किमयागार.............. मुलांचं आयुष्य घडवणारा जादूगार असतो बाप

The Thing That Father Do But We Never Realise
किमयागार…………... मुलांचं आयुष्य घडवणारा जादूगार म्हणजे बाप.
          त्यादिवशी नाना जोशी म्हणजेच जोशी मास्तरांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमाची तयारी अगदी जोरात सुरू होती. आधी सपत्निक सत्यनारायण पूजा , मग होमहवन आणि त्यानंतर ग्रंथतुला ,शर्करा तुला, आणि नाणे तुला झाल्यावर, ६१ दिव्यांनी औक्षण आणि सगळ्यात शेवटी मधुरा- नानांची कनिष्ठ भगिनी -यांनी नानांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन असा कार्यक्रम ठरला होता.
                   नाना जोशी अर्थात शंकरराव जोशी तालुक्याच्या गावी प्राथमिक शाळेत नोकरी करणारे प्राथमिक शिक्षक. पण तेवढीच त्यांची ओळख नव्हती, नानांनी केवळ आपली भावंड मधुरा आणि नितीन यांचेच आयुष्य घडवले असे नव्हते तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या मुलांच्याही जीवनाला त्यांनी आकार दिला होता. गावच्या पाटलांच्या सहकार्याने नानांनी गावातच एक आदर्श शाळा निर्माण केली होती. त्यामुळे नानांच्या एकसष्टीला केवळ आप्तेष्ट नव्हे तर त्यांचे माजी विद्यार्थी आणि गावातील इतर काही मान्यवर ज्येष्ठ मंडळी ही उपस्थित होते.

                 नाना जोशी म्हणजे एक शांत , सरळ, पापभीरू,संयमी व्यक्तिमत्त्व, पण हाडाचे शिक्षक. राहणीमान अगदी साधे पण विचारांवर मात्र सानेगुरुजी , महात्मा गांधीजी यांचा प्रभाव. त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना केवळ साक्षर करुन केवळ अक्षर ज्ञानच दिले नाही ,तर व्यवसायाभिमुख जेवढे शिक्षण- प्रशिक्षण त्यांना देता येत होते तेही दिले . गांधीजींच्या बुनियादी तालीम विचारांचे प्रतिबिंब त्यांच्या शाळेत नक्कीच उमटले होते.
         
           नानाचे विद्यार्थी बागकाम करत ,सुतारकाम शिकत, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक मूलभूत जोडणी आणि बेकरीचे पदार्थ बनवण्याचे त्यांनी प्रशिक्षण घेतले होते . कुणी ग्रंथपालाचे काम करत होते तर, कुणी अकाउंटचे. आता तर नानांनी नोकरीच्या शेवटच्या पाच वर्षात विद्यार्थ्यांना संगणक शिकवणे हे सुरू केले होते.

        


           सत्यनारायण, होमहवन ,ग्रंथ तुला ,शर्करा तुला , आणि नाणे तुला झाल्यावर नानांच्या पत्नी - गिरिजा वहिनी, भगिनी मधुरा, लहान भावाची पत्नी सुनीता ,कन्या मीरा आणि स्नुषा रमा- नानांचा लेक नारायण यांची पत्नी, या पाच सवाष्णींनी नानांना औक्षण केले.
      


         औक्षण झाल्यावर मधुराने -नानांच्या भगिनीने -\"किमयागार………. मुलांचे आयुष्यात घडवणारा जादूगार ", या नावाचे नानांन वर लिहिलेले पुस्तक, स्थानिक माजी सैनिक प्रताप सिंग चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. एकेक मान्यवर नानांन विषयी आपला आदरभाव व्यक्त करत होता. पण नाना मात्र पुस्तक वाचण्यात रमले होते प्रस्तावनेतच मधुराने वडिलांविषयीच्या तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.


        \" स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी\" ,किंवा \"प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई\"- आईची महती सांगणारी अशी कितीतरी काव्य अनेक कवींनी लिहिली आणि गायली आहेत . आईची महती खरोखरच थोर आहे. तिच्या त्यागाची, समर्पणाची सर कशालाच येणार नाही . पण बापही मुलांच्या आयुष्याचा दिपस्तंभ असतोच. आई लेकराला शिकवते मायेचा ओलावा, प्रेमाची ऊब, नात्यांचा गोडवा तर बाप सांगतो जगाचा कोरडा व्यवहार. आई देते संस्कार, जिव्हाळा, त्याग, यांची शिदोरी तर बाप सांगतो जगाचा भावना रहीत , रोखठोक, हिशोब.

          
 ‌‌ आई आपल्या सहवासाने ,आपुलकीच्या , ममतेच्या अमृतानं घराला घरपण देते. आपल्या लेकरांना जिवाचं रान करून जपते, वाढवते. तर बाप आपल्या छातीचा उभा कोट करून व्यवहारही, निष्ठुर निर्दयी, स्वार्थी जगाची सारी वादळे एकटाच झेलतो. घरा बाहेरच थोपवतो. आयुष्यभर त्याच्या स्वाभिमानावर, लायकीवर होणारे घाव झेलत शुर शिपायासारखा तो लढत राहतो. तरीही तो कधी थकत नाही, झुकत ही नाही, आपल्या शिस्तीतच राकट रागाचं कुंपण घालून कोवळ्या रोपट्याला रूजवण्यासाठी संरक्षण देत राहतो.
     

          जर आईमुळे घराला घरपण आहे तर बाबामुळे त्या घराच्या भिंती संरक्षित आहेत. आई आहे घराला घर बनवणारी तर बाबा आहे त्या घराचं उन्हापावसात भिजणारा पण तरीही अभेद्य राकट आणि तेवढच खंबिर छत.

             नाना एकेक प्रकरण वाचत होते पहिल्या प्रकरणात नानाने मधुरा आणि नितीनला आई-वडील गेल्यावर कसं कष्टाने उभा केलं त्याबद्दल सांगितलं होतं मधुरा जणु काही आत्मकथनच करत होती. \" मी तर पाच साडेपाच वर्षाची. वडील तर आठवतही नव्हते. आई गेली तेव्हा मात्र मी तिच्यासाठी खूप खूप रडायची, मला अजुनही आठवतं नाना मला कडेवर घेऊन अंगणभर फिरवायचा तर कधी रात्री झोपताना गोष्टी सांगायचा नितीन मोठा होता सात आठ वर्षाचा. त्याला सारं कळेल पण तो काहीच बोलत नव्हता आणि रडतही नव्हता आई गेल्याने जणू एकदम असतो समजदार आणि समजूतदार ही झाला होता\".

            रोज सकाळी उठून जसं आई अंगण झाडायची , सारवायची ,रांगोळी टाकायची दादा ही अगदी तसच करायचा . आमच्यासाठी स्वयंपाक बनवायचा ,माझी आंघोळ, कपडे, वेणी ,डबा भरून ,स्वतःच्या सायकलवर मला आणि नितीन शाळेत घेऊन जायचा . गौरी-गणपतीला तालुक्याच्या गावी जाऊन मेळावे आणि जत्राही दाखवायचा. आकाश झुला ,इलेक्ट्रिक रेल्वेत बसवायचा, खेळणी, बाहुल्या ,फुगे ,किती किती वस्तू घेऊन द्यायचा मला नाना ! नितीन मात्र काहीच घेत नसे. नाना तेव्हा एवढे पैसे कसे खर्च करायचा आणि कुठून आणायचा याचा विचारच मनात येत नव्हता आणि ते वयही तसं नव्हतं पण आता मात्र कळत पावसाळ्याचे चार महिने नाना पाटलाच्या मळ्यात आणि शेतात सकाळी दोन तास कामाला जायचा मग तिकडून आल्यावर आमची तयारी आणि परत दिवसभर शाळेत शिकवायचा.

        पाटलाचा नंदू अभ्यासात कच्चा होता. शिवाय उनाड, पाटलाने नानाला नंदूची जबाबदारी दिली. नंदू आता आमच्यासोबतच राहायचा नितीन अंगण झाडायचा, मग नंदू आणि नितीन सारवण करायचे, मी रांगोळी काढायची ,स्वयंपाकासाठी ची भाजी चिरणे ,कणिक मळणे, लसूण सोलणे, कांदा चीरणे,शेंगदाण्याची भरड ,वरण भाताचा कुकर सारं नानानं आम्हाला शिकवलं. पण मग मी आठ नऊ वर्षाची झाल्यावर आजूबाजूंच्या म्हणण्यानुसार आता घरात एक बाई माणूस असणं आवश्यक होतं.


             नानाचं लग्न झालं. पण वहिनीविषयी माझ्या मनात जरा अढीच होती. भावकितल्या बायका म्हणाल्या \"आता जरा शंकराला सुख मिळेल . त्याचा कामाचा ताण जरा तरी हलका होईल. पण मला मात्र वाटायचे की, \"नाना माझ्यापासून दुरावेल कारण नाना मला माझ्या हक्काचा माणूस वाटायचा\". मला वाटायचे गिरीजा वहिनी नानाला माझ्यापासून तोडेल. पण ती नावाप्रमाणेच गिरीजा होती नानाच्या संसाराला गिरिजा वहिनींनी समर्थपणे साथ दिली. आधी मी वहिनी केलेल्या स्वयंपाक खायची नाही किंवा कधी भाजीत तिखट आणि कधी कधी वरणात मुद्दा मीठ किंवा पाणी टाकून द्यायची. तेव्हा वाटायचे नाना आता वहिनीला ओरडेल पण रागावू नये हा नानाचा स्वभावच नाही आणि नितीन वहिनीला सांगायचा की मी ती बदमाशी केली आहे म्हणून पण वहिनी ही मला कधी रागे भरली नाही.


           वहिनीच्या हातचा खायचं नाही असा मी हट्ट केला की नाना माझ्यासाठी दुसरी भाजी करून न बोलता शाळेत निघून जायचा, तेव्हा मात्र मला खूप त्रास व्हायचा. पण वहिनी मला कधीही रागवली नाही. गिरिजा वहिनीने तिच्या संयमी, प्रेमळ स्वभावाने मला केव्हाच जिंकून घेतलं होतं. मीराच्या वेळी वहिनी गर्भवती असताना मात्र मी नाना आणि नितीन यांनी वहिनीची खूप काळजी घेतली. पण तरीही माझा स्वभाव ओळखून वहिनी जरा काळजीत होती. पण मीरा झाल्यावर नाना म्हणाला होता, \" मधुरा तुला खेळासाठी सोनेरी केसांची बाहुली आणली आहे.\" मग मीच वहिनीची आणि मीरा ची खूप काळजी घ्यायची आणि मी मीराचे खूप खूप लाड करायची.

            मी ना नाना नितीन गिरीजा वहिनी नारायण नानांचा मुलगा आणि मधुरा त्यामुळे घरचा खर्च वाढत होता वाढत्या खर्चाला हातभार लावायचा म्हणून गिरीजा वहिनीने गृह उद्योग सुरू केला. तिच्या हातचे मसाले, लोणची ,पापड यांची चव काही औरच होती आणि त्यासाठी लागणारा कच्चामाल नाना आणून द्यायचा आणि तयार झालेला मालही शहरात नेऊन मोठ्या मोठ्या सुपर मार्केटमध्ये तोच नेऊन विकायचा नाना वरचा भार आधी कधी हलका झाला असं वाटलंच नाही पण मग जेव्हा नितीन इंजिनियर होऊन नोकरीला लागला आणि नारायणनेही आर्किटेक केले तेव्हा मात्र नाना खऱ्या अर्थाने भरून पावला. आमच्या सोबत राहणारा नंदू आता एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करतो आहे.     पाटलांच्या इच्छेखातर, आणि नंदूच्या अर्थसाहाय्याने पाटलांनी दिलेल्या पाच एकराच्या जागेवर नानांनी एक शाळा बांधली आहे आणि बाजूलाच गरिबांच्या मुलांसाठी होस्टेलचे ही सुविधा केली आहे.            नानांचा आदर्श डोळ्यासमोर असल्याने मी पण शिक्षिका झाले. मला पण आता अनेक मुलांचे जीवन घडवायचे आहे त्याकरिता नानांचा आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे.


         माझ्या लग्नाच्या वेळी नाना किती उत्साही होता आणि पाठवणी करताना त्याची किती घालमेल झाली होती हे मी शब्दात सांगू शकत नाही. जे प्रेम त्याने मीराला दिले कदाचित काकणभर जास्तच प्रेम नानाने मला दिले आहे. प्रत्येक वेळी आवश्यक नाही की आपण मुलांना जन्मच द्यायला हवा. नानाने आपल्या भावंडांवर डोळस प्रेम करून असे एक अनोखे उदाहरण आपल्या समोर उपस्थित केले आहे नाही का धन्यवाद!

         मधुराने लिहिलेल्या पुस्तकाचे शेवटचे पान वाचून नानांच्या डोळ्यात दोन अश्रू आले त्यांनी ते टिपले आणि नानांचा सत्कार समारंभ संपला.


       ग्रंथ तुलातले सगळे ग्रंथ शहरातल्या एका महाविद्यालयाला दान म्हणून देण्यात आले. शर्करा गावातल्या मुलांच्या होस्टेलला देण्यात आली आणि नाणे तुलातले नाणे ही शहरातल्या वृद्धाश्रमाला देणगी म्हणून देण्यात आले.
       समाप्त

फोटो साभार गुगल


          

🎭 Series Post

View all