अस्तित्व एक संघर्ष
भाग-४८
प्रतिक अलिबागला गेल्यावर आजीने प्रतिकच्या आईबाबांना तिच्या रुममध्ये बोलावून घेतलं.
आजी: (शांतपणे) बसा... तुम्ही दोघेही... मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे...
बाबा: हो आई बोल ना...!!
आजी: मी जे काही विचारणार आहे त्याची मला अगदी खरी खरी उत्तरं हवी आहेत...
आजीच्या चेहऱ्यावरचे भाव बघून दोघेही घाबरलेच होते.. दोघेही एकमेकांना पाहत मानेनेच हो म्हणाले.
आजी: मला आपल्या प्रतिक बद्दल बोलायचं आहे..
बाबा: हो आई बोलना... आई बाबांचे कान आजी काय बोलतेय याच्यासाठी टवकारले होते.
आजी: आपल्या घरी पूजेच्या दिवशी प्रतिकच्या ऑफिसमधल्या त्याच्या बरोबर काम करणाऱ्या ज्या मुली आल्या होत्या... त्यातली जी माझ्या बाजूला बसून माझ्याशी बोलत होती... तिचं नाव काय होतं...?
आजीचा आवाज खूप गूढ जाणवत होता. दोघेही काही बोलनात हे पाहून आजी म्हणाली, मी काहीतरी विचारलं आहे...मिलिंद, नंदा काही बोलणार आहात की नाही...
मिलिंद (बाबा) : आई ते...तिचं... नाव... ( काय होतं ग...असं म्हणत त्यांनी प्रतिकच्या आईकडे पाहिलं) तसं आईने प्रतिकच्या आईकडे म्हणजे नंदाकडे पाहिलं.
नंदा: आई तिचं नाव प्रेरणा... पण आई तुम्ही अचानक आम्हाला तिच्या बद्दल का विचारत आहात...? (प्रतिकच्या आईने कशीबशी हिंमत करुन आजीला विचारलं)
आजी: (काहीशी रागात) माझा नातू कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात पडला आहे... माझ्या मुलाला आणि सुनेला त्याबद्दल माहीत असूनही ते दोघेही माझ्यापासून लपवून ठेवतात याला काय म्हणावं मी...?
मिलिंद: (घाबरत) ते आई आम्ही तुला सांगणारच होतो... प्रेरणाने प्रतिकला होकार दिल्यावर...
आजी: (रागात) पण माझ्यापासून लपवून ठेवावं असं का वाटलं तुम्हाला...? की मी म्हातारी झाले म्हणून मला गृहीत तुम्हाला धरावं असं वाटलं नाही.
नंदा: आई असं नका हो बोलू... आम्ही तुम्हाला सांगणारच होतो...
मिलिंद: हो आई, नंदा खरं बोलतेय...
आजी: हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे... मिलिंद आणि नंदा...
आजीच्या आवाजाचा पारा चढला होता... ती काहीच न बोलता सरळ देवघरात निघून गेली आणि प्रतिकचे आईबाबा ही तिच्या मागोमाग देवघरात गेले. आजीने डोळे बंद करून हातात जपमाळ घेउन जप करायला सुरवात केली होती. दोघेही पुन्हा लिविंग रुममध्ये आले.
मिलिंद: नंदा, मला वाटतं नाही ग... आई आपलं उत्तर ऐकल्या शिवाय गप्प बसेल असं...
नंदा: मला त्याचीच भीती वाटते आहे... प्रेरणा बद्दल खरं कळलं तर आई ऐकतील का... प्रतिक आणि तिच्या लग्नासाठी...?
मिलिंद: तू एक काम कर... तिच्या आवडीचा बेत कर जेवणाचा आज सगळा... म्हणजे तिचा राग शांत होईल थोडातरी... मग आपण बोलू तिच्याशी...
नंदा: बरं... मी करते जेवण... एक विचारु..?
मिलिंद: हो विचार...
नंदा: आपण प्रतिकला कॉल करुन सांगूया का...?
मिलिंद: नको नंदा... त्याला आल्यावरच सांगू... त्याला तिथे एन्जॉय करू दे... हे कळलं तर तो आजीचाच विचार करत बसेल...तो घरी आल्यावर बोलू आपण त्याच्याशी..
आजी दुपारपर्यंत देवघरातच बसून होती. जेवणाची वेळ झाली तसं प्रतिकच्या आई बाबांनी तिला तिच्या दोन्ही नातवांची शपथ घालून जेवणाच्या टेबलवर जेवायला भाग पाडलं. आजी जेवताना दोघांशी ही काही बोलत नव्हती.
नंदा: आई, बोला ना... असं तुमचं गप्प गप्प राहणं सहन होत नाही हो आम्हाला...
मिलिंद: (आजीच्या हाताला हात लावून) आई बोलना ग...
आजी: मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दोघे देणार असाल तरच आणि तरच मी तुमच्याशी बोलेन.... आणि आज माझ्या नातवांची शपथ दिली म्हणून मी आज जेवते आहे पण पुन्हा माझ्याशी असा शपथांचा भावनिक खेळ खेळू नका... आजीच्या आवाजावरुन ती दुखावली असल्याचं दोघांच्या ही लक्षात आलं.
तिने तिचं जेवण आटपलं आणि ती जागेवरुन उठून सरळ तिच्या खोलीत गेली. तिच्या मागोमाग नंदा आणि मिलिंद ही जेवण आटपून उठले आणि आजीच्या खोलीत गेले.
आजी तिच्या खोलीत असलेल्या त्यांच्या फॅमिली फोटोला हातात घेऊन पाहत बसली होती.
आजी: (स्वतःशीच) आज माझ्या मुलाने, मुलीसारख्या सुनेने आणि नातवाने मला एकदम परकं करुन टाकलं.. तिचे ते शब्द नंदा आणि मिलिंद दोघांच्या ही कानावर पडले. दोघांना ही आजी पासून आपण प्रेरणा बद्दल लपवून ठेवलं याचं वाईट वाटलं. नंदाने मिलिंदच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना मानेनेच आजीला आपण सांगूया म्हणून सांगितलं. दोघेही आजीसमोर येऊन उभे राहिले. आजीने त्यांना पाहिलं आणि स्वतःचे डोळे पुसून घेतले.
मिलिंद: (खाली बसून आजीचा हात हातात घेऊन) आई मला माहित आहे ग... तू आमच्या वागण्याने दुखावली आहेस ते... पण आम्ही असं का केलं ते तरी एकदा समजून घे ग..
नंदा: हो आई, त्यावेळी आम्हाला प्रतिकची अवस्था बघून तसंच करावं असं वाटलं. आजी दोघांचं ही बोलणं मन लावून ऐकत होती.
मिलिंद: आई, प्रतिकला त्याचं प्रेरणावर जीवापाड प्रेम आहे हे जाणवलं तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती ग... आणि ती शुध्दीवर कधी येईल याची डॉ ना ही काही कल्पना नव्हती. आम्हाला वाटलं ती पूर्णतः ठीक झाल्यावर जेव्हा प्रतिक तिला त्याच्या मनातलं तिला सांगेल तेव्हाच आम्ही तुला लगेच सांगणार होतो.
आजी: हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती पण कशासाठी...?
मिलिंद: ते आई... ते जाऊदे ग... ते तितकं महत्त्वाचं नाही आहे... ती आता ठीक झाली आहे...
आजी: महत्त्वाचं नाही हे ही तुझं तूच ठरवलंस का आता...? माझ्या नातवाचं ज्या मुलीवर प्रेम आहे... ती मुलगी हॉस्पिटलमध्ये का होती हे मी जाणून नको का घ्यायला... आजीच्या आवाजातला राग दोघांना ही जाणवत होता.
आजी: (रागाने) आता बोलणार आहेस की नाही काही... की मी तिच्या आईबाबांनाच विचारायला हवं का आता...?
मिलिंदच्या खांद्यावर नंदाने हात ठेवून धीर दिला. कधीतरी त्यांना या गोष्टीला सामोरं जावंच लागणार होतं आणि आज ती वेळ आली होती.
मिलिंदने हिंमत करुन प्रेरणाच्या बाबतीत घडलेला प्रसंग आणि त्यानंतर तिने स्वतःला कसं यातून बाहेर काढलं... हे सगळं आजीला सांगितलं. सगळं ऐकून आजी रागाने तिच्या जागेवरुन उठली.
मिलिंद: आई, बोलना काहीतरी...
आजी: काय बोलावं मी अशी तुमच्या दोघांची अपेक्षा आहे... त्या मुलीच्या बाबतीत जे काही झालं ते खरंच खूप वाईट झालं... पण म्हणून मी तिला माझी नातसून करावी का...? राजाध्यक्ष घराण्याचं नाव मला अशी नातसून आणून खाली आणायचं नाही आहे.
नंदा: पण आई त्यात तिची चूक काय होती...
आजी: (रागाने) नंदा, मान्य आहे तिची यात काहीच चूक नव्हती पण हा आपल्या घराण्याच्या अब्रूचा प्रश्न आहे. इतकी वर्षे जे लोक आपल्याला सन्मान देत आले आहेत तेच लोक आपल्याला नाव ठेवायला ही कमी करणार नाहीत.
मिलिंद: पण आई आपल्या प्रतिकचं तिच्यावर प्रेम आहे ग... तू त्याचा तरी एकदा विचार कर...
आजी: मी प्रतिकसाठी एकाहून एक सरस स्थळ शोधेन पण मी त्या मुलीला माझ्या घरची नातसून करणार नाही... आणि आता तुम्ही दोघेही बाहेर जा... मला एकटीला थोडा वेळ सोडा...
आजीच्या बोलण्याने दोघेही तिच्या खोलीबाहेर निघाले.
रात्री आजी जेवल्याच नाहीत.... त्यामुळे प्रतिकचे आई बाबा ही जेवले नाहीत. नंदाने जबरदस्तीने कसंबसं आजीला दूध प्यायला लावलं. आजी तिला तिच्या मुलीसारखं मानत असल्याने तिने तिचा दूध प्यायचा हट्ट ऐकला. रात्रभर तिघांपैकी कोणाला ही झोप लागली नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळीच अंघोळ वगैरे आटपून नंदा आजीच्या खोलीत गेली. एरवी लवकर उठणारी आजी अजूनही झोपूनच होती. तिने आजीच्या डोक्याला हात लावून पाहिला....आजीचं डोकं थोडं गरम लागल्याने तिने thermameter ने temperature चेक केलं. आजीला ताप आलेला पाहून तिने लगेच मिलिंदना डॉ ना बोलवायला सांगितलं. थोडया वेळाने डॉ आले त्यांनी आजीचं चेकअप करुन काही औषधे लिहून दिली आणि काही urgency असेल तर लगेच कॉल करा म्हणत ते तिथून निघाले. मिलिंद ही डॉ ना सोडायला त्यांच्या बरोबर गेले.
मिलिंद: डॉ अचानक कसा ताप आला आईला...?
डॉ: बहुतेक कोणत्यातरी गोष्टीमुळे त्या घाबरल्या असाव्यात किंवा कोणत्या तरी गोष्टीचा आघात त्यांच्या मनावर लागला असणार... त्यांचं temperature उतरलं की त्यांच्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करा...आणि काही मदत लागलीच तर मला कॉल करा.
मिलिंद: ओके thank you डॉ.
डॉक्टरांना सोडून मिलिंद नंदापाशी आले. त्यांनी डॉ नी जे सांगितलं ते तिला सांगितलं.
मिलिंद: मला आता खरंच कळत नाही आहे नंदा... मी काय करु ते...
नंदा: नका काळजी करु... प्रतिकच्या मनाविरुद्ध आई नाही वागणार...
मिलिंद: I hope so असंच होवो.
***
नंदाने सतत डोक्यावर घातलेल्या घडयांनी काही तासांनी आजीचा ताप थोडा उतरला आणि त्यांना जाग आली. नंदाने त्यांना पेच भरवली आणि औषध देऊन पुन्हा आराम करायला सांगितलं. संध्याकाळपर्यंत आजीचा ताप पूर्णपणे गेला पण तापामुळे आलेल्या अशक्तपणामुळे आजी बसूनच होती. काही लागलंच तर लगेच द्यायला म्हणून प्रतिकचे बाबा मिलिंद ही तिच्याच बाजूला बसून होते.
***
बसमध्ये प्रतिक आणि प्रेरणा एकमेकांशी बोलण्यात रमले होते. समिधा-राहुल, आशिष तिघांना ही शांत झोप लागली होती. मीना-अभि त्यांचं favourite song एकाच headphone ने एकमेकांच्या हातात हात घेऊन ऐकत होते. आशिषच्या बाजूला बसलेला विवेक विचार करत स्वतःच्याच विश्वात रमला होता. काही तासांनी सगळेजण दादरला पोहचले. प्रेरणा, प्रतिक आणि विवेकने सगळ्यांना बाय म्हणून त्यांना निरोप दिला. सगळे गेल्यावर प्रतिक प्रेरणा एकमेकांचा हात हातात घेऊन कितीतरी वेळ एकमेकांना पाहत होते. दोघांनाही हा क्षण संपूच नये असं वाटतं होतं. तेवढ्यात विवेकच्या वाजलेल्या मोबाईच्या रिंगने दोघेही भानावर आले आणि एकमेकांपासून थोडे दूर झाले.
विवेक: (कॉल उचलून) हो आई, आलोत आम्ही दादरलाच पोहचलो आहोत जस्ट....
आई: बरं सांभाळून या...
विवेक: हो आई म्हणत त्याने कॉल ठेवला.
प्रतिक: निघूया चला...
विवेक: सर, तुम्ही तर ola ने जाणार होतात ना...?
प्रतिक: हो जाणार होतो...(प्रेरणाकडे पाहून) पण मी विचार करतोय की तुमच्या बरोबरच आज ट्रेनने जावं.
त्याच्या या बोलण्याने प्रेरणा लाजून हसली.
प्रतिक: (प्रेरणाला पाहून) निघूया ना मग...
प्रेरणाने मानेने होकार दिला. तसे तिघेही ट्रेनने जायला निघाले. विवेक आणि प्रतिक दोघेही ट्रेनमध्ये तिला कोणाचा धक्का ही लागणार नाही असे तिच्या बाजूला उभे होते. काही वेळाने त्यांचं स्टेशन आलं तसे तिघेही उतरले. स्टेशनवरुन घरी जाण्यासाठी विवेक ऑटोरिक्षा लाईनमध्ये गेला. त्या घडलेल्या घटनेनंतर प्रेरणाचं पुन्हा कधीही ऑटोरिक्षा मध्ये बसायचं धाडस झालं नव्हतं. पण आज तिला बसावं लागणार होतं. ती मनातून खूप घाबरली होती. तिची भिती प्रतिकला तिच्या डोळ्यांत जाणवली. पण तिला आज त्या भीतीला सामोरं जाण्यासाठी प्रतिकला तिला हिंमत द्यायची होती.
प्रतिक: (प्रेरणाचा हात हातात घेऊन) मी आहे ना... तुझ्याबरोबर.. आज, उद्या आणि यापुढे नेहमीच...चल जाऊ आपण. प्रतिकच्या बोलण्याने प्रेरणाच्या मनातली भिती निघून गेली. त्यांचा ऑटोच्या लाईनमध्ये नंबर आला. तसं विवेक आणि प्रतिक या दोघांच्या मध्ये प्रेरणा ऑटोरिक्षा मध्ये बसली आणि ऑटो सुरु झाली. ऑटोमधल्या स्टेशनपासून घरापर्यंतच्या प्रवासात प्रतिकने प्रेरणाचा हात घट्ट पकडून ठेवला होता. अपार्टमेंटकडे ऑटोरिक्षा पोहचली तसे तिघेही ऑटोमधून उतरले. विवेक ऑटो ड्राईव्हरचे पैसे देतच होता तोच प्रतिक त्याला थांबवत म्हणाला, अरे पैसे देऊ नकोस... मी याच ऑटोने घरी जातो.... असं म्हणत प्रतिक ऑटो ड्राईव्हरला त्याच्या घरचा पत्ता सांगून विवेक आणि प्रेरणा दोघांना बाय म्हणत ऑटोमध्ये बसला. तशी ऑटो ड्रायव्हर ने ऑटो प्रतिकच्या घरच्या दिशेने वळवली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा