Login

उपकार

नात्यातील एक कटु शब्द ' उपकार '

" राकेश अरे मला जरा बरं वाटत नाही,आज जरा सुटी घेतोस का ऑफिस मधून?"

थोडे नाखूष होत,

" बर ठीक आहे."

" ऐक ना रूही ला अंघोळ घालतोस का ?"

" का ? तू का नाही घालणार सुनिता?"

" अरे मागच्या वेळी ती आजारी कशी पडली? तिला माझ्या वासाने सर्दी झाली होती.डॉक्टर तेव्हाच नाही का बोलले, इन्फेक्टेड व्यक्तीपासून तिला दूर ठेवा म्हणून!"

राकेश,तोंड जरासे फुगवत म्हणाला,

" बर बाई ठीक आहे.घालतो मी तिला अंघोळ!"

अचानक रुही खूप रडायला लागली.

" आई आई मला तूच घाल ना अंघोळ! अह .. अह.."

" ए रुही,शांत बस !नाहीतर,एक फटका देईल."

" अरे राकेश मी कधीपासून बघतेय,तू सारखी चिडचिड करतोयस.काय झाले आहे?"

" ए बाई वैतागलो आहे मी आता. तू जसे काही माझ्यावर खूप उपकार करतेस एवढी कामे करून,असेच दाखवते आहेस.नुसतं हे कर ते कर."

" कम ऑन राकेश. तू माझा जोडीदार आहेस.खर तर माझच चुकलं की मी तुला कधी या  जबाबदाऱ्या पार पाडायला सांगितल्या नाहीत; आणि आज सांगितल तर तू उपकाराची भाषा वापरतो आहेस? "

" हे बघ मला तसे म्हणायचे नव्हते, सुनिता!"

" राकेश तुझ्या मनातलं सरळ ओठांवर आलय अरे. बास तू काहीही करू नकोस. सरक हो बाजूला."

" अग मी करतो ना तुझी कामे."

सुनिताने मास्क घातले आणि रूहीला अंघोळ घातली.आजारी असूनही सारी कामे केली.

थोड्या वेळाने,

 " सुनिता आय ऍम सॉरी.खरच तू माझे जे घर छान सांभाळते ते माझ्यावर उपकार करतेस आणि हे मी माझ्या मनापासून बोलतोय."

" राकेश,इथे उपकाराची भाषा वापरणे फार चुकीचे आहे.हा संसार आपला दोघांचा आहे,जबाबदारी सुद्धा दोघांची हवी.कधी आपण थकलो,आजारी पडलो तर एकमेकांना सांभाळून घेत मदत करायला हवी.अरे,आपल्या नात्यात प्रेम,आपुलकी असली की ही कामे उपकार नाही तर कर्तव्य समजून केली असतीस तू!"

" हे सॉरी ना सुनिता.ऐक आजपासून आपल्या जबाबदारीचे,कर्तव्याचे भान मी नेहमी ठेवीन.उपकार हा शब्द कधीही वापरणार नाही."

" ठीक आहे राकेश!"

तेवढ्यात छोटी रूही सार काही समजल्यागत बोबडे बोलत म्हणाली,

" पप्पा , प्लोमिश?"

अन् हे त्रिकोणी कुटुंब जोर -जोरात हसू लागले. 

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे