#फादर्स डे_अलक बाबा....एक सहृदयी नातं

ईरा शब्दांचा खळाळणारा झरा

बाबा हे नात जीवनाला दिशा देणारे अनमोल असे आहे.सतत आपल्या कामात व्यस्त असणारे आपल्या कुटुंबाचे व मुलांचे प्रत्येक गोष्टीत हित पहाणारे व आपला आनंद सर्वांना वाटणारे बाबा निशःब्द व्यक्तिमत्व आहे.  संकटे , कष्ट व मदतीची भावना यांचा सुंदर मिलाफ त्यांच्याकडे असतो.ते कधीच कोणत्याही गोष्टींचे प्रदर्शन करित नाहीत केवळ कुटुंबांचा व मुलांचा नेहमी विचार करतात.अनेक गोष्टी मोठ्या दिमाखात साज-या होतात पण बाबांच्या गुणांचे कौतुक फारसे होत नाही त्यासाठी ईरा व्यासपीठाने आयोजित केलेल्या " फादर्स डे " निमित्य तमाम बाबांना ही अलकरुपी  शब्दसुमने ...!!
---------------------------------------------

तनुष आज बाबाबरोबर शेतात फिरायला गेला होता.बाबा शेतातील हिरव्यागार पिकाचे निरीक्षण करीत होते.पिकावर अलगद हात फिरवताना त्यांना गहिवरुन आले होते.लहान मुलांप्रमाणे पिकाची काळजी त्यांंनी घेतली होती. पाणी , खते , मशागत यासह देखभाल केली होती लहान मुलासारखे ते त्यांंच्याशी हितगुज करत होते ..हे करत असताना आपल्या तनुषकडे त्यांंची नजर गेली ..निरागस कोवळ्या मनाला बाबांनी असेच जपले होते ..बांबाना हे आठवताच तनुषला छातीशी घट्ट कवटाळले ..बाबांचे हृदय पाझरले होते ...!!

-----------------------------------------------

ईरा ही प्रतीभाशाली लेखिका होती.आपल्या अनमोल लेखणीने वाचकांना सदाबहार खजिना तिने उपलब्ध करुन दिला होता.पण आज ती बाबांच्याबद्दल व्यक्त झाली होती.लहानपणापासून आपली केलेली जपणूक , गोड बोलणे , तिच्यासंगे खेळणे , शाळेळा पाठविणे , चांगले संस्कार करणे व आदर्श शिक्षिका करणे हे सगळे व कौटुंबिक वातावरण लेखणीत बंदीस्त केले होते.बाबांचे हे थोरपण तीला पदोपदी आठवत होते.कधी बाबांनी कशाचीही तमा न बाळगता तिला घडविले होते.या सगळ्या प्रसंगाचे वर्णन एक लेखिका,  शिक्षिका व मुलगी नात्याने बाबासमोर प्रकट करताना बाबांचे अश्रु घरंगळत होते ...बाबा म्हणत होते " बेटा अशीच महान लेखिका  व  शिक्षिका हो..!!

-----------------------------------------------
फादर्स डे निमित्य ईरा व्यासपीठाने पुस्तकप्रदर्शन भरविले होते.ईरावरील नामांकित लेखकांची पुस्तके प्रदर्शनात मनाचा ठाव घेत होती.पुस्तकांची बाबांची  मुखपृष्ठे हेलावून टाकत होती.प्रदर्शनाला अनेक लोकांची अलोट गर्दी उसळली होती,त्यात बाबा लोकांचा सहभाग भारावून टाकणारा होता.ईराच्या या उपक्रमाला व लेखकांच्या लेखणीला बाबा लोक सुखावून  गेले होते.

-----------------------------------------------

आर्या फार सुखात वाढली होती.बाबांच्याबद्दल तिला अपार आदर होता.बाबांच्या प्रेमाने लहानाची मोठी झाली.बाबांनी चांगले स्थळ पाहून तिचे लग्न उरकले होते.आर्या सासरी आनंदात रहात होती.बाबांना पाहुणचारासाठी आर्याच्या सासरी बोलावले होते.बाबांना मधुमेह होता हे तिला माहित होते तरीसुद्धा सासरच्या लोकांनी त्यांंचा यथायोग्य पाहुणचार केला होता.आर्याने सासरच्या मंडळींना  सुचना केल्यामुळे बाबांची जेवणखाण्याची  चांगली व्यवस्था झाली होती.ही संकल्पना बाबांनी ओळखली होती त्यामुळे बाबा मनोमन आनंदून गेले होते.

-----------------------------------------------

शेजारचा विनू शाळेत जात नव्हता.शाळा म्हटल की विनू धूम ठोकायचा.आयुषचे बाबा हे सर्व पहात होते.विनूला त्यांनी गोड बोलून मित्र केले.त्याला गोळ्या , चॉकलेट देवून शाळेविषयी चांगले समजावून सांंगितले.पाटीवर अक्षरे गिरवण्यास शिकविले.आता दोघांची छान गट्टी जमली होती.आयुषच्या बाबांनी "विनू आजपासून तू शाळेला जायचे "  असे म्हणताच .हो बाबा ..!! बाबांनी विनूला नविन दफ्तर , पाटी , पेन्सिल आणले ...! विनूला बाबा शाळेत घेवून गेले..!! सर्व शिक्षकांनी आयुषच्या बाबांचे व विनूचे अभिनंद न केले..!!आयुषच्या बाबांनी विनूच्या शैक्षणिक जीवनाला  कलाटणी दिली होती.

---------------------------------------------
         आरतीचे वडील शेतात भरपूर कष्ट करत होते.शेतीबरोबर त्यांना सामाजिक कार्याची आवड होती.गावातील अनेक सामाजिक कामात पुढाकाराने ते काम करित असत.गावात मरणोत्तर नेत्रदान चळवळ त्यांंच्याच सहभागाने चालू होती.नेत्रदान चळवळीविषयी लोकांना ते उत्साहाने मार्गदर्शन करित असत.आरतीचे वडिल अचानक आजारी पडले.सर्व ईलाज झाले परंतु कांही उपयोग झाला नाही.अखेर त्यांंची प्राणज्योत मावळली पण जाता जाता त्यांनी मरणोत्तर नेत्रदान करुन आपली ईच्छा पूर्ण केली.आरतीच्या वडिलांनी " नेत्रदान महान कार्य आहे " हे  समाजाला शिकविले.

--------------------------------------------
     बाबा आज कोर्टात लगबगीने चालले होते.अनेकवर्ष त्यांनी वकीली करुन गोरगरीबांना न्याय दिला होता.आज अशाच गरीब शेतक-याच्या केसचा निकाल होता.गरीब शेतक-याची जमीन सावकाराने बेकादेशीर हडप केली होती.बाबांनी अत्यंत निस्पृःहपणे मुद्देसुद मांडणी करुन गरीब शेतक-याला जमीन मिळवून दिली होती.बाबांची ही तळमळ ऋचाने जवळून बघीतली होती.बाबांच्या   मोठ्या मनाचे सर्व कार्याचे  आदराने कौतुक केले तेंव्हा बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.

 ----------------------------------------------

     अजय आज शाळेत आनंदाने गेला होता.आपले बाबा शिक्षक या नात्याने मुलांना कसे संस्कार करतात हे पहिल्या बेंचवरुन निरीक्षण करणार होता.अजयचे बाबा वर्गावर येताच मुलांनी गुरुजींचे छान स्वागत केले.नंतर गुरुजींनी सुंदर मार्गदर्शन केले.संस्काराचे धडे दिले.हसतखेळत शिकवणीमुळे मुले फार उत्साही झाली होती.अजय आपल्या वडिलांच्या शिक्षणपद्धतीवर मुलांचे लाड करण्यावर  फार खुश झाला.अजयसह मुलांनी गुरुजींचा यथायोग्य सन्मान केला.

----------------------------------------------
    बाबा असेच घरात वर्तमानपत्र वाचत होते.लगेच त्यांंच्यासमोर अनाथ मुलगा भिक मागण्यासाठी आला.बाबांना त्याची अवस्था पाहून फार दया आली.त्याला त्यांनी घरात बोलविले त्याला पोटभर जेवण दिले.नविन कपडे , धान्य  थोडे पैसे दिले.अनाथ मुलांने बाबांचे पाय धरले कारण त्याला बाबांच्याच आपला बाप दिसला होता.

----------------------------------------------
     गणपतराव हाडाचे शेतकरी होते.शेतातील सारे कसब त्यांना अवगत होते.पारंपरिक शेती करण्यात ते माहिर होते.ऊस व भाताचे जोमदार पीक घेण्यात त्यांचा हातखंडा होता.मुलगा रामचंद्र वडिलांंचे हे सारे प्रयोग जवळून पहात होता.बाबांना त्यांने आधुनिक शेतीची कास धरण्याचे सांगीतले.नवेनवे बदल व पारंपरिक शेतीला छेद देत दोघांनी आधुनिक शेती केली.भरघोस उत्पन्न मिळू लागले.बाबा मुलाच्या या नव्या पद्धतीवर खुश झाले.बाबांच्या या सहकार्याने रामचंद्रही नव्या दमाने शेती करु लागला.

         ©®नामदेव पाटील