फॅमिली प्रायव्हेट लिमिटेड-9

मामा..काका..कामाला लागा !

रात्रभर मितांश विचार करत होता, माधव त्याच्या सोबत होता. मितांशने मनाशी काहीतरी पक्कं केलं आणि तो उशिराने झोपला.

दुसऱ्या दिवशी मितांश आवरून खाली आला तोवर सर्व पाहुणे तयार होऊन बसलेले. मितांश आता काय निर्णय देतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.

"तर मी ठरवलं आहे की तुम्हाला एक संधी द्यायची.."

सर्वजण एकदम खुश झाले, खरं तर आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या टाकून सर्वजण एक झाले होते. वेळ आली तर नातलग पाठीशी कसे उभे राहू शकतात हेच त्यांना दाखवून द्यायचं होतं.

"मी तुम्हाला आपल्या कंपनी चं काम सांगतो.. कश्या प्रकारे पूर्ण प्रोसेस असते हे सांगतो. प्रत्येकाला एक डिपार्टमेंट दिलं जाईल. त्याने आपापलं काम करावं..आपल्याकडे वेळ कमी आहे, महिन्याभरात आपल्याला चांगला जम बसवावा लागेल तरच काहीतरी होऊ शकेल. मी 2 दिवस सर्वांना ट्रेनिंग देईन आणि तोवर एखादा इन्व्हेस्टर, म्हणजेच गुंतवणूकदार बघतो. कारण पूर्ण सेटअप करायचा म्हणजे पैसे लागतील.."

"अरे पण आपण आपल्या पैशातून सुद्धा सगळं करू शकतो, माझ्याकडे आहे तेवढी सेविंग.." मितांशचे वडील म्हणाले..

"नाही बाबा,मला ही रिस्क घ्यायची आहे, म्हणजे शून्यातून मला सगळं उभं करायचं आहे.."

ठरलं तर मग, आजपासून तुमची ट्रेनिंग सुरू. वरच्या दोन खोल्या रिकाम्या आहेत, तिथे एक बोर्ड लावून मी तुम्हाला सगळं समजवतो. त्यानंतर तुम्हाला मागचे काही प्रोडक्ट दाखवतो त्यावरून तुम्ही स्वतः अभ्यास करा. त्यावेळात मी काही इन्व्हेस्टर्सला भेटून येतो. मामा, तुम्ही माझ्यासोबत चला.

ठरल्याप्रमाणे नाष्टा वगैरे आटोपून सर्वजण वरच्या खोलीत गेले. सर्वजण मितांशची वाट बघत होते. मितांश खोलीकडे गेला, खोलीला फुगे लावलेले, बाजूला रांगोळी, बोर्डच्या बाजूला दिवा, समई आणि अगरबत्तीचा सुगंध. आत्या हातात पूजेचे ताट घेऊन उभी, तिने मितांशला ओवाळले..मितांशने डोक्यावर हात मारून घेतला, या आत्या पण ना...कुठल्याही गोष्टीचा अति उत्साह असतो यांना. असो, यामुळे वातावरणनिर्मिती झाली हेही नसे थोडके.

मितांशने समोर सर्वांना बसवलं,

"आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका.."

बाजूला माम्यांची कुजबुज सुरू होती, लहाण्या मामीने दोघींना फटकारले तेव्हा त्या शांत झाल्या..

"तर..आपल्याला एक e-learning सॉफ्टवेअर बनवायचे आहे. अमेरिकेला असतांना आम्ही कॉलेज आणि कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर बनवत होतो, पण आपण इथे शाळेतील मुलांसाठी हे बनवणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला इयत्ता पहिली ते पाचवी चा अभ्यासक्रम काढायचा आहे. मराठी मिडीयम पासून सुरवात करूया. त्यांचा अभ्यासक्रम काढण्यासाठी आपल्याला त्यांची पुस्तकं लागतील. मग त्या अभ्यासक्रमाला मनोरंजन पद्धतीने कसं सांगता येईल हे बघायचं. ते एका कागदावर लिहून काढायचं, उदाहरणार्थ, जलचक्र अशी एक संज्ञा आहे. सूर्याच्या प्रकाशाने पाण्याची वाफ होते, मग ती वाफ वर जाते, त्याचे ढग बनतात,त्याला हवा लागते आणि पाऊस पडतो. या गोष्टीला गेम अथवा गोष्टींच्या माध्यमातून दाखवायचं आहे. तुम्ही फक्त कन्सेप्ट तयार ठेवायची, मग आपला डेव्हलपर ते बनवेल. त्यानंतर सॉफ्टवेअर बनवून झालं की ते एकदा चेक होईल, मग खरं काम पुढे असेल. हे सॉफ्टवेअर शाळांमध्ये, क्लासेसमध्ये विकायचे. आणि असं करत करत एकेक ऑर्डर मिळवायच्या.."

"सोपं आहे की.." मामा म्हणाले,

"हो ना? कळेलच मग.."

आता तुम्ही सर्वजण याबाबत डिस्कशन करा, मामा आणि मी जाऊन येतो इन्व्हेस्टर्स कडे.

मामा आणि मितांश निघतात, मामाला कळत नसतं यातलं काही, तो केवळ सोबत म्हणून जातो..

मितांश मामाला घेऊन काही इन्व्हेस्टर्स ला भेटतो, त्यांना सगळी हिस्टरी सांगतो, पुढचे प्लॅन्स सांगतो.. इन्व्हेस्टर्स मात्र पैसे द्यायला तयार होत नाहीत. मितांशची बंद पडलेली कंपनी आणि इथे नातलगांना सोबत घेऊन सुरू केलेलं काम ऐकून त्यांना हसू येतं. ते म्हणतात,

"व्यवसाय म्हणजे मजाक वाटला का तुम्हाला? नातलग फक्त लग्न समारंभात चांगले दिसतात, सगळीकडे नाही.."

मितांश हताश होतो. मामा विचार करतो आणि मितांशला म्हणतो,

"बेटा मला सांग, हे इन्व्हेस्टर्स म्हणजे नक्की काय करतात?"

"हे आपल्याला गुंतवणूक साठी पैसे देतात."

"म्हणजे कर्ज का?"
"कर्ज नाही, पण कंपनीत त्यांची भागीदारी असते, त्या बदल्यात ते सुरवातीला पैसे देतात आणि नंतर जसजशी कंपनी मोठी होते तसा त्यांचा हिस्सा ते घेत जातात.."

"आणि समजा तोटा झाला तर?"

"तर काही नाही करू शकत , ते रिस्क घेतात तेवढी.."

"अवघड आहे सगळं प्रकरण.."

"जाऊद्या मामा, करू काहीतरी.."

"हे इन्व्हेस्टर्स म्हणजे काही डिग्री लागते का त्यांना?"

मितांश हसतो,

"नाही ओ मामा, ज्याच्याकडे भरपूर पैसा असतो तो गुंतवू शकतो..त्यात एंजल इन्व्हेस्टर्स, सीड इन्व्हेस्टर्स असे प्रकार असतात"

"सीड इन्स्टिव्हर.. इवनेस्तर.. ई..""

"इन्व्हेस्टर्.."

"हा तेच ते..अरे मग आहे की आपल्याकडे.. चल माझ्यासोबत.."

"अहो मामा.."

"काही बोलू नको..तू चल फक्त.."

मामा त्याला गाडीत बसवतात आणि एका गावाकडे नेतात.

"मामा हे कुठे खेडेगावात आणलं आहे मला?"

"तू चल फक्त.."

मितांशला राग येतो, मामा उगाच ओव्हर कँफीडन्स दाखवताय..

मामा एका मोठ्या बंगल्यापाशी गाडी थांबवतात.

आजूबाजूला मोठमोठे शेत, शेतात पिकं डोलत होती. बाहेर गाय, बकऱ्या गोठ्यात आणि तिथे एक माणूस शेण उचलत होता.

"तो बघ... सीड इन्व्हेस्टर्"

मितांश खूप चिडतो, पण तो काही बोलायच्या आत तो माणूस मामाकडे बघून म्हणतो,

"ओ नाना..आज इकडे कसकाय.."

"काम होतं आण्णा.. येऊ का.."

तो माणूस हातपाय धुवून येतो आणि दोघांना आत नेतो.

मितांश हळूच मामाला म्हणतो,

"मामा हे इथे कुठे आणलं मला तुम्ही?"

"तू बघ फक्त.."

तो माणूस मामाची विचारपूस करतो, मग हळूच मामा विषय काढतो.

"एक मदत हवी होती.."

असं म्हणत मामा त्याला झालेलं सगळं कथन करतो. हे ऐकून त्या माणसाची प्रतिक्रिया काय असेल याचं मितांशला दडपण येतं. मितांश अमेरिकेला असतो हे ऐकून तो म्हणाला,

"माझा एक भाचा पण आहे तिकडे, म्हटलं एखादा फ्लॅट घेऊन टाक माझ्या नावाने तिकडे, कधी जाणं झालं तर बरी आपली सोय.."

मितांशला हसू येतं,

"काका तिकडच्या फ्लॅट च्या किमती खूप आहेत, कमीत कमी दीड करोड लागतील.."

"स्वस्त आहेत मग..त्याने पाच करोड चा एक पाहिलेला.. म्हटलं घेऊन टाक.."

मितांश पाणी पीत होता त्याला ठसका लागला..

तो माणूस एक सुस्कारा टाकतो आणि विचारतो,

"तुम्हाला किती पाहिजे?"

"किमान 15-20 लाख.."

तो माणूस आत जातो आणि एका पिशवीत रक्कम घेऊन येतो. मितांशला धक्काच बसतो,

"हे घ्या, 25 लाख आहेत...अजून लागले तर सांगा.."

"तुमचे फार मोठे उपकार झाले आण्णा.. आणि हो, या बदल्यात तुम्हाला कंपनीत भागीदारी मिळेल.."

"नाना, ते काही नको. आपलं पोरगं आहे, जीव काढतंय, आपल्या लोकांना सोबत घेऊन काम करतंय.. खूप अभिमान वाटला बघा मला...हे जसे जेव्हा परत करायचे तेव्हा कर सावकाश.. काही घाई नाही.."

"मी पेपर बनवून आणतो.."

मितांश म्हणाला तसा मामा आणि अण्णा हसायला लागले,

"अरे बाबा आपल्या लोकांत पेपर नाही शब्द महत्वाचा"

ते दोघे गाडीत बसतात आणि परतीच्या प्रवासाला लागतात..

मितांश अजूनही धक्क्यात असतो,

"कसा वाटला आमचा सीड इन्व्हेस्टर्? सीड पेरतो तो, मोठा शेतकरी आहे.."

"पण एकदम इतके पैसे?"

"अरे एखादा मोठा शेतकरी इतका श्रीमंत असतो की तुमचे ते इन्व्हेस्टर्स कामाला ठेऊ शकेल..पण शेतकरी शेवटी साधा भोळा माणूस, दिखावा आवडत नाही त्याला.."

🎭 Series Post

View all