Jan 26, 2022
नारीवादी

तिचं समजूतदारीचं शहाणपण- भाग १

Read Later
तिचं समजूतदारीचं शहाणपण- भाग १

"लेक माहेराचं सोनं,

लेक सौख्याचं औक्षण,

लेक बासरीची धून,

लेक गंध हळवं मन..


खरंच किती मार्मिक अर्थ दडलाय नाही या ओळींत. अशीच असते ना लेक. माहेरासाठी सुखाचा ठेवा असते लेक. ती असते म्हणून घराचे घरपण टिकून असते. लेकिमुळेच घर हसते,खेळते आणि आनंदी राहते. चार दिवस जरी लेक माहेरी आली तरी घर गोकुळासारखे गजबजते. ती पुन्हा सासरी गेल्यावर मात्र घर रिकामे भासते. हीच परिस्थिती सगळीकडे पाहायला मिळते. ती जन्माला आल्यापासून तर सासरी जाईपर्यंतचा काळ म्हणजे आई बापासाठी त्यांच्या आयुष्यातील एक सुखाचे पर्व असते. परंतु आताच्या काळात मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि पूर्वींच्या काळातील हा दृष्टिकोन यांत खूप मोठा फरक. सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी नवे पर्व जरी सुरू केले त्याकाळी पण त्यानंतरही कितीतरी वर्षे उलटली असतील सामान्य जनतेची मानसिकता बदलायला. हळूहळू यांत सुधारणा झाली. मुलींसाठी थोडी मोकळीक समाजात निर्माण झाली. पण तरीही शहरी आणि ग्रामीण भाग यांतील दरी मात्र वर्षानुवर्षे कायम राहिली. ग्रामीण भागातील मुलींना शहरी भागातील मुलींपेक्षा मिळणारी वागणूक, त्यांच्यावर लादण्यात येणारी बंधनं, समाजाकडून त्यांना मिळणारी वागणूक, रुढी परंपरा यांचा पगडा याबाबतीत सारीच बंधनं असायची. आता काळ खुप बदलला. शिक्षणामुळे समाज सुधारला. सोशल मीडियामुळे तो जवळ आला. विचारांची देवाणघेवाण जलदपणे होवू लागली. त्यामुळे मुलींबद्दलचा दृष्टिकोनही बदलला.आताच्या काळात मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणजे एक सुखाचा सोहळा असतो. सोशल मीडियावर मुलींच्या जन्माचे होणारे स्वागत पाहताना डोळ्याचे अगदी पारणे फिटल्याचे समाधान लाभते. पूर्वी लेक जन्माला आली म्हणून नाकतोंड मुरडले जायचे. मुलीच्या आईचा अतोनात छळ केला जायचा. आता मात्र पोटी एक तरी मुलगी असावी अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. खरंच किती बदलला नाही काळ. आणि हा एवढा मोठ्ठा बदल विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे घडून आला असे म्हणायला हरकत नाही.

साधारणपणे दोन दशकांपूर्वीपर्यंत समाज जुन्या बुरसटलेल्या विचारांत बऱ्यापैकी अडकलेला होता. जसजसं मागे जावू तसतसा बुरसटलेल्या विचारांचा पगडा या समाजात किती घट्ट पाय रोवून होता याची आपल्याला जाणीव होते.


मुलगी म्हणजे प्रत्येक आई वडिलांची अगदी जीव की प्राण असते.परंतु, कितीही आणि काहीही झाले तरी एक ना दिवस तिला सासरी हे पाठवावेच लागते. पण जन्माला आल्यापासूनच तिच्यावर त्यादृष्टीने संस्कार करायला सुरूवात केली जाते. आता जमाना जरी बदलला असला, मुलींच्या बाबतीत पहिल्यासारखी बंधनं जरी नसली तरी स्री म्हणून तिच्या वागण्या बोलण्यावर मर्यादा येतातच. 

"मुलगी म्हणजे परक्याचे धन" समजून तिला सासरी गेल्यावर कोणताही त्रास होवू नये यासाठी कामाचे, वागण्या बोलण्याचे सगळे धडे तिला बालपणापासूनच द्यायला सुरुवात होते. मुलाच्या बाबतीत मात्र या सगळ्या गोष्टी होत नव्हत्या आधी. कितीही नाही म्हटले तरी त्याला उजवी बाजू आणि मुलीला मात्र डावी बाजू मिळायची. तिच्या मोठ्याने हसण्यावर, मोठ्याने बोलण्यावर सगळ्यांचच आक्षेप असायचा. उद्या सासरी गेल्यावर कसं व्हायचं हीचं..? या एका काळजीतच तिची आई असायची. पण त्यात एका गोष्टीचे खूपच नवल वाटायचे ही सगळी बंधनं, मुलीच्या वागण्या बोलण्यावरिल आक्षेप, तिने सगळी काम अगदी चोखपणे पार पाडावीत यासाठी तिला तिची आवड लक्षात न घेता दिली जाणारी शिकवण हे सगळे एका स्रीकडूनच दुसऱ्या स्रीच्या बाबतीत घडत होते. पुरुषांपेक्षा स्रियांचा यात होणारा हस्तक्षेप मोठा होता. आता ती फक्त एका स्रीचीच चूक होती असं नाही,समाजव्यवस्थाही त्याला तितकीच कारणीभूत होती.

प्रत्येक आई स्वतः जो त्रास, सासुरवास सहन करायची तो आपल्या लेकीच्या वाट्याला येवू नये यासाठीच धडपडत असायची. स्वतःला ज्या चुकांवरून बोलणी बसत, त्या चुका लेकिकडून होवू नये यासाठी ती सजग राहायची. त्यामुळे नकळतपणे आईकडूनच लेकीचे बालपण हिरावून घेतले जायचे. 


अशीच आईच्या कडक शिस्तीत वाढलेली नंदिनी अगदीच हुशार आणि चुणचुणीत मुलगी. वडिलांचा शेती व्यवसाय. जेमतेम मध्यमवर्गीय कुटुंब. शून्यातून सारं निर्माण केलं होतं नंदीनीच्या वडिलांनी. पण कष्टाला पर्याय नाही म्हणत शेतीत राब राब राबनारे हे कुटुंब. चार भावंडं. एक भाऊ आणि तीन बहिणी. असा जेमतेम परिवार. घरात अगदी धडधाकट असणारी नंदिनीची आजी म्हणजे घराचा मोठा आधारस्तंभ. भाऊ सर्वांत मोठा. त्याच्या पाठीवर नंदिनी आणि मग तिच्या पाठीवर दोन लहान बहिणी. अजून एक मुलगा असावा, एकाला दोघे हवेत. मुली काय लग्न करून सासरी जातील. म्हणून मग पुढे अजून दोन मुली वाढल्या. इतर भावंडांच्या तुलनेत नंदिनीला घरात थोडी डावी बाजू मिळायची. कारण एकच,तू मोठी आहेस. तू शिस्तीत राहिलीस तरच बाकीच्या बहिणीही तुझंच अनुकरण करतील. ही आईची भावना. म्हणून आई मात्र नंदिनीला थोडी धाकातच ठेवायची. भावाला मात्र सगळ्याच बाबतीत सुट असायची. कारण तो "मुलगा" होता ना. पण मुलींच्या बाबतीत आईचे विचार थोडे मागासलेलेच होते. वडिलांची मात्र सगळ्यांत लाडकी होती नंदिनी. तिचाही त्यांच्यावर अती जीव. पण आईसमोर त्यांचेही काही चालायचे नाही. फक्त आई नंदिनीला उठसूठ जेव्हा रागवायची तेव्हा वडील तिची बाजू घेतल्याशिवाय राहायचे नाहीत. आणि नजरेनेच तिला आपुलकीचा पाठिंबा द्यायचे. तिही आईच्या बोलण्यापेक्षा वडीलांच्या या मायेची, त्यांच्या प्रेमाची खूप भुकेलेली होती. त्यांच्या नजरेची भाषा आणि त्यातील प्रेम नंदिनीला सुखावत असे. त्यामुळे आईच्या बोलण्याने, तिच्या रागवण्याने ती जास्त दुःखी व्हायची नाही. कारण पहाडासारखा बाप तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. मुलापेक्षा मुलींवर वडिलांचा जीव तर होताच पण नंदिनीवर थोडा जास्तच. 


वडिलांना शेती कामात सर्व ती मदत नंदिनी करायची. वडीलांच्या मागे मागे करणारी नंदिनी शेती कामातही अगदी तरबेज झाली होती. सकाळी शाळेत जाईपर्यंत आणि सायंकाळी शाळेतून घरी आल्यावर देखील ही वडीलांच्या मागे शेतातच दिसायची. वडीलांमुळे तिलाही शेतीची खूपच आवड निर्माण झाली.दावणीला जेवढी काही जनावरं होती साऱ्यांनाच नंदिनीचा लळा लागला होता. वडीलांप्रमाणे तीही त्यांना खुप माया करायची. त्यांना खावू पिऊ घालण्यापासून तर धारा काढण्यापर्यंतची सारी कामे नंदिनी लहान वयातच शिकली होती. 


आताशी कुठे नंदिनी सातवी पास होवून आठवीत जाणार होती. पण वयाच्या मानाने खूपच समजूतदार. उंचीने थोडी कमी पण कामाच्या बाबतीत कोणी तिचा हात धरुच शकत नव्हते. रंगाने थोडी सावळी पण नाकी डोळी एकदम तरतरीत आणि नीटस. वडिलांची गरिबी तिने अगदी जवळून पाहिली होती. त्यामुळे परिस्थितीची खूप जाणीव होती तिला. कोणत्याही गोष्टीसाठी कधी हट्ट केला नाही पोरीने. उलट न सांगता वडिलांनी काही आणलेच तर "कशाला आणालंत बाबा. कशाला उगीच खर्च केला." असे समजूतदारपणाचे शब्द ऐकून बापाचा उर मात्र भरून यायचा. तिच्या उलट बाकीची भावंडं होती. प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट असायचा त्यांचा. तेव्हा नंदिनी लहान बहिणींची समजूत घालायची. त्यांनाही वडील काही कमी पडू देत नव्हते. फक्त मुलाचे अती लाड जेव्हा आईकडून व्हायचे तेव्हा मात्र वडिलांचा त्याला विरोध असायचा. पण आई मात्र लेकाला कोणतीही गोष्ट देताना कधीही मागे पुढे पाहायची नाही. "अहो जावू द्या लहान आहे तो", म्हणत वडिलांची समजूत घालून त्याला पाहिजे ते मिळवून देण्याची आईची धडपड मात्र सुरू असायची. हे वडीलांच्या आणि नंदिनीच्या नजरेतूनच काही सुटायचे नाही. माझी लेक तरी कुठे इतकी मोठी झालिये तरी तिला वेळोवेळी मोठे झाल्याची जाणीव करून दिली जाते. का.? कशासाठी..? बापाचे काळीज मात्र तीळतीळ तुटायचे. आणि नंदिनीवरच्या बापाच्या प्रेमाला मग आणखीच पाझर फुटायचा. 

"जावू द्या बाबा, तुम्ही नका टेन्शन घेवू. आईचा दादावर खूप जीव आहे आणि असणारच. तिचं पहिलंच बाळ आहे ना ते. असे हसून जेव्हा नंदिनी बाबांची समजूत घालायची तेव्हा बाबांच्या डोळ्यांत मात्र नकळतपणे अश्रूंची दाटी व्हायची.


इतर दोन बहिणींच्या तुलनेत अभ्यासात मात्र नंदिनी थोडी मागे होती. कारण तिला अभ्यासापेक्षा कामात आणि विशेष म्हणजे शेतीकामात जास्त रस होता. मुलगी असूनही मुलगा बनून वडीलांच्या पाठी ती उभी असायची. वडिलांना दोन भाऊ होते पण तेही शहरात. चांगल्या पगाराच्या नोकरीवर. त्यांच्यात नंदिनीच्या वडीलांच्या वाट्यालाच कष्ट आले होते. त्यांना बहीण मात्र नव्हती. नंदिनी वेळेला त्यांची बहीण, लेक,आई सारंच व्हायची. स्वत:च्या बहिणींनादेखील आईप्रमाणे काळजी घ्यायची. त्यांना अभ्यास करा म्हणून नेहमी बजावायची. त्यांच्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही म्हणून ती सर्वतोपरी काळजी घ्यायची. भावाचे आणि तिचे जास्त काही पटायचे नाही. तसेही भावंडांच्या भांडणाशिवाय कुठे बालपण असते का..? आणि त्याशिवाय का घराचे घरपण टिकते.  

आईच्या कडक शिस्तीत नंदिनी घडत होती. जरी आई तिला रागावत होती, ओरडत होती तरी ती तिच्या भल्यासाठीच हे बालवयातच तिला उमगत होते. कदाचित आईच्या या वागण्यामुळेच नंदिनीला लहान वयातच शहाणपण आलं होतं. आई वडीलांपैकी एकाचा तरी मुलांना धाक हा हवाच पण फक्त त्याचा अतिरेक नसावा. नंदिनीची बाकीची भावंडं मात्र आईशी जास्त जोडलेली होती. भावाला "मुलगा" म्हणून सूट तर इतर दोन बहिणींना लहान आणि शाळेत हुशार म्हणून सूट मिळायची. पण बाकीच्या भावंडांचे आईकडून जसे कौतुक व्हायचे तसे नंदिनीचे मात्र व्हायचे नाही. त्यामुळे ती कुठेतरी दुखावली जायची. पण बाहेरच्या जगात आणि नातेवाईकांमध्ये नंदिनीचे सर्वचजण अगदी तोंडभरून कौतुक करायचे. त्यामुळे नंदिनी आईचेच मनोमन आभार मानायची. कारण आईकडून जरी तिच्यावर अन्याय होत असला तरी तिच्या कडक शिस्तीमुळेच नंदिनी जी आहे आणि जशी आहे तशी घडत होती. आईलाही लेकीचा बऱ्याचदा अभिमान वाटायचा पण तिने शब्दात तो कधी व्यक्त केला नाही. आणि नंदिनीनेदेखील आईकडून तशी कधी अपेक्षा केली नाही. आईचा तिच्यावर जीव नव्हता असे नाही. परंतु तिनेही खूप वाईट काळ पाहिला होता त्यामुळे नंदिनीच्या बाबतीत ती थोडी जास्त नव्हे तर अती बंधनं टाकायची. मुलींनी कसे वागावे आणि कसे वागू नये याचे धडे ती नेहमीच नंदिनीला द्यायची. फक्त काही गोष्टी प्रेमाने सांगितल्या तर लवकर समजतात. परंतु तो प्रेमाचा गोडवा आईच्या बोलण्यातून नंदिनीला कधीही मिळाला नाही. एकांतात मात्र ती रडून स्वत:चे मन मोकळे करायची. 

वडील आईला वेळोवेळी त्याबाबतीत समजही द्यायचे पण मी तरी काय करू..? तिच्या भल्यासाठीच मला हे करावं लागतंय असे म्हणून आई वडिलांचे तोंड बंद करण्यात यशस्वी व्हायची. आईच्या या वागण्यामुळे वडिलांचे मात्र नंदिनी वरचे प्रेम दिवसागणिक वाढत होते. आईकडून नाही कधी वडिलांकडून तिला पोटभरून प्रेम आणि तोंडभरून कौतुक नेहमीच मिळायचे. "ज्या घरात जाईल त्याचे कल्याण करील ही पोरगी" असे जेव्हा नातेवाईक आणि शेजारी पाजारी बोलले जायचे तेव्हा आई वडिलांची मान अभिमानाने उंचावली जायची. आईलाही आपण तिच्यावर करत असलेल्या संस्कारांवर विश्वास बसायचा. आणि स्वतः तिला देत असलेली वागणूक किती योग्य आहे याची तिला स्वतःलाच खात्री वाटायची. त्यामुळे आईकडून नंदिनीला मिळणारी कठोर वागणूक, परखड शब्दातील ओरडा नेहमीच सहन करावा लागायचा. वडील मात्र लेकीला शब्दाने कधी दुखवायचे नाहीत. कारण नंदिनी म्हणजे वडिलांचा श्वास होती. वडिलांना थोडं जरी खरचटलं तरी लेकीच्या डोळ्यांत पाणी यायचं. असं हे बापलेकीचं नातं दिवसागणिक अधिकच घट्ट झालं होतं.बाप लेकाचे मात्र जास्त काही पटायचे नाही. कारण तो आईच्या प्रेमामुळे तिच्यासोबत जास्त जोडला गेला होता. काहीही पाहिजे असल्यास "आई बाबांना सांग ना तू. तुझं ते ऐकतील." एवढं वाक्य पुरेसं असायाचं त्याला हवं ते मिळवण्यासाठी. लेकी मात्र बापासोबत हृदयापासून जोडलेल्या होत्या. काही मिळवण्यासाठी त्यांना आईचा कधीच आधार घ्यावा लागला नाही. आईचा जेवढा धाक वाटायचा तेवढा वडिलांचा कधीही वाटला नाही तिघींनाही कदाचित आजही ही अशी परिस्थिती समाजात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. नंदिनी आणि तिच्या बहिणी त्याबाबतीत खूपच नशीबवान होत्या. आई जरी कठोर असली तरी बाप मात्र अगदी कोमल हृदयाचा लाभला होता. परंतु असे असले तरी तेही खूप कडक शिस्तीचे होते बरं का. पण स्वतः पेक्षाही जास्त लेकिंवर विश्वास. माझ्या लेकी माझी मान खाली जाईल असे कधीच वागणार नाहीत याची त्यांना खात्री होती. पण अजून त्यास तरी कुठे एवढ्या मोठ्या झाल्यात. इतक्यात जास्त बंधनं नकोत असे वडिलांना वाटायचे तर याउलट आईचे विचार होते. या वयातच खरी शिस्त लागते. म्हणून तीही त्यांना वेळोवेळी चांगल्या वाईटाची शिकवण द्यायची. विशेषकरून नंदिनीला जास्त. 

आईचा जरी धाक असला तरी लेकरांच्या किलबिलाटाने घराचं वातावरण अगदी गजबजलेलं असायचं. घर अगदी गोकुळासारखं भरलेलं वाटायचं. 


आई कितीही रागावली तरी मुलं कधी आईला उलट उत्तर द्यायचे नाहीत. उलट ती रागावू नये म्हणून सगळी कामे अगदी पद्धतशीररित्या आणि वेळच्या वेळी करायचे. हीच आईची शिस्त होती. पण कुठेतरी त्याचा अतिरेक होत होता. अशा परिस्थितीत सगळ्या भावंडांत नंदिनी खूपच समजदार होती. "समजूतदारीचं शहाणपण" खूपच लहान वयात तिच्याकडे आलं होतं. घरापासून शाळा थोडी दूर होती. घरचं जमेल तेवढं काम आवरून, आईला हवी ती मदत करून, लहान बहिणींची देखील शाळेची तयारी करून त्यांना अगदी जबाबदारीने शाळेत नेण्याचे आणि पुन्हा घरी आणण्याचे काम हे नंदिनीचेच होते. तिही तिची जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडायची. 


क्रमशः


प्रिय वाचक वर्ग या कथामालिकेत मी एका मध्यमवर्गीय खेड्यातील मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. परिस्थिती माणसाला घडवते आणि वेळच्या वेळी वागण्याचे धडेदेखील देते. हे या कथेतून पाहायला मिळते. लेकरांना घडविण्यात पालकांचा कस लागतो. पूर्वी मुलांना घडवताना एवढा विचार करावा लागत नव्हता. आता मात्र याउलट परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी मध्यमवर्गीय कुटुंबात मुले जास्त असायची. आई वडिलांच्या पश्चात लहान भावंडांची जबाबदारी ही मोठ्या बहीण भावाची असायची. या कथेतील नंदिनी देखील अशीच एक जबाबदार मोठ्या बहिणीच्या भूमिकेत पाहायला मिळते. 

पण भावंडांचे बालपण जपताना स्वत:चे बालपण मात्र ती हरवून गेलेली असते. तिचा हा संघर्ष पुढेही असाच सुरू राहणार की परिस्थिती बदलणार हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा आणि कथेचा हा पहिलाच भाग कसा वाटला ते नक्की तुमच्या प्रतिक्रियेतून कळवा. 


धन्यवाद..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Kavita Waykar

गृहिणी

सध्या लेखणीच्या दुनियेत नवीन जग शोधलंय मी ...शब्दांसोबत झाली मैत्री अन आनंदाने बहरलंय माझं जीवन...