फॅशन : एक सोय , भाग १

दृष्टी तशी सृष्टी ! फॅशन किती सोयीची असते सांगणारा लेख


#राज्यस्तरीय करंडक वादविवाद स्पर्धा

#विषय : फॅशन - सोयीसाठी , लेख १

#जिल्हा : पुणे

 " भारताने जगभरात फॅशनची राजधानी व्हावे " केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग व वस्त्रोद्योग मंत्री श्री. पियुष गोयल ह्यांनी नुकतेच हे वक्तव्य केले. मुंबईच्या \" राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या (NIFT) \" पदवीदान समारंभात ते बोलत होते . का केलं असेल त्यांनी असं वक्तव्य ? प्रगतीसाठी आणि सोयीसाठी की दिखाव्यासाठी ? एवढ्या उच्च पदावर असणारी व्यक्ती फॅशनला महत्व देत असेल तर फॅशन नक्कीच भारताला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असेल ना....


फॅशन म्हणजे नेमकं काय हे आधी जाणून घेऊया . फॅशन म्हणजे खरं तर स्वतःला किंवा आपल्या कंपूला अधोरेखित करण्यासाठी मानवाने उचललेलं \" हटके \" पाऊल ! अर्थातच ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या ( Principles of Autonomy ) नियमांना धरून असते आणि हळूहळू ते जास्तीतजास्त लोकांमध्ये रुळते , थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ट्रेंडिंग होते . अच्छा , म्हणजे आजच्या भाषेत , म्हणजे फॅशन आताच आली का ?

चला तर मग थोडं , छे ,छे बरंच rewind करूया . जेम्स लेव्हर आणि फर्नांड ब्रूडेल ह्यांनी १४व्या शतकापासून कपड्यांचे फॅशन युग सुरू केले. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात बदल होत राहिले पण फॅशनची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती १८५८ मध्ये, फ्रेडरिक वर्थ कडून पॅरिस येथे. बाकीचे द्या हो सोडून , हे फॅशनचं वेड परदेशातून आलंय म्हणणाऱ्यांसाठी जरा भारताच्याच इतिहासातून फेरफटका मारून येऊ . कपडे न घालणारे पूर्वज ते विशिष्ट पेहराव केलेला सिंध प्रांत थाटातला (Indus Valley Civilization) राजाचा पुतळा असो किंवा इ. स. पूर्व ३०० मध्ये याक्षिणीने घातलेले धोतीसम ( साडी नव्हे ) वस्त्र असो वा कालांतराने अजिंठा वेरूळच्या लेण्यात आढळून येणारे वस्त्राचे विविध प्रकार असो , सगळीकडे पदोपदी फॅशन दिसून येते . अगदीच अलीकडे म्हणायचे तर जर्दोसी काम , लग्नात घातला जाणारा घागरा , भरतकाम हे सगळे कला दाखवण्यासाठी केलेले फॅशनचेच प्रकार !

आता तुम्ही म्हणाल , अरेच्चा , नक्की काय म्हणायचंय ? वादविवाद स्पर्धा सोडून इतिहास शिकवायला बसल्यात की काय डॉक्टर ? थांबा , थांबा , तसं मुळीच नाहीये . \"गरज ही शोधाची जननी आहे \" आणि \" माणूस हा विकसनशील प्राणी आहे \" ह्या दोन उक्तीतूनच फॅशन ही सोयीसाठी उत्क्रांत होत गेली हे स्पष्ट होते . जेव्हा जेव्हा जगभरात राजकीय , आर्थिक घडामोडी घडल्या तेव्हा तेव्हा फॅशनचे वारे जोरात वाहिले आहेत . तर , जसजसे शास्त्र प्रगत होत गेले , तसतसे फॅशनमध्ये बदल पटापट आणि प्रगल्भ होऊ लागले . फॅशन ही नुसती कपड्यांपुरता मर्यादित नसून पादत्राणे , वस्तू , दागिने, केशरचना अशा बऱ्याच गोष्टींना लागू पडते . अनवाणी फिरणारा पूर्ण भारत चपलेचा शोध लागला तेव्हा आधी चप्पल वापरणाऱ्याला हसत होता पण जसजसे चपलेचे महत्व किंवा फायदे समजू लागले तसे चप्पल वापरणाऱ्यांची संख्या वाढून आता चप्पल न घालणाऱ्यावर आपण हसायला लागलो . थोडक्यात काय तर फॅशन हा सोयीला दिलेला पर्यायी शब्द आहे आणि म्हणूनच त्यात दिवसेंदिवस शास्त्र , विचार , प्रयत्न व सौंदर्य ओतलं जातं . आता चपलेचे उदाहरण पुढे न्यायचे म्हंटले तर वाटत असेल काही लोकांना दिखावा चपलेतून पण जर फॅशनेबल दिसणारी चप्पल कुणाला सपाट पाऊल असेल तर एका बाजूने उंचवटा देणारी किंवा पोलिओ असणाऱ्या व्यक्तीला खास माप देऊन बनवून घेतलेली , ऍक्युप्रेशरचे बिंदू ओळखून तिथे दाब देणारी किंवा अगदी बुटक्या मुलीला आपण उंच दिसतोय हा आनंद देणारी असेल तर फॅशनेबल चप्पल सोय नाही म्हणायचं तर काय ?

आठवतं , साधारण १९९८-२००० च्या दरम्यान लाखोंत एखाद्याकडे मोबाईल होता आणि काय गरज , उगाच दिखाव्यासाठी फॅशन म्हणून घेण्याची असं बहुतेक मध्यमवर्गीय बाबांचं म्हणणं होतं पण मोबाईल हे संपर्काचं उत्तम साधन आहे ही सोय लक्षात येताच तो दृष्टिकोन बदलला . साधे फोन जाऊन अँड्रॉइड फोनची फॅशन आली आणि ही फॅशन त्यात असणाऱ्या अपरिमित सोयीमुळे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली . मोबाईलचे छान छान कव्हर ही सुद्धा म्हंटलं तर एक फॅशन पण नीट अवलोकन केलं तर कार्ड्स , पैसे ठेवण्याची , मोबाइल सुरक्षित ठेवण्याची सोय नाही का ? गरजेनुसार आणि काळानुसार उत्क्रांत झालेली फॅशन आज आपलं जीवन बनली आहे .

अगदी तसंच कपड्यांचं ! नऊवारी ते सहावारी ते पंजाबी ड्रेस ते जीन्स ते शॉर्टस हा प्रवास का शक्य झाला ? कुणीतरी फॅशन करायची हिम्मत केली आणि त्यातली सोय दिसली म्हणूनच ना ? कल्पना करा , साहसी गेम्स खेळण्यासाठी साडी घालून बायका उभ्या आहेत , असतीलही पण कम्फर्टेबल असतील ? पुरुषही धोती , लुंगी , झब्बा कुर्ता , जीन्स , शर्ट - पॅन्ट ते बरमुडा अशा अनेक फॅशन स्थित्यंतरातून का गेले ? अर्थातच सोयीमुळे ! विशिष्ट भागात त्या वातावरणाला पूरक कपडे हा ही एक फॅशनचा आणि नंतर सोयीमुळे रोजच्या जीवनाचा बनलेला भाग ! छोटे केस ही सुद्धा वेळ वाचवण्याच्या सोयीसाठी केलेली फॅशन अगदीच उपयोगी ठरली . दागिन्यांंची फॅशन तर फारच सोयीची , सौंदर्य आणि बचत ह्याचा मिलाफ जणू.....

फॅशन ही फक्त आधुनिकतेकडेच झुकणारी असते असंही नाही . कालानुरूप लोप पावलेली नऊवारी किंवा महफिलीत गायली जाणारी जुनी गाणी किंवा घर , हॉटेलला दिलं जाणारं पुराणकालीन इंटेरिअर ही फॅशन आजच्या काळात आपल्या संस्कृतीची , विविध कलांची नव्याने आपल्याला ओळख करून देण्याचेही काम करते . नुकतेच NIFT संस्थेने फॅशन आणि विज्ञानाची सांगड घालत आपल्या जवनांनाही फॅशनेबल करण्यासाठी camouflage ( छ्दम वादीद्वारे रंग बदलणारे ) नवीन सैनिक वेष design केले आहेत , देशप्रेम - फॅशन - शास्त्र , काय तो त्रिवेणी संगम ! सगळं फॅशनच्या सोयीमुळे ओकेमध्ये हाये....

आता तरी कळलंच असेल तुम्हाला की फॅशन ही सोय असते . पण नावापुरती सोय नाही बरं का.... ही सोय त्या व्यक्तीला आत्मविश्वास देते आणि इतरांना धाडस करण्याची प्रेरणा देते . मी सुंदर नाही हा न्यूनगंड घालवण्यासाठी फॅशनची मदत घेतली तर ती ही एक सोय नाही का ? त्याच त्याच वाटणाऱ्या बोरिंग आयुष्यात फॅशन बदल आणते आणि जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन जागवते . फॅशन आपलं जगणं सुखद आणि आल्हाददायक करते . आपली कला व कल्पनाशक्ती लोकांंपर्यंत पोहोचवण्याचं हे एक प्रभावी साधन आहे. हे नुसतं वैयक्तीक जीवनशैलीपुरतं मर्यादित नसून आज देशाच्या आर्थिक उलाढालीत हातभार लावणारी फॅशन इंडस्ट्री आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे . अनेकांना रोजगार देणारी आणि जगाच्या पाठीवर आपल्या भारतीय कला घराघरात पोहचवणारी फॅशन ही एक सोय आहे .

फॅशन म्हणजे स्वतःला किंवा ग्रुपला आणि हळूहळू पूर्ण समाजाला प्रगतीपथावर नेणारी एक अपरिहार्य प्रक्रिया आहे .तुम्ही मान्य करा अथवा नका करू , बदल हाच प्रकृतीचा नियम आहे आणि म्हणूनच सोयीच्या पायवाटेवरून प्रगतीच्या महामार्गावर नेणारे फॅशन हे माणसाचे पॅशन आहे !

©️®️ डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर