फॅमिली प्रायव्हेट लिमिटेड-7

नातलगांना आव्हान..कंपनी तुम्ही उभी करून द्याल?
लग्नाचा दिवस उजाडला, एकच लगबग सुरू झाली. मितांशचे आई बाबाही त्यांच्या गडबडीत. मितांश सोबत त्याचा मावसभाऊ होता, त्याला सोबत म्हणून त्याचा जवळच असायचा. पण डोळे मोबाईल मध्ये, मितांशने विचारलं,

"इंजिनिअरिंग नंतर काय ठरवलं आहेस?"

हा प्रश्न ऐकताच तो संकटात सापडला, कारण ते अजून ठरलेलं नसल्याने उत्तर काय द्यावं हा प्रश्न, त्यात त्याला ड्रॉप पडलेला, वर्षभर घरी.

"विशेष काही नाही, बघू.."

असं म्हणत तो अंघोळीला गेला..मितांशला भावाबद्दल खरं तर वाईट वाटलं, तो अयशस्वी आहे म्हणून नाही, तर जीवनाचा मार्गच त्याने अजून निश्चित केला नाही म्हणून.. मितांशला वाटायचं की त्याला मार्गदर्शन करावं.. पण तसा विचार आला की लगेच कंपनी आठवायची, आपण स्वतःच अयशस्वी असतांना त्याला काही सांगणं म्हणजे अपराधी वाटायचं त्याला.

सर्वजण आवरून लग्नाच्या ठिकाणी पोचले.

काकू नेहमीप्रमाणे तिच्या नियोजनानुसार सर्व काटेकोरपणे सांभाळत होती. मुलाकडची बाजू असल्याने लग्नात फार काही काम नव्हतं, पण आलेल्या प्रत्येक पाहुण्याची विचारपूस चालू होती. काका नेहमीप्रमाणे काकूच्या भरवश्यावर सर्व आटोपत होते. मोठ्या काकांची नजर काहीतरी कुरापत काढण्याकडे होती. मावश्या आईसोबत फिरत एकेका नातेवाईकाशी ओळख करून घेत होत्या, आत्या आणि मावसबहिणींचा फोटो चा कार्यक्रम सुरूही झालेला. मामा खिशात चार फोर व्हीलर च्या चाव्या आणि त्यांचे चार ड्रायव्हर सोबत घेऊन फिरत होते. कधी काय लागेल सांगता येत नाही, त्यासाठी अगोदरच ही व्यवस्था.

शेवंती आणायचा कार्यक्रम मंदिरात झाला, तिथून वाजतगाजत लग्नाच्या ठिकाणी वरात पोचली, मितांश सगळं बघत होता..त्याला अमेरिकेतील लग्न आठवली..थोडक्यात थोडी लग्न व्हायची, इतका फाफटपसारा नव्हताच. काय तो एकेक कार्यक्रम.. शंभर वेळा उपरणं, टोपी घाला, नारळ द्या, पूजा करा, ओवाळा..

एकदाची टाळी लागली, वरमाला घातल्या..जेवणाकडे लोकांची झुंबड उडाली. फोटो सेशन, भेटीगाठी सुरू होतं. काही तासात बिदाई चा कार्यक्रम होऊन सर्वजण घरी परतणार होती, खरं तर आधी मितांशला वाटे, कधी एकदाचं लग्न संपेल म्हणून..पण ती घटना झाल्यापासून त्याला घरी जाणं नकोसं वाटू लागलं, इथे माणसांच्या घोळक्यात तो अधूनमधून सगळं विसरत तरी होता.. घरी गेला की पुन्हा तेच...

कन्यादान झाले, बिदाईचा कार्यक्रम झाला. जवळपास सगळे पाहुणे घरी गेलेले आणि आता फक्त जवळचे नातेवाईक तेवढे उरले होते. नवरीचं सामान गाडीत ठेवलं जातं होतं, इकडे मुलाकडचे सगळे पाहुणे खुर्चीवर निवांत बसले होते गप्पा मारत, मितांश सुद्धा बसलेला त्यात.

मितांश मोबाईल बघत होता, एक मेल आला..

त्यात असं होतं की ज्या इन्व्हेस्टर्स ने कंपनीत पैसे गुंतवले होते ते आता करार मागे घेताय..

मितांश वर आभाळ कोसळलं,

एका ठिकाणी दुसरे एम्प्लॉयी घेऊन कंपनी सुरू ठेवायची अशी एक आशा असताना दुसरीकडे कंपनीचा स्रोतच बंद पडला..मितांश सुन्न झाला. आपण इकडे आलो अन आठवडा भरात इतकी उलथापालथ झाली, आपण तिथे असतो तर एम्प्लॉयीसोबत बोललो असतो , इन्व्हेस्टर्स सोबत बोललो असतो..त्यांना भेटलो असतो,फोन अन मेलला उत्तर देत नव्हते ते..इकडे आपण का आलो याचा त्याला पश्चाताप व्हायला लागला..

सगळं संपलं होतं..

मावसभावाच्या वडिलांनी हळूच विषय काढला..

"मितांश..आमच्या गणूचं शिक्षण झालं की लाव तुझ्याकडेच कामाला."

"आमच्या सोनीला पण बघ जरा काम, तुझ्या भरवशावर आता सगळं.."

"खरंच कौतुक आहे या मुलाचं, अमेरिकेत जाऊन स्वतःची कंपनी आणि लाखोंची उलाढाल करतोय..."

मितांश काहीही उत्तर देत नव्हता, तो उत्तर देत नाही म्हणून सगळे त्याला म्हणू लागले,

"करशील ना काम? करशील ना काम?"

हे शब्द त्याच्या कानात घुमू लागले, एम्प्लॉयी सोडून गेलेल्या चे मेल, रिकामी कंपनी आणि आता परत इन्व्हेस्टर्स चा मेल..त्याची सहनशक्ती संपली होती..तो मोठ्याने उठून उभा राहिला..

"नाहीये काही...सगळं संपलं आहे, मी संपलो आहे...सगळं संपलं आहे.."

त्याचा आवाज ऐकून सर्वजण धावत आले..

याला असं अचानक काय झालं म्हणून सर्वजण त्याच्याकडे बघत होते, काका मामा विचारू लागले, काय झालं?

मितांशचे डोळे लाल झाले होते, अंग थरथरत होतं..त्याचा पारा चढला,

एक खुर्ची हातात घेऊन जोरात त्याने जमिनीवर आपटली,

सर्वजण घाबरले, मितांशचा मावसभाऊ त्याला आवरायला जवळ जाताच त्यालाही मितांशने दूर लोटलं...

मितांश ओरडू लागला..

"झालं तुम्हा सर्वांचं समाधान? आलो ना लग्नाला? मी आल्यामुळे काही फायदा नुकसान काही झालंय? नाही ना? पण तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे मी माझं काम सोडून इथे वेळ वाया घालवायला आलो आणि तिकडे सगळं चक्र बिघडलं..सगळं धुळीस मिळालं..चार चार दिवस लग्नात वेळ वाया घालवायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? कसं वाटणार, कामधंदे हवेत ना दुसरे...तुमच्या सारख्यांना ठीक असेल हो, पण माझं सगळं सगळं गेलं.."

मितांश शुद्धीत नव्हता, काहीबाही बोलत होता. हे सगळं झालं तेव्हा तो तिथे नव्हता, इथे आल्यामुळे तिकडे दुर्लक्ष झालं ही समजूत करून घेऊन तो सर्वांना दोषी ठरवत होता.

मितांशचे मोठे काका चिडले,

"मितांश काहीही बोलू नकोस, स्वतःच्या परिस्थितीला माणूस स्वतःच कारणीभूत असतो..दुसरा नाही. आणि हे लग्न, हे विधी यांना नावं ठेऊ नकोस, परंपरागत पद्धतीने आले आहेत ते आपल्याकडे..आपली संस्कृती आहे ती. आणि काय म्हणालास? वेळ वाया घालवायला? कामधंदे नाहीत आमच्याकडे? अरे शेतीला एक दिवस एखादं काम चुकलं तर पीक वाया जातं आमचं, एकेक क्षण महत्वाचा असतो आमच्यासाठी, तरीही ती सोय लावून लग्नकार्यात हजेरी लावतो आम्ही. वेळ घालवायला नाही, नातेवाईकांना भेटण्यासाठी... आपण आज जे काही आहोत त्यात समाजाचा आणि नातलगांचा मोठा वाटा असतो, त्यांच्याबद्दल नाळ जोडून ठेवण्यासाठी हे लग्नप्रसंग म्हणजे आम्ही एक माध्यम मानतो. कायम चुलीपाशी असलेल्या बाईला इथे चार क्षण आनंदाने नाचता येतं, भाऊबंदकीच्या घोळक्यात बसलो ना की एक भक्कम आधार जाणवतो,..तो तुला कधीच कळणार नाही, पैसे फेकून माणसं विकत घेणारी पिढी तुमची.."

आपण जास्त बोलून गेलो हे मितांशला समजलं, तो काहीसा वर मला..पण डोक्यातून अजूनही ते जात नव्हतं.. काकांना त्याने प्रतिउत्तर दिलं..

"भाऊबंदकी, भक्कम आधार, नातलग...हे आपली साथ सोडत नाहीत असं म्हणताय ना? मग सांगा...माझी कंपनी बंद पडली आहे, गुंतवणूकदारांनी पैसे मागे घेतले...मोठ्या संकटात आहे मी...काय करणार भाऊबंदकी? सांगाच तुम्ही...पुन्हा उभी करणार? इंग्रजी लिहिता वाचता न येणारी तुमची पिढी, सांगा माझ्या कंपनीला पुन्हा उभं करू शकाल? नातेवाईक, भाऊबंदकी इतका पुळका असेल तर आता देऊ शकाल मला आधार? नाही ना...या सर्व फक्त बोलायच्या गोष्टी आहेत..नातेवाईक म्हणजे फक्त वेळ खायला तेवढं जमतात, त्या पलीकडे काहीही नसतं.."

"बस्स मितांश.. बस्स...खूप झालं तुझं. तुला असं वाटतंय ना की या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत, तर मी तुला शब्द देतो..तुझी कंपनी उभी करायला तुझे हे नातेवाईक तुला साथ देतील..जीवाचं रान करून तुला पुन्हा उभं करू..ना अमेरिका ना कुठला पैसा...आता आम्हीच दाखवून देऊ भाऊबंदकी म्हणजे काय ताकद असते ते.."

मितांशचे सर्व भाऊ अन बहीण पुढे सरसावून बोलले..

मितांश हसायला लागला..

"काय करणार तुम्ही? सांगा ना, काय करणार? मॅनेजमेंट करणार? मार्केटिंग करणार? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणार? काय करणार ते सांगा फक्त.."

"तुझ्यासाठी वाट्टेल ते करू शकतो.."

मितांशचे मामा,काका, आत्या सगळे पुढे सरसावले आणि आश्वासन दिलं..

मितांश वैतागला.. गाडीत जाऊन बसला..


🎭 Series Post

View all