प्रेमात आपटलो मी

This guy fell in love and his girlfriend betrayed him.

#प्रेमात_आपटलो_मी

रिया सबनीस..टिचरने नाव घेताच एक मंजुळसा स्वर कानी आला. माझ्या बेंचच्या अगदी बाजूच्या बेंचवर मुलींच्या रांगेत ती बसली होती. मिसने तिला विचारलं,"न्यू एडमिशन?" ती हसून यस टिचर म्हणाली. आमच्या एसवायबीकॉमच्या वर्गात एकही मुलगी रियाएवढी मॉडर्न नव्हती. 

मी तिरप्या नजरेने रियाचे निरीक्षण करत होतो. तिचा लांडा स्कर्ट,पिंक टॉप तोही एका खांद्यातून खाली ओघळणारा,गोरीपान काया,सायीचे हात,लांबचलांब निमुळती नखं,त्यावरलं नक्षीदार नेलआर्ट, तिचे हायहिल्स,पिंगट कुरळे केस,हलकासा मेकअप, लालबुंद लिपस्टीक..

समोर मराठीची मिस कोणतीतरी कविता शिकवत होती. रिया हनुवटीला हात टेकून तल्लीन होऊन ऐकत होती. तिच्या आखीवरेखीव,गुलाबपाकळ्यांसारख्या नाजूक पापण्यांची अधनंमधनं उघडझाप होत होती. पापण्यांचे केस तर अगदी डौलदार वाटत होते. तिच्या पिंगट कुरळ्या केसांच्या काही बटा तिच्या वक्षस्थळावर विराजमान झाल्या होत्या. एक अवखळ बट तिच्या गालावर रुळत होती. रियाचं यौवन मला आव्हान करत होतं. लेका हरशा हिच तुझी आर्ची,आता फायनल असा कौल मला माझ्या जाणत्या मनाने दिला.

हिच्या आधी एकदोघी आवडायच्या मला. त्यातली मंजुषा जरा जास्तच. तिचा पाठलाग करत एकदा तिच्या घराच्या नाक्यापर्यंत गेलो होतो पण तिथल्या पोरांनी तिच्या भावाला सांगितलं नि त्या टोळक्याने चांगलच लोळवलं मला. तेव्हापासून तिचा नाद सोडला.

रिया मात्र मंजूपेक्षा उजवी होती. वाईटातून चांगल होतं तसंच वाटलं मला. रियाने लांडा स्कर्ट घातल्याने मलाच शरमल्यागत झालं. अंगात एक गोड शिरशिरी येत होती. त्या लिरिलच्या जाहिरातीत धबधब्यात नाचणाऱ्या मॉडेल्स फिक्या पडतील इतकं आरसपानी नितळ गोरेपण. 

मराठीच्या मिस वर्गाबाहेर गेल्या तसं रियाने तिच्या बोटांनी मला स्पर्श केला. कसला दचकलो मी!
"ए ऐक ना तुझं नाव काय?"

"माझं ना..हे आपलं ते..काय बरं..हा आठवलं हरिष."
माझी फजिती पाहून रिया खळखळून हसली. तिच्या हास्यातून कितीतरी चांदणफुलं ओघळताहेत असं वाटलं मला.
"हरिष,मी रिया. मला जरा कॉलेजच्या केम्पसची वगैरे ओळख करुन देशील का? मी माझ्या बाजूच्या भक्तीला सांगितलं पण ती कसलंतरी पुस्तक वाचण्यात दंग आहे रे. तुला आवडेल का मला कंपनी द्यायला?"

मी पटकन हो म्हणालो पण आजुबाजूची पोरं माझ्याकडं वेगळ्या नजरेनं बघू लागली. मी लक्षच दिलं नाही. पावसात भिजू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून काही नोटा आईने माझ्या बेगेच्या आतल्या कप्प्यात ठेवल्या होत्या. त्या मी लगबगीने काढून खिशात कोंबल्या व निघालो. 

रिया माझ्यापेक्षा जरा उंच होती. हाय हिल्समुळे ती अधिकच उंच वाटत होती. कोरिडॉरमधून जाणारेयेणारे सगळेच तिच्याकडे बघून लाळ घोटत होते. मला प्रचंड कॉम्प्लेक्स येत होता. मी ठरवलं,आपणपण जरा टिपटॉप रहायचं. रियाला लायब्ररीत घेऊन गेलो. लायब्ररी कार्ड काढायची पद्धत समजावली. आम्हाला लायब्ररी कार्ड द्यायला पंधरावीस दिवस लावणाऱ्या आमच्या लायब्ररियन कांबळे याने लगेच प्रिन्सिपलची सही घेऊन पाच दहा मिनिटांत तिला लायब्ररी कार्ड दिलंसुद्धा. कधी नाही ते माझ्याकडे पाहून तो हसला.

मी रियाला कँटीनमध्ये घेऊन गेलो. तिथे दोन समोसे व कॉफी मागवली. कसलं भारी फील होत होतं मला! रियाच्या तोंडातून टपकणारा एकेक शब्द माझ्यासाठी अम्रुताहून मधुर होता. बेल झाली तसं आम्ही वर्गात जाऊन बसलो. मुलं माझी फिरकी घेत होते. मी दुर्लक्ष केलं. डबाही बेगेत तसाच राहिला. आईने कोबीची भाजी दिलेली ती कुठे तिच्यासोबत खाणार!

कॉलेज सुटल्यावरही एकत्रच बाहेर पडलो. बसमधे चढलो. मी रियाला अगदी प्रोटेक्शन देत होतो. कोणाचाही स्पर्श तिला होऊ नयेसं मला वाटत होतं. कंडक्टर जवळ आला तसं मी आम्हा दोघांची तिकीटं काढली.

रिया माझ्या आधीच्या स्टॉपवर उतरली. मी आज जरा लुक चेंज करायचं ठरवलं. घराजवळचे सलोनवाले काका  मला लहानपणापासून ओळखतात. त्यांच्याकडे गेलो तर मुंगीसारखे बारीक केस करतील म्हणून एका नवीनच उघडलेल्या सलोनमधे गेलो. तिथे जरा स्टाइलमधे कटींग करुन घेतली. फेशियल वगैरे केलं. बिल दिलं नि घरी आलो. घरात शिरल्यावर आईचे,ताईचे हजार प्रश्न.

"अरे आज शनिवारचा केस कापून आलास तो!" इति आई.
"अरे हे वरती फुलदाणीसारखं झुडूप कसं ठेवलंस?" इति आजी. 
"अगदीच चिमणीचं घरटं वाटतय नं आजी. चिमणी यात अंडीसुद्धा घालू शकेल..रादर उबवूही शकेल,"ताई म्हणाली.

मी मनात म्हंटलं,"कशी रहाणार माझी रिया या बायांत? तिचे आधुनिक कपडे..तिची आधुनिक विचारसरणी यांना कशी मानवणार?" मग मी निर्धार केला की नाही मानवलं यांना तर सरळ प्रेमविवाह करायचा नि वेगळं रहायचं पण आता माघार नाही. 'जिना रिया के वास्ते मरना भी रिया के वास्ते.' मी शॉवर घेणार इतक्यात आई आलीच दार वाजवायला,"अरे हरिष,आधी त्या झुडुपात तेल घाल" असं म्हणत तिने तेलाची बाटली माझ्याकडे दिली. 'काय ही अंधश्रद्धा, कसं होणार या कजाग सासूच्या हाती माझ्या रियुडीचं!'असं मनात म्हणत मी केसांना तेल लावलं व शेम्पू वगैरे करुन मस्त सुस्नात झालो. डब्बा खाल्ला नव्हता त्यावरुनही बोलणी चालू होती.

मधला रविवार मला अनेक युगांसारखा वाटला. पहिलं रविवारसाठी तरसायचो मी. आता वाटलं हा का आला मधे कडमडायला! जळी स्थळी पाषाणी मला रियाच दिसत होती. तिच्या त्या गुलाबपाकळ्यांसारख्या पापण्या,धनुष्याकार भुवया,गालावरची मादक खळी. तिलाही माझ्यासारखंच होत होतं का? मी ते गाणं लावलं..पहेला पहेला प्यार है। पहेली पहेली बार है। जान के भी अंजाना ऐसा मेरा यार है ओ ओ ओ पहेला पहेला.. 

सोमवारी फ्लुरोसंट शर्ट व डार्क ब्लू जीन्स घालून कॉलेजात गेलो. योगायोग म्हणजे रियानेही फ्लुरोसंट टॉप व डेनिम घातली होती. रियाने मला सेम पिंच म्हंटलं व माझ्या हातात हात घालून जिने चढू लागली. इतर मुलंमुली आमच्या नव्या जोडीकडे पहात होती. अर्थात इतरही जोड्या होत्या पण आमची अगदी ताजी नवदाम्पत्यासारखी कोवळी लुसलुशीत होती. मी अधिक लाजरा होतो. माझं हेच लाजरेपण रियाला फार आवडायचं.

आम्ही दोघे ऑफ पिरियडला बरेच फिरायचो. कॉलेज सुटल्यावरही बसस्टॉपवर अर्धाएक तास काढायचो. कधी बाजूच्या बागेतही जायचो. एकच बर्फाचा गोळा एकत्र चोखायचो. एकाच शहाळ्यातून दोघं पाणी प्यायचो..एकचं भुटा..असे बरेच एकच..माझं अकाऊंट्स चांगलं होतं. मी रियाचे बरेच क्वेरिज सॉल्व्ह करायचो. बेलंसशीट टेली झाली की ती माझ्या गालांचे चिमटे घ्यायची व म्हणायची,"कसला क्युट आहेस रे पण तू न् ही मिशी काढ."

प्रकरण मिशीपर्यंत येईल असं मला वाटलं नव्हतं पण प्रेमाखातर काहीपण. मी नुकतीच बऱ्यापैकी वाढवलेली मिशी उडवायचं ठरवलं. सकाळी दाढी करताना मनाचा हिय्या करुन मी माझी लाख मोलाची मिशी उडवली.. मनात म्हणालो,'रिया तेरेखातीर मुँछ भी निकाल दी.'

इतक्यात आजीने पाणी मागितलं म्हणून मी हात धुवून पाणी द्यायला गेलो. आजी मला पाहून,तोंडाला पदर लावून हसू लागली. काय झालं म्हणून पहायला आई,ताई आल्या. त्याही खिदळू लागल्या. वडील मात्र मला पाहून ओरडले,"कसली ही थेरं सुचतात मिशी काढायची!" तेव्हा माझ्या लक्षात झाला प्रकार आला. मी मनात म्हंटलं,"रियाला आवडतं नं मग झालं तर."

रियाला केम्पसजवळ भेटलो. रियाने माझी पप्पीच घेतली. "माझा शोनू,कसला क्युट दिसतोयस तू मिशी काढल्यावर,खूप ग्गोड!" मला इतका आनंद झाला म्हणून सांगू. वर्गात मित्र चिडवत होते. मी परत लक्ष दिलं नाही. आफ्टरऑल माझी मिशी..मी मालक.. मी ठरवणार ठेवायची की नाही ते. यांचा काय संबंध? रियाला मी अजून प्रपोज केलं नव्हतं पण ती माझीच आहे असं मी ग्रुहित धरुन चालत होतो.

रिया इतर मुलांशीही आता बिनधास्त बोलू लागली होती. मला ते आवडत नव्हतं पण अडवणार कसं? तिच्यावर थोडाच माझा हक्क होता! कधी बहिणीसोबत कॉसमेटिक्सच्या दुकानात गेलो नव्हतो पण रियासोबत जायचो. ती झुमके कानाला लावून माझ्याकडे पाहत मला विचारायची,"हेरी,कसे दिसताहेत. सुट होताहेत नं मला." तेव्हा मला ती करवाचौथच्या वेळी टिव्हीतल्या नट्या आपल्या नवऱ्याचा चेहरा चाळणीत पाहून उपवास सोडतात तशी डिट्टो दिसायची. 

माझी सेविंग मी रियासाठी खर्च करत होतो. कधी तिला लिप्स्टीक, कधी नेलपेंट,कधी इमिटेशन ज्वेलरी..म्हणजे ती पैसे पुढे करायची पण मलाच पटायचं नाही मी असताना तिने पैसे दिलेले. 

कितीतरी डोसे,डेझर्ट्स आम्ही एकत्र खाल्ले. एकाच डिशमधे खायला मजा यायची. वेटर सेपरेट वाट्या द्यायला बघायचा पण मी त्याला खुणेनेच नको म्हणायचो.  सगळं गुलाबी गुलाबी चाललं होतं. ताईची डिटेक्टिव्हगिरी चालू होती पण मी ताकास तूर लागू देत नव्हतो. 

सहा महिन्यांत माझी सेव्हिंग संपत आली. सेविंग्स तरी कसली,सुट्टीत एका मेडीकलमधे काम करायचो. ती असून किती असणार! पप्पाही मोजकेच पैसे देऊ लागले. मी माझी सेव्हिंग्स वापरली हे ताई घरात सगळ्यांना सांगून मोकळी झाली होती. आईला वाटले, त्या दोघांचा लग्नाचा वाढदिवस जवळ येतोय म्हणून मी साठवलेले पैसे वापरले असतील. तरी बरं त्यांना गीफ्ट द्यायला मी थोडे पैसे बाजूला काढून ठेवले होते. 

रियाच्या मागण्याही दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. मला अगदीच कडकी लागली तेव्हा मी रियाला टीटीएमएम (तुझे तू माझे मी)सांगितले. तेव्हापासून ती मला कटवू लागली. एकेदिवशी रिया मला आमच्या कॉलेजचा सीआर रोहनसोबत त्याच्या कारमधून येताना दिसली. हळूहळू ती मला टाळू लागली. रोहनशी रियासाठी पंगा घेणं मला शक्य नव्हतं कारण तो सिक्स पेकवाला होता. त्याने एक दिली असती तरी मी जागेवर पडलो असतो. 

शेवटी मी मान्य केलं की प्रेमात मी हरलो व प्रेमबीम करणं हे आपल्यासारख्यांच काम नाही. यावर कळस रियाने केला तो म्हणजे,रक्षाबंधनच्या दिवशी ती आमच्या घरी आली. मला तिने लाल गोंड्याची राखी बांधली व तिच्या सायीच्या बोटांनी पेढा भरवला. माझ्या आजीने तिच्या गालावर कडाकडा बोटं मोडली व तिची द्रुष्ट काढली. आईने तिला सांगितले,"येत जा हो अधूनमधून." 

खरं काय ते ताईलाच कळलं होतं. ती मला ठेंगा दाखवून हसत होती. तर मित्रांनो असं माझं प्रेम रक्षाबंधनावर येऊन थांबलं. रियाचा पती होण्याचं स्वप्न पहाणारा मी एका राखीच्या धाग्याने तिचा भाऊ झालो.

------सौ.गीता गजानन गरुड.©®