अस्तित्व एक संघर्ष
भाग-२६
आज विवेकचा ऑफिसमध्ये पहिला दिवस होता....तो कॉलेज मधून तडक ऑफिसमध्ये पोहचला. समिधाने त्याला आणि अनिकेतला कामाचं स्वरुप सांगून कामं वाटून दिली. तसे दोघेही कामामध्ये बिझी झाले... अधूनमधून समिधा आणि मीना त्यांची कामं चेक करु लागले. काम लवकर समजल्याने आणि चुका न झाल्यामुळे ऑफिस मधला दिवस दोघांचा ही खूप चांगला गेला. निघते वेळी दोघांना प्रतिकने केबीनमध्ये बोलवून त्यांचं आज काम खूप चांगलं होतं असंच काम करत रहा म्हणून appreciate केलं. दोघेही बॉसच्या या बोलण्याने खूप खुश होऊन त्यांना thank you म्हणून घरी जायला निघाले.
घरी आल्यावर विवेकने दिवसभर काय काय झालं, कसं काम केलं ते सगळं प्रेरणाला सांगत होता आणि प्रेरणा सुद्धा खूप आनंदाने ऐकून घेत होती....तिला त्याच बोलणं ऐकून तिचे ऑफिसचे दिवस आठवत होते. ती त्याला अधून मधून काही गोष्टी सांगत होती. आईबाबा दुरुन प्रेरणाला आनंदी होऊन विवेकचं बोलणं बोलताना ऐकताना पाहून खुश होत होते.
असेच दिवसा मागून दिवस जात होते. मालगुडे काका प्रेरणाला आईबाबांबरोबर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कार मधून चेकअप साठी नेत असतं. डॉ स्नेहा अधून मधून घरी चेकअपला येत असत. आता प्रेरणाच plaster पण काढण्यात आलं होतं. राजीवने ही प्रतिकच्या सांगण्या प्रमाणे नरेशच्या बायकोला त्याच्या ऑफिस मध्ये मावशींच्या जागी कामावर ठेवून घेतलं होतं. अनूला आठवा महिना सुरु झाला होता. मालगुडे काकू तिची खूप काळजी घेऊ लागल्या होत्या. आदी पण आईच्या वागण्यातील बदल पाहून खुश होता. नंतर सुट्ट्या लागणार म्हणून तो ऑफिसचं काम थांबून पूर्ण करू लागला. मालगुडे काका आणि प्रेरणाचे आई बाबा न चुकता प्रेरणा आणि अनूला डॉ कडे नेत असतं. अधूनमधून प्रतिक प्रेरणाच्या आईबाबांना कॉल करून तिची तब्येत विचारु लागला आणि न चुकता तिला मेसेज करुन काळजी घ्यायला सांगू लागला. प्रेरणाच्या मनात नकळत कुठे तरी प्रतिकबद्दल boss म्हणून नाही तर एक मित्र म्हणून हळूहळू आपुलकी निर्माण व्हायला लागली. ती ही डॉ काय म्हणाले हे त्याला सांगू लागली.
दोन दिवसांपासून टॅक्सी ड्रायव्हरने संप पुकारला होता आणि आज नेमकं प्रेरणा आणि अनू दोघींची appointment होती. मालगुडे काका अनूला घरी घेऊन येतंच होते पण ट्रॅफिक खूपच असल्याने त्यांनी मग प्रेरणाच्या बाबांना त्यांना लगेच येता येणार नाही म्हणून कळवलं...बाबांनी उशीर नको व्हायला म्हणून लगेच विवेकला app वरुन टॅक्सी किंवा ऑटो बुक करायला सांगितली. विवेकने टॅक्सी available नसल्याने auto बुक केली. थोड्याच वेळात auto त्यांच्या घराच्या खाली आली. समोर ऑटो बघून प्रेरणा घाबरली...तिला पुन्हा तोच दिवस आठवू लागला. ती काहीही करुन ऑटो मध्ये बसायला तयार होईना. तिला असं घाबरलेलं पाहून बाबांनी ऑटो ड्रायव्हरची माफी मागून त्याला जायला सांगितलं...तोपर्यंत प्रेरणाला चक्कर आली. आईने तिला सावरलं आणि बाबांना लगेच हाक मारली...बाबांनी तिच्या डोळ्यांवर पाणी मारुन तिला शुद्धीवर आणलं. आईने तिला पाणी प्यायला सांगितलं. आता बाबांसमोर मोठा प्रश्न होता की आता जायचं कसं....? त्यांनी लगेच विवेकला कॉल करुन घडलेला प्रकार सांगितला.. विवेक म्हणाला, ठीक आहे मी सरांना सांगून येतो लगेच... असं म्हणून त्याने कॉल ठेवला आणि तो प्रतिकच्या केबिनमध्ये गेला.
विवेक: May I come in Sir...?
प्रतिक: Yes come in..(खुर्ची कडे हात करत त्याने विवेकला बसायला सांगितलं पण तरी विवेक उभाच थांबला... ) any problem Vivek...?
विवेक: Yes Sir, मला घरी जावं लागेल...तुमची परवानगी हवी होती...
प्रतिक: तुझी हरकत नसेल तर मला तुझ्या घरी जाण्या मागचं कारण जाणून घ्यायचं आहे...
विवेकने लगेच त्याला घडलेला सगळा प्रकार सांगितला.
प्रतिक: विवेक तुझी हरकत नसेल तर मी जाऊ का त्यांना सोडायला...I mean see, तू इथे लगेच सुट्टी घेणं योग्य नाही आणि मी तुला allow केलं तरी प्रश्न हा आहेच ना की तू कसा नेणार त्यांना...?
विवेक: ओके सर, मी हा विचारच नव्हता केला...मी कळवतो तसं बाबांना की तुम्ही येत आहात म्हणून...!! पण सर, तुम्हाला यावेळी काम पण असेल ना....?
प्रतिक: Don't worry, I'll manage.... तू घरी कॉल करून बाबांना कळव फक्त...मी निघतो लगेच( असं म्हणून प्रतिकने त्याचा लॅपटॉप बंद केला)
विवेकने प्रतिकला thank you sir म्हणून घरी कॉल करून प्रतिक येत असल्याचे सांगितले आणि दोघेही केबिनमधून निघाले. प्रतिक समिधा आणि मीनाला मी थोड्या वेळात येतो तोपर्यंत काही important असेल तर handle it...or call me असं म्हणून निघाला. विवेक पुन्हा त्याच्या कामा मध्ये बिझी झाला.
प्रतिकचं ऑफिस प्रेरणाच्या घराच्या दुसऱ्या बाजूला असल्याने तिथे वाहनांची वर्दळ नव्हती आणि त्याने कारचा स्पीड थोडा वाढवल्याने तो त्यांच्या घरच्या रस्त्याला लगेच पोहचला आणि त्याने कार पार्क केली. प्रेरणा आणि तिचे आईबाबा दोघेही खालीच वाट पाहत थांबले होते. प्रतिक त्यांच्या दिशेने आला. तसे बाबा म्हणाले, तुम्ही खूप मोठी मदत केली आमची...!!
प्रतिक: काका, असं नका म्हणू...अशावेळी मी मदत नाही करु शकलो तर काय उपयोग...पण काका, मला एका गोष्टीचं अजून ही वाईट वाटतं आहे
बाबा: कोणत्या गोष्टीचं...? म्हणजे आमचं काही चुकलं का...?
प्रतिक: म्हणजे तुम्ही मला हक्काने कॉल करुन सांगितलं असतं तर मला खरंच खूप आवडलं असतं पण अजून ही तुमच्या जवळचा माणूस बनू शकलो नाही.... याचंच मला वाईट वाटतं आहे...
बाबा: (थोडे हसले आणि म्हणाले) नाही नाही खरं तर तुम्हाला मला त्रास द्यायचा नव्हता म्हणून मी कॉल नाही केला...
प्रतिक: हेच तर ना काका, म्हणजे मला काहीही सांगण्यापूर्वी हा विचार करतात म्हणजे अजून ही मी तुमच्यासाठी परका आहे...
बाबा: असं नाही आहे प्रतिक... पण यापुढे मी हक्काने तुम्हाला कॉल करत जाईन...
प्रतिक: (हसून) निघूया आपण...?
बाबा: हो हो चालेल पण ट्रॅफिक खूप आहे असं मालगुडे म्हणाले होते... मग कसं जायचं...?
प्रतिक: काका, ते सगळं माझ्यावर सोडा मी वेळेत नेतो तुम्हाला...
तसे सगळे प्रतिकच्या कार मध्ये बसले. आई आणि प्रेरणा मागच्या सीट वर बसल्या आणि बाबा प्रतिकच्या शेजारी बसले.
प्रेरणा प्रतिकच्या नकळत त्याच्याकडे पाहत होती.....तिचं नकळत त्याच्याकडे पाहणं तिला ही समजत नव्हतं. थोड्याच वेळात सगळेजण वेळेत डॉ स्नेहा यांच्या clinic मध्ये पोहचले.
डॉ स्नेहा यांनी प्रेरणाच चेकअप केलं आईने घडलेला सगळा प्रकार सांगितला. डॉ नी सगळं त्यांचं बोलणं ऐकून घेतलं.
डॉ. स्नेहा: हां मी याच गोष्टींचं निरीक्षण करायला अधून मधून clinic मध्ये बोलावलं तुम्हाला...आतापर्यंत या गोष्टी आपल्याला समजू शकल्या नाहीत पण आज टॅक्सीच्या संपामुळे आपल्याला हे समजू शकलं... प्रेरणाचा स्वभाव पाहता ती पटकन तिच्या मनातली भिती व्यक्त करत नाही आज जेव्हा ही situation तिला face करावी लागली तेव्हा ती घाबरली...
प्रतिक: मग डॉ यावर solution काय...?
डॉ स्नेहा: आता आपण प्रेरणाला मेडिटेशन ट्रीटमेंट सुरु करु... तिच्यामुळे तिच्या मनात जी भिती आहे ती निघून जाईल आणि पूर्वीसारखाच तिच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण होईल..आणि आता जर ऑटो व्यतिरिक तिच्याकडे ऑफिसमध्ये जायला दुसरा पर्याय असेल तर ती ऑफिस जॉईन करु शकते...म्हणजे तिची तयारी असेल तर....आणि (प्रतिककडे पाहत) तुम्ही एकाच ऑफिस मध्ये आहात म्हणजे तुमच तिच्याकडे आपोआप लक्ष ही राहील..(प्रेरणाकडे पाहून) मग प्रेरणा आहेस का ऑफिसमध्ये जायला तयार.... त्यावर प्रेरणा काहीच बोलली नाही.... तशा डॉ म्हणाल्या तुम्ही सगळे जण थोडा वेळ बाहेर थांबाल का....? मला प्रेरणाशी थोडं खाजगी बोलायचं आहे तसं डॉ च्या सांगण्या प्रमाणे सगळे बाहेर थांबले.
डॉ स्नेहा: प्रेरणा, तुला जॉब सोडायचा नाही ना की अजून थोडा वेळ हवा आहे जॉईन करायला...?
प्रेरणा: डॉ खरं सांगू तर मला खूप भिती वाटते म्हणजे असं वाटतं की ऑफिसमध्ये सगळे माझ्या बाबतीत जे झालं त्यानंतर माझ्याशी बोलणं सोडतील....मी एकटी पडेन...मला ऑटो पाहिली की तोच सगळा प्रकार आठवतो...सगळं पुन्हा डोळ्यासमोर येऊ लागतं...मला खूप वाटतं की मी पूर्वी सारखं काम करावं पण माझी हिंमत होत नाही.
डॉ: पण प्रेरणा कधीतरी प्रयत्न करायलाच हवा ना...हे बघ आज तू जेव्हा घाबरुन चक्कर येऊन पडलीस तेव्हा आईबाबा किती घाबरले होते.... त्यांना तुझी काळजी आहे त्यांच्यासाठी तुला स्ट्रॉंग नको का व्हायला....आणि राहिला प्रश्न ऑफिसमधल्या लोकांचा... तर कोण काय बोलत आहे की नाही हे तुला तिथे गेल्यावरच कळेल ना कदाचित तुला वाटतं तसं काही होणार ही नाही... आणि आता मेडिटेशन सुरु केलं ना की तुझ्या मनात जी भिती आहे ना ती पूर्णपणे निघून जाईल बघ..आता छान पैकी हसून सांग मला की तू ऑफिसमध्ये जायला तयार आहेस ते.
प्रेरणा: (हसून) हां मी जाईन ऑफिसमध्ये आणि पुन्हा पूर्वी सारखंच काम करायला सुरुवात करेन.
डॉ: That's like a good girl...आता सगळ्यांना आत मध्ये बोलवू का मी...?
प्रेरणा: हो चालेल डॉ...! तसं डॉ नी सगळ्यांना आत बोलावून घेतलं आणि मेडिटेशन साठी address देऊन त्यांनी प्रेरणा ऑफिस जॉईन करत असल्याचं सांगितलं. तसे सगळेजण हे ऐकून खूप खुश झाले आणि डॉ चा निरोप घेऊन निघाले.
सगळेजण डॉ च्या क्लिनिक मधून निघाले तसं प्रतिकने काहीतरी विसरलो असं म्हणून त्यांना कारकडे थांबायला सांगून पुन्हा डॉ च्या केबिनमध्ये गेला. त्याला पाहून डॉ म्हणाल्या, येस मि राजाध्यक्ष, काही बोलायचं होतं का?
प्रतिक: हो डॉ, मला तुमचं कार्ड हवं होतं प्रेरणा संदर्भातच बोलायचं होतं. ओके शुअर असं म्हणून डॉ नी त्यांचं कार्ड दिलं तसा प्रतिक thank you म्हणून तिथून कारच्या दिशेने निघाला. त्याने प्रेरणा आणि तिच्या आईबाबांना घरी सोडले आणि तो पुन्हा ऑफिसच्या दिशेने निघाला.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा