अस्तित्व एक संघर्ष-भाग-५४

It is a story of a girl who faced such a situation where she totally destroyed and at one point she fight for her identity.

अस्तित्व एक संघर्ष

भाग-५४


आदिने कार त्यांच्या अपार्टमेंटपाशी आणून थांबवली. त्याने प्रेरणाच्या हाताला हात लावून तिला भानावर आणले. प्रेरणाने तिचे डोळे पुसले आणि ती कारमधून उतरली. दोघेही घरी आले त्यावेळी मालगुडे फॅमिली प्रेरणाच्याच घरी होती त्यामुळे आदिला ही प्रेरणाच्या घरी पहिलं जावं लागलं. प्रेरणा घरी कोणाशीही न बोलता सरळ रुममध्ये निघून गेली. रडून लाल झालेले डोळे ती कोणापासूनही लपवू शकली नाही. तिला असं जाताना पाहून अनू सकट सगळ्यांनी आदिकडून काही तरी उत्तर मिळेल या आशेने आदिकडे पाहिलं.

आदि: अनू, आईबाबा आणि काकीकाका तुमच्या सारखाच मला ही हा प्रश्न सतावतो आहे.... असं म्हणत त्याने सगळी गोष्ट सांगितली. ती ऐकून आईबाबा दोघेही प्रेरणाच्या रुमच्या दिशेने तिच्याशी बोलायला गेले. प्रेरणाने रूमचा दरवाजा लावला नसल्याने बाबांनी खुणेने आईला तिच्याशी बोलून बघ म्हणून सांगितलं. आईने तिच्याशी हर तऱ्हेने बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण गुडघ्यात स्वतःचा चेहरा लपवून ती रडतच होती. शेवटी आई बाबांना सांगायला पुन्हा बाहेर लिविंग रुममध्ये गेली. बाबा, मालगुडे काकीकाका, आदि, अनू सगळे टेन्शनमध्येच होते. 

आई: अहो, ती नाही हो काही बोलत आहे, मला खूप काळजी वाटते आहे तिची... सारखी रडतच आहे... 

बाबा: थांब मी जाऊन बोलतो तिच्याशी... ते जाणार तेवढ्यात अनूने त्यांना आवाज दिला.

अनू: काका, तुमची हरकत नसेल तर मी एकदा बघू का बोलून प्रेरणाशी...

बाबांना अनू आणि प्रेरणाची किती घट्ट मैत्री आहे हे माहीत असल्याने त्यांनी तिला प्रेरणाशी बोलण्याची परवानगी दिली. अनू प्रेरणाच्या खोलीत जाऊन तिच्या बाजूला बसली. तिचा गुडघ्यात लपवलेला चेहरा तिने वर केला. प्रेरणाचे रडून रडून डोळे सुजले होते.

अनू: (तिने तिचे दोन्ही हात तिच्या हातात घेतले) प्लीज बोल ना प्रेरणा, का अशी रडते आहेस... तुझे आईबाबा पण किती टेन्शन मध्ये आहेत तुला असं पाहून...

प्रेरणा तिचे हात सोडवत हुंदके देऊन पुन्हा रडू लागली.

अनू: (काही अंदाज लावत) काही झालं का, प्रतिकच्या घरी... कोणी तुला काही बोललं का...? आजी काही बोलल्या का...?

तू आज त्यांनाच भेटायला जाणार होतीस म्हणालेली मला मघाशी... बोल ना प्लीज यार, काहीतरी बोल... तुला असं नाही पाहवत ग आम्हाला... प्रेरणाचं रडणं काही थांबत नव्हतं... शेवटी न राहवून अनू म्हणाली, मी प्रतिकच्या घरी कॉल करुन विचारु का...? काय झालं ते...?

प्रेरणाने हे ऐकून घाबरुन मान वर केली आणि रडतरडतच मानेने नको म्हणाली. तिच्या अशा वागण्याने अनूच्या हे लक्षात आलं की प्रेरणाच्या रडण्याचं कारण प्रतिकच्या घराशीच निगडित आहे... पण नक्की काय...? अनूने मनाशी काहीतरी विचार केला आणि प्रेरणाला असंच बोलतं करता येईल असा विचार केला.

अनू: (तिच्या दंडाना धरुन हलवत) प्रेरणा, तुला तुझ्या प्रतिकची शप्पथ आहे... तुला तुमच्या प्रेमाची शप्पथ आहे... सांग मला नक्की काय झालं ते...?

अनू बराच वेळ झाला अजून बाहेर आली नाही म्हणून प्रेरणाची आई तिच्या रुमच्या दिशेने आली.. तेवढ्यात त्यांना प्रेरणाचा आवाज ऐकू आला, प्लीज अनू,  मला नको ग शप्पथ देऊस... सांगते मी तुला काय झालं ते... प्रेरणाचं बोलणं ऐकून आई तिथेच बाहेर थांबली. कारण त्यांना भिती होती की जर त्या आत गेल्या आणि प्रेरणाने अनूला काहीच नाही सांगितलं तर... त्याक्षणी त्यांना प्रेरणाच्या अशा वागण्याचं कारण जाणून घेणं जास्त महत्त्वाचं वाटत होतं.

प्रेरणाने अनूला प्रतिकच्या घरी गेल्यावर घडलेली सगळी गोष्ट सांगितली. आजीचं मत सांगताना प्रेरणाचा आवाज खूप थरथरत होता. अनूने तिला जवळ घेत मिठी मारून तिच्या पाठीवरुन हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. अनूच्या आणि बाहेर थांबलेल्या आईच्या ही सगळं ऐकून डोळ्यांतून पाणी येऊ लागलं. आईने कसंबसं स्वतःला सावरलं आणि ती भिंतीचा आधार घेत लिविंग रुममध्ये खुर्चीवर येऊन बसली. त्यांना असं पाहून बाबा आणि मालगुडे काकू ही तिच्याजवळ गेले.

बाबा: अग काय होत आहे तुला...? तुझं बोलणं झालं का प्रेरणाशी...?

काकू: (पाणी आणून त्यांना प्यायला दिलं) वहिनी, शांत व्हा आणि हे पाणी प्या... आई कसंबसं पाणी प्यायली.

आई: अहो आपली प्रेरणा... (आईला पुढे काही बोलवेना..)

बाबा: (काळजीने) प्रेरणाचं काय...?

आई: काय माझ्या लेकीच्या नशिबात लिहिलं आहे काही समजत नाही... आता कुठे तिच्या आयुष्यात सुखाचे चार दिवस येत होते... तिचा बोलता बोलता हुंदका अनावर झाला.

मालगुडे काकूंनी आईच्या पाठीवरून हात फिरवला. 

बाबा: अग बोल ग काहीतरी.... ती तिकडे काही सांगायला तयार नाही आणि तू आता तिथून आली तू ती रडतच आहेस... सांग ग मला मी पण बाप आहे तिचा... मला पण माझ्या लेकीला असं नाही बघवत ग...

मालगुडे काकूंनी आईच्या हाताला हात लावून त्यांना धीर देत सांगा म्हणून इशाऱ्याने सांगितलं. आई काही बोलणार तितक्यात मालगुडे काकांना आपण तिथे थांबावं की नाही हे समजेना ते काकूंना आणि आदिला म्हणाले, आपण जाऊया का घरी... कदाचित आपण घरी गेलो की वहिनी दादांशी मोकळेपणाने बोलू शकतील. त्यांचं बोलणं ऐकून काकू आणि आदि घरी जायला निघणार तोच आईने त्यांना थांबायला सांगितलं. आईने कसंबसं सगळ्यांना प्रेरणाचं अनूला सांगताना ऐकलेलं बोलणं सांगितलं. 

आईचं बोलणं ऐकून सगळेच शांत झाले. कोणीही कोणाशी बोलेना. असं काही घडेल असं कोणालाही अपेक्षित नव्हतं.

आई: जे घडलं त्या दिवशी त्यात काय दोष होता माझ्या मुलीचा...? तिला यातून सावरुन नवीन आयुष्य जगायचा अधिकारच नाही का...?

बाबा: शांत हो, आपणच जर असं रडलो तर प्रेरणाला कसं सावरणार...?

मालगुडे काका काकू आईबाबांना समजावत होते. आदि सगळं ऐकून खूप भडकला होता.

आदि: मी आताच्या आता त्या प्रतिक राजाध्यक्षच्या घरी जाऊन त्याच्या आजीशी जाऊन बोलणार आहे... त्या असं कसं बोलू शकतात... 

मालगुडे काकी काकांना आदिचा राग खूप चांगलाच माहीत होता. मागच्या वेळी भांडण झाल्यावर असंच भडकून तो अनूला घेऊन वेगळा राहायला गेला होता. 

मालगुडे काकू: थांब आदि, तू कुठेही जाणार नाही आहेस... आपण यावर काहीतरी मार्ग काढू...

आदि: आई मार्ग हा एकच... त्याच्या घरी जाऊन त्याच्या आजीशी बोलायचं...

कोणी पुढे त्यावर काही बोलणार तेवढ्यात त्यांच्या आवाजाने प्रेरणा आणि अनू बाहेर आल्या.

प्रेरणा: आदि दादा, कुठे चालला आहेस तू...?

आदि: (प्रेरणापासून लपवत) प्रेरणा, ते काही नाही ग माझं थोडं काम होतं मित्राकडे .. त्याच्या घरी जातोय..

प्रेरणा: दादा, मी आणि अनूने तुमचं मघासच बोलणं ऐकलं आहे...

आदि: मग प्रेरणा, तू मला याक्षणी थांबवू नकोस... मी प्रतिकच्या घरी जाऊन त्याच्या आजीशी बोलणार आहे.. 

अनू: आदि, आणि जाऊन काय बोलणार आहेस तू...?

आदि: ते मी जाब विचारणार आहे...

प्रेरणा: दादा, थांब नको जाऊस...

आदि: का प्रेरणा, तुला नाही वाटत तुझं प्रतिक बरोबर लग्न व्हावं. तुमचा ही सुखाचा संसार व्हावा...

प्रेरणा: हो वाटतं मला, पण मला आजींच्या मनाविरुद्ध प्रतिकची बायको नाही व्हायचं आहे. तू त्यांना समजावशील ही आणि त्या कदाचित हो ही म्हणतील.... पण त्यांचं आणि माझं नातं त्यांच्या साठी तडजोडीचं असेल... आणि मला ते नको आहे. मला त्यांनी मनापासून स्वीकारावं अशीच माझी इच्छा आहे.

आदि: प्रेरणा का अशी स्वतःला फसवतेय... तुला ही हे माहीत आहे त्यांना तुला मनापासून स्वीकारायला अवघड आहे...

प्रेरणा: दादा, मान्य आहे अवघड आहे पण त्या कधीच बदलणार नाहीत असं नाही आहे ना...? कधीतरी त्यांचे माझ्या बाबतीतले विचार बदलतील आणि त्या मला स्वीकारतील.

आदि: प्रेरणा, तुला वाटतं तितकं हे सोपं नाही आहे... कदाचित त्या प्रतिकचं दुसऱ्या मुलीशी लग्न ही लावून देतील... मग.. मग काय करशील तू... आदि पोटतिडकीने तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता.

प्रेरणा: (काही वेळ शांतच राहून मग म्हणाली) मग मी प्रतिकच्या आयुष्यातून कायमचं निघून जाईन...आणि हेच मी माझं नशीब म्हणून समजेन... बोलताना तिचा आवाज थरथरत होता. पुढे ती काहीच न बोलता तिच्या रुममध्ये निघून गेली. सगळेच तिच्या या बोलण्याने स्तब्ध झाले.

***

प्रतिक त्याचं ऑफिसचं काम पूर्ण करून प्रेरणाला पाहायला आजीच्या रुममध्ये गेला.

प्रतिक: आजी, प्रेरणा कुठे आहे..?

आजी: अरे मघाशीच ती रुममधून बाहेर गेली. नंदाला विचार... नंदाला माहित असेल बघ... 

आजीच्या बोलल्याप्रमाणे प्रतिक आईला विचारायला गेला.

प्रतिक: आई, प्रेरणा कुठे आहे...?

आई: आजीच्या रुममध्ये आहे ना...?

प्रतिक: नाही आई, मी आताच तिथून आलोय...

आई: मग कुठे गेली...? घरी अशी न सांगता कशी जाईल...

प्रतिक: थांब आई मी कॉल करतो तिला... प्रतिकने कॉल केला तर त्याला प्रेरणाचा नंबर switch off लागला.

आई: काय रे, लागला का कॉल..

प्रतिक: आई, नंबर switch off येतोय.

त्यांच बोलणं चालू असेपर्यंत बाबा घरी आले.

बाबा: काय रे, काय झालं एवढं काळजीत का दिसत आहात..?

प्रतिक: ते बाबा, प्रेरणाला कॉल लावतोय पण तिचा नंबर switch off येतोय.

बाबा: अरे, मग तिच्या घरातल्या कोणाच्या तरी मोबाईल वर कॉल करुन बघ... कदाचित मोबाईलची बॅटरी low झाली असेल तर switch off झाला असेल.

प्रतिक: बाबा, प्रेरणा आजीच्या रूममधून घरीच गेली असेल ना...? म्हणजे ती घरी जाताना ना आईला ना मला नाही आजीला काही सांगून गेली.

बाबा: (काही विचार करत) अरे काळजी नको करुस... तू तिच्या घरी कॉल करून बघ. मी आलोच तोपर्यंत.

प्रतिकने बाबांच्या सांगण्याप्रमाणे विवेकला कॉल केला. विवेक त्याच्या मित्राच्या घरुन नुकताच त्यांच्या अपार्टमेंट मध्ये पोहचला होता.

विवेक: हॅलो हां सर बोला, काही काम होतं का..?

प्रतिक: अं हो... तू घरी आहेस...?

विवेक: पोहचेन just...

प्रतिक: ओके घरी गेल्यावर मला लगेच कॉल करशील का...? मला प्रेरणाशी बोलायचं आहे...

विवेक: ओके चालेल सर... म्हणत त्याने कॉल ठेवला.

***

प्रतिकचे बाबा आजीच्या रुममध्ये गेले. त्यांच्या मनात का कोण जाणे प्रेरणाच्या अचानक न सांगता घरी जाण्यामागे आजीचाच हात आहे असं वाटतं होतं.

बाबा: आई, मला तुझ्याशी बोलायचं आहे.

आजी: बोल ना मिलिंदा, काय बोलायचंय..?

बाबा: आई, तू प्रेरणाशी नक्की काय बोललीस...?

आजी: तुला या गोष्टी जाणून घेऊन काय करायचंय..?

बाबा: आई, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे..

आजी: ते माझं आणि प्रेरणाचं खाजगी बोलणं होतं.

त्या दोघांचं बोलणं चालू असतानाच प्रतिकला विवेकने कॉल केला.

विवेक: हो सर, आलो मी घरी... दिदी आहे तिच्या रुममध्ये... तिच्या मोबाईलची बॅटरी उतरल्यामुळे तिचा मोबाईल switch off झाला होता. थांबा मी दीदी कडे देतो. असं म्हणत त्याने प्रेरणाला कोणाचा कॉल आहे हे न सांगताच direct कॉल दिला.

प्रेरणाने स्क्रीनवर प्रतिकचं नाव बघितलं पण एकदम अचानक विवेकने कॉल दिल्याने तिला कॉल attend करण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रतिकने समोरून प्रेरणाचं कॉल वर असल्याचं लक्षात घेऊन direct बोलायला सुरुवात केली.

प्रतिक: प्रेरणा, अशी कशी तू मला न सांगताच घरी निघून गेली....मला नाहीतर आईला किंवा आजीला तरी काहीतरी सांगून जायचं होतं... तुझा नंबरही switch off येतोय... तुला कल्पनाही नाही आहे की मी किती टेन्शनमध्ये होतो. आता बोल ना काहीतरी... ती पुढे काहीतरी बोलणार तेवढ्यात तिला प्रतिकच्या बाबांचा आवाज प्रतिकच्या दिशेने ऐकू आला.

बाबा: प्रतिक, आजी चक्कर येऊन पडली अचानक... लवकर जाऊन डॉक्टरांना बोलावून घे.

प्रतिकने बाबांचं बोलणं ऐकून प्रेरणा नंतर कॉल करतो म्हणत लगेच कॉल ठेवून टाकला.

कॉल ठेवल्यावर प्रेरणाच्या डोक्यात विचार येऊ लागले, आजी चक्कर येऊन पडल्या... मी तर या गोष्टीला जबाबदार नाही ना...? त्यांनी माझ्यामुळे तर टेन्शन नाही ना घेतलं. देवा, प्लीज आजींना ठीक कर...सगळे खूप प्रेम करतात त्यांच्यावर... त्यांना माझ्यामुळे आणखी त्रास होऊ देऊ नकोस.... मी त्यांच्या मनाप्रमाणेच वागेन पण त्यांना ठीक कर लवकर...तिने मनात देवाची प्रार्थना केली.

***

आजीचं डॉ नी येउन चेकअप केलं.

बाबा: डॉ, काय झालं आईला, अचानक कशी चक्कर आली.

डॉ: ते ताप येऊन गेल्यामुळे त्यांना जो अशक्तपणा आला आहे त्यामुळेच त्यांना चक्कर आली.. बाकी तसं काही घाबरण्याचं कारण नाही. फक्त त्या स्ट्रेस फ्री कशा राहतील एवढं बघा. या काही गोळ्या आणि liquid लिहून देतोय ते दुपार रात्र असं जेवून झाल्यावर द्या. आणि काळजी करु नका, येतील थोड्या वेळात शुध्दीवर..

बाबा: बरं डॉ... प्रतिक डॉ ना सोडून ये.

प्रतिक डॉ ना सोडून त्यांची फी देऊन परत घरी आला.

बाबा: काय रे काय झालं, असा काय चेहरा पडलाय... डॉ म्हणाले ना, आजी ठीक आहे म्हणून... थोडा अशक्तपणा आहे इतकंच.

प्रतिक: (बाबांच्या बाजूला बसत) बाबा, मला उद्या लगेच बेंगलोरला जावं लागणार आहे.

आई: सकाळपासून तू काही बोललास नाही...

प्रतिक: आई, मघाशी सरांनी कॉल केला होता तो याचमुळे...

बाबा: पण हे असं अचानक का जावं लागत आहे..?

प्रतिक: ते बाबा तिकडच्या ऑफिसमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळेच मला जावं लागणार आहे. पण आता आजीची तब्येत पण ठीक नाही आहे.

बाबा: अरे आम्ही आहोत ना घरी... तू बिनधास्त जा...

आई: जा चल पॅकिंग करुन घे... उगाच परत घाई नको व्हायला...

प्रतिक: हो आई... म्हणत तो तयारीला लागला.

***

प्रतिकने जेवण आटपल्यावर पुन्हा एकदा प्रेरणाला कॉल केला. तिचा मोबाईल अजूनही switch off येत होता. त्याने शेवटी तिला whatsapp वर तो उद्या बेंगलोरला जात असल्याचा मेसेज केला. विवेकला आईबाबांकडून प्रेरणाचं आजीबरोबर झालेलं बोलण समजलं.  प्रेरणाचा मोबाईल switch off असण्यामागे हेच कारण असणार हे त्याच्या लक्षात आलं. विवेक हे सगळं ऐकून पुरता गांगरून गेला होता.

***

प्रेरणा एकटीच तिच्या रुममध्ये बसून एका बॉक्समध्ये प्रतिकने तिला ऑफिस जॉईन केल्यापासून ते आतापर्यंत दिलेले सगळे गिफ्ट्स ठेवत होती. सगळे गिफ्ट्स ठेवून झाल्यावर तिची नजर हातातल्या प्रतिकने घातलेल्या रिंगवर गेली. ती रिंग घालताना त्यावेळी तिने मनाशी ठरवलं होतं की ही रिंग आता कधीच बोटातून काढणार नाही पण आज तीच त्यांच्या प्रेमाची निशाणी तिला तिच्यापासून दूर करावी लागणार होती. तिने रिंगला एकवार पाहिलं आणि तिला किस करत तिने बॉक्समध्ये ठेवली. रिंग काढून झाल्यावर तिचं लक्ष त्या मोकळ्या बोटाकडे गेलं. रिंगने बोटांवर निशाण उमटलं होतं...तिच्या मनात आलं, फक्त या रिंगने माझ्या बोटांवर रिंगची दिसून येईल अशी निशाणी उमटली आहे.... तर मी माझ्या मनातल्या प्रतिकवरच्या प्रेमाला कसं दूर करु शकणार आहे... कसं मी जगू शकणार आहे त्याच्या शिवाय... फक्त प्रतिक पासून दूर व्हायचयं याचं विचाराने प्रेरणाच्या डोळ्यांतून पाणी आलं. तिने त्याक्षणी तिच्या आसवांना मोकळं होऊ दिलं... तिच्या मनात शब्द घुमू लागले...

कसं सावरू मी मना...

कसं जगू मी तुझ्याविना...

कसं मी होऊ दूर तुझ्यापासून...

कसं मी जगणार तुझ्यावाचून...

क्रमशः

(प्रतिक बेंगलोरला असताना प्रेरणा त्याच्याशी बोलेल का..? प्रतिक प्रेरणाचं त्याच्यापासून दूर राहण्या मागचं कारण समजून घेईल का...? आजी पुढे अजून काय नवीन गोष्ट प्रतिक आणि प्रेरणाच्या बाबतीत करणार आहे..?  जाणून घ्यायला वाचायला विसरू नका... अस्तित्व एक संघर्ष... )

🎭 Series Post

View all