कुटुंब

Family

कुटुंब

अभयाने महत्प्रयासाने डोळे उघडते. तिच्या लक्षात आलं,आपण इस्पितळातल्या खोलीत आहोत. तिच्या हाताला ग्लुकोज लावण्यासाठी सुया टोचल्या होत्या. तो हात तिला बोजड जाणवला. खरंतर  साधं इंजेक्शन घ्यायचं म्हंटलं तरी डॉक्टरांच्या नाकीनऊ आणायची ती. तो हात तिला बोजड जाणवला. त्यातून उठलेली एक सौम्य कळ तिच्या मेंदूत शिरली.  

अभयाने उजवीकडे पाहिले. तो कुशल होता.. तिचा कुशल. अभयाने त्याचे पाणावलेले डोळे पाहिले. किती आनंद झालेला त्याला अभया शुद्धीवर आलेली पाहून.. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. फक्त अश्रुंचा पूर वहात होता दोन्ही डोळ्यांतून. अभयाने हलकेच त्याचा हात दाबला. तिचं मन घड्याळाच्या विरुद्ध दिशेने धावू लागलं.

अभया एका सुखवस्तू घरातली मुलगी. वडील मोठे उद्योजक, आई ग्रुहिणी. अभया त्यांची एकुलती एक मुलगी. सारी सुखं तिच्या पायाशी लोळण घालत होती. एखाद्या राजकुमारीसारखा थाट होता तिचा. घरात कामाला नोकरचाकर. तिचं बालपण इम्पोरटेड बाहुल्यांनी सजलेलं. शाळाही कॉन्व्हेंट. साहजिकच एक माज होता तिच्या वागणुकीमधे.. माज श्रीमंतीचा.

अभया कॉलेजमध्ये चार चाकी गाडीतून जायची. अतिशय आधुनिक पेहराव..मिनीस्कर्ट..फेशनेबल टॉप्स,मिडीज. मुलंच काय मुलीसुद्धा अगदी टक लावून  पहात रहायच्या तिच्याकडे.  तिच्या आजुबाजूला बरीचं पोरं लाळ घोटत असायची. तिला त्यांनी तिची केलेली तारीफ आवडायची. अपवाद होता फक्त कुशलचा. कुशल गरीब घरातून नुकताच पुण्यात शिकायला म्हणून आला होता. दोन जोडीच्यावर कपडे नव्हते त्याच्याकडे. सरकारी वसतिगृहात रहायचा. त्याची गरीबी त्याच्या चेहऱ्यावर दिसायची. आईवडील शेतात मोलमजुरी करायचे. हा थोरला होता. याच्या पाठीवर दोन बहिणी होत्या. खूप शिकून घरातलं दारिद्रय घालवायचा त्याने निश्चय केला होता. 

अभयाच्या आजुबाजूस सगळे मित्रमैत्रिणी असतानाही तिचं लक्ष मात्र कुशलकडे जायचं.  तिला वाटायचं,इतर मुलांसारखं कुशलनेही तिच्याशी बोलावं,हसावं.

रोकडे सरांनी मुलांना एक आनंदाची बातमी दिली,पावसाळी सहलीची. सगळी मुलं आनंदाने टाळ्मा वाजवू लागली. कुशल मात्र पुस्तकात बघत गप्प बसला होता. कुशलकडे वर्गणीचे पैसे नव्हते ही गोष्ट रोकडे सरांच्या लक्षात आली. त्यांनी स्वतः कुशलचे पैसे भरले. कुशल नकैच म्हणत होता पण सर म्हणाले," तू सावकाश परत कर माझे पैसे." कुशल इतर मुलामुलींत मिसळत नसे. यानिमित्ताने तरी त्याचा बुजरेपणा कमी होईल म्हणून सरांनी त्याला सहलीला घेऊन जायचं ठरवलं होतं. पावसाळी कुंद वातावरण,हिरवागार निसर्ग, डोंगररांगा,त्यातून वहाणारे फेसाळते धबधबे..खूप छान वातावरण होतं.

 प्रत्येकजण सेल्फी काढण्याच्या मुडमधे होता. अभया व तिची दोस्तमंडळी धबधब्याच्या टोकावर जाऊन बसली व एका सुरात गाणी गाऊ लागली. कुशल काही मित्रांसोबत खडकांवर बसला होता. त्याच्या डोळ्यासमोर त्याची शेतात तरवा काढणारी,लावणी लावणारी आई व बहिणी येत होत्या. खरंतर या हंगामात घराकडे पुरुष माणूस असणं गरजेचं असायचं. मजुरांची मजुरी,न्याहारी,जेवण त्यांना परवडणारं नव्हतं. काय करत असेल आई? तिची कंबर दुखत कसेल का? शाकारायला न जमलेलं नळ्यांच घर गळून घरात ओल आली असेल. शेणाच्या जमिनीवर त्या गारठ्यात आई,बहिणी कशा झोपत असतील? असे अनेक विचार त्याच्या मनात फेर धरून नाचत होते. 

जोरजोरात आरडाओरडा झाला तशी कुशलची तंद्री उडाली. एक मुलगी शेवाळावरुन घसरून पाण्याच्या झोतासोबत वाहून जात होती. मागचापुढचा काहीही विचार न करता कुशलने त्या प्रवाहात उडी घेतली. भोवऱ्यामुळे ती मुलगी आत खेचली जाण्याची शक्यता जास्त होती. इतर कोणीही तिला वाचवायला धजावले नाही कारण दर पावसाळ्यात त्याठिकाणी एकदोन बळी जातात हे ग्रामस्थांनी सांगितल्याने त्यांची भितीने गाळण उडाली होती. सगळ्यांनी दोघांचीही आशा सोडून दिली होती पण थोड्याच वेळात त्यांना त्या मुलीला खांद्यावर वाहून आणणारा कुशल दिसला तसं साऱ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. 

ती मुलगी दुसरीतिसरी कोणी नव्हती तर अभया होती. कुशलने तिला हिरवळीवर ठेवून तिच्या पोटावर दाब देऊन नाकातोंडात शिरलेले पाणी काढले. काही मिनिटांत अभया शुद्धीवर आली.  रोकडे सरांनी कुशलचं कौतुक केलं. त्याच्या प्रसंगावधानामुळे फार मोठा अनर्थ टळला होता.  अभयाला कुशलचे आभार मानायचे होते पण त्याआधीच तो तिथून निघून गेला व तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला गराडा घातला.

 अभया सहीसलामत आहे याची खात्री झाल्यावर कुशल कपडे बदलून जेवायला गेला होता. रात्री हॉटेलच्या बाहेरच्या लॉनमधे तो एकटाच येरझारा घालत होता. असा एकांत आवडायचा त्याला,जो पुण्यातल्या वसतीग्रुहात  त्याला कित्येक दिवस गवसला नव्हता. 

सगळी मुलं ड्रॉईंग हॉलमधे पसरलेली. एकमेकांची थट्टामस्करी, फिशपॉड,गाण्याच्या भेंड्या चालू होत्या. अभयाची नजर मात्र कुशलला शोधत होती. दुपारच्या घटनेमुळे रोकडे सर प्रचंड घाबरले होते. त्यांच्या अंगात ताप भरला तसे ते रुममधे जाऊन झोपले. साहजिकच होते ते,अभयाला काय झालं असतं तर कॉलेज प्रशासनाने,तिच्या पालकांनी त्यांनाच जाब विचारला असता. नोकरीही धोक्यात आली असती. 

कुशल दिसत नाहीसे पाहून अभया बाहेर आली. गर्द निळ्या आकाशाकडे टक लावून पहात असलेला कुशल तिला दिसला. अभया त्याच्या बाजूला जाऊन बसली तसं त्याने अंग आकसून घेतलं. अभयाने नेटाने त्याचा हात हातात घेतला व त्याला थँक्स म्हणाली. कुशलचं अंग थरथरत होतं. बहिणींव्यतिरिक्त एखादी षोडशा त्याच्यासोबत बसायची त्याच्या जीवनातली ही पहिलीच वेळ होती. 

आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. नुकताच पाऊस पडून गेल्याने वातावरणात मातीचा ओलसर गंध दरवळत होता. अभयाने कुशलच्या हातावर तिचे गुलाबी ओठ टेकवले व म्हणाली,"कुशल,मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू मला वाचवलंस म्हणून नव्हे तर तुझं वागणंबोलणं,तुझ्या स्वभावातला नम्रपणा मला फार भावतो."

कुशलने हलकेच तिच्या हातातला आपला हात काढून घेतला व म्हणाला "मिस अभया, मी फार गरीब माणूस आहे. तुमची गाडी,तुमचं एकंदर रहाणीमान पहाता मी तुमचा ड्रायव्हर होण्याच्याही लायकीचा नाही. प्रेम वगैरे सगळे मोठ्या लोकांचे धंदे असतात. गरीबाचं श्रीमंताच्या मुलीशी लग्न होणं हे फक्त हिंदी,मराठी सिनेमांतच शोभून दिसतं. गरिबी भोगलेय मी,माझ्या कुटुंबाने. कित्येकदा फक्त पाणी पिऊन उपाशीपोटी झोपलेय माझी आई. दोन बहिणी आहेत पाठीमागच्या. त्यांच शिक्षण,लग्नकार्य करायची जबाबदारी आहे माझ्यावर. बाप काय असून नसल्यासारखा. सदा दारु पिऊन तर्र पडलेला. घरी आला की टोपात काय शिजवलं असेल ते एकटा बसून हादडणारा. मागे आपली बायकापोरं उपाशी आहेत  याचीही त्याला जाणीव नसते. सतरा ठिगळं लावलेलं लुगडं माझी माय नेसते.

 गावातल्या काही भल्या माणसांनी माझ्या शिक्षणाचा खर्च उचललाय म्हणून इथे शहरात येऊ शकलो मी. त्यांच्या खाल्ल्या मीठाला जागणार आहे मी. आईबाबांची स्वप्नं पुरी करणार आहे. तुम्ही प्लीज माझा विचार सोडून द्या व काय अधिकउणं बोललो असेन तर माफ करा."

इतक्यात वॉचमन तिथे आला व त्यांना वरती झोपायला जा म्हणाला. अभया मुलींच्या रुमकडे वळली. आज पहिल्यांदाच तिला कोणीतरी नकार दिला होता. आयुष्यात पहिल्यांदाच तिचं कोणावर तरी प्रेम जडलं होतं. कुशलवर तिचा जीव जडला होता. जीव जडण्यासारखं काय होतं त्याच्याकडे.. किरकोळ बांधा,सावळा वर्ण..तरी त्यात अशी काही जादू होती जिने अभया मोहित झाली होती. बाकीच्या मैत्रिणी एक वाजता झोपल्या पण अभया टक्क डोळे उघडे ठेवून सिलिंग फेनकडे बघत राहिली होती. तिच्या डोळ्यांत आसवं दाटली होती. तिला वाटत होतं,धावत जावं त्याच्या खोलीत व त्याला सांगाव़,"कुशल,मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मला फक्त तू हवा आहेस.कुशल."

अभयाने नंतरही कॉलेजमध्ये त्याचं मन वळविण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. कुशल ऐकायला तयारच नव्हता. कॉलेजच्या गेदरिंगच्या वेळीही तिने कुशलला उद्देशून गाणे गायले होते..
हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते
मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना

हळूहळू का होईना,कुशलच्याही मनात अभयाबद्दल हळवा कोपरा तयार होत होता पण त्या दोघांतल्या सामाजिक दरीचा विचार मनात आला की तो परत भानावर येत होता. अभया आताशी अबोल झाली होती. फार क्रुश होत चालली होती. तिच्या पप्पांनी तिला जवळ घेऊन तिच्या अस्वस्थतेचं कारण विचारलं तेव्हा अभयाने त्यांना कुशलविषयी सगळं सांगून टाकलं. अभयाचे पप्पा तसे मोकळ्या स्वभावाचे होते. त्यांनी अभयाला कॉलेज संपेपर्यंत धीर धरायला सांगितले. 

कॉलेजची फायनल इयरची परीक्षा झाली. कुशल आपल्या गावी जायला निघाला तसं अभयाच्या पप्पांनी त्याला बोलावून घेतले. त्यांनी कुशलला त्यांच्या कंपनीत नोकरीची ऑफर दिली. कुशल नाही म्हणू शकला नाही कारण त्याला पैशाची गरज होती. आई म्हातारी होत चालली होती. बहिणी मोठ्या होत होत्या. त्यांची शिक्षणं,लग्नकार्य करायची होती. 

कुशल एमके कंपनीत जॉइन झाला. साईडबायसाईड त्याने त्याचे पुढील शिक्षणही चालू ठेवले.  आत्ता त्याने तिथेच जवळपास घर घेतले व दोघी बहिणींना,आईवडिलांना रहायला आणले. काही काळ जाताच अभयाच्या पप्पांनी त्याची पदोन्नती केली व त्याला अभयाशी लग्न करण्याची विनंती केली. कुशल अभयाच्या वडिलांच्या उपकाराखाली दबला होता शिवाय अभयाही त्याला आवडत होतीच. त्याने आईची संमती घेऊन लग्नाला होकार दिला.

अभयाचे व कुशलचे लग्न झाले व अभया सासरी नांदायला आली. वन बीएचकेचं घर ते. सासूसासरे,नणंदा हॉलमध्ये झोपत. अभया व कुशल किचनमध्ये झोपत होते. चार दिवस प्रेमाच्या बहरात गेले पण नंतर अभयाला त्या टिचभर खोलीचा त्रास होऊ लागला. पहाटे चार वाजता पाणी येई. त्यासाठी नाही म्हंटलं तरी तिला उठावच लागे. एका तासात पाणी गायब. भरलेल्या पाण्याने सगळे विधी करणे तिच्या जीवावर येई. लाडाकोडात वाढलेली ती..माहेरी फळफळावळ,केक,बिस्कीटांचा स्टॉक तर सासरी दोन वेळचं जेवण पुरेसं मिळण्याची मारामार.

 कुशलला पगार बऱ्यापैकी होता पण वडिलांनी दारुच्या नादात बरंच कर्ज करुन ठेवलेलं. शिवाय नवीनच घर घेतल्याने त्याचे हफ्ते..यात फारच कमी पैसे घरात येत होते. तो सगळे हफ्ते भागवून,अभयाला थोडे पैसे देऊन उरलेला पगार त्याच्या आईकडे देत असे,  ते अभयाला पटत नव्हते. तिला मनासारखं मार्केटिंग, शॉपिंग करता येत नव्हतं. थोड्याच दिवसांत ती या साऱ्याला कंटाळली. 

अभयाने कुशलकडे वेगळा संसार थाटुया अशी मागणी केली मात्र,कुशल तिच्यावर जाम चिडला. तुला मी साऱ्या गोष्टींची आधीच कल्पना दिलेली व मी माझ्या कुटुंबाला सोडून वेगळा नाही राहू शकत असं त्याने तिला सांगितलं तेव्हा अभयाही जाम चिडली. तिच्या डोळ्यांत आसवं दाटली. तुझ्या लेखी माझी काहीच किंमत नाही का असं तिनं त्याला विचारलं तसं तो कूस बदलून झोपी गेला. हे असं त्यांच भांडण आता दररात्री होऊ लागलं. रात्रीच्या श्रुंगाराची जागा चिडचिड,वाद,कुजकट बोलणं यांनी घेतली. 

घरातल्यांशीही अभया तुटकपणे वागू लागली. स्वत:पुरतं काहीतरी शिजवून खाणं,स्वतःचेच तेवढे कपडे धुणं असं तिनं आपलच वेगळं असं विश्व थाटलं. कुशलने तिच्या वडिलांना याबाबत सांगितले. वडील तिला माहेरी घेऊन आले. माहेरी आल्यावर अभया दोन दिवसांतच छान खुलली. आपलं लग्न झालंय हेच ती विसरू पहात होती. आईने सासरची चोकशी केली तर वरवरची उत्तरं देत होती. पप्पांना मात्र तिने नवीन घराच्या इच्छेबाबत सांगितलं.

 पप्पांनी जावयाचा पगार वाढवला व त्याला नवीन घर घेण्याचा सल्ला दिला. नवीन घर घेईपर्यंत माहेरीच रहायचं असं अभयाने ठरवलं. कुशल सुट्टीला एकदोन दिवस येऊन तिच्यासोबत रहात होता. नवीनच बांधलेल्या एका इमारतीत ब्लॉक बुक केला. अभया कुशलसोबत जाऊन ब्लॉक बघून आली. ग्रुहपूजा करुन सगळी त्या घरात रहायला गेली. बहिणी दोघी शिकत होत्या. व्यसनमुक्तीकेंद्रात ठेवल्याने कुशलच्या वडिलांनी दारु सोडली होती. कुशलची आई घरातली बरीचशी कामं करत होती. कुशलच्या बहिणी वरवरची कामे,बाजारहाट करीत. अभयाही थोडंफार घरकाम करत होती पण तिचं एक स्वप्न होतं ते म्हणजे राजाराणीचा संसार..त्यात तिला नणंदा,सासूसासरे नको होते पण कुशलपुढे ती हतबल होती.

सासूसासरे मुलींना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेले तेव्हा अभया खूप खूष झाली. त्या एकदिड महिन्यात ती कुशलच्या खूप जवळ आली. तिने कुशलला भरभरून प्रणयसुख दिलं. कुशलच्याही चेहऱ्यावर तेज दिसू लागले ते पाहून अभयाचे पप्पा खूष झाले. आपली मुलगी सासरी सुखाने नांदतेय यापेक्षा आणि काय हवं असतं एका बापाला! मुलीचा बाप मग तो श्रीमंत असो वा गरीब आतलं बापाचं काळीज एकच असतं. अभयाचे पप्पा कुशलला सासरवाडीतच रहा म्हणून सांगू शकले असते पण त्यांना कुशलचा स्वाभिमान डिवचायचा नव्हता. अभयाचा अल्लडपणा त्यांना माहित होता व वयोपरत्वे तिला समज येईल अशी ते आशा धरून होते. 

सासूसासऱ्यांच परत येतोय हे पत्र आलं आणि अभयाचं वागणं पुन्हा बदललं. ती पुन्हा काहीतरी खुसपटं काढून कुशलशी भांडू लागली. कुशल आईवडिलांना गावीच रहा असं सांगू शकत नव्हता. त्याला अभयाही हवी होती. शेवटी एके दिवशी अभया व कुशलमध्ये खडाजंगी झाली. कुशल डबा न घेता ऑफिसला गेला. अभया माहेरी गेली. तिथे मम्मीपप्पांना तिचे विचार पटले नाहीत. त्यांनीही कुशलचीच बाजू घेतली तशी न जेवताच ती घरी जाते असं सांगून बाहेर पडली.

 नुकताच पाऊस पडू लागला होता. ती वाट फुटेल तिथे चालत होती. तिने मोबाईल स्वीच ऑफ केला होता. चालता चालता एका वेगाने येणाऱ्या गाडीखाली ती आली. तिचे दोन्ही पाय हलत नव्हते. डोक्याला जबर मार लागला होता. तिच्या पाकिटातल्या ओळखपत्रावरून व तिच्या मोबाईलमधून पोलिसांनी तिच्या मम्मीपप्पांशी व कुशलशी संपर्क साधला. रक्त बरंच वाहून गेलं होतं. ताबडतोब रक्त लावण्यात आलं. अभयाच्या मणक्याला जबर मार बसला होता. पायाला प्लास्टर घातलं होतं. कुशल तिच्यासोबत दवाखान्यातच बसून होता. अभयाच्या मम्मीपप्पांनी समजावूनही तो घरी गेला नव्हता. तो स्वतःला अपराधी मानत होता. 

अभया बरी होऊन घरी आली तेंव्हा सासूसासरे,नणंदा आलेले होते. दोन्ही नणंदा व सासूही तिची खूप काळजी घेत होत्या. तिला आवडेल ते खाऊ घालीत होत्या. कुशलही तिच्याशी खूप गोड वागत होता. एका महिन्यानंतर पायाचं प्लास्टर काढलं गेलं. त्यानंतरही तीनेक महिने सासूने तिला फार जपलं. अभयानेही फिजिओथेरपिस्टकडून कंबरेचे व्यायाम शिकून घेतले. हळूहळू तिच्यात शारिरीक व मानसिक दोन्ही सुधारणा होऊ लागल्या. तिला तिची चूक उमगली. एकत्र कुटुंबाची गरज कळून चुकली. सासूबद्दल तिच्या मनात हळवा कोपरा निर्माण झाला.

 गणपतीसाठी जेव्हा सासूसासरे गावी जायला निघाले तेव्हा अभया स्वतः बोलली,विसर्जनानंतर लगेच या. तुम्ही नसलतात तर मला इथे करमणार नाही.

सासूनेही तिला जवळ घेतलं व म्हणाली,"येईन हो लवकर. तू इथे असताना माझा जीव तरी तिथे कसा लागणार म्हणा!"

------सौ.गीता गजानन गरुड.