
#बापाचं_काळीज
शुभम,इंजिनिअरिंगचा विद्यार्थी कॉलेजवरुन आला तोच उशीत डोकं खुपसून रडू लागला.
शुभांगी शुभमची आई तितक्यात गिरणीत गहू दळायला देऊन आली. कुलुप उघडलेलं होतं,परत लावलेलं नव्हतं. शुभांगीला अंदाज आला,तिचा लेक शुभम आला असणार. घरातील प्रत्येकाकडे एक चावी तिने ठेवलीच होती. शुभांगीने किल्ली काढून ते उघडं कुलुप बंद केलं व दार लोटून घरात शिरली. चपला काढल्या.
हॉलमधे कोणीच नव्हते. शुभांगीने हातपाय धुतले व शुभमला आवाज दिला,"शुभम,अरे गरम पेटीस मिळालेत बेकरीत तुझ्या आवडीचे. थांब हं आणते." शुभांगीने प्लेटमधे पेटीस काढले. आत चटपटीत बटाट्याची भाजी व वरुन खारीसारखे लागणारे पेटीस शुभमला फार आवडायचे. त्या बेकरीवाल्याकडेही पेटीससाठी गर्दी असायची.
शुभांगी लेकाच्या खोलीत गेली. नेहमी आल्याबरोबर कपडे काढून हातपाय स्वच्छ धुतल्याशिवाय बेडवर न जाणारा शुभम आज तसाच घामेजल्या अंगाने पालथा पडला होता. शुभांगीने त्याच्या केसांतून हात फिरवला.
"शुभम"
"काही नको मला तुझे पेटीसबिटीस. मला एकटं राहूदे."
"बरं नको खाऊस पण झालं काय एवढं रडायला."
"अगं मम्मा,सोसायटीत शिरल्याबरोबर त्या गार्डनमधल्या काकू,तिथली काही नेहमीचीच माणसं वेगळ्याच नजरेने पहायला लागली माझ्याकडे. आजच नाही,आठवडाभर घडतोय हा प्रकार. काल वळसा घालताना मी ऐकलंसुद्धा त्या ढमढेरे काकू,दुसऱ्या कॉलनीतल्या बाईला सांगत होत्या..आपली श्रावणीताई पळून गेली म्हणून. आठवडा झाला ताईला पळून जाऊन. तिने लग्न केलं..ही सगळी बातमी सोसायटीत कशी पसरली. यांना दुसरे काहीच उद्योग नाहीत का?"
"तू नको रे शोन्या मनाला लावून घेऊस. सेमिस्टर जवळ आलीय नं तुझी. त्यावर लक्ष केंद्रित कर."
"एवढं सोप्पय का गं ते. पाटीवर लिहिलं नि ओल्या फडक्याने पुसून टाकलं एवढं उथळ असतं का गं भावाबहिणीतलं प्रेम? आज त्या दयानंद बिल्डींगच्या दुसऱ्या मजल्यावर नजर गेली. ताई उभी होती तिथे सज्ज्यावर हात टेकवून. हिरवागार चुडा होता हातात,गळ्यात मंगळसुत्र,साडी नेसलेली आकाशी रंगाची..किती वेगळी वाटत होती माहितीए तुला.
तिचीही नजर मला शोधत होती बहुतेक. ताईला पहाताच वाटलं..वाटलं धावत जावं नि तिला परत घेऊन यावं आपल्या घरी पण बॉस..बॉसला ताईचं लग्न पसंत नाही ना."
"ए बॉस काय म्हणतोस रे त्यांना."
"मग काय हिटलर म्हणू. केवळ तो श्रेयस दुसऱ्या जातीतला म्हणून त्यांचा राग."
"अरे बाळा,तुलाही बापाचं मन समजलं नाही तर. अरे नोकरी कुठे आहे त्याला. कसलंतरी इस्टेट एजंटचं काम करतो म्हणे. आपली श्रावू एमए,बीएड आणि तो फक्त बारावी पास. किती विचित्र जोडा! लग्न लावून दिलं असतं तर लोकं काय म्हणाली असती?"
"आता तरी काय म्हणताहेत लोकं? पाठीमागून कुजबुजतात ##."
"एवढं होतं तर त्यावेळीच का नाही दिलीस ताईला साथ? का नाही उभा राहिलास तिच्या पाठीशी? का तिची वकिली केली नाहीस शुभम..शुभम,अरे मला नकोय का रे ताई आपल्या घरात आलेली पण बघतोस ना तू तिचं नाव जरी घेतलं तरी यांचा पारा किती वाढतो! उभं अंग थरथरु लागतं यांच. यांना काही झालं तर म्हणून मुग गिळून गप्प बसावं लागतं.
तू हे विचार सोड आता. तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर. ताई जरी सासरी गेली तरी तिचं अर्ध लक्ष तुझ्याकडेच असणार राजा.लोकं काय थोडे दिवस बघतील न् होतील गप्प. तुझे पप्पा तब्येतीने बरे असते तर मीच ताईचं लग्न लावून दिलं असतं. पण त्यांच्या ह्रदयाची अशक्तता त्यामुळे मन मारून गप्प बसावं लागतं बघ."
"आई,म्हणजे ताईबद्दल राग नाही तुझ्या मनात?"
"बिलकुल नाही रे. गुणाची आहे माझी श्रावू. तिची निवड चुकीची नसणार ठाऊक आहे मला. तिच्या नवऱ्याच्या धंद्यात प्रगती होईल बघ दिवसेंदिवस. लक्ष्मीच्या पावलांची आहे माझी श्रावू." त्यानंतर मग शुभमनेही कधी तो विषय काढला नाही,केवळ पप्पांकरता.
दोन वर्षांनी..
पप्पा हॉस्पिटलमध्ये एडमिट होते. ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता त्यांना. शुभम व त्याची आई त्यांच्यासोबत होते. इतक्यात श्रावणी धावतपळत आली. तिने काचेतून पप्पांना बघितलं. आईपाशी गेली. आई रडत होती. ती आईचा हात धरून बसून राहिली.
पप्पा शुद्धीवर आले तशी आई त्यांच्याजवळ गेली,शुभमही गेला. श्रावू मात्र बाहेरच थांबली..इच्छा असुनही नाही गेली आत. पप्पांना डिस्चार्ज मिळणार होता म्हणून शुभम बिल भरायला गेला. बिल श्रावणीने भरलं होतं आधीच. पप्पांना घरी आणलं नि तडक तिच्या घरी गेला.
"ताई,हे धर बिलाचे पैसे."
"अरे शुभ,मी कोणीच नाही का तुमची?"
"मग दोन वर्ष झाली का नाही आलीस घरी?"
"केवळ पप्पांसाठी रे."
"पुरं आयुष्य पप्पांसाठी दु:खात घालवायचं. त्यांना आहे का काय त्याचं? काय समजतो तो स्वतःला. पाषाणह्रदयी,बिन काळजाचा माणूस."
श्रावूने सणकन एक शुभमच्या थोबाडीत लावून दिली. तो मान खाली घालून गाल चोळू लागला.
"शुभम,अरे वडील आहेत ते आपले. तुला माहित नाही,आम्हालाही नव्हतं माहित. आमच्या धंद्यासाठी कुठे जागाच मिळत नव्हती. समोरच्या बिल्डींगमधल्या शहांनी त्यांचा गाळा अत्यंत कमी भाड्यावर आम्हाला चालवायला दिला. डिपॉझिटही नको बोलले. शिवाय गिऱ्हाईकही आणून देत होते.
आम्ही किती गुणगान गात होतो शहांच. ती जागा फळली आम्हाला. धंदा वधारला आमचा. दहा दिवसांपूर्वी शहाची बायको भेटली होती,तिच्याकडून कळलं मला की डिपॉझिट पप्पांनी भरलं होतं व वरचं भाडंही तेच भरत होते, शहा फक्त मोठेपणा घेत होते.
आता आमचं चांगलं चाललय ते पप्पांच्याच आशीर्वादाने व मला माहिती आहे की पप्पांची एंजिओप्लास्टी करायचा सल्ला दिलाय डॉक्टरांनी. तीही आपण करुन घेऊ. पैशाचा विचार तू नको करुस."
"आणि पप्पांनी पैशाबद्दल विचारलं तर काय सांगू?"
"सांग की मामाने दिले म्हणून."
शुभम तिथून परत आला. वाटेत फक्त तो, पप्पा व श्रावूताई यांचा विचार करत होता," दोघं एकमेकांची तोंडं पहात नाहीत पण मनापासून प्रेम करतात एकमेकांवर. पप्पांना मी काय समजत होतो दगडाच्या काळजाचा माणूस. हे तर शहाळं आहेत."
तो घरी गेला. हातपाय धुतले. देवाला नमस्कार केला.
पप्पा काहीतरी वाचत बसले होते. त्यांनी शुभमला बोलावलं. शुभम त्यांच्याशेजारी जाऊन बसला.
"ताईकडे जाऊन आलास नं."
शुभमने पप्पांकडे पाहिलं. "यांना कसं समजलं?" ..शुभमच्या डोळ्यात न लपवता येणारे भाव.
"अरे काही नको लपवूस माझ्यापासून. माहितीय मला त्या गधडीनेच पैसे भरलेत ते बिलाचे आणि आता पुढचेही भरेल शहाबिहाच्या नावावर. तिला सांग बापाला बघायला ये एकदा."
शुभमने पप्पांना गच्च मिठी मारली. पुढच्या सेकंदाला तो ताई व भाओजींना आणायला गेला.
श्रावणी व तिचा नवरा श्रेयस दोघेही लगेच आले. श्रावणी पप्पांजवळ गेली. पप्पांनी जावईबापुंनाही जवळ बोलावलं. म्हणाले,"माफ करा या बापाला पोरांनो. नोकरी नाही म्हणून तसंच वेगळ्या जातीतला म्हणून मी हा जावई नको म्हणत होतो. समाजाची भितीही होती मनात पण आता नाही.
समाजाला ओरडून सांगेन,माझा जावई म्हणजे खणखणीत नाणं आहे खणखणीत नाणं."
श्रावू व श्रेयस आईपप्पांच्या पाया पडले. पप्पा आशीर्वाद देत म्हणाले,"शतायुषी व्हा बाळांनो."
-----सौ.गीता गजानन गरुड.