अस्तित्व एक संघर्ष-भाग-२९

It is a story of a girl who faced such a situation where she was totally destroyed... and at one point she fights for her identity.

अस्तित्व एक संघर्ष

भाग-२९


प्रतिकची आजी घरी आल्यापासून तिला घरात नक्की काहीतरी वेगळं घडलं असल्याचं सारखं जाणवत होतं. तिने मनात आणलं असतं तर ती प्रतिकच्या आईबाबांना त्याबद्दल विचारु शकत होती पण तिने यावेळी नक्की काय हे स्वतःच शोधून काढायचं ठरवलं. आजी आली आहे हे कळताक्षणी आणि रविवार असल्यामुळे आज राजीव तिला भेटायला आला होता. राजीवला आलेलं बघताक्षणी आजीने त्याचा कान जोरात पकडला.
राजीव: (कळवळीने) आजी, सोडना कान माझा... खूप दुखतोय ग...
प्रतिक: हो आजी, सोडना...
आजी: (कान सोडत) काय रे राजीव, मुलगी पसंत केलीस आणि या आजीला सांगितलं पण नाही...की सांगावस वाटलं नाही या म्हातारीला...?
राजीव: (कान चोळत) नाही ग आजी, तेच तर सांगायला मी आलो इथे आज...आणि तुला सांगितल्या शिवाय थोडीच मी लग्नाला उभं राहणार आहे...उलट माझा विचार तर आहे प्रतिकचं आणि माझं लग्न एकाच मांडवात व्हावं...!!
आजी: प्रतिकचं लग्न...? म्हणजे प्रतिकने पण परस्पर पसंती केली आहे का...?
प्रतिक: ( थोडा सावरत) नाही ग आजी... हा राजीव कॉलेज मध्ये असल्यापासून असाच म्हणायचा... याचं एवढं ऐकू नकोस...!!
राजीव: (स्वतःची चूक लक्षात येत) हो हो आजी...प्रतिक बोलतोय ते बरोबर बोलतोय...(विषय बदलत) हे घे आजी, मी तुला आवडते म्हणून काजूकतरी आणली आहे. (मोबाईलमधून रेखाचा फोटो दाखवत) आजी, ही बघ तुझी नातसून...!!
आजीच्या नक्की कुठंतरी पाणी मुरत आहे हे लक्षात आलं. तिने प्रतिक आणि राजीवला तिला आलेला संशय कळू दिला नाही.
आजी: (फोटो पाहत) हं, तू आणि ही म्हणजे अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडाच...खरं तर तुझ्यावर रागावलेच होते मी... पण नातसुनेला पाहून माझा राग कुठच्या कुठे निघून गेला आणि अरे, तुझ्या काकूंना दे हा काजूकतरीचा बॉक्स...ती देईल मला नंतर...मी आता जाऊन जरा देवघरात जपमाळ करते... तोपर्यंत चालू दे तुमच्या गप्पा...असं म्हणून आजी देवघरात गेली.
प्रतिक: आज तुझ्यामुळे माझं काही खरं नव्हतं... आजीला अजून माहीत नाही आहे काही...
राजीव: सॉरी यार, मी बोलता बोलता बोलून गेलो...पुन्हा ही चूक नाही होणार...!!
प्रतिक: हं ठीक आहे... नशीब आजीने विश्वास ठेवला आपल्या बोलण्यावर...चल आता आपण निघूया...आणि तो बॉक्स दे मी ठेवून येतो..तसं राजीवने तो बॉक्स प्रतिककडे दिला आणि प्रतिकने बॉक्स घेऊन किचनमध्ये ठेवला. तशी आई बाहेर आली.. अरे राजीव निघालास तू...?
राजीव: हो काकू, थोडं काम आहे म्हणून निघतो आहे.
आई: बरं बरं, आईबाबांना विचारलं म्हणून सांग...
राजीव: हो काकू...
प्रतिक: आई, मी राजीव बरोबर जाऊन येतो...
आई: हो चालेल..
तसे दोघेही घरुन निघाले. राजीवच्या बाईकवर बसून प्रतिक आणि तो त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी पोहचले. राजीव बाईक साईडला लावून प्रतिकच्या बाजूला बसला.
राजीव: हां बोल, प्रेरणा जॉईन होऊन आता बराच वेळ झाला आहे सो कधी सांगतो आहेस तिला...?
प्रतिक: कसं सांगू तेच समजत नाही रे मला...?
राजीव: पण मग असा किती दिवस विचार करत बसणार आहेस... आजीने मनावर घेतलं तर ती स्वतःच मुलगी शोधायला सुरवात करेल तुझ्यासाठी...
प्रतिक: हं सांगता येत नाही तिचं... आणि प्रेरणाबद्दल तिला खरं कळलं तर माहीत नाही ती कशी वागेल ते पण...?
राजीव: मी काय म्हणतो, जितकं लवकर सांगशील तितका तुझा प्रॉब्लेम तू लवकर सोडवशील...तसं ही आजीला आज ना उद्या खरं काय ते कळेल...!!
प्रतिक: हं बघतो कधी सांगायला चान्स मिळतो आहे ते...चल आता निघू आपण... घरी येतोय की कसं...
राजीव: नाही रे तुला सोडतो आणि जातो मी... माझ्या घरी... उगाच आजी समोर मघाशी घडलं तसं व्हायचं...
प्रतिक: ओके, ते पण आहे म्हणा...ठीक आहे तू इथूनच जा मग..
पुन्हा घरी नाही आलास म्हणून ऐकावं लागेल परत तुला...
राजीव: (बाईक स्टार्ट करत) ओके चालेल बाय...पण मी सांगितलं तसं जरा लवकर सांग...
प्रतिक: (बाय करत) हो हो...
तसा प्रतिक तिथेच थोडा वेळ विचार करत बसला. काही वेळाने त्याच्या बाजूला बागेत फिरणारे त्याच्या ओळखीचे आजी आजोबा येऊन बसले...
आजोबा: (आजीला) कसला विचार करतोय काय माहीत...?
आजी: हो त्याच्या लक्षात पण नाही आलं की कोणी तरी बाजूला येऊन बसलं आहे ते...!!
आजोबा: बोलू का मी त्याच्याशी..?
आजी: तुम्हाला जरा म्हणून थारा नाही... त्याला आवडेल का असं आपण विचारलेलं...?
आजोबा: अग बघू तरी, बोलत असेल तर ठीक नाहीतर सॉरी म्हणू...असं म्हणून आजोबांनी प्रतिकला हाक मारली, ए प्रतिक बाळा...
प्रतिक: (त्यांच्याकडे पाहत) हां आजोबा काही म्हणालात
तुम्ही...?
आजोबा: हं, आम्ही इथे बसलो तर चालेल ना तुला...म्हणजे आम्ही म्हातारी माणसं आमची बडबड खूप असते म्हणून आपलं विचारलं...
प्रतिक: नाही नाही काही हरकत नाही माझी... तुम्ही इथे बसला तरी...
आजोबा: एक विचारु...
प्रतिक: हां विचारा ना आजोबा...
आजोबा: कसला एवढा विचार करतोय...
आजी: ऑफिसमधून काही कामाचा ताण असेल तर त्रास नको करून घेऊस असा... 
आजोबा: मग घरी काही प्रॉब्लेम आहे का...? खरं तर माफ कर आम्ही बराच वेळ तुझ्या बाजूला बसून होतो पण तुझ्या ते लक्षात आलं नाही म्हणून न राहवून आम्ही विचारतो आहोत...
प्रतिक: नाही आजी आजोबा...काम किंवा घरचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे...
आजोबा: मग काय म्हणतात ते...(आजीकडे पाहत) काही प्रेमाची भानगड वगैरे आहे का...??
प्रतिक: (थोडा सावरत) म्हणजे ते...
आजी: (आजोबांना ओरडत) कशाला तुम्ही उगाच त्याला हजार गोष्टी विचारुन त्रास देत आहात...?
प्रतिक: नाही आजी त्रास नाही होत आहे मला तुमच्या दोघांमुळे..
उलट तुम्ही आपुलकीने विचारत आहात हे जास्त आवडलं मला...
आजोबा: मग तुला चालणार असेल तर सांग बघू तू कसला नक्की एवढा विचार करतोय ते...
प्रतिक: ते मला, एक मुलगी आवडते...
आजोबा: अरे, मग यात विचार करण्यासारखं काय आहे... विचारून टाक एकदाचं....हो तर हो नाहीतर नाही...आणि नकार दिला तर उगाच आत्महत्या वगैरेचा विचार करू नकोस...काय ग बरोबर बोलतो आहे ना मी...?
आजी: हं
प्रतिक: नाही आजोबा, तसं मी काही नाही करणार आहे... पण मला कसं विचारू ते नाही समजत आहे...
आजोबा: तसं होय... बोलावं की मग या बागेत आणि विचारुन टाक एकदा मनातलं तुझ्या... आणि संध्याकाळी पण आम्ही येतोच की, आम्हाला पण दिसेल की तुला पसंत पडलेली मुलगी... हो ना ग...!!
आजी: हो हो, काय म्हणतात ते,(आठवून) All the best...
प्रतिक: (दोघांना वाकून नमस्कार करून) हं  तुम्ही म्हणतात तसंच करेन...तुम्हाला सोडू का घरी....
आजोबा: माझा हात पकड...(आणि आजीकडे बघून) मी आमच्या सौ चा हात पकडतो.
आजी: (आजी हे ऐकून थोडी लाजून म्हणाली) कळतं का तुम्हाला कसं बोलावं ते....प्रतिक, यांचा फाजिलपणा गेला नाही अजून... म्हातारे झाले तरी...
त्यांना असं बोलताना पाहून प्रतिक गालातल्या गालात हसला.
आजोबा: प्रतिक, आमच्या बिल्डिंगपर्यंत सोड... तुला वेळ असेल तर सोड हा...नाहीतर जाऊ आमचं आम्ही...
प्रतिक: हो आजोबा, सोडतो मी तुम्हाला...असं म्हणून त्याने त्या दोघांना त्यांच्या बागेच्या समोरच्या रस्त्यावर असलेल्या बिल्डिंग मध्ये सोडलं आणि तो घरच्या वाटेला निघाला.

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे प्रतिक ऑफिसमध्ये गेला... प्रेरणाला रोजच्या सारखाच बुके आलेला होता.. प्रतिकला आलेलं पाहून तिघींना त्याला गुड मॉर्निंग म्हंटलं तसं तो ही त्यांना very good morning म्हणत केबिनमध्ये गेला. काम करता करता त्याला सतत हा प्रश्न मनात येत होता की प्रेरणा आपल्या बरोबर बागेत यायला तयार होईल का...? आफ्टर लंच विवेक आणि अनिकेत त्याच्या केबिनमध्ये आले.
प्रतिक: हां बोला काही काम होतं का...?
दोघे: सर ते उद्या आमचं कॉलेजमध्ये एक्सटर्नल प्रेझेन्टेशन आहे... तुम्हाला आधी सांगितलं होतं ना ते...
प्रतिक: (काहीसा आठवत) तुम्हां दोघांचही उद्याच आहे का...?
विवेक: हो सर, हे main आहे त्यामुळे बऱ्याच कॉलेजमध्ये आज आहे, काही कॉलेज मध्ये ते उद्या आहे...
प्रतिक: ओके...
अनिकेत: सर, त्यामुळे आम्हा दोघांना उद्या सुट्टी हवी होती...
प्रतिक: हो तुम्ही तसा mail पण केला आहे... आणि I guess, I approved also...
विवेक: हो सर, पण आम्ही पुन्हा सांगायला आलो...कारण मेल करून बरेच दिवस झाले आहेत...
प्रतिक: (हसून) अरे मी सुट्टी कॅन्सल नाही करणार तुमची... डोन्ट वरी...हां मी थोडा कामाच्या गडबडीत विसरलो होतो पण आता आठवलं...(उठून दोघांना हात मिळवून) All the best खूप छान presentation द्या.
दोघे: हो सर, thank you sir... आम्ही काम करायला जातो सर...असं म्हणून दोघेही पुन्हा त्यांच्या डेस्कवर काम करायला गेले.

ते दोघे जाताक्षणी प्रतिकच्या मनात विचार आला, उद्या विवेक नाही आहे मग प्रेरणा एकटीच घरी जाणार...आजोबा म्हणाले तसं उद्याच प्रेरणाला विचारु का...? मग त्याने मनाशी काहीतरी ठरवलं आणि तो पुन्हा कामाला लागला.

ऑफीसच काम संपवून सगळे आपापल्या घरी गेले. घरी येताना रस्त्यात विवेकने प्रेरणाला विचारलं, दिदी, उद्या घरी येताना कसं येशील...म्हणजे मी नाही आहे ना म्हणून विचारलं.
प्रेरणा: हं येईन रे मी सांभाळून... तू उगाच विचार करतो आहेस...नको काळजी करुस...
विवेक: चालेल... नाहीतर तू बाबांना सांगना स्टेशनला यायला... ते येतील तुला घ्यायला.
प्रेरणा: अरे, येईल रे मी... आणि आता मला आधी सारखी भीती नाही वाटत...तू उगाच बाबांना घरी गेल्यावर सांगत नको बसू...परत काळजी करत बसतील ते...!
विवेक: हं चालेल नाही बोलत काही घरी...
प्रेरणा: चल आता भरभर, उद्याची तयारी पण करायची आहे ना...!!
विवेक: हो
तसे दोघेही स्टेशनवरून चालत घरी पोहचले. जेवण वगैरे झाल्यावर विवेकने दुसऱ्या दिवशीची तयारी केली आणि तो झोपी गेला. प्रेरणाने पण दुसऱ्या दिवशी ती घरी यायला एकटीच आहे हे आईबाबांना कळू दिलं नाही.

क्रमशः

🎭 Series Post

View all