Oct 16, 2021
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-५९

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-५९
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

अस्तित्व एक संघर्ष

भाग-५९


आजीशी इतका वेळ प्रेरणाबद्दल बोलतो आहोत तरी ती काही बोलत नाही आहे हे पाहून सोनाने आजीला विचारलंच, आजी मी इतका वेळ तुझ्याशी प्रेरणाबद्दल बोलतेय पण तू काहीच बोलत नाही आहेस... तुला प्रेरणा पसंत तर आहे ना...?

आजी: (थोडा वेळ शांत बसून मग म्हणाली) प्रेरणा खूप चांगली मुलगी आहे पण मी आपल्या प्रतिकसाठी दुसरी मुलगी निवडली आहे..

सोना: काय...? आजी तू मस्करी तर करत नाही आहेस ना... तुला माहिती आहे ना प्रतिकचं तिच्यावर किती प्रेम आहे ते...

आजी: सोना, प्रतिकच मला बेंगलोरला जाण्याच्या आधी म्हणाला की, आजी तू निवडशील त्या मुलीबरोबर मी लग्न करेन... मग मी निवडली आहे मुलगी... आणि मी आपल्या पुरोहितांना मघाशी फोन करुन दोन दिवसांनंतरचा मुहूर्त ही काढला आहे... म्हटलं तू इथे आलीच आहेस तर साखरपुडा उरकून घेऊ...

सोना: पण आजी, तुला माहीत आहे ना त्याची पसंत, तरी तू अशी का वागतेय...?

आजी: हे बघ सोना, तो स्वतःहून मला म्हणाला की, मी त्याच्यासाठी स्थळ बघावं... आणि त्याला माझी पसंत चालेल म्हणून... मग मी अशी वागतेस असा तू माझ्यावर आरोप नको करुस... हवं तर प्रतिक आल्यावर तू त्यालाच विचार...

सोना: ठीक आहे होउदे तुझ्या मनासारखं... मी कितीही काही बोलले तरी ज्याने बोलायला हवं तोच काही बोलायला तयार नसेल तर मी माझं तोंड उघडून काय उपयोग... पण एक गोष्ट लक्षात ठेव आजी, तुझ्या अशा वागण्याने तीन जणांच्या आयुष्याशी तू खेळते आहेस... ना प्रतिक खूश राहू शकणार ना प्रेरणा आणि नाही तू ठरवलेली मुलगी... जाते मी बाहेर, कर तुला हवं तसं... असं म्हणत ती रूममधून निघण्यासाठी बेडवरुन उठली.

आजी: थांब सोना, बाहेर जातेच आहेस तर राजीवला माझ्या रुममध्ये पाठव... मी बोलावलं आहे म्हणून सांग... 

सोना: आजी आता त्याला आणि रेखाला तरी वेगळं नको करूस... त्यांना तरी त्यांचं आयुष्य सुखाने जगू दे...

आजी: तुला मी सांगितलं आहे तेवढंच कर... राजीवला आत पाठवून दे.. तशी ती रागाने रूममधून निघाली.

***

 

सोना रागाने लिविंग रुममध्ये आली. आईबाबा, सोना चे मि समीर सगळे गप्पा मारत बसले होते.. सोना रागातच आईच्या बाजूला येऊन बसली.

आई: काय झालं सोना, अशी का रागावली आहे... आजी काही बोलल्या का तुला...? हे बघ काही बोलल्या असतील तर लक्ष नको देऊस... सध्या त्यांची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे त्यांची चिडचिड होत असेल...

सोना: आई, मान्य आहे मला आजी वयाने मोठ्या आहेत पण सगळं त्यांच्या मनासारखंच व्हायला हवं का...?

बाबा: (सोनाला पाण्याचा ग्लास पुढे करत) तू आधी पाणी पिऊन घे आणि शांत हो मग बोलू आपण...

सोना: बाबा, नाही राहू शकत मी शांत... मला सांगा प्रेरणा आजीला भेटायला आली होती का आपल्या घरी...?

बाबा: हो आली होती... पण त्या दिवशी आजी आणि तिच्यामध्ये नक्की काय बोलणं झालं हे आम्हाला कोणालाही माहीत नाही...

सोना: असं कसं माहीत नाही... तुम्ही विचारलं नाही तिला... आणि प्रतिकने सुद्धा...?

आई: आजीची तब्येत प्रेरणा तिला भेटायला येण्याच्या आधीपासूनच ठीक नव्हती आणि त्यात प्रेरणा आजींना भेटून गेल्यावर त्यांची तब्येत विचारायला अधून मधून कधी माझ्या कधी आजींच्या मोबाईलवर कॉल करायची.. त्यामुळे त्या दोघींमध्ये काही विचित्र घडलं आहे असं माझ्या डोक्यातही आलं नाही.

सोना: आणि बाबा तुम्ही.. तुम्हाला नाही वाटलं का काही विचित्र...?

बाबा: अं, खरं सांगू त्या दिवशी तिचं आजीच्या रूममधून थेट कोणालाही न भेटता निघून जाणं मला मनात शंका निर्माण करुन गेलं होतं... मग मी आईशी या विषयावर बोललो ही पण तिने मला कशाचाही थांगपत्ता लागू दिला नाही.

समीर: पण सोना, तू एवढी hyper का झाली आहेस... काय झालं ते तरी सांग... सोना काही बोलणार इतक्यात दारावरची बेल वाजली. आईने दरवाजा उघडला. राजीव सगळ्यांना ice cream घेऊन आला होता.

राजीव: (ice cream काकूंकडे देत) मस्तपैकी ice cream खाऊ... जिजू पण आले आहेत... सो मी खाली जाऊन घेऊन आलो. सगळ्यांचा मूड थोडा बदलावा म्हणून आई सगळ्यांसाठी प्लेटमध्ये ice cream घेऊन आली.

सोना: (ice cream खाता खाता) लवकर ice cream खा राजीव... आजीने तुला आतमध्ये बोलावलं आहे...

राजीव: कोण आपली लेडी डॉन...

सोना: (काहीशी वैतागून) हो तीच ती....

राजीव: (हाताचे इशारे करत) हं, कुछ तो गडबड है दया... हमें बुलाया वो भी अपनी लेडी डॉन ने...

त्याला असं acting करताना पाहून सोना सकट सगळेजण हसू लागले. 

सोना: (हसणं कंट्रोल करत) जा रे बाबा लवकर आत, नाहीतर डॉन बाहेर येईल...

आई: (सोनाला मारत) आजी आहे ती तूझी... काहीही काय बोलतेस...

सोना: आई रिलॅक्स, माझ्यात आणि आजीमध्ये सगळं चालतं... आणि सध्या ती माझ्यासाठी लेडी डॉन च आहे...

राजीव: अं, काही झालं आहे का...?

सोना: (राजीववर वैतागत) जा रे तू आतमध्ये... तुझं ice cream खाऊन झालं तर...

समीर: हां राजीव, लवकर जा... आजींचं माहीत नाही, पण सोना डॉन नक्की मारेल तुला.... अजून जास्त वेळ थांबलास तर...

राजीव: (जागेवरुन उठत) मानलं जिजू तुम्हाला कसं हँडल करतात तुम्ही दीदीला... तुमच्याकडून मला माझ्या लग्नाच्या आधी नक्की ट्रेनिंग घ्यावं लागेल....

समीर: (जोरजोरात हसत) हो हो नक्की...

समीरला असं बोलताना पाहून सोना त्याच्याकडे रागाने पाहू लागली.

राजीव: मी जातो जीजू... माझं माहीत नाही पण तुमचं तरी आता काही खरं नाही म्हणत तो आजीच्या रुममध्ये निघून गेला.

***

 

राजीवने आजीच्या रुमचा दरवाजा हळूच उघडला. आजी त्याचीच वाट पाहत होती.

आजी: ये राजीव आत ये... मी जागीच आहे...

राजीव: (आजीजवळ येत) ते आजी सोना दीदी म्हणाली मला की तुमचं काहीतरी काम होतं माझ्याकडे...

आजी: (एक हात दुसऱ्या हातावर ठेवत) हं, काम तर आहे पण खूप महत्त्वाचं आहे... आणि उभा का बस माझ्याबाजूला... तू सुद्धा माझा नातूच आहे... या आजीशी बोलू शकतोस तू मोकळेपणाने...

राजीव: (तिच्या बाजूला बसत) आजी, आता कसं वाटतं आहे तुम्हाला... आणि काळजीवाली गोष्ट असेल तर सांगा मला...

आजी: हं, त्यासाठीच मी बोलावलं आज तुला...

राजीवच्या हृदयाची धडधड वाढली होती. कारण आजीने असं कधीच त्याच्याशी कोणत्या विषयावर चर्चा केली नव्हती. आजीने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचले आणि विषय जास्त ताणून न धरता तिने राजीवला तिच्या मनात चाललेलं सगळं सांगितलं. राजीवला सगळं ऐकून धक्काच बसला आणि सोना दीदी का चिडली आहे हे ही त्याच्या लक्षात आलं.

आजी: तर मग प्रतिकला साखरपुड्यासाठी तयार करशील ना...? मान्य आहे मला, खूप मोठी जबाबदारी देतेय मी तुझ्यावर... पण तू ती पार पाडशील याची खात्री आहे मला... तुम्ही दोघे लहानपणापासूनचे मित्र आहात आणि प्रतिकला तूच समजावू शकतोस... 

राजीव: ठीक आहे आजी, मी प्रतिकला या साखरपुड्यासाठी तयार करेन...

आजी: आणखी एक गोष्ट दोन दिवसांनी साखरपुड्याचा मुहूर्त काढला आहे मी... तर रेखा आणि तू, सोनाला बरोबर घेऊन तुम्हां सगळ्यांना कपडे खरेदी करुन घ्या. प्रतिक आणि प्रतिकच्या होणाऱ्या बायकोसाठीही कपड्यांची खरेदी करा... उठून दिसला पाहिजे जोडा असं काहीतरी खरेदी करा.

राजीव: हो आजी...

आजी: माझं आणखी एक काम कर... मला जरा बाहेर यायला मदत कर... मला बोलायचं आहे सगळ्यांशी या विषयावर...

राजीव: चालेल आजी... म्हणत तो आजीला बाहेर घेऊन आला.

***

 

सोना: बराच वेळ झाला ना बाबा, राजीव आतमध्ये जाऊन... इतकं काय बोलायचं असेल आजीला त्याच्याशी... सोनाला आतून भीती वाटू लागली होती. 

मिलिंद: हो मी पण तोच विचार करतोय... तोच आजीचा हात धरुन तिला बाहेर आणणाऱ्या राजीवकडे सगळ्यांच लक्ष गेलं. बाबांनी लगेच आजीला खुर्चीत बसवलं. आजीने सगळ्यांकडे एकवार पाहिलं मग म्हणाली, खूप महत्त्वाच्या विषयावर मला बोलायचं आहे.

मिलिंद: हां आई, बोल ना...

आजी: मिलिंद, दोन दिवसांनंतरचा मी आपल्या पुरोहितांकडून प्रतिकच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढून घेतला आहे.

नंदा: पण आई इतक्या लवकर तयारी कशी होणार...

आजी: नंदा, आपल्याला फार कोणाला बोलवायचं नाही आहे... आणि साखरपुड्याची तयारी करायला दोन दिवस पुरेसे आहेत.

मिलिंद: पण आई, आपल्याला प्रेरणाच्या घरी पण विचारावं लागेल ना.... त्यांना चालणार आहे का दोन दिवसांनंतरचा मुहुर्त...?

आजी: मुळात त्यांना कशाला विचारायला हवं... मुलीच्या आईबाबांशी माझं आधीच बोलणं झालं आहे... आणि त्यांची या मुहूर्ताला काही हरकत नाही.

मिलिंद: म्हणजे आई, तू कोणाच्या आईबाबांबद्दल बोलतेय..?

आजी: जी मुलगी मी प्रतिकसाठी निवडली आहे तिच्या आईबाबांशी...

नंदा: म्हणजे आई... म्हणत ती तोंडावर हात ठेवत खुर्चीत बसली.

आजी: नंदा, मिलिंद तुम्हाला काय वाटतं मी हे सगळं प्रतिकच्या मनाविरुद्ध करतेय...? बेंगलोरला जाण्यापूर्वी त्याने मला म्हटलं होतं, आजी तू निवडशील त्या मुलीशी मी लग्न करेन... आणि आता आपली सोना पण आली आहे मग मी विचार केला, ती इथे आहे तोपर्यंत साखरपुडा करुन घेऊ...

मिलिंद: पण आई, तुला माहीत आहे ना, प्रतिकला प्रेरणा आवडते...

आजी: हो मला माहीत आहे... पण मी त्याच्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही... त्यानेच मला त्याच्यासाठी स्थळ शोधायला सांगितलं होतं... बोलता बोलता आजीला खोकला आला. नंदाने पटकन आजीला पाणी प्यायला दिलं.

मिलिंद: आई, तू आराम कर आपण नंतर बोलूया...

आजी: एकदा तुम्हाला काय काय करायचं हे सांगू दे मला... मग 2 दिवस आरामच करायचा आहे. (नंदा, मिलिंदकडे पाहून) तुम्ही नंतर माझ्या खोलीत या... तुम्हाला माझ्या नातसूनेसाठी बनविलेले दागिने द्यायचे आहेत आणि ते सोनाराकडून पॉलिश करुन घेऊन या... आणि अंगठयांबद्दल ही बोलायचं आहे. काय काय तयारी करावी लागेल याची यादी करुन सामान मागवून घ्या... आणि कोणाकोणाला बोलवायचं ते पण सांगते. (सोना, समीर आणि राजीवकडे पाहून) तुम्ही तिघांनी प्रतिकला बरोबर घेऊन तुम्हां सगळ्यांसाठी कपड्यांची खरेदी करून घ्या... आणि राजीव रेखाला पण बोलवून घे.

सोना रागाने काही बोलायला उठणार तितक्यात समीरने तिला थांबवलं.

आजी: मिलिंद-नंदा चला माझ्या खोलीत, तुम्हाला कोणते कोणते दागिने द्यायचे आहेत ते देते म्हणत आजी खुर्चीला धरुन उठू लागली. मिलिंद तिला धरून घेऊन तिच्या खोलीत गेले. मागोमाग नंदा ही गेली.

***

 

सोना: (समीरला रागाने) का थांबवलं समीर तू मला....?

समीर: हे बघ, तुला कळत नाही आहे का, आजीची तब्येत ठीक नाही आहे... आणि अशात तिच्या कलेने आपल्याला गोष्टी घ्याव्या लागतील.

सोना: म्हणजे होऊ द्यायचा का प्रतिकचा साखरपुडा...?

समीर: सध्या तरी आपल्याकडे यावर काही सोल्यूशन नाही आहे... आजींनी आधीच सगळ्या गोष्टी ठरवून टाकल्या आहेत. 

सोना: अरे पण प्रतिकचं काय... तुला पण माहीत आहे ना... त्याचा किती जीव आहे तिच्यावर...

समीर: सोना मला हेच तर समजत नाही आहे... जर प्रतिकला प्रेरणाचं पसंत आहे, तिच्याशीच लग्न करायचं आहे मग त्याने आजीला दुसरं स्थळ का बघायला सांगितलं...?

राजीव: हो दीदी, मला ही जिजूंच म्हणणं पटतं आहे... आधी आपल्याला प्रतिक असा का वागला ते जाणून घ्यायला हवं... मगच काय तो निर्णय घेता येईल.. त्यांचं बोलणं ऐकून सोना रागारागाने तिच्या खोलीत निघून गेली. समीर तिला समजवण्यासाठी तिच्या मागोमाग गेला.

***

 

रात्री 7.30-8 च्या आसपास प्रतिक घरी आला. त्याचं एक आठवड्यात वजन खूप कमी झालं होतं. सोना दीदी आणि जिजूंना पाहून तो खूप खूश झाला. त्याने येताक्षणी दोघांना गळाभेट दिली.

सोना: (प्रतिककडे पाहत) किती बारीक झाला आहेस तू.....! खूप टेन्शनवालं काम होतं का... बेंगलोरला..?

प्रतिक त्याच्या टेन्शन मागचं खरं कारण कळू न देता फक्त मानेने हो म्हणाला.

सोना: (त्याला थकलेलं पाहून) तू फ्रेश होऊन ये... बोलू आपण नंतर...

प्रतिक: हां दीदी, आलोच मी... म्हणत तो त्याच्या रुममध्ये गेला.

****

 

प्रतिकने रूमचा दरवाजा उघडला. रुममध्ये समोर राजीवला अचानक पाहून तो दचकला.

राजीव: शॉक लागला ना...?

प्रतिक: (शर्टाची बटण काढत) हं... पण तू अचानक कसा...?

राजीव: तू फ्रेश तर होऊन ये मग बोलू आपण...

प्रतिक: बरं

प्रतिक फ्रेश होऊन आला. राजीव त्यावेळी रेखाशी प्रतिकच्या एंगेजमेंट बद्दल बोलत होता.

राजीव: (प्रतिकला आलेलं पाहून) रेखा मी नंतर बोलतो... आता प्रतिक आला आहे त्याच्याशी बोलतो आधी... म्हणत त्याने कॉल ठेवला.

प्रतिक: (बेडवर बसत) तुमच्या एंगेजमेंटला काय काय करणार ते बोलत होतात का...?

राजीव: ते जाऊदे, तू इतका कसा बारीक झालास... आणि हल्ली एकदम कॉन्टॅक्टचं पूर्ण बंद केलं...

प्रतिक: (विषय बदलत) ते सोड, तू अचानक...?

राजीव: अचानक नाही... ते आजीची तब्येत ठीक नव्हती... आणि त्यात त्या चक्कर येऊन मंदिरात पडल्या. नशीब त्यावेळी प्रेरणाने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. थोडा स्ट्रेस घेतल्याने त्यांची तब्येत बिघडली होती. सध्या डॉ म्हणाले की, आजी कोणत्याही गोष्टींमुळे स्ट्रेस घेणार नाही याची काळजी घ्या.. प्रतिक शांतपणे सगळं ऐकत होता. माझ्या प्रेरणाने आजीला ऍडमिट केलं..... प्रेरणा तू माझ्या फॅमिली मेम्बर्सची इतकी काळजी घेतेस... पण स्वतःला माझ्यापासून दूर का करते आहेस... तो स्वतःशीच बोलला. नकळत त्याच्या डोळ्यात पाणी आलं.

राजीव: (प्रतिकला हात लावून) प्रतिक सगळं ठीक आहे ना...? 

प्रतिक: (त्याच्यापासून नजर लपवत) हो सगळं ठीक आहे... कुठे काय...?

राजीव: मग हे डोळ्यांत पाणी कसं....? तुझं आणि प्रेरणाचं भांडण नाही ना झालं...? 

प्रतिक पुढे काही बोलणार इतक्यात नंदा प्रतिक आणि राजीवला जेवायला बोलवण्यासाठी आली. प्रतिक त्यामुळे राजीवशी काहीच बोलू शकला नाही.

 

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...