#fathers_day#अलक बाप_मनातला एक हळवा कोपरा

Short stories about relation between father and child

#fathers_day#अलक बाप_मनातला हळवा कोपरा

1) संध्याकाळ झाली...शेवटच्या गाडीनं गावाच्या फाट्यापर्यंत बाप लेक आले..
लेक 10 वर्षाचा...बापाचा हात धरून चालत होता...
तेवढ्यात एक वळू मागे लागला...बापानी लेकाला खांद्यावर घेऊन सगळ्या शक्तीनिशी गाव गाठलं....लेकाची सुपर हिरो ची व्याख्या आज बदलली...
___________________________________________

2)सणावाराला, वाढदिवसाला घरातल्या सगळ्याना कपडे , हवं ते मिळायचं...
बाप मात्र तेच जुनं आवडीनं घालायचा...
आज बापाचा वाढदिवस..."बाबा तुमचा वाढदिवस, आज तुम्ही नवीन कपडे घ्या" म्हणून पोरीन केलेलं भांडण बापाची मान उंचावून गेलं..
___________________________________________

3) बाबा अभ्यास घेत होते...
कविता होती " गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या"..
अन कविता लेक बापाच्या अश्रूंत न्हावून तृप्त झाली...
__________________________________________

4) तिसरी पण मुलगीच झाली म्हणून पूर्ण गावाला पेढे वाटणार बाप सापडेल का पुन्हा परत....
___________________________________________

5) पोरीला मोठ्या शहरात शिक्षणासाठी ठेवलं ..
.बाप महिन्यातून एकदा धावती भेट घ्यायचा..आईनी दिलेले चिवडा लाडू देताना एक शंभराची नोट सोबत द्यायचा..."अडीअडचणीला राहू दे जवळ"
होस्टेलच्या गेट मधून पाठमोरा जाताना दिसलेला बाप तेव्हा मात्र जगातला सगळ्यात श्रीमंत वाटायचा....
___________________________________________

6) आज तो बाप झाला एका छोट्या गोड परीचा...अन "बाप" काय असतो ..तो त्याला नव्याने उमगला...
पळत जाऊन त्यानं एक मिठी मारली बापाला अन एक त्याच्या सासऱ्याला...
बापाला... सगळ्या आयुष्यभराची साथ म्हणून....
सासऱ्याला... त्याची लाडकी परी किती मोठ्या मनानं त्याच्या स्वाधीन केली म्हणून...
दोन्ही पऱ्यांना अगदी फुलासारख जपेल अस म्हणत एक नवा बाप साकारत होता...
________________________________________

7) एक वाकडा तिकडा  मोठा गोल ...त्यात दोन छोटे छोटे गोल...अन मध्ये एक तिरपी रेष...आज बापाच्या whatsapp status ला 2 वर्षाच्या लेकीन काढलेलं चित्र होत...त्याच्यासाठी ते एका सर्वोत्कृष्ट चित्रकारपेक्षाही श्रेष्ठ होतं...
__________________________________________

8) पोरगी सासरी पाठवताना बाप धाय मोकलून रडला..
जावयाच्या हातात लेकीचा हात देत म्हणाला, "माय आहे माझी,तिला तिच्या बापसारखं जपाल न ?"


___________________________________________

9) बाबा गेले तेव्हा आभाळच कोसळलं...
आई मात्र पर्वतासारखी उभी कोसळलेलं आभाळ झेलत...
आता आईच बाबा आहे...पण बापासारखा कठोरपणा दाखवताना तिचा हळवेपणा येतो हळूच पुढं....


___________________________________________

10) बाबांजवळ एक संदुक असायची.. ते कोणालाच तिला हात लावू द्यायचे नाही....
बाबा गेले...आता संदुक उघण्यापासून कोण अडवणार....
संदुक उघडली अन पाहतो तर काय...लहानपणी च्या वह्या...उलटे सुलटे लिहिले 1 2...वाकडे तिकडे चित्रं... अन बऱ्याच गोष्टी.....
खरंतर मनातही बापाचा कप्पा असाच झालाय संदुकीसारखा..तो उघडून त्या आठवणी कुरवाळायला हव्यात...
      
                                 डॉ किमया मुळावकर-सोनटक्के

( अति लघु कथा लिहिण्याचा...त्याहीपेक्षा लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न..जमलाय का नक्की कळवा...चुका असतीलच...नक्की सांगा)