Jan 22, 2022
प्रेम

अस्तित्व एक संघर्ष-अंतिम भाग

Read Later
अस्तित्व एक संघर्ष-अंतिम भाग

अस्तित्व एक संघर्ष

अंतिम भाग


प्रेरणाची गोड बातमी ऐकून सगळेजण खूश झाले होते. प्रतिक आता तर तिची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेऊ लागला होता. तिचे आईबाबा, विवेक आणि मालगुडे फॅमिली अधून मधून तिला कॉल करुन तिची तब्येत विचारत होते. तिला कॉलेज मध्ये सोडायचं आणायचं काम मिलिंद यांनी घेतलं होतं. असेच दिवसा मागून दिवस जात होते. नंदा, आजी तिला जे जे काही खावं असं वाटत असेल ते करुन खायला द्यायचे. नंदा तर तिला किचनमध्ये काहीच करायलाच देत नसे. सगळेच तिची खूप काळजी घेत होते.

 

रेखा प्रेरणाला घेऊन रोज सकाळी टेरेसवर फिरायला जात असे आणि त्यांच्या मागे आजी दोन्ही नातवांचा हात पकडून फिरत असे. रेखाने अस्मी-अंकितच्या वेळी ज्या ज्या ऍक्टिविटी केल्या होत्या त्या सगळ्या ती प्रेरणाकडून करुन घेत होती. आजी रात्री तिला झोपताना एखादा अभंग किंवा एखादी प्रवचनात सांगितलेली गोष्ट सांगत होती जेणेकरुन होणाऱ्या बाळाला उपजतच त्याचं बाळकडू मिळून जाईल. सोनाला इतक्यात येणं शक्य नसल्याने ती न विसरता रविवारी व्हिडिओ कॉल करत असे. रुही सुद्धा तिच्या बोबड्या भाषेत प्रेरणा-प्रतिकशी बोलत असे. त्या दोघांच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत चालू होतं. 

***

 

खुशी देशमुख रेखाच्या घरी अधून मधून येत असल्याने प्रेरणाची आणि तिची ही आता गट्टी जमली होती. नंदाला मात्र खुशीला बघून सतत कोणाची तरी आठवण होत होती. तिचा चेहरा तिला कोणाची तरी आठवण करुन देऊ पाहत होता. पण खुशीला विचारावं तर कसं या विवंचनेत तिने फक्त तिचं मन मिलिंद समोर मोकळं केलं होतं. मिलिंद यांनी तिला काही गोष्टी काळावरच सोडून द्याव्यात असं सांगून समजावलं. पण मिलिंद याबाबत राजीवशी बोलले जेणेकरून त्यांना नंदाला जे वाटतं आहे ते खरं आहे का ते जाणून घ्यायला. पण राजीवने वेळ आली की आपण नक्की तिच्याबद्दल सांगू असं आश्वासन दिलं. राजीव त्याच्या कोणत्याही एम्प्लॉयची माहिती सखोल शोधून काढतो हे मिलिंदना माहीत होत म्हणून मग ते राजीवने बोललेल्या गोष्टीसाठी कबूल झाले. खुशी स्वभावाने इतकी छान होती की राजीव आणि प्रतिक दोन्ही घरातल्या लोकांना तिने आपलंसं केलं होतं.

***

 

एकदा खुशी संध्याकाळी राजीवबरोबर त्यांच्या घरी आली. त्यांच्या घरी सगळ्यांची विचारपूस करुन ती प्रेरणाशी बोलायला आली. नंदा, आजी दोघीही गप्पा मारत बाहेर लिविंग रुममध्ये बसल्या होत्या. खुशीने त्या दोघींची विचारपूस केली. त्यांच्याशी गप्पा मारल्या.

खुशी: काकू, प्रेरणा वहिनी कुठे आहे...?

नंदा: अग ती आत आहे तिच्या रुममध्ये. जा आत काही हरकत नाही.

खुशी: बरं काकू... म्हणत ती प्रेरणाच्या रुममध्ये गेली. प्रेरणाच्या रूमचा दरवाजा तसा उघडाच होता. पण त्यावेळी ती विवेकशी व्हिडिओ कॉल वर बोलत होती. खुशीने हळूच रुममध्ये डोकावलं आणि तिला व्हिडिओ कॉलवरचा प्रेरणाशी बोलणारा विवेक दिसला. विवेकला स्क्रिनवर पाहून ती रुममध्ये न जाता तशीच मागे वळून बाहेर लिविंग रुममध्ये आली.

आजी: (तिला बाहेर आलेलं पाहून) काय झालं खुशी...? प्रेरणा झोपली आहे का..??

खुशी: नाही आजी, वहिनी व्हिडीओ कॉलवर आहेत. मी नंतर बोलते त्यांच्याशी.

नंदा: हां तिचा भाऊ विवेक असावा. मघाशी म्हणाली होती मला.. तो कॉल करणार आहे म्हणून... मीच विसरले. ये बस आमच्या बरोबर..

खुशी: नको काकू, पुन्हा कधीतरी नक्की येईन. आता घरी सगळे वाट पाहत असतील.

नंदा: घरी कोण कोण असतं तुझ्या..?

खुशी: आईबाबा आणि मी. शेजारीच आमच्या माझ्या मामांची फॅमिली राहते.

आजी: अच्छा, किती मामा आहेत तुला...?

खुशी: आजी, ते माझ्या आईला भावंड नाहीत. हे माझ्या आईचे मानलेले भाऊ आहेत. पण मानलेले असले तरी त्यांचा आमच्यावर इतका जीव आहे की, इतका कोणी सख्खा मामा ही नाही लावणार... बोलताना ती भावूक झाली.

आजीने तिला असं पाहून मग पुढे तिला काही विचारलंच नाही. 

खुशी: (डोळे पुसत) काकू, आजी येते मी नंतर...

आजी: हो बाळा, काळजी घे.

खुशी त्यांचा निरोप घेऊन राजीवच्या घरी आली आणि नेहमीचा तिचा बुरखा घालून राजीव बरोबर ती तिच्या घरी जायला निघाली.

***

 

प्रेरणाचा ६ वा महिना संपत आला आणि तिची कॉलेजची शेवटची परीक्षा ही सुरु झाली. तिला बसून बसून जास्त अभ्यास करणं जमत नसल्याने प्रतिक तिला पडून रहायला सांगून स्वतः नोट्स वाचून दाखवत असे. तिची परीक्षा झाली तसं प्रतिकसकट प्रेरणाने ही मोकळा श्वास घेतला. दोघेही रात्री एकमेकांचा हात हातात घेऊन मोकळेपणाने गप्पा मारत होते.

प्रेरणा: प्रतिक, तुम्हाला काय वाटतं काय होईल आपल्याला...?

प्रतिक: (तिच्या हातावर किस करत) कोणीही चालेल मुलगी किंवा मुलगा... आपलं बाळ माझा जीव असेल.

प्रेरणा: तरी सांगा ना...

प्रतिक: (तिच्या कपाळावर वर किस करत) मला ना एक छोटी प्रेरणा हवी आहे. प्रेरणा त्याच्या बोलण्याने लाजून हसली.

प्रेरणा: आणि छोटा प्रतिक झाला तर...

प्रतिक: (तिच्या डोळ्यांत पाहून) मग एक-दोन वर्षांनी आपण छोट्या प्रेरणाचा विचार करु... चालेल ना तुला...

प्रेरणा पुन्हा लाजून हसली. ती काहीच बोलत नाही आहे हे पाहून प्रतिक तिच्या पोटाला कान लावत बोलू लागला, "ओ ज्युनिअर राजाध्यक्ष, झोपलात का...?, तुझ्यावर आमच्या दोघांचं खूप प्रेम आहे. तर तुला एक गंमत सांगतो हां, तू मुलगा आहे की मुलगी असं तुझ्या मम्माचं आणि माझं म्हणजे तुझ्या पप्पाचं डिस्कशन चालू आहे. तर मला सांग बाळा तूझं लक्ष आहे ना आमच्या बोलण्याकडे...?" प्रेरणा त्याच्या अशा वागण्याने लाजून लाजून हसू लागली होती.

प्रतिक: बाळा बोल काहीतरी... तसं लगेच बाळाने किक मारली.

प्रेरणा: आई ग...

प्रतिक: बाळा, इतकं जोरात नको रे किक मारु.. मम्मीला त्रास होतो ना रे...

प्रेरणा त्याचं बोलणं ऐकून हसू लागली. प्रतिक तिच्या पोटावर ओठ टेकवत म्हणाला, "गुड नाईट बाळा, झोप आता तू सुद्धा आणि ऐक बरं का, मम्मी-पप्पा दोघे तुझी खूप वाट पाहत आहेत... लवकर ये...!!"

त्याने प्रेरणाला बेडवर झोपायला मदत केली आणि तो ही तिच्या बाजूला शांत झोपला.

***

 

लीला आजीपर्यंत प्रेरणाची गोड बातमी पोहचली होती. तिला तिचं वागणं किती चुकीचं होतं हे आता लक्षात आलं होतं. ती आता अपार्टमेंटच्या खाली जाणं शक्यतो टाळू लागली. प्रेरणाची बातमी कळल्यापासून तिने तर पार्कमध्ये जाणं सुद्धा बंद केलं होतं. पार्कमधल्या सगळ्या आजी प्रेरणाची गोड बातमी ऐकून तर खूश झाल्याच होत्या पण लीलाचं बोलणं खोटं ठरलं म्हणून जास्त खूश होत्या. आता त्या फक्त लीला आजी कधी पार्कमध्ये येते त्याचीच वाट पाहत होत्या.

***

 

प्रेरणाचा आज डोहाळे जेवणाचा एका हॉलमध्ये कार्यक्रम होता. समिधा-मीना, मालगुडे फॅमिली, तिचे आईबाबा, रेखाची फॅमिली, आजींच्या मैत्रिणी, खुशी, राजीवच्या घरातील सगळे आज कार्यक्रमासाठी आले होते. सोना समीर बारशाला सुट्टी परत मिळणार नाही म्हणून ऑनलाइनच कार्यक्रम पाहणार होते. प्रेरणाने मस्त हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तिच्या चेहऱ्यावर तेज झळकत होतं. प्रतिकने ही हळदीच्या रंगाचा सदरा पायजमा घातला होता. प्रेरणाच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमानंतर दोघांचे वेगवेगळ्या प्रकारे फोटोग्राफरने फोटो काढायला सुरवात केली. आई मी होणार, बाबा मी होणार, आजी मी होणार... अशा प्रकारचे बोर्ड हातात घेऊन सगळयांनी त्या दोघांसोबत फोटो काढले. आता वेळ होती पेढा बर्फीच्या कार्यक्रमाची... प्रेरणासमोर 2 वाट्या झाकून ठेवण्यात आल्या होत्या. प्रेरणाने प्रतिकला विचारुन एक वाटी खोलली. त्यात काहीच नव्हतं. ते पाहून आजीने तिला दुसरी वाटी खोलायला सांगितली. दुसरी वाटी ही रिकामी निघाली.

आजी: अरे, वाटी मधले पेढा बर्फी कुठे आहेत...

नंदा: आई, मी ठेवले होते त्यात..

आजी: हां पण गेले कुठे...? बोलताना आजीचं लक्ष नेमकं कोपऱ्यात बसलेल्या अस्मी-अंकित आणि ओवीकडे गेलं. तिघेही मिळून पेढा आणि बर्फीचे तुकडे करून खात होते.

आजी: ते बघा, तिकडे आहेत बर्फी आणि पेढा... आजीचं बोलणं ऐकून अनू आणि रेखा दोघी त्यांच्याकडे गेल्या.

अनू: ओवी, हे तुम्ही कुठून घेतलं. ओवी ने खाता खाता वाटीच्या दिशेने हात केला. तसे आजीसकट सगळे हसू लागले. नंदाने परत

2 वाट्या आणून ठेवल्या. प्रेरणाने त्यातली एक वाटी निवडली.

आजी: बर्फी निघाली बरं का...!! आजीने ऑनलाइन असलेल्या सोना-समीरला सांगितलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि त्यांना टाळ्या वाजवताना पाहून बच्चे मंडळींनी ही टाळ्या वाजवल्या. कार्यक्रम झाल्यावर प्रेरणा काही दिवस माहेरी राहून पुन्हा राजाध्यक्षांच्या घरी आली. तिचं ते पहिलं बाळंतपण असलं तरी राजीवने त्यांच्याच जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये तिचं नाव दाखल केलं होतं. त्यामुळे आपसूकच तिचं पुन्हा येणं झालं होतं.

***

 

असेच काही महिने निघून गेले आणि प्रेरणाची डिलिव्हरीची तारीख जवळ येऊ लागली. आदल्या दिवशीच्या सोनोग्राफी रिपोर्ट वरुन डॉ नी तिला आज ऍडमिट करायला सांगितलं. प्रतिकने मग ऑफिसमध्ये कळवून घरीच थांबायचं ठरवलं. प्रेरणा बरोबर तो आणि मिलिंद दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले. डॉ नी तिचा बीपी नॉर्मल आहे का ते पाहून घेतलं. दुपारी तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या तसं तिला OT मध्ये नेण्यात आलं. बाहेर प्रतिक काळजीने एका बाकड्यावर बसून होता. मिलिंद त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला स्ट्रॉंग रहा म्हणून सांगत होते. काही वेळाने डॉ OT मधून बाहेर आले. त्यांना आलेलं पाहून मिलिंद आणि प्रतिक दोघेही उभे राहिले.

डॉ: Congratulations मि प्रतिक, मुलगा झाला आहे.

प्रतिक: आणि डॉ प्रेरणा कशी आहे.

डॉ: त्याही ठीक आहेत. काळजी करायची आवश्यकता नाही. सध्या त्यांना थोडा आराम करु दे. मग तुम्ही भेटू शकता.

प्रतिक: ओके डॉ... थँक यू सो मच... डॉ प्रतिककडे स्मित हास्य करुन निघून गेल्या.

 

प्रतिक, मिलिंदने सगळ्यांना कॉल करुन ही आनंदाची बातमी कळवली. थोड्या वेळाने तो प्रेरणाच्या रुममध्ये आला. प्रेरणा शांत डोळे मिटून पडून होती. प्रतिकने तिच्या जवळ येऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याच्या स्पर्शाने तिला जाग आली. तिने उठून बसण्याचा प्रयत्न केला पण थकललेली असल्याने तिला उठून बसायला जमेना. प्रतिकने तिला हातानेच बसून रहायची खूण केली.

प्रतिक: ठीक वाटत आहे ना...

प्रेरणा: हं (तिने मान हलवत पाळण्याकडे बोट दाखवलं)

बाजूलाच पाळण्यात बाळ शांत झोपलं होतं. प्रतिकने हळूवारपणे त्याला उचलून प्रेरणाकडे आणलं.

प्रतिक: आज कळलं मला, राजीवला त्याक्षणी कसं वाटलं असेल. बाबा होण्याचं सुख आज माझ्या आयुष्यात तुझ्यामुळे आलं. Thank you Prerna.... माझ्या आयुष्यात येऊन ते इतकं सूंदर केलं... त्याने बाळाला हळूच प्रेरणाला दाखवलं. तिच्या एका हाताला सलायन असल्याने तिने दुसऱ्या हाताने बाळाच्या चेहऱ्यावरुन हात फिरवला. तिच्या स्पर्शाने झोपेतही बाळ हसलं. मागूनच मिलिंद ही आले.

मिलिंद: प्रेरणा बेटा, कशी आहेस...

प्रेरणा: (हळू आवाजात) ठीक आहे.

मिलिंद: जास्त बोलू नकोस... आराम कर... (मग बाळाकडे पाहून) अरे, माझ्या बाळा... आजोबा आला बघ तुझा... त्यांनी प्रतिकच्या हातातून बाळाला घेतलं... तेवढ्यात नर्स प्रेरणाचं चेकअप करायला आली आणि तिने त्या दोघांना बाहेर जायला सांगितलं. मिलिंदनी बाळाकडे एकवार पाहून त्याला पुन्हा पाळण्यात ठेवत ते प्रतिक बरोबर रुमच्या बाहेर पडले. संध्याकाळी तिचे आईबाबा, मालगुडे काकी-काका, नंदा, राजीवचे आईबाबा सगळे तिला भेटायला आले. अस्मी-अंकित मुळे राजीव-रेखा यांना येणं शक्य नाही झालं. त्यामुळे ते तिला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये भेटून आले. काही दिवसांनी प्रेरणाला डिस्चार्ज मिळाला तशी ती तिच्या माहेरी राहायला आली. 

***

 

एक महिन्यानंतर आज प्रेरणा-प्रतिकच्या बाळाचं बारसं होतं. सोना-समीर रुहीला घेऊन काही दिवस आधीच आले होते. विवेकची ट्रेनिंग पूर्ण होऊन तो ही त्याच्या घरी आला होता. हॉलमधल्या डेकोरेशनकडे, जेवणाकडे त्याने आणि आदीने स्वतः हजर राहून सगळं व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली होती. हॉलच्या स्टेजवर बारशाचा कार्यक्रम सुरु झाला. आजी मालगुडे काका-काकूंबरोबर खाली सोफ्यावर बसली होती. त्यांच्याच बाजूला ओवी, अस्मी-अंकित आणि रुही बसले होते. सोनाने बाळाच्या कानात हळूच 'यश' म्हणून नाव सांगितलं तसं स्टेजवर बनवलेल्या बोर्डवरचा पडदा दूर करण्यात आला. सगळ्यांनी नाव पाहून टाळ्या वाजवल्या. बाळाबरोबरचे फोटो, फॅमिली फोटो, पाहुण्यांचं जेवण सगळा कार्यक्रम सुरेख पार पडला. आलेले सगळे पाहुणे अरेंजमेंटची तारीफ आणि बाळाला गिफ्ट आणि आशीर्वाद देऊन गेले. आजी ही सगळं पाहून खूप खुश झाली होती आता तिला फक्त आपली नातसून कधी बाळाला घेऊन घरी येते आहे असं झालं होतं.

***

 

काही दिवसांनी,

रेखा: राजीव, तुम्ही खुशीला सांगितलं नव्हतं का... बारशाला यायला...?

राजीव: अग सांगितलं होतं... पण तिच्या बाबांची तब्येत ठीक नव्हती म्हणून ती नाही येऊ शकली.

रेखा: त्यादिवशी प्रेरणा मला विचारत होती की, खुशीला सांगितलं नाही का म्हणून... आज तरी बोलवा तिला मग... आज येणार आहे प्रेरणा.

राजीव: हो हो सांगितलं आहे मी तिला यायला. येईल ती इतक्यात. ते एक बरं केलं रविवारीच प्रेरणाने यायचं ठरवलं ते... म्हणजे आपसूकच मला सुट्टी घ्यावी लागली नाही.

रेखा: हं, आणि मला ही... खुशीचे बाबा आता ठीक आहेत का का मग...?

राजीव: हो.

रेखा: मला ना राजीव, खुशीशी आपली ओळख अशी काही वर्षांपासूचीच आहे यावर अजूनही विश्वास बसत नाही. इतकं ती आपल्या, प्रेरणाच्या फॅमिलीबरोबर मिसळून गेली आहे.

राजीव: हो ते तर आहे... आणि मला तिच्या रुपात एक छोटी बहीण मिळाली... तो त्याच्या हातातल्या तिने बांधलेल्या राखीकडे पाहत म्हणाला. एक सोना दीदी जी माझी मोठी बहीण झाली आणि एक खुशी जी माझी छोटी बहीण झाली. तेवढ्यात दारावरची बेल वाजली.

रेखा: आली वाटतं खुशी..

मालतीने दरवाजा उघडून खुशीला आत घेतलं.

मालती: ये बेटा आत...

खुशीने चेहऱ्यावरचा पडदा पूर्ण बाजूला केला. 

खुशी: काकू, कशा आहात...

मालती: आता आठवली तुला काकू.

खुशी: (एका हाताने कान पकडून) सॉरी बरेच दिवस झाले यायलाच मिळालं नाही. बाबांची तब्येत थोडी ठीक नव्हती तर यायला जमलं नाही.

प्रकाश: आता ठीक आहे का बाबांची तब्येत...?

खुशी: हो काका.

मालती: सॉरी बेटा मला माहीत नव्हतं तुझ्या बाबांना बरं नव्हतं ते... तू फ्रेश होऊन ये मग बोलूया आपण..

खुशी: हो काकू म्हणत ती बाथरुम मध्ये जाऊन बुरखा काढून फ्रेश होऊन आली.

रेखा: आलात मॅडम... खुशीला रेखाने hug केलं. मागोमाग अस्मी-अंकित ही तिला येऊन बिलगले.

राजीव: प्रतिक प्रेरणाला घेऊन निघाला आहे तिकडून... आताच कॉल आला होता.

मालती तोपर्यंत सगळ्यांसाठी कॉफी घेऊन आल्या.

रेखा: आई, मला आवाज द्यायचा होता ना, मी आले असते.

मालती: काय एवढं त्यात... कॉफीच तर करायची होती. रेखाने ट्रे मधून खुशी, प्रकाश, मालती आणि राजीवला कॉफी दिली आणि तिने स्वतःला ही कॉफी घेतली. सगळे गप्पा मारत बसले.

 

प्रतिक प्रेरणा घरी आले तसं नंदाने आई-बाळाची नजर काढून त्यांना आत घेतलं. आजीने प्रेरणाच्या हातून बाळाला घेतलं आणि ती सोफ्यावर येऊन बसली. प्रेरणा-प्रतिक आत फॅनच्या खाली आले तसं ठरल्या प्रमाणे मिलिंद यांनी फॅनच बटण चालू केलं आणि फॅनवरच्या गुलाबांच्या पाकळ्या त्यांच्या डोक्यावर पडल्या. सोना-समीर, राजीव-रेखा आणि खुशी एक सूरात जोरात ओरडले, welcome to rajadhyaksh house... प्रेरणाने सोना, रेखाला hug केलं मग खुशीने ही तिला येऊन hug केलं. तेवढ्यात दरवाजातून विवेक बॅग्स घेऊन आला. त्याची नजर प्रेरणाला hug करणाऱ्या खुशीकडे गेली. खुशीचीही नजर त्याच्याकडे गेली तशी ती प्रेरणा पासून दूर झाली.

प्रेरणा: खुशी, तुला यायला काय झालेलं बारशाला... रागावली आहे बघ मी तुझ्यावर...

रेखा: अग तिच्या बाबांची तब्येत ठीक नव्हती.

प्रेरणा: ओह सॉरी, आता ठीक आहेत ना...?

खुशीने मानेनेच हो म्हंटलं.

प्रेरणा: आता आली आहेस ना तर मस्तपैकी गप्पा मारु..

खुशी: (नजर लपवत) नाही मला निघावं लागेल. ते खूप महत्त्वाचं काम आहे.

प्रेरणा: बरं आता सोडते आहे पण मग नंतर येशील तेव्हा वेळ जास्त काढून ये...

खुशी: हो म्हणत तिने सोना-समीर, राजाध्यक्ष कुटुंबातील सगळ्यांचा निरोप घेतला आणि राजीवच्या घरी पुन्हा बुरखा घेण्यासाठी आली.

राजीव: मी येतो तिला सोडून...

प्रतिक: लवकर ये रे...

आजी: अरे विवेक असा उभा कशाला... बस ना...

विवेक स्मितहास्य करत आजींच्या बाजूला बसला पण खुशीला समोर पाहून त्याला काहीच कळेनासं झालं होतं.

***

 

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राजाध्यक्ष यांच्या घराची बेल वाजली. मावशींनी दार उघडून बाहेर आलेल्या लीला आजींना आत घेतलं.

लीला: शशिला बोलावं ग...

मावशी: बरं म्हणत तिने आजींना आवाज दिला.

आजींच्या मागोमाग नंदा, प्रेरणा, सोना ही बाहेर आल्या. सोफ्यावर वर्तमानपत्र वाचत बसलेल्या मिलिंदनी नक्की काय झालं हे पाहण्यासाठी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं.

शशी: बस लीला... आज कसं येणं केलं.

लीला: (खाली मान घालून) मी तुम्हां सगळ्यांची माफी मागायला आले आहे.

शशी: माफी मागायची असेल तर माझ्या नातसूनेची माग.

लीला: (प्रेरणा समोर हात जोडून) माफ कर प्रेरणा मला, मी तुझ्या बद्दल खूप चुकीचं बोलले. त्यांचं बोलणं चालू असताना समीर-प्रतिकही बाहेर आले.

प्रेरणा: आजी काय करताय तुम्ही... तुमचे हात जोडण्यासाठी नाहीत आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आहेत. हे ऐकून लीला आजीच्या डोळ्यात अश्रू आले.

शशी आजी: बघ लीला, आता कळलं का... का मी माझ्या नातसुनेचं गुणगाण करते. तू इतकं तिच्या बद्दल बोलूनही तिने तुझ्या कडून फक्त तुझ्या आशीर्वादांची अपेक्षा केली आहे.

लीला: खरंच चुकलं माझं शशी... जमल्यास मला तुम्ही सगळ्यांनी माफ करा... पुन्हा हात जोडून लीला आजी जायला निघाली.

शशी आजी: थांब लीला, माझ्या नातवाच्या बाळाला नाही का बघणार आणि तुझा आशीर्वाद देणार. नंदाने लगेच पाळण्यातून यशला आणून आजींच्या स्वाधीन केलं. शशी आजीने लीला आजीला बसायला सांगून तिच्या हातात बाळाला दिलं. लीला आजी त्याच्या गालांवरून हात फिरवत म्हणाल्या, आईबाबांचं नाव मोठं कर हां....भावूक झाल्याने त्यांना पुढे काही बोलवेना. त्यांनी शशी आजी कडे पुन्हा यशला दिलं. नंदा त्यांच्या साठी प्लेटमध्ये मिठाई घेऊन आली. आजीने त्यांना जबरदस्तीने खायला भाग पाडलं. लीला आजी तिथून जायला निघणार तोच प्रेरणा-प्रतिक, सोना-समीर त्यांच्या पाया पडले. लीला आजीने त्या सगळ्यांना आशीर्वाद दिला आणि त्या त्यांच्या घरातून स्वतःच्या घरी जायला निघाल्या.

***

 

दीड वर्षानंतर...

प्रेरणा: (यशबरोबर खेळत असलेल्या आजीला) आजी पाया पडते... आज माझा कॉलेजला शिकवायला जायचा पहिला दिवस आहे.

आजी: (प्रेरणाच्या डोक्यावर हात ठेवून) अग पाया कशाला पडते, माझे आशीर्वाद नेहमीच तुमच्या बरोबर आहेत...

प्रेरणा मिलिंद-नंदाच्या पाया पडायला आली आणि ती वाकणार तेवढ्यात मिलिंद म्हणाले, "नको बेटा, पाया नको पडूस..." नंदा आणि मिलिंदने तिला ऑल द बेस्ट केलं.

प्रतिक: प्रेरणा मॅडम, निघूया का आपण... बाकी काही नाही... मॅडमच उशिरा गेल्या तर कसं चालेल... तसे सगळे हसू लागले.

मिलिंद: चला निघा लवकर...

दोघेही सगळयांना बाय बोलून कॉलेजला जायला निघाले.

नंदा: माझं स्वप्न माझ्या मुलांकडून नाही झालं पूर्ण पण माझ्या सुनेने ते नक्की पूर्ण केलं.

आजी: (नंदाच्या पाठीवर हात ठेवून) सून नाही लेकचं आहे ती तुझी... अशी सासू मिळायला ही भाग्य लागतं.

मिलिंद: (आजीला) आणि अशी आई आणि आजी मिळायला ही... तिघेही एकमेकांना पाहून आनंदाने हसू लागले.

***

 

रात्री प्रेरणा सगळं आटपून झोपायला आली. प्रतिक खिडकीतून बाहेरचं चांदणं पाहत होता. प्रेरणा त्याच्या जवळ येऊन उभी राहिली.

प्रतिक: मग आजचा दिवस कसा होता.

प्रेरणा: (त्याच्या मिठीत जाऊन) खूप छान. प्रतिक, आज खऱ्या अर्थाने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या.

प्रतिक: पण माझी एक इच्छा अजून आहे बरी का पूर्ण व्हायची.

प्रेरणा: (त्याच्याकडे पाहून) कोणती इच्छा...?

प्रतिक: मला तुझ्यासारखीच दिसणारी, गोड हसणारी एक परी हवी आहे.

प्रेरणा: (लाजून) नाही हां इतक्यात... म्हणत ती बेडवर येऊन बसली. प्रतिक ही तिच्या बाजूला येऊन बसला.

प्रतिक: (तिचा हात हातात घेऊन) मला घाई नाही आहे... पण हवी तर आहे. बोलता बोलता दोघेही बेडवर पडले.

प्रेरणा: (त्याच्याकडे पाहून) प्रतिक, मला अजूनही हे एका स्वप्ना सारखं वाटत आहे.

प्रतिक: का बरं...

प्रेरणा: माझ्या बाबतीत जे काही झालं त्यानंतर तुम्ही जोडीदार म्हणून माझ्या आयुष्यात येणं... आईबाबा, आजी, सोना दीदी सगळंच एका स्वप्ना प्रमाणे वाटत आहे.

प्रतिकने तिच्या हाताला हळूच चिमटा काढला.

प्रेरणा: प्रतिक, काय करताय.. दुखतं ना...

प्रतिक: दुखत ना...(स्वतःच्या हृदयाकडे हात करुन) मग मला ही दुखतं इथे... जेव्हा तू असं काही बोलतेस. बोलता बोलता त्याने तिला जवळ ओढलं.

प्रेरणा: सॉरी पुन्हा नाही करणार असं..

प्रतिक: मान्य आहे प्रेरणा, काही गोष्टी मी तुझ्या आयुष्यात घडलेल्या बदलू शकत नाही पण एका वाईट स्वप्ना प्रमाणे आपण ते विसरु तर शकतो ना.. प्रॉमिस कर मला... यापुढे तू या गोष्टी मनातून काढून टाकशील.

प्रेरणा: हं

प्रतिक: हं नाही बोल...

प्रेरणा: प्रॉमिस... नाही वागणार मी अशी यापुढे..

प्रतिक: (तिला मिठीत घेऊन) That's like my wife...

प्रतिकच्या मिठीत ती सुखावून गेली. त्या रात्रीच्या चांदण्यात दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्ण हरवून गेले. प्रतिकच्या साथीने प्रेरणाची तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक वाईट प्रसंगाशी चाललेली लढाई आता कायमची थांबली होती. आता यापुढे कायमचे फक्त तिच्या आयुष्यात सुंदर क्षण रेखाटले जाणार होते.

 

पर्व एक समाप्त...

 

(खरं तर ही कथा लिहिताना मनात असंख्य विचार होते, मी जे लिहिते आहे ते आवडेल ना...? पण तुम्ही सगळ्यांनी या कथेला दिलेला प्रतिसाद मला नेहमीच पुढे लिहिण्यासाठी प्रोत्साहन देत गेला आणि मी पुढे लिहू लागले. कथेला तुम्ही आपलंसं केलं यासाठी तुम्हां सगळ्यांचे खूप सारे आभार... तुमच्या आपलेपणामुळेच लवकरच घेऊन येत आहे कथेचं "पर्व-२-अबोल प्रीत" विवेक आणि खुशी यांची. प्रेरणा-प्रतिक यांची जरी कथा इथे संपत असली तरी पर्व-२ मध्ये ते आपल्या सगळ्यांच्या भेटीला अधून मधून येतीलच. आशा आहे पर्व-२ ही तुम्हाला नक्की आवडेल.)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Ujwala Desai

Graphic Designer

तशी मी लेखिका नाही. पण सहज मनाला सुचलेलं शब्दांत उतरवायचा प्रयत्न करते.. आशा आहे की तुम्हाला ते लिखाण आवडेल...