Jan 22, 2022
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-भाग-५८

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-भाग-५८

अस्तित्व एक संघर्ष

भाग-५८


शशी निघूया ना जेवायला जायला... सगळे तुझी वाट पाहत थांबले आहेत....देशपांडे आजी आजीजवळ येऊन म्हणाल्या. पण आजीचं लक्ष होतं कुठे... ती scooty वरच्या मुलीकडेच पाहत होती.

देशपांडे: (आजीला हात लावून) शशी कुठे हरवलीस... (मग scooty start करणाऱ्या मुलीकडे पाहत) अग ही तर आमच्याच बाजूच्या सोसायटीमध्ये राहते.. खूप गोड मुलगी आहे बरं का.... माझा नातू आतासा कॉलेजमध्ये आहे नाहीतर हिलाच माझ्या घरची नातसून करुन घेतली असती....

आजी: (तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत) निघूया ना...?

देशपांडे: हो मग... त्यासाठीच तर आले मी तुला शोधत शोधत... असं म्हणत देशपांडे आजी प्रतिकच्या आजींना scooty वरच्या मुलीबद्दल काही ना काही सांगू लागल्या. आजी शांतपणे सगळं ऐकून घेत होती. सगळेजण जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवून देशपांडे आजींच्या घराजवळच्या विठ्ठल मंदिरात जायला निघाले. कारमध्ये आजी शांतपणे डोळे मिटून होती. बाकीच्यांना वाटलं तिला थकवा जाणवत असावा म्हणून झोपली असावी. पण आजीला झोप कसली लागतेय तिच्या डोक्यात असंख्य विचार चालू होते.

****

 

प्रतिक काम करता करता प्रेरणाचाच विचार करत होता. काय कारण असेल त्याची प्रेरणा त्याच्याशी असं वागण्यामागे.... चेअरवर डोकं मागे ठेवून तो डोळे बंद करून विचार करत होता.

 

सगळं त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागलं... अलिबागला त्यांनी एकत्र घालवलेला वेळ... तिच्या डोळ्यात त्याला जाणवत असलेलं प्रेम... आणि त्याला गालावर मारल्यावर तिने लपवलेलं डोळ्यातलं पाणी... विचारात गुंग असताना त्याच्या लक्षात आलं हे सगळं तेव्हापासून होत आहे जेव्हापासून ती आजीला भेटून गेली. आजी तिला काही बोलली तर नसेल ना... त्याचं एक मन सांगत होतं जरुर आजी तिला काहीतरी बोलली असावी तर दुसरं मन सांगत होतं, आजी तर त्याला समोरुन विचारते प्रेरणाबद्दल... मग ती असं कसं करेल... तो स्वतःच्याच विचारांत अडकला असताना ऑफिसच्या लँडलाईनच्या आवाजाने भानावर आला. सरांशी लँडलाईन वर झालेल्या बोलण्याने तो राहिलेलं पेंडिंग वर्क पूर्ण करण्यासाठी पुन्हा कामाला लागला.

****

 

देशपांडे आजींकडे चहा वगैरे आटपून त्यांच्या घराजवळ असलेल्या मंदिरात बुवांच्या किर्तनासाठी आजीसकट सगळेजण पोहचले. बुवांनी विठूमाऊलीच्या सुंदर मूर्तीचं दर्शन घेतलं आणि आलेल्या सगळ्यांना नमस्कार करून कीर्तनाला सुरवात केली. कीर्तनाचा पहिला विषय बुवांनी सीताहरण निवडला होता. कीर्तन ऐकणारे सगळे देहभान विसरून त्यांचे कीर्तन कानांत साठवून घेत होते. आजीच्या मनात नकळत प्रतिक प्रेरणाचा विचार येऊ लागले. तिच्या मनाच्या दोन्ही बाजू आपापसात काय योग्य काय अयोग्य या विचारात होत्या. तिने विठ्ठलाच्या मूर्तीकडे पाहिलं आणि हात जोडून डोळे मिटून घेतले. बुवांचे शब्द तिच्या कानावर पडत होते. बुवांनी दुसरा विषय घेतला होता संत कान्होपात्रा...आजी पूर्णपणे देहभान हरपून ऐकत होती. तिच्या मनातला कल्लोळ हळूहळू शांत होत होता. बुवांचं कीर्तन आटोपलं तसं श्रवण करणारी मंडळी बुवांबरोबर विठूमाऊलीचा जयघोष करु लागली. आजी माऊलींच्या जयघोषाने भानावर आली आणि विठूमाऊलीकडे पाहून तिच्या चेहऱ्यावर काहीतरी गवसल्याचा आनंद झाला. ज्यांना दर्शन घ्यायचं होतं ते ते विठ्ठलाचं दर्शन घेऊन निघत होते. बुवा त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करत होते. देशपांडे आजींनी प्रतिकच्या आजीला हात लावून निघूया का म्हणून विचारलं.

आजी: मी थोडा वेळ इथेच बसू म्हणतेय... तू एक काम कर तू सगळ्यांची घरी जायची सोय कर आणि मिलिंदला सांग मला घ्यायला इथे ये म्हणून... आता पावणेसात झालेत म्हणजे तो येईपर्यंत साडेसात तरी होतील. 

देशपांडे आजी: शशी तुला बरं वाटतं आहे ना...?

आजी: हो आता उलट मला खूप मोकळं वाटतं आहे.

देशपांडे आजी: ठीक आहे मी मिलिंदला कॉल करुन कळवते असं म्हणत त्यांनी सगळ्यांबरोबर निघताना मंदिरातील पुजाऱ्यांना आजीकडे लक्ष ठेवायला सांगितलं.

***

 

देशपांडे आजींचा कॉल आल्यावर मिलिंद तयारी करून कार घेऊन निघाले. आजी मंदिरात शांतपणे डोळे मिटून होत्या. आज कितीतरी दिवसांनी त्यांच्या मनात चाललेला विचारांचा कल्लोळ शांत झाला होता. मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ थोडी कमी झाली होती. आजीने डोळे उघडले आणि पुन्हा एकदा विठूमाऊलीचे आभार मानत ती जागेवरून उठली. चालता चालता तिला घेरी आली आणि ती पडणार तेवढ्यात तिला कोणीतरी सावरलं... आजीच्या चेहऱ्यावर तिला सांभाळणाऱ्या व्यक्तीला पाहून किंचित हास्य आले आणि ती त्याच व्यक्तीचा हात हातात पकडून बेशुद्ध झाली.

***

 

आजी हॉस्पिटलमध्ये बेडवर शांत झोपून होती. तिच्या हातावर लावलेलं सलाईन त्याचं काम करत होतं. मिलिंद धावत हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी रिसेप्शनला त्यांना कॉल आल्याचं सांगितलं आणि लगेचच शशिकला राजाध्यक्ष कोणत्या वार्डमध्ये असल्याचं विचारलं. मागोमाग नंदाही ऑटोमधून हॉस्पिटलमध्ये आली.

नंदा: (घाबरुन मिलिंदला) आई कुठे आहेत...? आणि तुम्हाला कोणी कॉल केला होता.

मिलिंद: नंदा, मला रिसेप्शनमधूनच कॉल आला होता.... कोणत्या तरी सिस्टरचा...शांत हो आणि चल माझ्या बरोबर...

दोघेही आजीच्या रूममध्ये गेले. आजी शांत झोपलेली होती. ते दोघेजण तिच्या बाजूला बसले असताना डॉ त्यांच्या रुममध्ये आले.

मिलिंद: डॉ, यांना काय झालं...?

डॉ: तुम्ही यांचे कोण...?

मिलिंद: मी यांचा मुलगा... (मग नंदाकडे हात दाखवून) आणि ही माझी बायको... 

डॉ: काही घाबरण्याचं कारण नाही. कोणत्या तरी गोष्टीचा स्ट्रेस घेतल्यामुळे त्यांचा बीपी थोडा low झाला होता त्यामुळे त्यांना चक्कर आली.... यांच्या बरोबर ज्या होत्या त्यांनीच यांना इथे आणलं...

मिलिंद: (नंदाला) देशपांडे काकू असतील...

डॉ: नाही त्यांनी नाव काहीतरी वेगळंच सांगितलं होतं... (तेवढ्यात दरवाजाकडे लक्ष गेल्यावर) हे काय आल्याचं त्या..

मिलिंद, नंदा दोघांनी मागे वळून दरवाजाकडे पाहिलं. 

डॉ: सॉरी मिस... तुमचं नाव काय सांगितलं होतं तुम्ही....?

ती: प्रेरणा प्रधान..

डॉ: ओह येस, सॉरी मी विसरलो होतो... (मग मिलिंद, नंदाकडे पाहून) याच तुमच्या आईंना हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्या.

प्रेरणा: डॉ, आजी शुद्धीवर कधी येतील...?

डॉ: येतील लवकरच... anyways मि मिलिंद, काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही... उद्या सकाळी तुम्ही आजींना घेऊन जाऊ शकता.

मिलिंद: thank you doctor...

डॉ: thank you मला नको मिस प्रेरणांना म्हणा... त्यांनीच वेळेवर आजींना इथे आणलं... बरं मी येतो, आजी शुध्दीवर आल्या की त्यांचं चेकअप करु... म्हणत डॉ रूममधून निघाले. डॉ जाताक्षणी नंदाने प्रेरणाचा हात हातात घेतला.

नंदा: खरंच प्रेरणा, तू होतीस म्हणून आज आजी वेळेवर... त्यांना काही पुढे बोलवेना...प्रेरणाने त्यांच्या पाठीवरुन हात फिरवत शांत केलं.

प्रेरणा: काही नाही झालं आहे काकू आजींना... फक्त स्ट्रेसमुळे झालं आहे सगळं... आणि डॉ म्हणाले ना... की उद्या घेऊन जाऊ शकतात म्हणून...

प्रेरणाच्या सावरण्याने नंदा शांत झाली पण मिलिंदच्या मनात विचार येऊ लागला, प्रेरणाने स्वतः कॉल न करता... सिस्टरला का कॉल करायला सांगितलं...?

मिलिंद: (प्रेरणाच्या डोक्यावरुन हात फिरवत) thank you बेटा...

प्रेरणा: काका, thank you नका बोलू... त्या मला पण माझ्या आजीसारख्याच आहेत... आणि मी माझ्या आजीसाठी नक्कीच एवढं करु शकते...!!

मिलिंद: आणि आम्ही तुला तुझ्या आईबाबांसारखेच आहोत...

प्रेरणाने हे ऐकून चपापून वर पाहिलं... आता तिला जास्त वेळ थांबणं धोक्याचं वाटू लागलं... कारण जर भावनेच्या भरात ती आजी आणि तिचं बोलणं बोलून गेली असती तर... फक्त या विचारांनीच तिला घाम फुटला.

प्रेरणा: काकी काका, मी निघते आता... आईबाबा घरी वाट पाहत असतील... काही हवं असेल तर मला कॉल करा मी तातडीने येईन...

नंदा: प्रेरणा, आजी शुद्धीवर येइपर्यंत तरी थांब...

प्रेरणा: नको काकू... आईबाबा खरंच वाट पाहत असतील माझी..

मिलिंद: ओके हरकत नाही... मी तुला घरी सोडतो... (मग नंदाकडे पाहून) तू आई बरोबर थांब... मी आलो लगेच...

प्रेरणा: काका, मी जाईन घरी नीट...

मिलिंद: तुझ्या होणाऱ्या सासऱ्यांचं ऐकणार नाही का....? प्रतिकला कळलं की तुला मी घरी सुद्धा सोडलं नाही तर तो किती रागवेल... तर मग सोडतो मी चल... प्रेरणाला यावर काय बोलावं कळेना... तिने शेवटी त्यांच्या बरोबर घरी जाण्यासाठी हो म्हटलं आणि नंदाचा निरोप घेऊन मिलिंदबरोबर जायला निघाली. मिलिंदने तिला घरापर्यंत सोडलं आणि पुन्हा ते हॉस्पिटलमध्ये आले. 

***

 

मिलिंद आणि नंदा दोघेही आजीच्या शुध्दीवर येण्याची वाट बघत होते. थोड्याच वेळात आजी शुध्दीवर आली. तिने डोळे उघडून सगळीकडे पाहिलं पण तिला त्या दोघांशिवाय कोणीही दिसेना.

नंदा: आई, काही हवं आहे का...?

आजी: (कसंबसं म्हणाली) प्रेरणा कुठे आहे...?

मिलिंद: आई, तिचे आईबाबा तिची वाट पाहत होते म्हणून ती आम्ही आलो तसं आम्हाला सांगून घरी गेली.

मिलिंदचं बोलणं ऐकून आजी स्वतःशीच म्हणाली, पण मी शुध्दीवर येईपर्यंत तरी थांबायला हवं होतं तिने...

नंदा: अहो, डॉ ना सांगून या... आई शुध्दीवर आल्या आहेत त्या...

मिलिंद: हो हो आलोच.. म्हणत ते डॉ ना बोलवायला निघून गेले.

डॉ नी येऊन आजीचं चेकअप केलं आणि कोणत्या कोणत्या मेडिसिन द्यायच्या हे सिस्टरला सांगितलं. डॉ दोघांशी बोलत असतानाच राजीव टिफिन घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. डॉ चं बोलणं झाल्यावर ते नेक्स्ट पेशंटचं चेकअप करायला दुसऱ्या रुममध्ये गेले. 

मिलिंद: (राजीवला पाहून) तू इथे...?

राजीव: हां ते काकूंना आईने कॉल केला होता तेव्हा आजींबद्दल कळलं म्हणून मी आलो. आणि आईने हा टिफिन दिला आहे तुम्ही जेवून घ्या तोपर्यंत मी आजींना जेवण देतो.

नंदा: वहिनींना आमच्यामुळे त्रास झाला...

राजीव: काकू त्रास कसला यात...!! तुम्ही दोघांनी आधी जेवून घ्या बरं... मी आजींना जेवण देतो असं म्हणत त्याने प्रतिकच्या आईबाबांना जबरदस्तीने जेवायला भाग पाडले आणि तो आजीला जेवण भरवू लागला.

मिलिंद: राजीव, प्रतिकला यातलं काही सांगू नकोस... त्याची तिकडच्या कामामुळे आधीच दमछाक होत आहे आणि तो तसा ही उद्या संध्याकाळी येतोय म्हणाला.. मग तो घरी आल्यावर त्याला नंतर सगळं सांगता येईल.

राजीव: नाही सांगणार काका... आणि तसं ही माझं त्याच्याशी अलिबागवरून आल्यानंतर हल्ली बोलणं झालंच नाही आहे.

त्याचं बोलणं ऐकून आईबाबा दोघांना ही आश्चर्य वाटलं. पण प्रतिक असा का वागत असेल याचा अंदाज आजीला आला.

आजी: राजीव तू थांब आमच्याकडे काही दिवस... बरेच दिवस झाले तुझ्याशी बोलणं ही झालं नाही आहे.

राजीव: आजी तुम्ही आधी ठणठणीत व्हा मग मी काय आहेच गप्पा मारायला... (नंतर मिलिंदकडे पाहून) काका, सोना दीदीला यातलं काही सांगितलं का...?

मिलिंद: नाही काही सांगितलं... तसं ही उद्या प्रतिक येणार आहे म्हटल्यावर ती उद्या दुपारीच राहायला येणार आहे त्याला surprise द्यायला...

राजीव: पण काका हे सगळं झालं कसं...?

त्यावर मिलिंद यांनी कसं आजी घेरी येऊन पडल्या आणि कसं प्रेरणाने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ते सगळं सांगितलं.

राजीव: मग प्रेरणा कुठे आहे... मी तिला पाहिलं नाही...

नंदा: ती घरी गेली... तिचे आई बाबा तिची काळजी करत असतील म्हणून... राजीवला प्रेरणा अशी वागू शकत नाही हे माहीत होतं त्यामुळे नक्कीच मधल्या काळात काहीतरी घडलं आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो त्यावर काहीच नाही बोलला. रात्री आजीबरोबर नंदा थांबली. राजीव आणि मिलिंद दोघेही थांबायला बघत होते पण डॉ नी तशी कोणीच थांबायची आवश्यकता नसल्याचं म्हटल्यावर फक्त नंदा आजीला काही हवं असेल तर म्हणून थांबली.

****

 

दुसऱ्या दिवशी आजीला discharge देऊन घरी आणलं. प्रतिकला भेटूनच संध्याकाळी घरी जावं म्हणून राजीव त्यांच्याकडेच थांबला. आजी तिच्या खोलीतच बेडवर अशीच पडून होती. राजीव प्रतिकच्या आईबाबांबरोबर गप्पा मारत घरचं वातावरण खेळतं करत होता. तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजली. दरवाजावर सोना होती... नंदाला समोर बघून ती मिठी मारतच आत आली. तिच्यामागोमाग तिचे मि ही आत आले.

नंदा: अग सोड सोना, जावईबापू काय म्हणतील... ( मग सोनाच्या मि ना) या बसा ना जावईबापू... 

सोना: काही नाही म्हणणार... त्याला पण माहीत आहे मी किती मिस करते तुम्हा सगळ्यांना... तोपर्यंत आई दोघांना पाणी घेऊन आली.

सोनाचे मि: हो ना आई, प्रतिक समजून अजूनही मला झोपेतच तिच्या ड्रॉवर मधले स्केचपेन घेतले म्हणून मारत असते..

मिलिंद: (डोक्यावर हात लावत) अरे देवा, अजून पण ही हेच करते...

सोना: बाबा, तुम्ही पण ना...

तसे राजीवसकट सगळेजण हसू लागले.

सोना: (राजीवला पाहून) अरे तू कधी आलास... मी आले होते प्रतिकला surprise द्यायला... आणि इथे तर मलाच surprise मिळालं आहे...

राजीव: ते दीदी... तो पुढे काही बोलणार तितक्यात त्याला सोनाला आजीच्या तब्येतीबद्दल सांगणं योग्य वाटलं नाही... आणि तो बोलायचा थांबला.

सोना: थांब राजीव, तुझ्याशी नंतर बोलते मी.... आधी माझ्या डार्लिंग आजीला भेटून येते.

मिलिंद: सोना, आजीला आराम करु दे... नंतर बोल आईशी...

सोना: बाबा, काय झालं आजीला..? तसं मिलिंद यांनी तिला सगळं सांगितलं.

सोना: बाबा, तुम्ही मला हे आता सांगत आहात... मला तुम्ही दोघांनी एकदम परकं करुन टाकलं...

नंदा: असं काही नाही आहे... तू आज येणारच होतीस म्हणून आम्ही नाही काही सांगितलं... आणि आम्ही प्रतिकला पण यातलं काही सांगितलं नाही.

सोना: हं, मी आजीला बघून येते...असं म्हणत ती आजीच्या रुममध्ये निघून गेली. 

***

 

आजीला तिच्या रुममध्ये अशीच बेडवर पडून असलेलं पाहून सोनाने आजीला आवाज दिला.

सोना: hey my darling, what happend to you...

आजी तिला आलेलं पाहून बेडवरुन उठून उशीला टेकून बसली.

सोना: (सवयीप्रमाणे तिच्या गालांवरून हात फिरवत) काय झालं आजी...? बाबा म्हणाले, तुझी तब्येत ठीक नाही...

आजी: हं, अग काही नाही ग वयोमानाने ते व्हायचंच... 

सोना: असं कसं...तुला एकदम स्ट्रॉंग रहायचंय... अजून तुला प्रतिकचं लग्न बघायचंय... आणि अजून तुला पणजी व्हायचंय... इतक्यात नाही हा आजारी बिजारी पडायचं... पुन्हा असं काही मला ऐकायला मिळालं तर बघ माझ्याशी गाठ आहे... मग मी तुला इथे ठेवणारच नाही डायरेक्ट प्लेनने आमच्या बरोबर इंडियाच्या बाहेर...(सोना आजीला action करून सांगू लागली)

आजी: नको ग बाई... माझं आपलं घरचं बरं... मला नाही तो तिकडचा हिवाळा सोसवायचा...

सोना: (हसत) नाही यायचं ना मग लवकर ठीक हो... आपल्याला प्रतिकच्या लग्नाची शॉपिंग पण करावी लागेल ना... ते बाकी एक बरं झालं, तुला चक्कर आली तेव्हा नेमकी प्रेरणा तिकडे होती... बहुतेक तू म्हणतेस ना देव असं काही घडलं की आपल्या मदतीला कोणी ना कोणी पाठवतच असतं... तर इथे तुझ्या देवाने तुझ्या नातसूनेला पाठवलं...

आजी: (तिचं सगळं ऐकून थोडा वेळ शांतच राहिली मग म्हणाली) प्रेरणा कशी आहे ग स्वभावाला...

सोना: एकदम मस्त... समजूतदार... मला आवडली आपल्या प्रतिकची चॉईस... तुला सांगू आजी... राजीव कडून जेव्हा मला कळलं की प्रतिकला प्रेरणा आवडते तर मग मी विचार केला, बघूया तर आपल्या भावाची चॉईस... शेवटी तूच म्हणतेस ना, व्यक्तीला एकदम सोन्यासारखं पारखून घ्यावं... मग मी पण तेच केलं... सोना बराच वेळ प्रेरणाबद्दल आजीला खूप काही सांगत होती आणि आजी मन लावून ऐकत होती. 

 

 

क्रमशः

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...