#fathers_day#अलक# घराचा कळस बाबा

Inspirational stories of father

# घराचा कळस बाबा

# अलक

©® आर्या पाटील

माहेरचं अंगण सोडून ती आज निघाली होती.पाठवणीचा क्षण म्हणजे क्षितिज जणू सुखदु:खाचं.आयुष्यभर खंबीर असलेला तिचा बाबा अश्रूंनी चिंब भिजत होता." सून नाही मुलगी घेऊन जात आहोत निश्चिंत रहा."सासरे पुढे आले आणि म्हणाले.. लेकीला सासरी बाबा मिळाला या जाणिवेने क्षणात एका बापाच्या अश्रूंचे आनंदाश्रू झाले.

---------------------------------------------------------------

 वडिलांनी त्याचा पहिला पगार देवाजवळ ठेवायला सांगितला.. त्याने तो वडिलांच्या हातात दिला आणि म्हणाला.." काबाडकष्ट करून मला सक्षम बनविणाऱ्या माझ्या देवजवळच ठेवतोय पगार.." लेकाने पांग फेडले या विचारतच त्याने शेला डोळ्याला लावला.

-------------------------------------------------------------

एरवी रविवारी भेटणारा त्यांचा बाबा लॉकडाऊनमुळे त्यांच्या रोजच्या विश्वाचा अविभाज्य भाग बनला. बाबाचा सहवास त्या भरभरून अनुभवू लागल्या.. मलाच आई पाहिजे असा अट्टहास धरणाऱ्या त्या दोघींच्या भांडणात आता आई तुझी अन् बाबा माझा झाला.

-------------------------------------------------------------

वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारा तो आज एका वर्षाच्या लेकीला कुशीत घेऊन ढसाढसा रडला. आपली लेकही शेजारच्या सुमी सारखी लग्न करून उद्या आपल्याला सोडून जाईल या जाणिवेने त्या बापाच्या हृदयाला आजच पाझर फुटला.

---------------------------------------------------------------

आज सासूबाई नसल्याने तिची चांगलीच तारांबळ उडाली. सारं आवरून ऑफिससाठी बाहेर पडणार तोच सासऱ्यांनी चहाचा कप आणि चपातीचा रोल हातात देत"लेकीकडे लक्ष द्या असा दम देऊन केली आहे तुझी सासू." म्हणणारे सासरे क्षणात बाबा झाले..बापाच्या हातचा तो चपाती चहा तिला पुरणपोळीसारखा लागला.

---------------------------------------------------------------

लहानपणीच आई गमावलेल्या लेकीने आयुष्यभर आभाळासारखा खंबीर राहिलेला बाबा पाहिला होता पण पाठवणीच्या क्षणी मात्र ढसाढसा रडणाऱ्या बापाच्या रुपात तिने त्याचं आईपण अनुभवलं.

---------------------------------------------------------------

बापाला आईसारखा जीव कधीच लावला नाही याची जाणिव त्याला तो बाप झाल्यावर झाली.त्या दिवसापासून आपल्या म्हातार्‍या बापासोबत हक्काचा वेळ घालवायचे त्याने ठरवले. आणि म्हाताऱ्या बापाला लहानपणी हरवलेला त्याचा मुलगा नव्याने सापडला.

---------------------------------------------------------------

मासिक पाळीचा त्रास पुरुषाला तेव्हा कळला जेव्हा एका बापाने लेकीला वेदनेने विव्हळतांना पाहिले.

--------------------------------------------------------------

ऑपरेशन थिएटर मधून डॉक्टर बाहेर आल्यावर तिला मुलगा झालाय की मुलगी असे विचारणारे सगळेच होते पण प्रसुतीच्या वेदना सहन केलेली माझी मुलगी बरी आहे ना.. असे विचारणारा एकच बाप होता.

---------------------------------------------------------------

दोन दिवस बाळाची हालचाल जाणवली नाही म्हणून घाबरलेली ती तिसऱ्या दिवशी मात्र निर्धास्त झाली.. कारण दोन दिवस बाहेरगावी गेलेला त्याचा बाबा तिसऱ्या दिवशी जवळ येताच बाळराजांची धडपड पुन्हा सुरु झाली.. आईशीच नाही तर बापाशीही गर्भातच नाळ जुळते बाळाची हे चांगलच कळलं तिला.

©® आर्या पाटील

*******************************************

अलक आवडल्यास नक्की प्रतिक्रिया द्या..

धन्यवाद.