अस्तित्व एक संघर्ष
भाग-३८
ऑफिसचं काम आटपलं तसं प्रतिकने केबिनमधून बाहेरच्या डेस्कवर समिधाला कॉल करून सगळ्यांना बॅग पॅक करून रेडी रहायला सांगितलं. त्याने ही त्याचा laptop ड्रॉवर मध्ये ठेवला आणि तो त्याची बॅग घेऊन केबिन बाहेर पडला.
प्रतिक: (सगळ्यांना उद्देशून) चलायचं मग..?
टीममधले सगळे: हो सर...
समिधा: पण सर जायचं कसं...?
आशिष: सर माझी बाईक आहे तर... मी आणि विवेक बाईकने येतो...तुम्ही फक्त कुठे यायचं ते सांगा...
प्रतिक: हो चालेल... आपल्या स्टेशनलाच बघ लेफ्टला एक विश्रांती नावाचं फाईव्ह स्टार रेस्टॉरंट आहे तिथेच जायचं आहे आपल्याला...
आशिष: ओके सर...
प्रतिक: चला तर मग निघूया...
तसे सगळेजण प्रतिक बरोबर ऑफिसमधून बाहेर पडले. आशिष आणि विवेक सगळ्यांना बाय बोलून बाईकने पुढे गेले.
प्रतिकने कारचा डोअर ओपन केला तसं समिधा, प्रेरणा आणि मीना तिघी मागच्या सीटवर बसल्या. मीना आणि समिधाला वाटत होतं, प्रेरणाने सरांच्या बाजूला बसावं पण सांगणार कसं होत्या त्या...?
प्रतिकने तिघी बसल्यावर कारचा दरवाजा बंद केला आणि पुढच्या सीटवर बसत त्याने कार रेस्टॉरंटच्या दिशेने वळवली. कार चालवत असताना तो अधून मधून प्रेरणाला मिरर मधून पाहत होता. समिधा आणि मीनाचं काही ना काही बोलणं चालू होतं...प्रेरणा फक्त त्यांचं बोलणं ऐकत होती. शेवटी त्यांनी तिला बोलायला भाग पाडलंच... ती ही सकाळचं सगळं विसरून त्यांच्याशी बोलण्यात गुंग झाली होती. थोड्याच वेळात कार रेस्टॉरंटपाशी पोहचली. दुसऱ्या बाजूने गाड्या जात असल्याने प्रतिकने त्यांना एकाच दिशेने उतरायला सांगितलं. मीना मागोमाग समिधा उतरली आणि बोलण्याच्या नादात दोघींच्या हे लक्षातचं आलं नाही की प्रेरणा पण मागे आहे. प्रेरणा कारमधून उतरली तसा प्रतिकही कारमधून उतरला आणि त्याने कार लॉक केली. प्रेरणा मागोमाग प्रतिकही रेस्टॉरंट मध्ये जायला निघाला. अचानक चालत असताना प्रेरणाचा कार्पेटमध्ये पाय अडकला आणि ती घसरून पडणार तेवढ्यात प्रतिकने तिला मागून पकडलं. प्रतिकला इतकं जवळ पाहून तिच्या हृदयाची धडधड वाढली होती... ती त्याच्या डोळ्यात स्वतःला हरवून गेली होती. प्रतिकची ही अवस्था फार वेगळी नव्हती...तो ही तिला भान हरपून पाहत होता... तोच समिधाला प्रेरणा आणि प्रतिक मागेच राहिल्याचं आठवलं तसं तिने मीनाला विवेक आणि आशिषबरोबर थांबायला सांगून ती पुन्हा मागे आली. प्रतिक आणि प्रेरणाला दोघांना एकमेकांकडे पाहताना पाहून समिधाला कळेना की आता यांना भानावर कसं आणावं...तिने प्रेरणा म्हणून आवाज दिला आणि साईडला लपून राहिली तसे दोघेही समिधाच्या आवाजाने भानावर आले आणि एकमेकांपासून दूर झाले. दोघांनी आजूबाजूला पाहिलं तर त्यांना समिधा दिसेना. समिधा त्या दोघांना पाहून लपून हसू लागली आणि मनात म्हणाली, देव पण वाटतं आमच्याच साईडने आहे... समिधा कुठेही दिसेना तसा प्रतिक प्रेरणाला म्हणाला, चल जाऊया आपण आत...त्यावर प्रेरणाने मानेनेच होकार दिला आणि दोघेही आत सगळे जिथे होते त्या टेबलवर पोहचले. त्यांच्या मागोमाग समिधा ही टेबलवर आली. तिला पाहून प्रतिक म्हणाला, तू आता आमच्या बरोबर बाहेरून आलीस का...?
समिधा: (हसणं लपवत) नाही सर, मी कॉलवर होते...
प्रतिक: अच्छा...anyways चला ऑर्डर द्या...कोणा कोणाला काय काय हवं त्याची...!!
तसं प्रतिकसकट सगळ्यांनी त्यांना काय काय हवं ते वेटरला सांगितलं...प्रेरणा काही ऑर्डर देणार नाही हे प्रतिकला आधीच ठाऊक असल्याने त्याने तिच्यासाठी पण ऑर्डर देऊन टाकली. ऑर्डर येईपर्यंत समिधाने प्रतिकला आणि सगळ्यांना तिचे एंगेजमेंटचे नंतर आलेले फोटोज दाखवले..मीना तिला लग्नासाठी सध्या काय काय trending चालू आहे ते सांगू लागली.
आशिष: समिधा मॅडम, तुम्ही pre wedding photoshoot करणार आहात की नाही...?
मीना: वाह आशिष काय भारी idea दिली...समिधा तुम्ही खरंच करा photoshoot... एकदाच तर लग्न करतो आयुष्यात...आणि नंतर याच तर सगळ्या आठवणी असतात...
प्रतिक त्या तिघांचं बोलणं ऐकत होता...आणि मनात विचार करु लागला... प्रेरणा आणि माझं मी नक्की pre wedding photoshoot करणार... प्रेरणा तू फक्त एकदा लग्नाला हो म्हण ग...मग बघ... तुला आयुष्यात कधीही एकटं पडू देणार नाही...तुझी साथ मी कधीही सोडणार नाही.. विचार करता करता त्याने प्रेरणाकडे पाहिलं. ती पण त्यालाच पाहत होती. दोघांची नजर एकमेकांमध्ये गुंतली होती. त्यांचं आजूबाजूला काय बोलणं चालू आहे याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. तेवढ्यात वेटर त्यांच्या मेनू ऑर्डर्स घेऊन आला... त्याच्या आवाजाने दोघेही भानावर आले. दोघांनी काही घडलंच नाही अशा आविर्भावात लगेच आजूबाजूला नजर वळवली. वेटरने सगळ्यांच्या प्लेटमध्ये डिश सर्व्ह केली आणि तो निघून गेला. मी तर काहीच ऑर्डर केलं नव्हतं मग माझ्या प्लेटमध्ये त्याने कसं सर्व्ह केलं हा विचार प्रेरणाच्या मनात आला आणि तिने समिधाच्या कानात याबद्दल विचारलं. तेव्हा समिधाने प्रतिकने तिच्यासाठी ऑर्डर केल्याचं सांगितलं. त्या दोघींमध्ये काय बोलणं चालू आहे याचा प्रतिकला अंदाज आला आणि त्याने प्रेरणाला लगेच मेसेज केला...असं म्हणतात प्लेटमधलं जेवण टाकून द्यायचं नसतं...अशाने त्या अन्नाचा अपमान होतो...आणि कोणाचा अपमान होईल असं तू नक्कीच वागत नाही. त्याचा मेसेज वाचून प्रेरणाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि तिने मोबाईल बाजूला ठेवून प्लेटमधलं जेवण जेवायला सुरवात केली. तिने जेवणाला सुरवात केली तसं प्रतिकने ही जेवायला सुरु केली. प्रेरणाच्या मनातून आता दुपारचा त्या मुलीचा विषय पूर्णपणे निघून गेला होता. सगळेजण गप्पा गोष्टी करत जेवणाची मज्जा घेत होते. आणि आपले lovebird एकमेकांना कळणार नाही असे पाहत होते. सगळ्यांच जेवण चालू असताना वेटर अजून काही ऑर्डर करायचं आहे का हे विचारायला आला तसं प्रतिक म्हणाला, मी सगळ्यांसाठी ice cream ऑर्डर करतो आहे कोणतं कोणतं हवं ते पटकन सांगा...तसं सगळ्यांनी आपल्या ice cream orders वेटरला सांगितल्या आणि वेटर ice cream आणायला निघून गेला. पुन्हा सगळेजण गप्पांमध्ये रंगले.
विवेक: समिधा मॅडम, तुमच्या लग्नाची तारीख फिक्स झाली का...?
समिधा: बहुतेक दिवाळी नंतर करणार आहोत...
आशिष: आम्हाला बोलवणार ना...?
समिधा: अर्थात हे काय विचारण झालं...? पण माझ्या काही conditions आहेत...
प्रतिक सकट सगळ्यांना हे ऐकून थोडा शॉक लागला.
प्रतिक: conditions कसल्या समिधा...?
समिधा: condition ही आहे की सगळ्यांनी tradition look मध्ये यायचं आहे... म्हणजे प्रेरणा आणि मीना तुम्ही दोघींनी साडी नेसून यायचं आहे...आणि प्रतिक सर, आशिष, विवेक आणि ofcourse राजीव सर यांनी formal shirt..वगैरे न घालता कोणताही त्यांना आवडेल असं ट्रॅडिशनल लुक मध्ये यायचं आहे...
विवेक: मला condition मान्य आहे...
आशिष: (विवेकला टाळी देत) मला पण चालेल... we will enjoy your wedding...एकदम कॉलेजमध्ये जसं ते डेज वगैरेला कसं वाटतं अगदी तशीच मज्जा करु...(प्रतिककडे पाहत) सर तुम्हाला पण चालेल ना...?
प्रेरणा प्रतिक काय बोलतोय म्हणून त्याच्याकडे पाहत होती तोच प्रतिक विवेक आणि आशिषकडे पाहून म्हणाला, चालेल काय धावेल...वाटलं पाहिजे लग्नात समिधाचा ऑफिस ग्रुप किती मस्त आहे हे....त्याचं हे बोलणं ऐकून सगळेजण मनोसक्त हसू लागले. तेवढ्यात वेटर आईस्क्रीम घेऊन आला. तो सगळ्यांना आईस्क्रीम सर्व्ह करुन निघणार तसं प्रतिकने त्याला बिल आणून द्यायला सांगितलं. वेटर मानेने हो म्हणत तिथून निघून गेला. Ice cream खाता खाता प्रतिकने समिधाला तिच्या प्री वेडिंग शूटबद्दल विचारलं.
समिधा: सर अजून तसं काही ठरवलं नाही आहे आम्ही दोघांनी...
प्रतिक: तुला सुट्टी जेव्हा केव्हा हवी असेल photoshoot साठी तेव्हा सांग...
समिधा: सर माहीत नाही किती खर्च येतो ते शूटला... बजेटमध्ये बसत नसेल तर नाही करणार...
प्रतिक: पण तुला करायची खरंच इच्छा आहे का...?
समिधा त्यावर काहीच बोलली नाही... प्रतिकला तिचा मूड ऑफ करायचा नव्हता म्हणून त्याने पण पुढे काही विचारलं नाही.
मीना: (विषय बदलण्याच्या हेतूने) समिधा तुझं थंड ice cream गरम व्हायच्या आधी खाऊन घे...लवकर...नाहीतर त्याचा मिल्कशेक होईल...तसे सगळेजण खो खो करुन हसू लागले. सगळ्यांच खाऊन झालं तसं प्रतिकने बिल पे केलं आणि सगळेजण तिथून निघाले. समिधाने आणि मीनाने आधीच राहुल आणि अभिला सांगितलं असल्यामुळे दोघेही त्यांना घ्यायला आले होते. त्या दोघांशी बोलून प्रेरणा, प्रतिक, आशिष आणि विवेकने त्या चौघांना बाय म्हटले. आशिष ही त्या तिघांना बाय म्हणत त्याची बाईक घेऊन घरच्या दिशेने वळला.
प्रतिक: (कारचा दरवाजा उघडून प्रेरणाला बसायला सांगत) चला आता, आपण पण निघूया...तशी प्रेरणा कारमध्ये बसली. विवेक प्रतिकच्या बाजूच्या सीटवर बसला. प्रतिकने कारच्या मिररमधून बाहेर बघणाऱ्या प्रेरणाकडे पाहिलं आणि कार त्यांच्या घरच्या दिशेने वळवली. विवेकने प्रतिकला विचारुन FM सुरू केला.
FM वर गाणं लागलं होतं...
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो
क्या कहना है, क्या सुनना है
मुझको पता है, तुमको पता है
समय का ये पल थम सा गया है
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो...
दोघांच्या ही डोळ्यासमोर कार्पेटवरुन पडतानाचा एकमेकांच्या डोळ्यांत हरवून गेल्याचा प्रसंग डोळ्यासमोर आला...प्रेरणा आठवून बाहेर बघत गालातल्या गालात हसत होती... तर प्रतिक आरशातून प्रेरणाला पाहत होता.
कितने गहरे हलके, शाम के रंग हैं छलके
परबत से यूँ उतरे बादल, जैसे आँचल ढलके
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो...
दोघेही एकमेकांबरोबरचे एंगेजमेंट हॉलमधले, हॉस्पिटलमधले क्षण आठवत होते... एकमेकांना कळणार नाही अशा अंदाजात ते एकमेकांना पाहत होते...
सुलगी सुलगी साँसे, बहकी बहकी धड़कन
महके महके शाम के साए, पिघले पिघले तन मन
और इस पल में कोई नहीं है
बस एक मैं हूँ, बस एक तुम हो
कुछ ना कहो, कुछ भी ना कहो...
आज रेस्टॉरंट मध्ये प्रतिकने तिने जेवावं म्हणून केलेला मेसेज... आणि तिने सुरवात केल्यावर त्यानेही सुरवात करणं हे आठवून पुन्हा ती लाजून त्याच्याकडे पाहू लागली... मिरर मधून प्रतिकने तिला पाहत डोळयांनी इशारा करत काय झालं विचारलं. तसं तिने ही डोळ्यांनीच काही नाही असं म्हणत नजर पुन्हा बाहेर वळवली.. विवेकला मात्र त्यांचं काय चालू आहे हे बिलकुल ठाऊक नव्हतं तो स्वतःच्याच विश्वात कुठे तरी हरवला होता.
घरी पोहचल्यावर रात्री उशिरा प्रतिकला राजीवने कॉल केला आणि काय मग तुझी love story कुठपर्यंत आली.
प्रतिक: आज ती ही माझ्याकडे पाहत होती...अरे हो तुला सांगायचंच विसरलो आम्ही आज team dinner ला गेलो होतो...असं म्हणत त्याने राजीवला घडलेली सगळी गोष्ट सांगितली.
राजीव: वाह वाह मतलब आग दोन्हो तरफ बराबर लगी है...त्यावर प्रतिक लाजून हसला.
राजीव: ओह माय गॉड... प्रतिक तू लाजलास का आता...
प्रतिक: गप्प रे...किती छळणार आहेस अजून मला...?
राजीव: बरं नाही आता छळत.. फक्त तिच्याकडून होकार मिळत नाही तोपर्यंत तू तिला जितकं होईल तितकं इग्नोर कर... बस...चल अभी सो जा...गुड नाईट...प्रतिकने ही त्यावर ओके चालेल, गुड नाईट म्हणत कॉल ठेवला.
प्रतिकचा कॉल ठेवल्यावर राजीवच्या मनात विचार आला...उद्याचाच दिवस आपल्या नेक्स्ट प्लॅनसाठी योग्य आहे... आणि त्याने हसत हसत त्याच्या प्लॅन मधल्या तिला मेसेज केला.
***
दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे प्रेरणाचे डोळे प्रतिकच्या येण्याकडे लागून राहिले होते...आज प्रतिक ऑफिस मध्ये आला पण तो कॉलवरच होता...त्याच आजूबाजूला कुठेही लक्ष नव्हतं... तो टेंशन मध्ये आहे हे प्रेरणाला जाणवलं...तो तिच्या डेस्कपर्यंत पोहचला तसा तो समोरच्या व्यक्तीला म्हणाला, हे बघ तू असं काहीही करणार नाही आहेस... मी आहे ना...you trust me ना...तिथून ती व्यक्ती काय म्हणाली याचा अंदाज प्रेरणाला आला नाही...प्रतिक पुन्हा तिला म्हणाला, अग तू रडू नकोस...एक काम कर माझ्या ऑफिस मध्ये ये... आपण इथेच बोलू यावर...असं म्हणत तो कोणाकडेही न बघत केबिनमध्ये निघून गेला.
प्रेरणा त्याला असं टेंशन मध्ये जाताना पाहून विचार करु लागली, काय झालं असेल नक्की ज्यामुळे प्रतिक सर आज खूप टेंशन मध्ये आहेत...आणि कोण असेल कॉल वर...जी कॉल वर रडत होती...काम करता करता पुन्हा तिला आठवलं, हां सर तिला ऑफिसमध्ये ये म्हणाले...म्हणजे ती नक्की कोण आहे ते कळेल आपल्याला... तिने विचार करता करता हातातला कस्टमरचा चेक केलेला फॉर्म त्याच्या हातात दिला आणि केबिनकडे पाहत पुन्हा स्वतःला कामात झोकून दिलं.
एक दीड तास झाला असेल नसेल अचानक एक मुलगी ऑफिसमध्ये आली. समिधाचं तिच्याकडे लक्ष जाताच तिने प्रेरणा आणि मीनाला ही तिच्याकडे पाहायला सांगितलं. दोघींनी तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती security guard बरोबर बोलत होती...तिच्या चेहऱ्यावर आलेल्या मोकळ्या सोडलेल्या केसांमुळे त्यामुळे त्या दोघींना ती कोण आहे हे नीट पाहता आलं नाही. Security guard ने कोणाला तरी कॉल केला आणि तिला कस्टमरच्या लाईनमध्ये बसायला सांगितलं....guard ला हो म्हणत ती कस्टमर्सच्या लाईनमध्ये बसायला आली...तसं मीना आणि प्रेरणाने तिला पाहिलं... प्रेरणाने तिला पाहताक्षणी तिला प्रतिक आणि त्या मुलीचा समिधाच्या मोबाईल मध्ये पाहिलेला फोटो आठवला. म्हणजे सर, हिच्याशी बोलत होते तर... मनात असा विचार येताना तिच्या डोळ्यांत नकळत पाणी आलं... जे तिने कोणाच्याही लक्षात येणार नाही असं पटकन रुमालाने पुसलं आणि पुन्हा कामामध्ये स्वतःला झोकून दिलं.
थोड्या वेळाने प्रतिक त्याच्या केबिनमधून बाहेर त्या मुलीच्या दिशेने आला...ती मुलगी प्रतिकला पाहून खुर्चीवरुन उठली. प्रतिक बाहेर जायला निघाला तशी ती ही त्याच्या मागोमाग बाहेर पडली. प्रेरणाचं कामामध्ये लक्ष लागेना... तिच्या मनात असंख्य विचार येऊ लागले. जणू काही तिला कॉल आला आहे असं बाकीच्यांना दाखवत ती डेस्कवरून उठत ऑफिसमधून बाहेर पडली.. तिने आजूबाजूला पाहिलं प्रतिक आणि मघासशी मुलगी कुठे दिसते आहे का...? तर तिला लांबून ऑफिसच्या बाहेर असलेल्या open space मध्ये ते दोघे बोलताना दिसले. दोघेही पाठमोरे होते त्यामुळे प्रेरणा तिकडे आहे याची त्यांना जराही कल्पना नव्हती. मी जाऊ का तिथे... तिच्या मनात विचार येऊन गेला. पुन्हा तिच्या मनात विचार आला, प्रेरणा काय चाललं आहे तुझं...? सर आहेत तुझे ते...? आणि ते कोणाबरोबर ही बोलू शकतात. पण तिची तिथून जायची ही इच्छा होईना... तिला असं का वाटतं आहे हे तिला कळेना. शेवटी ती तिथेच थांबून त्यांच्याकडे पाहत राहिली. तिने पाहिलं प्रतिक बरोबर बोलताना त्या मुलीच्या डोळ्यांतून पाणी येत होतं... प्रतिक तिच्या खांद्यावर हात ठेवून तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होता...अचानक तिने त्याचा एक हात स्वतःच्या हातात घेतला आणि प्रतिकशी काहीतरी बोलली...तसा प्रतिकने पण त्याचा दुसरा हात तिच्या हातावर ठेवला...हे सगळं दुरून पाहून प्रेरणाच्या मनात विचार आला, सरांना पण ती आवडत असेल का....? क्षणभर मनात आलेल्या विचाराने तिच्या डोळ्यांत पाणी आलं... तिथे अजून थांबायची तिची हिंमत होईना....ती सरळ ऑफिसच्या लेडीज कॉमन रूम मध्ये घुसली. तिला असं जाताना पाहून मीना ही तिच्या मागोमाग डेस्कवरून उठून कॉमन रूम मध्ये गेली.
प्रेरणा कॉमन रूम मध्ये रडत असतानाच मीनाने डोअर ओपन केला.
मीना: (तिच्याकडे येऊन) काय झालं प्रेरणा...?
प्रेरणा: (रुमालाने डोळे पुसत खाली मान घालूनच) काही नाही...
मीना: माझ्याकडे बघून बोल एकदा...असं म्हणत
मीनाने तिचा चेहरा वर केला. प्रेरणाचे डोळे रडून लाल झाले होते.
मीना: कोणासाठी रडली आहेस तू एवढी...?
प्रेरणा: (पुन्हा मान खाली घालून) मला थोडं वेळ एकटीला सोड...
मीना: (तिच्या बाजूला बसून) त्याला माहित आहे का तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे ते...? तू सांगितलंस का त्याला...?
प्रेरणाने चमकून तिच्याकडे पाहिलं...तिचं तिला ही कळत नव्हतं... का ती प्रतिकला दुसऱ्या मुलीबरोबर पाहून रडते आहे...खरंच मी प्रेमात पडली आहे का प्रतिकच्या..? मीनाला तिच्या चेहऱ्यावर पडलेले प्रश्न जणू काही कळून गेले...
मीना: प्रेरणा मी तुला ज्या गोष्टी विचारते त्यांची तू मला उत्तरे नको देऊस पण तुला नक्की काय वाटतं हे तुझं तुलाच कळेल हळूहळू...तर माझा पहिला प्रश्न... तो आजूबाजूला नसला की तुला एकटं वाटतं का...? प्रेरणाने मनात विचार केला, हो सर आजूबाजूला नसले की मला खूप एकटं वाटतं.
माझा दुसरा प्रश्न...त्याला समोर पाहून आपसूकच तुझा मूड चांगला होतो का..? याचं ही उत्तर प्रेरणाला हो च मिळालं. माझा तिसरा प्रश्न... त्याला भेटता यावं म्हणून तू कारण शोधतेस का...? याचं ही उत्तर पुन्हा हो च होतं. माझा चौथा प्रश्न... त्याच्या बरोबर असताना तुला खूप सेफ वाटतं का...? त्याच्या प्रत्येक बोलण्यावर विश्वास ठेवावा असं वाटतं का...? प्रेरणाने मनात विचार केला... हो मला सरांबरोबर खूप सेफ वाटतं... and I trust him...तिच्या चेहऱ्यावर आपसूकच स्माईल आली. मीना तिला पुन्हा म्हणाली, माझा पाचवा प्रश्न...डोळे बंद केले की त्याचाच चेहरा नजरेसमोर येतो का...?कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये अडकली की तुला तोच आठवतो का...? दुसऱ्या एखाद्या मुली बरोबर त्याला पाहून तुला वाईट वाटतं का...? त्यावर प्रेरणाला पुन्हा मघासच सगळं आठवलं आणि तिने मानेनेच हो म्हटलं.
मीना: (तिचे डोळे पुसत) रडूबाई आता रडणं थांबवा...तुम्ही प्रेमात पडला आहात आणि तुमच्या मनातल्या राजकुमाराला तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे सांगून टाक लगेच...जास्त उशीर करू नकोस...
प्रेरणा: (रडतच) खूप उशीर झाला आहे ग...त्यांना ती आवडते...फोटोमधली...
मीना: (तिचा चेहरा बघत) कोणाबद्दल बोलते आहेस तू...?
प्रेरणा: (रडत आपण काय बोलून बसलो हे लक्षात आल्यावर बाकड्यावरून उठत) कोणी नाही ग...!!!
मीना: ( तिचा हात पकडून) प्रतिक सरांबद्दल बोलते आहेस ना तू...? आणि फोटोमधली म्हणजे... ती आता जी सरांना भेटायला आली आहे तीच ना...? प्रेरणा, एकदा बोलून तर बघ, कदाचित तुला वाटतं तसं काही नसेल ही...?
प्रेरणा: मला वाटतं तसं म्हणजे....तुला आठवतं ना समिधा फोटो दाखवून काय म्हणाली होती ते...सरांच्या फ्रेंडला सर खूप आवडतात म्हणून...आणि त्यांच्या घरी ही सगळ्यांना ती पसंत आहे...मग मी का त्या दोघांच्या मध्ये येऊ....सांग ना मला...?
मीना: पण सरांनासुद्धा ती आवडत असेल याची खात्री काय...? कदाचित त्यांनी कधी तिचा विचार ही केला नसेल... तू एकदा बोलून तर बघ...
प्रेरणा: काय बोलू मी मीना...त्यांच्या घरातले माझ्या बाबतीत जे झालं ते विसरुन जातील का...? ते मला त्यांची सून म्हणून स्वीकारतील का...? त्यांची फॅमिली काय कोणाचीही फॅमिली आपल्या मुलासाठी अशी मुलगी बायको म्हणून घरी घेऊन येणार नाहीत...ज्या गोष्टींना पुढे काही भविष्यच नाही त्यांचा विचार ही करु नये... असं म्हणून प्रेरणा तिथून निघणार तेवढ्यात मीना म्हणाली, थांब प्रेरणा...प्रेरणाने मागे वळून पाहिलं.
मीना: तुला जमेल का सरांना विसरायला...? आणि सगळ्या गोष्टी या तुझ्या तूच ठरवते आहेस असं नाही का वाटत तुला...कदाचित तू जसा विचार करते आहेस तसं होणार ही नाही...असं ही होऊ शकतं ना की त्यांना तू त्यांची सून झालेली आवडेल...आणि सरांना ही तू लाईफ पार्टनर म्हणून आवडशील.... प्रेरणा, माझ्या बोलण्याचा विचार करून बघ एकदा...आणि जास्त उशीर लावू नकोस...कधी कधी आपलं प्रेम आपल्या हाकेच्या अंतरावर असतं पण आपण त्याला आवाजच देत नाही आणि गमावून बसतो... चल आता उठ...शांत हो आणि नीट विचार कर...बराच वेळ झाला आपण इथे आहोत...आता आपल्याला डेस्कवर गेलं पाहिजे. तू चेहऱ्यावर पाणी मारुन ये... बघ डोळे कसे रडून रडून झाले आहेत... मी डेस्कवर जाते...तू पण ये लवकर...असं म्हणत मीना कॉमन रुम मधून बाहेर पडत तिच्या डेस्ककडे गेली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा