फॅमिली प्रायव्हेट लिमिटेड -8

Challenge Accepted !



लग्नाची सांगता एका गंभीर परिस्थितीने झाली. वाद चिघळला होता, नातलग, भाऊबंदकी हे सगळं झूठ आहे असं म्हणणारा मितांश विरुद्ध नातलग हे भक्कम आधार असतात यावर ठाम असणारे इतर हा संघर्ष सुरू झालेला.

गाडीत मितांश आणि त्याचे आई वडील होते. गाडी मितांशचे वडील चालवत होते. काहीवेळ सर्वजण चिंतेत शांत बसलेले, मग मितांशला ते बोलले..

"तू आज खूप बोलून गेलास मितांश, हे सगळं बोलायला नको होतं"

मितांश आधीच त्याच्यावर कोसळलेल्या संकटाचा विचार करत होता, त्यात अजून हे सगळं झालं. आपण उद्धट वागलो हेही त्याला कळत होतं. त्याने मौन राखणं पसंद केलं.

दुसऱ्या दिवशी माधव मितांशला भेटायला आला,

"काय मग, कसं झालं लग्न?"

माधवच्या या प्रश्नाला उत्तर न देताच मितांश खोलीत निघून गेला. मग मितांशच्या आई वडिलांनी माधवला घडलेली सारी हकीकत सांगितली.

"मावशी काका तुम्ही काळजी करू नका, मी बोलतो त्याच्याशी."

माधव त्याच्या खोलीकडे जाणार तोच दारात एक मोठी गाडी उभी राहिली, मितांशचे काका, मामा, आत्या, बहिणी, भाऊ सर्वजण त्यातून उतरले.

"कुठेय मितांश, बोलवा त्याला.."

मोठे काका ओरडले.

मितांशच्या आई बाबांनी म्हणाले,

"हे बघा काल झालेल्या प्रकरणाबद्दल आम्ही तुमची माफी मागतो, पण त्याला आता काही बोलू नका, फारच डिस्टर्ब झालाय तो.."

"म्हणूनच आम्ही आलोय, काल काय म्हणलेला? नातलग काय करतील म्हणून? तेच सांगायला आलोय आम्ही..त्याला म्हणा आम्ही तयार आहोत तुझ्या कंपनीत काम करायला..सकाळीच सत्यनारायणची पूजा आटोपली अन नव्या नवरीकडे घर सोपवून इकडे आलोय"

माधव पुढे आला,

"काका तुमचं क्षेत्र आणि मितांशचं क्षेत्र यात जमीन आसमानचा फरक आहे, तुम्ही कशी मदत करणार त्याला?"

"असुदेत ना फरक..आता त्याच्या कंपनीले सोडून गेलेले होते ना त्याच्याच क्षेत्रातले? काय झालं?..फरक इतकाच, की ते पैशासाठी काम करत होते, आणि आम्ही आमच्या लेकाला पुन्हा उभं करण्यासाठी काम करणार आहोत.."

मितांश वरून सगळं ऐकत होता, तो खाली आला..सर्वांसमोर उभा राहिला..हात जोडून म्हणाला,

"तुम्ही दाखवलेल्या सौजन्याबद्दल मी खूप आभारी आहे, आणि कालच्या प्रकाराबद्दल दिलगीर सुद्धा. ही माझी लढाई आहे, मला लढू द्या.."

"नाही पोरा, तू आव्हान दिलंस काल आम्हाला..आता आम्ही मागे हटणार नाही..तुला पुन्हा उभं केल्याशिवाय आम्हाला चैन पडणार नाही..आणि तसं केलं नाही तर नातलग म्हणून थू आमच्या जिंदगानी वर.."

आता यांच्यापासून कशी सुटका मिळवावी याचा विचार मितांश करत असताना माधव पुढे आला आणि म्हणाला,

"काय हरकत आहे मितांश? एक संधी द्यायला हवी.."

"माधव? तुला कळतंय का तू काय बोलतोय?"

"हो...हे बघ मितांश, सॉरी पण आता असंही तुझ्या हातात काहीही उरलेलं नाहीये..मग एक संधी यांना द्यायला काय हरकत आहे? Something is better than nothing !"

मितांशचे वडील पुढे आले आणि म्हणाले,

"मलाही तेच वाटतंय..हे बघ मितांश, अमेरिकेत तू जी कंपनी सुरू केलेली ना तीच इथे सुरू कर..भारतात. पुन्हा नव्याने..तेच काम, तेच सॉफ्टवेअर इथल्या लोकांसाठी बनव.."

"कल्पना वाईट नाहीये...मलाही पॉजिटीव्ह वाटतंय.." - माधव

"मला एक दिवस द्या विचार करायला.."

मितांशने एका दिवसाचा वेळ मागून घेतला. सर्व नातलग त्याच्या घरीच थांबले. घर खूप मोठं होतं त्यामुळे सर्वांची ऐसपैस सोय झालेली.

मितांशने रात्रभर विचार केला..
त्याची कंपनी आणि हे नातलग, यांच्यातील साम्य शोधण्याचा प्रयत्न करत होता..

त्याच्या डोळ्यासमोर एकेक गोष्टी फिरू लागल्या..

काकुचं लग्नातील व्यवस्थापन..

मामीची निरीक्षणशक्ती..

मावसबहिणींचे संपर्क..

मामाची तत्परता..

आत्याचा उत्साह..

मावशींचे वाक् चातुर्य..

काकांची अचूकता..

क्रमशः


🎭 Series Post

View all