फॅशन एक गैरसोय

फॅशनमुळे होणारे नुकसान


लेख शीर्षक : फॅशन एक गैरसोय 
विषय: फॅशन सोयीसाठी की दिखाव्यासाठी
वादविवाद स्पर्धा फेरी

काळानुसार जीवनशैली बदलत गेली. कपड्याच्या राहणीमानात असंख्य बदल घडून आले. \"एव्हरी लेडी ब्युटीफुल इन साडी\" बाईच्या साडीची कथा म्हणजे दहावारी कडुन नऊवारी आणि नऊवारी कडुन साडीवर पोहचली. पुर्वी नवरी लग्नासाठी हिरवा, लाल, चिंतामणी, राणी कलर अन् मोरपिशी ह्या रंगाचे भरजरी शालू पसंत करायची. लग्नात भरजरी शालू नेसून गळ्यात सोन्याची आभूषणे, मेहंदीचा लाल रंग उठून दिसणाऱ्या हातात हिरवा चुडा, आणि कानात मोती कुड्या सोबत कुंदन, नाकात मोत्याची नथ, कपाळी लाल चंद्रकोर किंवा टिकली सोबत सौभाग्याचे लेणे हळदकुंकू लावलेले असायचे. केसांचा अंबाडा त्यात मोगरा अथवा गुलाब माळून केलेली साजेशी केशरचना असायची. पिवळ्या हळदीच्या अंगावर नवरीचे रुप किती खुलून दिसायचे.

बदलत्या काळानुसार नवरी रिसेप्शनसाठी गाऊन परिधान करण्यास पहिली पसंती देते. गाऊन घातल्यावर इतर काही अलंकार घालण्याचा प्रश्नच निर्माण होऊ देत नाही. गळ्यात मंगळसूत्र, नाजुक असा डायमंड सेट अन् भरमसाठ असा चेहऱ्यावर मेकअप, केसांना छोटीशी पिनअप आणि केस मोकळे सोडलेले असतात. तुम्हीच सांगा ही आपली संस्कृती आहे का? आपल्या भारतीय संस्कृतीने असा परदेशी वारसा पुढे चालवला पाहिजे का?

फॅशनच्या दुनियेत नवीन पिढी इतकी रमली आहे की, भारतीय संस्कृती बाजुला सारून त्यांनी परदेशी संस्कृतीला आपलेसे करून घेतले आहे. फॅशन करायला पाहिजे. परंतु कुठे आणि केव्हा ह्या गोष्टीचे सुद्धा भान असायला पाहिजे. आजकाल मंदिरात जाताना मुली शॉर्ट वन पिस, थ्री फोर्थ पँट, क्रॉपटॉप असा पेहराव बिनधास्त करून येतात. हे कितीपत योग्य आहे? भले आपले मन शुद्ध आणि पवित्र असेल. मात्र समोरच्या व्यक्तीचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला जातो. पवित्र देवालयी असे कपडे परिधान करायला नकोच. ज्या भारत भूमीला संताची अन् देवांची भूमी म्हटले जाते. त्या भारतातील श्री कृष्ण भगवंताच्या श्रीमद भगवत गीतेचे सार परदेशी लोकांनी आत्मसाद केले. मुंबईच्या जुहू समुद्रावरील इस्कॉन मंदिरात आपल्याला त्याचे जिवंत उदाहरण पाहण्यास मिळते. श्रीकृष्णाचा भक्तीमार्ग स्वीकार केलेल्या परदेशी स्त्रिया साधी कॉटन साडी नेसलेल्या पेहरावात दिसुन येतात.

अश्युयुगीन मानवजात अंगाचे महत्वपूर्ण भाग पालापाचोळा लावुन ढाकत असे. बदलत्या काळानुसार कपड्याच्या बाबतीत सोयी निर्माण झाल्या. अंगभर कपडे घालण्याचे भाग्य आपल्या संस्कृतीला लाभले. मात्र तंत्रज्ञानाच्या गतिमान जगात हॉलिवूड पासून बॉलिवूडची निर्मिती झाली. फॅशनचे नाव आणि पैसे कमविण्याचे काम. ह्यासाठी सिनेस्टार वाटेल ते करताना दिसून येतात. जिमखान्यात व्यायाम करताना सोयीनुसार कपडे परिधान करणे आवश्यक आहे. परंतु बाहेर पडल्यावर वितभर कपडे परिधान करणे कितपत योग्य आहे? सिनेस्टार छोट्या कपड्यातच बाहेर पडताना दिसतात. मात्र ते क्षणाचा विलंब न करता आलिशान गाडीत देखील जाऊन बसतात. त्यांचे संरक्षण करण्यासाठी त्याच्या सोबत एखादा बॉडीगार्ड असतो. पण सर्वसाधारण मुली ज्या सिनेस्टारचे अनुकरण करत असतात त्यांचे काय? शॉपिंग मॉल, खाऊगल्ली, सिनेमाघर, हॉटेल सारख्या ठिकाणी मुली वीतभर कपडे घालून मिरवताना दिसतात. अंगप्रदर्शन करणारे कपडे फॅशन नसून स्त्री जातीला लागणारे एक प्रकारचे लांछन आहे.

द्वापार युगात श्रीकृष्ण भगवंताची करंगळी कापली होती. तेव्हा वाहत्या रक्ताची धार थांबवण्यासाठी द्रौपदीने भरजरी शालुचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या करंगळीला बांधला. पण जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते. त्यावेळी "द्रारकेच्या श्री कृष्णा धावत येरे" अशी तिने हाक देताच खुद्द श्री कृष्ण भगवंतांनी धावत येऊन तिला साड्या पुरवल्या. बहिणीचे अंगप्रदर्शन होऊ नये तिची इज्जत वाचवण्यासाठीच ना. फॅशनच्या नावाखाली अंगप्रदर्शन करणारे कपडे घातल्यास माणसांची नियत खराब होते. नको ते कृत्य घडतं. सर्वसाधारण घरातील मुलींना बलात्कारा सारख्या प्रकरणाला सामोरे जावे लागते. अंगप्रदर्शन करणारे कपडे घातल्यामुळे मुलींना आणि तिच्या पालकांना ह्या मध्ये दोषी ठरवले जाते. आयुष्यभर दुःखद घटने सोबत जीवन जगावं लागतं.

आपली संस्कृती एक विशाल सागर आहे. नदीने कितीही आणि कशीही वळणे घेतली तरी ती सागरास जाऊन मिळते. तिला माहिती असते तीचे अस्तित्व शेवटी सागरच आहे. कोणी कशीही अन् कितीही फॅशनचा अवलंब करा. मात्र भारतीय संस्कुती पुढे इतर संस्कृती फिक्याच पडतात.

पूर्वी पहाटेच्या प्रहरी रेडिओवर मराठी भक्तिगीते लागायची. प्रभात समयी ही गीते मन प्रसन्न करून जायची. दिवसाची सुरुवात अगदी प्रसन्नतेने व्हायची. देवापुढे दिवा लावून सकाळचे श्लोक म्हटले जायचे आणि संध्या समयी शुभम करोति म्हणा मुलांनो असं आई म्हणायची. पण आजकाल कॉन्व्हेन्टच्या मुलांना श्लोक म्हणजे काय हे माहीतच नसते. काळाच्या आड आलेला मोबाईल आणि कानाला हेडफोन लावून मुलं नको ते ज्ञान आत्मसात करत असतात. सध्या फॅशनच्या नावाखाली बीटीएस आर्मी नावाचे परदेशी संगीत खुपच प्रचलित झाले आहे. हल्ली आपली पिढी त्याच्या विश्वात एवढी रममाण झाली आहे की, त्यांना भारतीय संगीता बद्दल आवडच राहिलेली नाही हे निदर्शनास आले आहे. सणासुदीला  भक्तीगीते स्पिकरवर लावली जायची. मन तल्लीन होऊन एक प्रकारचा उत्साह वातावरणात निर्माण व्हायचा. गणेश उत्सवात गणपती बाप्पाचे विसर्जन होताना ताल मृदुंगाच्या तालावर भजन गायली जायची. तालाच्या ठेक्यावर पाऊले किती सुंदर पडताना दिसायची. आता मात्र डिजेवर नको ती गाणी लावून बाप्पा पुढे संपुर्ण अंगवळणी करून नाच केला जातो. श्रद्धा आणि मूल्य इथे बदलली जातात कारण गाण्याचा अर्थ कानांना ऐकवत नसतो आणि नाचणाऱ्याचा नाच डोळ्यांना पाहवत नसतो.

फॅशन सोय नसून एक प्रकारची गैरसोय आहे. जिकडे भारतीय संस्कृतीचा ठेवा जपला जात नाही अशी फॅशन म्हणजे फक्त दिखावा.

©®नमिता धिरज तांडेल.
जिल्हा पालघर