फॅशन सौंदर्यपूर्ण सोय

फॅशन मुळे मानवी जीवनात झालेले सकारात्मक बदल टिपण्याचा प्रयत्न

लेख शीर्षक :फॅशन सौंदर्यपूर्ण सोय.
विषय:फॅशन सोयीसाठी की दिखाव्यासाठी
वादविवाद स्पर्धा फेरी

एखादा जरा वेगळी केशभूषा,वेशभूषा करत असेल किंवा वेगळ्या प्रकारे अभिवादन करत असेल तरी आपण सहज म्हणतो,"अमका तमका खूप फॅशनेबल आहे."म्हणजेच व्यक्तीच्या वर्तन आणि वागण्याशी फॅशन जोडलेली असते.व्यक्ती स्वतःला साजेसे आणि सोयीचे वर्तन निवडत असतो.लोकशाहीत वर्तन स्वातंत्र्य आहे त्यामुळे फॅशन संदर्भात वैयक्तिक मापदंड लावले तर फॅशन सोय आहे हे विधान अगदी स्वाभाविक असल्याचे लक्षात येते.

जीवनशैलीतील सहज आणि सोयीचे असणारे बदल म्हणजे फॅशन.उदाहरण पहा,आजच्या काळात कॉर्पोरेट सेक्टर मध्ये किंवा वैद्यकीय ,अभियांत्रिकी क्षेत्रात वावरत असताना पारंपरिक पोशाख किंवा वाहतूक साधने वापरणे अशक्य आहे.त्याकरिता कामाच्या ठिकाणी वावरताना सोयीचा पोशाख आणि वेळेवर पोहोचायला गतिमान साधने वापरावीच लागतात .
अगदी पन्नास साठ वर्षांपूर्वी सायकलवर ये जा करणाऱ्या मुली किंवा स्त्रिया ही फॅशन म्हणून गणली गेलेली बाब कालांतराने सोय ठरली.
अगदी आदिमानव सुद्धा वेगवेगळी हत्यारे किंवा झाडांच्या साली वापरू लागला तेव्हा पहिल्यांदा ज्याने वापर केला त्याला नावे ठेवली असणारच.

आता काहीजण फॅशनचा संस्कृती बरोबर संदर्भ जोडतात. फॅशनमुळे संस्कृती बुडते असे काहीसे म्हणणे ह्या लोकांचे असते.परंतु प्रत्यक्षात संस्कृती ही नदिसारखी प्रवाही आणि वाहती असते.सिंधू संस्कृती,ग्रीस ,चीन आणि इजिप्त ह्यातील आजवर फक्त चीन आणि भारतातील समाज आणि सांस्कृतिक प्रवाह पूर्णपणे कधीली लयास गेले नाहीत.कारण नावीन्य स्वीकारणे. पूर्वी भारतीय स्त्रिया कंचुकी घालत नसत. हा बदल नंतर स्वीकारला गेला.विवाह संदर्भात बदल हेसुद्धा सुरुवातीला फॅशन असणारच.नंतर तेच सोय ठरले आणि स्वीकारले गेले.

बाबा आमटे यांनी हेमलकसा परिसरात काम करताना बनियन आणि हाफ पँट स्वीकारली.हे उदाहरण फॅशन विरोधक अनेकदा देत असतात.परंतु नीट विचार केल्यावर लक्षात येईल पूर्ण सुटबुट किंवा पँट शर्ट घातलेला डॉक्टर तिथल्या स्थानिकांनी स्वीकारला नसता.म्हणून हा सोयीस्कर बदल स्वीकारला.
आणखी एक प्रमुख आक्षेप असतो तो पर्यावरण हानी,प्राण्यांवर होणारे अत्याचार.परंतु ह्याबाबत सुद्धा फॅशन जगत बदलत असल्याचे आपल्याला दिसून येईल.अनेक आंतरराषट्रीय उत्पादक पर्यावरणपूरक उत्पादने बनवतात.लोकांचा कल सुद्धा नैसर्गिक आणि शुध्द उत्पादने वापरण्याकडे वाढला आहे.हा फॅशन जगतातील सकारात्मक बदल आहे.

तंत्रज्ञान आणि त्याच्या अती वापरामुळे फॅशन मधून अंगप्रदर्शन होते.संस्कृती बुडते असा एक सुर आढळतो.परंतु तंत्रज्ञान जीवन गतिमान आणि सोयीस्कर बनवत असते.आता तुम्हाला जर आधुनिक कामे करायची असतील तर तसा पोशाख करणे गरजेचे असते.पोहण्याच्या स्पर्धेत जर पूर्ण पोशाख घालून पोहले तर भिजलेल्या पोषाखाच्या वजनाने स्पर्धक दमून जाईल त्यामुळे तिथे सोय पहावीच लागते.

संस्कृती जपली जात नाही.ही ओरड सातत्याने केली जाते.परंतु पोशाख बदलला म्हणजे श्रद्धा आणि मूल्ये बदलतात का? सलवार सूट किंवा पँट शर्ट किंवा इतर काही फॅशन स्वीकारली म्हणजे काही मूल्ये आणि श्रद्धा बुडत नसतात.त्या तितक्या तकलादू असत नाहीत.म्हणूनच तर संगणक अभियंता असलेले अनेक तरुण तरुणी तुम्हाला गणेशोत्सवात मनोभावे सेवा करताना दिसतील.
आणखी एक उदाहरण देतो.काळाप्रमाणे सोयीचे ठरणारे बदल अंगीकारणे म्हणजे जीवन सुखकर बनवणे होय.पूर्वी हस्तलिखित ग्रंथात बंदिस्त असलेले ज्ञान छपाई तंत्राने सर्वदूर पोहोचले.
ह्या फॅशन उद्योगाचा आणखी एक पैलू म्हणजे रोजगार.जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नवे शोध लावून ते जीवनोपयोगी ठरवणारी एक मोठी साखळी काम करते.अगदी कोपऱ्यावर असलेल्या पार्लर,सलून पासून ते आंतरराष्ट्रीय कारखाने इथपर्यंत मानवी जीवन गतिमान आणि सोयीस्कर करणारा हा उद्याग पसरला आहे.

बॉलिवूड आणि रॅम्प वर असलेले सादरीकरण पाहून ह्या उद्योगाला नावे ठेवणारे काही गोष्टींकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात.बॉलिवूड किंवा रॅम्प शो म्हणजे फक्त फॅशन नव्हे.अगदी साडी नेसायची पद्धत बदलणे किंवा एखादे स्वयंपाकाचे भांडे बदलणे असो फॅशन सगळीकडे आहे त्यामुळे फक्त बॉलिवूड कडे पाहून नकारात्मक मत नकोच.त्यापेक्षा त्यातून जीवनात होणारी सोय आणि सौंदर्य पाहून पुढे जाणे श्रेयस्कर नाही का?

शेवटचा येणारा आक्षेप म्हणजे अंगप्रदर्शन.परंतु हा व्यक्तीसापेक्ष दृष्टीकोन आहे.पाहणाऱ्यांना साडी किंवा अंगभर पोशाखात सुद्धा बिभात्सता दिसते.स्थळ,काळ,प्रदेश आणि परिसर याप्रमाणे पेहराव आणि वर्तन पद्धती बदलते.मग ती आपल्या दृष्टीने वेगळी आहे म्हणून चुकीची ठरत नसते .
वरील सर्व विवेचन पाहता.फॅशन ही निश्चित सोय आहे.अगदी फॅशन विरोधक सुद्धा कपडे,खाणे, पिणे यात होणारे सोयीस्कर बदल अंगिकारत असतातच.
त्यामुळेच फॅशन ही दिखावा नसून सोय आहे.
प्रशांत कुंजीर

जिल्हा पुणे