फसवणूक..(भाग २)

सत्य कितीही लपवले तरी एक ना एक दिवस ते समोर येतेच.


अनिकेत थोडा उजवा जरी असला रेश्माच्या तुलनेत तरी फक्त पैशासाठी नाही त्याने पसंत केले तिला. तर रेश्माच्या साधेपणावर तो फिदा झाला. हे त्याने अनेकदा सांगूनही तिला मात्र ते पटतच नव्हते.

तसे पाहीले तर लव्ह मॅरेज मध्ये हे असे होते अनेकदा. पण अरेंज मध्ये मात्र असे क्वचितच घडते. असे रेश्माला वारंवार वाटायचे.

पण लग्नाच्या पहिल्याच रात्री रेश्माचा हा प्रश्न अनिकेतसाठी सरप्राइज होता. काय उत्तर द्यावे? क्षणभर त्यालाही समजेना.

"तुम्हाला नक्की मी आवडले की, घरच्यांच्या आग्रहास्तव तुम्ही तयार झालात या लग्नाला?"

पहिल्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोवर रेश्माचा दुसरा प्रश्न तयारच होता.

"मी अजिबात तुम्हाला शोभत नाही; हे मलाही माहितीये. तुमच्या होकाराची तर मला मुळीच अपेक्षा नव्हती. पण तुमच्या या भारदस्त व्यक्तिमत्त्वापुढे मीही स्वार्थी झाले काही क्षण आणि मागचा पुढचा विचार न करता माझा होकार देवून टाकला.
पण आज लोकांच्या नजरा जणू मला राहून राहून हा एकच प्रश्न विचारत होत्या, तर काही वेळा घरातील लोकांची कुजबूज कानी पडत  होती."

फक्त एकटी रेश्माच बोलत होती. अनिकेत मात्र तिच्याकडे एकटक बघत होता.

पण का कोण जाणे रेश्माला मात्र एकच वाटत होते, की "अनिकेतच्या होकार देण्यामागे नक्कीच काहीतरी मोठे कारण असावे. कारण कोणाला सुंदर बायको नको असते. आणि अनिकेतला तर ती अगदी सहजच भेटलीही असती. मग यांनी मला का पसंत केले? तेही दुसऱ्याच दिवशी लगेच होकारही आला यांचा." रेश्माचे विचारचक्र थांबायचे काही नावच घेईना.

"जे प्रश्न खरं तर मला लग्नाआधी पडायला हवे होते पण ते आता का पडत आहेत?" हे रेश्मालाही समजेना.

"अगं तू समजतेस तसे काही नाही ग रेश्मा. कुणी सौंदर्याला महत्त्व देते, कुणी पैशाला तर कुणी स्वभावाला. आणि तसेही कोण म्हणतं तू सुंदर नाहीस. तुझ्या मनाचे सौंदर्य कोणाला दिसो अगर न दिसो पण मला मात्र ते दिसले.
पण आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसू नकोस बरं. लग्न झालं ग आता आपलं. \"मी तुम्हाला शोभत नाही\",असं बोलणं बंद कर आधी. आपला जोडा लाखात एक आहे बघ."

*****

आज लग्नानंतर तब्बल वीस वर्षांनंतर रेश्मा भूतकाळात हरवली होती. एक एक गोष्ट आठवून तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा थांबायचे काही नावच घेईनात.

अनिकेतचे वागणे तिच्या जिव्हारी लागले होते.

रेश्माने तर स्वप्नातही विचार केला नव्हता की असे काही तिच्या आयुष्यात घडेल.

विचार करता करता तिला पहिल्या रात्रीचा तो अनिकेत आठवला. मनाचे सौंदर्य आवडणाऱ्या व्यक्तीला एखाद्याच्या भावनांशी खेळताना काहीच कसे वाटले नाही. हे गेले वीस वर्षापासून रेश्माला पडलेले कोडे आज खऱ्या अर्थाने उलगडले होते.

रेश्मा सी ए होती तर अनिकेत एका प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करत होता. घरची परिस्थिती नाही पेक्षा बरी होती. पण आता रेश्मा मुळे ती उत्तम झाली होती. शहरात दोन मोठे फ्लॅट, गाडी, गावी घर अशा बऱ्याच गोष्टींची त्यात भर पडली होती.

सुखाचा संसार सुरू होता रेश्मा आणि अनिकेतचा. दोन गोंडस पऱ्या देखील उमलल्या होत्या त्यांच्या संसार वेलीवर. रेश्माचे सासू सासरे, मोठे दिर गावीच होते. मजुरांकडून उत्तमप्रकारे ते शेती करून घेत होते. सुट्टीच्या दिवशी रेश्मा मुलींना घेवून आवर्जून गावी जायची. अनिकेत मात्र कामाचा बहाणा करून दरवेळी गावी जाण्याचे टाळायचा.

खरंच असेल कामाचा ताण म्हणून रेश्मादेखील दुर्लक्ष करत राहिली.

क्रमशः

अनिकेतच्या वागण्यामागे काय कारण असेल? जाणून घ्या पुढील भागात.

©® कविता वायकर

🎭 Series Post

View all