प्रतिकच्या दिशेने टवकारले. पण आजीला स्ट्रेसपासून लांब ठेवायचं आहे हे राजीवचं बोलणं त्याला आठवलं. त्याने मनात विचार केला की आजीला खरं कारण सांगितलं तर ती उगाच टेन्शन घेईल.

प्रतिक: आजी माझं जाऊदे, तुझं तुझ्या तब्येतीकडे बिलकुल लक्ष नाही आहे असं दिसतंय...

आजी: काही नाही रे प्रतिक, ते चालायचंच... वयोमानानुसार हे सगळं व्हायचंच...

प्रतिक: पण आजी तरी सुद्धा तब्येतीकडे दुर्लक्ष करु नकोस.... चल आता लवकर जेवून घे...आणि मेडिसिन घेऊन झोप..

आजी: हं... म्हणत आजी जेवू लागली.

कोणीही त्यांच्या दोघांच्या बोलण्यात पडलं नाही. कारण कोणालाही आजीचा प्रतिकच्या साखरपुड्याच्या निर्णय पटला नव्हता. सोना तर फक्त प्रतिक प्रेरणावरून काही बोलतोय का हेच पाहत होती... पण तो तिच्याविषयी काहीच बोलला नाही याचंच तिला आश्चर्य वाटत होतं.

सगळ्यांचं जेवण आटोपलं तसं आजी म्हणाली, मला तुम्हा सगळ्यांशी बोलायचं आहे.

प्रतिक सोडून कोणीच आजीचं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतं. सोनाला तर आईबाबा आजीच्या मताविरुद्ध काही बोलत नाहीत म्हणून त्यांचा पण राग आला होता. समीरने तिचा हात पकडून धरला होता म्हणून ती तिथे गप्प बसून होती.

आजी: प्रतिक, उद्या आणि परवा असे दोन दिवस तू सुट्टी घे..

प्रतिक: कशासाठी आजी...

आजी: तू बेंगलोरला जाण्यापूर्वी म्हणाला होतास ना... " आजी तू स्थळ बघायला सुरवात कर... तुझी निवड मला चालेल म्हणून.."

प्रतिकला आजीचं बोलणं ऐकून आठवलं, प्रेरणाला बोलतं करण्यासाठी त्याने आजीला हे सांगितलेलं... तो पुढे काही बोलत नाही आहे हे पाहून आजी म्हणाली, तर मी तुझ्यासाठी मुलगी निवडली आहे... तुला हवं असेल तर मी तिचा फोटो सुद्धा दाखवते....

प्रतिक: नको आजी, मला फोटो नाही बघायचा आहे...

सोनाला वाटलं आता तरी प्रतिक काही बोलेल पण कसलं काय....तिची मनातल्या मनात धुसफूस होत होती.

आजी: हं, ठीक आहे तर मग... दोन दिवसांनी तुझा साखरपुडा आहे...मी ठरवलेल्या मुली बरोबर...

प्रतिक: अं... काय...

आजी: काय झालं...?

प्रतिक: आजी, तू थोडा वेळ थांबायला हवं होतं म्हणजे मुलीला मी आवडतो का हे जाणून नको का घ्यायला.... प्रतिक उगाचच काहीतरी कारणं पुढे करु लागला...पण खरं कारण सांगेना.

आजी: हे बघ, मुलीला तू पसंत आहेस...तिच्या घरातल्याना ही तू पसंत आहे... राहिला प्रश्न साखरपुडा लवकर करण्याचा....तर मी विचार केला सोना इथे आलीच आहे....तर साखरपुड्याचा कार्यक्रम करून घ्यावा... मग काय नंतर तुम्हा दोघांना एकमेकांना समजून तर घ्यायचं आहे.... तुमच्या वेळी तरी असे एकमेकांना भेटून बोलण्याचे प्रकार आहेत... आमच्या वेळी तर सरळ लग्नानंतर काय ते बोलणं व्हायचं...

प्रतिक: मी जाऊन झोपतो....म्हणत तो त्याच्या रूममध्ये जायला निघाला.

आजी: ( तो जात असतानाच) प्रतिक, तुझ्या ऑफिसमधल्यांना पण बोलवायचं आहे पण ते काम राजीव करेल... तू सध्या आराम कर...

प्रतिक काही न बोलता निघून गेला.

***

 

काय गरज आहे आजीला इतकी घाई करायची...? मी तर प्रेरणा माझ्याशी बोलावी म्हणून हे नाटक केलं होतं.. पण ती तर All The Best म्हणून मोकळी झाली... आणि आजी तर....तिने मला प्रेरणा आवडते हे माहीत असून सुद्धा दुसऱ्याच कोणत्या मुलीला निवडलं... निवडलं कसलं... सरळ एंगेजमेंट ठरवून मोकळी झाली. आजीशी कसं बोलू मी समजत नाही आहे. नकार द्यावा तर तिची तब्येत पुन्हा बिघडता कामा नये. माझ्याकडे फक्त 2 दिवस आहेत.... काय करु मी कसं यातून बाहेर पडू... प्रतिक डोक्यावर हात ठेवून विचार करत होता. त्याने मनाशी काहीतरी ठरवून प्रेरणाला कॉल केला... The number you have dialed is currently switched off... ऐकून त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि प्रेरणा बरोबरचे क्षण आठवत डोळे बंद करुन पडून राहिला. 

****

 

आजीने बाहेर सगळ्यांना कामं वाटून दिली. नंदा आणि मिलिंदला दागिने पॉलिश करुन घ्यायला सांगितले. कोणाकोणाला बोलवायचं आहे याची यादी ही दिली. राजीवला प्रतिकच्या ऑफिसमध्ये जाऊन सगळ्या टीम मेंबर्सना personally invitation द्यायला सांगितलं. राजीव, रेखा, सोना समीर आणि प्रतिक सगळ्यांवर कपडे खरेदी करण्याची जबाबदारी दिली. समीर आणि राजीवला त्यांच्या एरियामध्ये असलेल्या हॉलमध्ये जेवण व्यवस्था करायला सांगितली. सगळ्यांना काम वाटून आजी तिच्या मेडिसिन घेऊन झोपायला गेली. आजी तिच्या रुममध्ये जाताक्षणी सोना आईबाबांना म्हणाली, तुम्ही काहीच कसे बोलत नाही... तुम्हांला माहीत आहे ना... प्रतिकचं प्रेरणावर प्रेम आहे ते... मग का तुम्ही आजीला ठामपणे सांगितलं...?

नंदा: सगळं इतकं अचानक घडलंय त्यात आईंनी मुलीच्या आईबाबांना आधीच सांगून ठेवलं... आणि आजीची तब्येत सध्या कशी आहे तुला माहीत आहे...

मिलिंद: म्हणून मी सुद्धा काही बोलू शकलो नाही...

सोना: पण मी नाही गप्प बसणार... मी थांबवणार आजीला...आणि आज आता ताबडतोब... ती जागेवरुन उठून आजीच्या रुममध्ये जायला निघाली तोच समीरने तिचा हात पकडून तिला थांबवलं.

समीर: सोना, थांब नको जाऊस...

सोना: समीर नको थांबवू तू मला... कोणी तरी आजीशी बोलणं खूप गरजेचं आहे... आणि मला वाटतं मलाच हे करावं लागेल.

समीर: सोना ही ती योग्य वेळ नाही आहे... आपल्याला आजीच्या कलाने घ्याव्या लागतील गोष्टी...

सोना: म्हणजे साखरपुडा होऊ द्यायचा का....?

समीर: माझ्या डोक्यात एक आयडिया आहे... बघ तुला पटली तर...

राजीव: कोणती आयडिया...?

समीर: आपण प्रतिकला हॉलमध्ये पोहचूच दिलं नाही तर...?

मिलिंद: म्हणजे...? 

समीर: म्हणजे आपण त्याला वेगळ्या ठिकाणी नेऊ... आणि त्याला दुसऱ्या दिवशी परत आणू...

नंदा: जावईबापू, प्रतिकला गायब झालेलं पाहून आजी टेन्शन घेतील...

मिलिंद: हो नंदा बरोबर म्हणतेय...

सोना: त्यापेक्षा आपण प्रतिकला चक्कर येऊन पडायला सांगितलं तर... आणि त्याचं चेकअप करायला माझ्याच एका मित्राला बोलवू... 

राजीव: not a bad idea दीदी...

समीर: मला चालेल हा प्लॅन...

सोना: मग ठरलं तर... असंच करायचं... राजीव तू प्रतिकला विश्वासात घेऊन त्याच्या मनात आधी काय चाललं आहे ते काढून घे... मग त्याला हा प्लॅन सांग...  (मग आईबाबांना पाहून) आईबाबा, तुम्हाला चालेल ना हा प्लॅन...?

मिलिंद, नंदा: हं चालेल पण आजी या गोष्टीने stress घेणार नाही एवढं फक्त बघा...

सोना: मग ठरलं तर असंच करायचं... चला आता मी शांत झोपू शकेन... दुपारी हे सगळ ऐकल्यापासून माझं मन थाऱ्यावर नव्हतं... आता मी रिलॅक्स आहे... ओके आईबाबा, राजीव गुड नाईट... (मग समीरकडे पाहत) तुला गप्पा मारायच्या असतील तर मार... मी झोपते जाऊन...

राजीव: जीजू जावा तुम्ही पण झोपायला... आम्ही पण जातो... उद्या परत शॉपिंगला पण जायचं आहे ना...!

मिलिंद: हो, चला जाऊन झोपा सगळ्यांनी... उद्यापासून असून नसलेल्या साखरपुड्याच्या कामाला लागायचं आहे... तसे सगळेजण हसत हसत एकमेकांना गुड नाईट बोलत आपापल्या रुममध्ये गेले.

****

 

राजीव प्रतिकच्या रुममध्ये आला. दरवाजाच्या आवाजाने प्रतिकने डोळ्यावरचा हात बाजूला करुन पाहिलं... राजीवला पाहून तो बेडवर उठून बसला.

राजीव: (प्रतिकच्या बाजूला बसत) मला वाटलं तू झोपला असशील आतापर्यंत...

प्रतिक: झोपण्यासाठी झोप यावी तरी लागते रे...

राजीव: काही झालं आहे का तुझ्या आणि प्रेरणा मध्ये....? आणि मला एक समजत नाही तुला प्रेरणा आवडते तर तू आजीला दुसरी मुलगी का बघायला सांगितली...?

प्रतिक: हे माझ्या मूर्खपणामुळे झालं आहे. प्रेरणा माझ्याशी बोलावी म्हणून मी हे नाटक केलं पण हे माझ्याच अंगाशी आलं आणि एवढे करून सुध्दा ती माझ्याशी बोलायला तयार नाही   आणि माझा फोन सुध्दा उचलत नाही.                                  राजीव : हे सगळे कधी घडलं... तुम्ही दोघे भांडलात का?

प्रतिक राजीवला पुढे काही सांगणार तोच त्याच्या मोबाईलवर रेखाचा कॉल आला.

प्रतिक: (राजीव कॉल कट करतोय हे पाहून) अरे उचल कॉल,  बोल रेखाशी आमच्यासारखं तुमच्या दोघांत तरी दुरावा नको यायला... राजीवने प्रतिककडे पाहिलं. त्याच्या डोळ्यांत प्रेरणा पासून दूर व्हायची भिती स्पष्ट दिसत होती. राजीवने त्याच्या हातावर हात ठेवून त्याला धीर दिला आणि तो रेखाशी बोलण्यासाठी रुमच्या बाहेर गेला.

 

बराच वेळानंतर राजीव रेखाचा कॉल ठेवून रुमच्या दिशेने यायला निघाला... तर त्याला आजीच्या रुममधली light चालू दिसली. आजीला बरं तर वाटत नसेल म्हणून त्याने तिच्या रुममध्ये डोकावून पाहिलं.

आजी: (राजीवला पाहून) अरे राजीव, ये ना आत....

राजीव: (आत येऊन) आजी, तब्येत ठीक नाही आहे का...? काकी काकांना बोलवू का..?

आजी: अरे ठीक आहे रे मी आता... पण विचार करून करून डोळ्याला डोळा लागत नाही आहे.

राजीव: काय झालं आजी...?

आजी: साखरपुडा नीट होईल की नाही याचाच विचार करतेय...

राजीव: (आजीला धीर देण्याच्या उद्देशाने) नका काळजी करु आजी, सगळं ठीक होईल.

आजी: हं, तू म्हणतोय तसंच होउदे... ते जाऊदे तू अजून झोपला नाहीस ते...?

राजीव: (केसांवरून हात फिरवत) ते आजी...

आजी: आजी आजी करत बसणार आहेस की पुढे पण काही बोलणार आहेस...? (मग काही विचार करून) हं आलं लक्षात... का जागा आहेस तू ते...!! मग झालं का बोलणं माझ्या होणाऱ्या नातसुनेशी...?

राजीव: (चेहरा लाजेने लाल झाला होता) आजी, तुमच्या पासून काहीच लपून राहत नाही..

त्याचं बोलणं ऐकून आजी हसू लागली. मग बराच वेळ आजी त्याच्याशी बोलत होती. तिच्या मनावर आलेलं साखरपुड्याचं दडपण आता निघून गेलं होतं. काही वेळाने राजीव आजीला झोपायला सांगून प्रतिकच्या रुममध्ये झोपण्यासाठी निघून गेला. प्रतिक बहुतेक नुकताच झोपी गेला होता. कारण त्याच्या मोबाईलची स्क्रीन अजून चालूच होती. राजीवने त्याचा मोबाईल बंद करण्यासाठी म्हणून हातात घेतला तर स्क्रीनवर त्याला प्रतिक प्रेरणाला propose करतानाचा फोटो दिसला. काहीतरी लवकरात लवकर सोल्युशन काढायला हवं... राजीव स्वतःशीच बोलत प्रतिकचा मोबाईल बंद करुन त्याच्या बाजूला झोपला.

***

 

दुसऱ्या दिवशी मिलिंद नंदा बरोबर तिचे दागिने आणि आजींनी दिलेले दागिने पॉलिश करायला सोनाराकडे घेऊन गेले. आजींनी सांगितल्या प्रमाणे त्यांनी अंगठ्या विकत घेतल्या आणि सगळे दागिने घेऊन दोघेही घरी आले. सोना, समीर काय काय शॉपिंग करायची याची आजीच्या सांगण्याप्रमाणे लिस्ट बनवत होते. राजीव invitation देण्यासाठी प्रतिकच्या ऑफिस मध्ये जायला निघाला होता आणि तिथुनच रेखाला आणायला तिच्या घरी जाणार होता. प्रतिक सगळ्यांमध्ये असूनही नसल्या सारखा बसला होता.

***

 

राजीव प्रतिकच्या ऑफिस मध्ये पोहचला. त्याने त्याच्या टीम मधल्या प्रेरणासकट सगळ्यांना एंगेजमेंटचं invitation दिलं आणि तो सगळ्यांकडून होकार मिळवूनच रेखाच्या घरी जायला निघाला. राजीव गेल्यावर मीना आणि समिधा दोघीही प्रेरणाला म्हणाल्या, This is not fair yaar, तुझी आणि सरांची एंगेजमेंट होणार आहे रविवारी... पण तू आम्हाला काहीच कसं सांगितलं नाही. त्यांचं बोलणं ऐकून प्रेरणाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. मीनाच्या ते लक्षात आलं तसं तिने हात लावून समिधाला काहीतरी नक्कीच घडलं आहे असं इशारा करुन सांगितलं. प्रेरणा स्वतःला त्या दोघींच्या प्रश्नातून सावरण्यासाठी लेडीज कॉमन रुममध्ये निघून गेली. 

 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...