#fathers_day #अलक #बाप झाल्याशिवाय बाप समजत नाही

आई म्हणजे दिवा, तर बाप म्हणजे दिव्याची वात. सदैव जळणारी आणि दुसऱ्याला प्रकाश देणारी. ज्योतीचे च?

मेधा कॉलेज वरून परत येत असताना तिला अचानक पोटदुखी सुरू झाल्याचं जाणवलं. घरी जाईपर्यंत पाळी सुरू झाली होती. आई ऑफिसला. समोर बाबा टीव्ही बघत बसले होते. आई घरात असती तर तिने मस्त गरम कॉफी करुन दिली असती, असा विचार करतच अंघोळीला गेली. बाहेर येऊन पाहते, तर समोर कॉफीचा मग आणि बाजूला हॉट बॅग तिची वाट पाहत होते. तिने बाहेर जाऊन बाबांना घट्ट मिठी मारली.
त्यालाही जाणवतात मुलीच्या त्या वेदना.
_____________________________________________

स्नेहा सायकल चालवायला शिकत होती. बाबांनी विश्वास दिला, "तू चालव मी धरलय तुला मागून". अर्धा रस्ता पुढे गेल्यावर म्हणाली, "बाबा आता सोडा. मी बघते एकटी चालवून." बाबांनी हात कधीच सोडला होता आणि ती एकटीच पुढे गेली होती. आज लग्न करून सासरी जातानाही बाबांनी तोच विश्वास दिला, "विसरू नकोस मी धरलय तुला आजही. ये माझ्याकडे कधीही गरज पडली की." आणि स्नेहा हसत हसत निघाली सासरची जबाबदारी उचलण्यासाठी.
समाधान होते त्याच्या चेहेऱ्यावर लेकीला सक्षम केल्याचे.
_____________________________________________

तिला मिळालेले प्रत्येक यश लोकांना सांगून तोंड दुखायचे त्याचे. मग ते कितीही लहान का असेना.
आज तिनेच त्याला ऐकवले होते, "तुमची इच्छा नाही तर मी करेन माझं लग्न माझ्या खर्चाने त्याच्यासोबत. नका येऊ तुम्ही माझं तोंड बघायला." तिच्या कन्यादानाचे स्वप्न रंगवत असणाऱ्या त्या बापाच्या डोळ्यातून अश्रूंचा पाऊस कधी पडू लागला त्यालाही नाही कळले.
त्याची चिमणी खूप मोठी झाली होती आज.
_____________________________________________

"आम्ही बाळ किंवा आई दोघांपैकी एकालाच वाचवू शकतो. कोणाला वाचवायच हा निर्णय घेऊन सही करा." डॉक्टरचे शब्द ऐकून एक बाप आणि एक होऊ घातलेला बाप दोघेही जागीच थिजले होते. पाठवणी नंतर त्याने हात जोडले होते जावया समोर आज पुन्हा एकदा. जड अंतःकरणाने त्या होऊ घातलेल्या बापाने सही केली होती. दोन्ही बाप देवाला आळवत होते. ऑपरेशन झाले. बाहेर येऊन डॉक्टरनी सांगितले, "बाळ आणि आई दोघीही सुखरूप आहेत".
विधात्याने दोन्ही बापांची प्रार्थना ऐकली होती.
काळाला हरवून बापाचे काळीज जिंकले होते.
_____________________________________________

आयुष्यभर घाम गाळून पैसा कमवून मुलाला चांगल्या कॉलेजात घातले होते. त्याला बाईक देऊन स्वतः रोज लोकलचे धक्के खात प्रवास करत होता तो. काय माहित त्याला एक दिवस मुलगा बाईक रेसमध्ये स्वतःचा जीव गमवून बसेल. एकुलत्या एक मुलाच्या चितेला अग्नी देताना त्यालाही जीव नकोसा झाला होता.
कदाचित तो बाप कुठेतरी कमी पडला होता.
_____________________________________________

जावयाने उगरलेला हात थोपवून मागे दुमडला आणि दुसऱ्या हाताने त्याच्या थोबाडीत लगावली. "पुन्हा डोळे वर करून बघायची जरी हिम्मत केलीस, तर जीव घेईन." सासूने सामान हातात देऊन सांगितले, "घेऊन जा मग आता तुमच्या मुलीला." मुलीचा हात धरून घेऊन गेला तो. तिला पुन्हा जगण्याची उमेद देण्यासाठी. तिचे आयुष्य मार्गी लावण्यासाठी.
बापाला कधीच जड नसते त्याचे काळीज.
_____________________________________________

आयुष्यभर आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले. बाप गेल्यावर श्राद्ध मोठे केले. वेळ आली पिंडाला कावळा शिवण्याची. कावळा रुपी बाप काही जवळ येईना. "का का" करून थकला. शेवटी वृद्धाश्रमातून आईला बोलावले. आई येऊन म्हणाली, "इतकं केलंस. आता एक खोटं अजून बोल. तुमच्या नंतर आईला सांभाळेन." डोळे पाणावले होते, पण बायकोचे मोठे डोळे दिसले होते. कावळा रुपी बापाचेही मन दाटले. येऊन शिवला तो, फक्त आपल्या पत्नीसाठी.
बापाचे कर्तव्य बजावले त्याने मरणानंतरही.
_____________________________________________

रोज मीटिंग आणि प्रोजेक्ट्स च्या गर्तेत अडकलेला तो. रात्री घरी आल्यावर समोर असलेल्या बापाची विचारपूस करण्याइतकाही वेळही नसायचा कधी त्याच्या जवळ. कोरोना आला. घरातून बाहेर जाणाऱ्या दोनच व्यक्ती. तो आणि बाप. एकत्र पॉझीटिव्ह. दोघांना एकाच रूम मध्ये क्वारांटाइन. रात्री झोप येईना. बापाने डोके चेपायला सुरुवात केली. झरझर लहानपण डोळ्यासमोर आले. त्यानेच तर कष्ट केले म्हणून आज इथवर आलो आपण. क्षणात उपरती झाली. दोघे एकमेकांच्या मिठीत विसावले.
बापलेकाचे नवे नाते सुरू झाले होते पुन्हा एकवार.
_____________________________________________

बाबांचा अपमान करून त्यांचं घर सोडून दूर गेला होता तो. आज कोरोनामुळे ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यावर आयसीयू मध्ये एडमिट असताना बाहेर धावपळ करणाऱ्या बाबांना बघून त्याच्या चुकीचा पश्चाताप होत होता.
मुलांच्या चुका पोटात गिळतो आणि त्यांच्यासाठी झगडतो तो एक बापच असतो.
_____________________________________________

पाणी तर डोळ्यातून केव्हाच वाहू लागले होते, जेव्हा त्याने मुलाच्या वहीत त्याचे विचार वाचले होते. निबंध होता त्याचा,  'तुम्हाला मोठे होऊन कोण व्हायचे आहे?' आणि मुलाने लिहिले होते, 'मला माझ्या बाबांसारखा बाबा व्हायचे आहे.'
एका सावत्र बापाला अजून काय हवे होते.
मुलाने त्याला मनापासून स्वीकारले होते.
_____________________________________________